Pages

Monday, December 17, 2012

उत्तर

इच्छा आणिक पूर्तीइतके अपुल्यामधले अंतर आहे
कळून चुकले आहे अन् हा प्रवासही जीवनभर आहे!

वाटेवरच्या खुणेऐवजी तुझे नि माझे नाते ठेवू
साथ सोडता चुकण्याचे भय पदोपदी वाटेवर आहे

जगण्यामध्ये सदा असावे दु:ख पुरेसे सुखावणारे
सुखी बनविण्याची ताकद या सुखात अगदी कणभर आहे

स्पर्शामध्ये नाहित आता भास मुलायम स्मरणांमधले
स्मरणांमध्ये अजून हळव्या स्पर्शामधली थरथर आहे

पहाल बाहेरून मनाला, दिसेल पडक्या गढीप्रमाणे
आत रहा, मग कळेल तेथे, कुणाकुणाचा वावर आहे!

जाता जाता प्राणांसोबत प्रेमच माझे ने बेलाशक!
कळेल तुजला साथ तुला माझ्या प्रेमाची कुठवर आहे!

नकोस घेऊ शपथा आता, नकोस देऊ जुने दाखले
तुझे वागणे उत्तर होते, तुझे वागणे उत्तर आहे

काळाने फाडून टाकली स्पर्शांनी बनलेली झालर
स्पर्श न होताही बसलेला पीळ अजुनही कणखर आहे

चवीचवीने जगता जगता आयुष्याला गोडी आली
मला खातरी झाली की मृत्यु याहुनही रुचकर आहे!

- नचिकेत जोशी (२४/५/२०१२)

(पूर्वप्रकाशित - मायबोली.कॉम दिवाळी अंक २०१२ - http://vishesh.maayboli.com/node/1241 )