Pages

Thursday, September 1, 2016

वि. ग. कानिटकर - RIP Sir!

वि. ग. कानिटकर गेले... माझा एक खूप आवडता लेखक काळाच्या पडद्याआड गेला. 'चर्चिल', 'नाझी भस्मासुराचा उदयास्त', 'अब्राहम लिंकनः फाळणी टाळणारा महापुरूष' अशी त्यांची फक्त तीन पुस्तके आजपावेतो वाचली आहेत, पण त्यातलं प्रत्येक पुस्तक कितीतरी वेळा वाचलंय याची नोंदच नाही.

'नाझी...' सगळ्यात पहिल्यांदा वाचलं. तेही जवळजवळ २००० साली. तेव्हापासून हिटलर आवडायला लागला. विशेषतः १९२४ ते १९३९ पर्यंत हिटलरने भल्याभल्या महासत्तांना गुंडाळत आपल्याला हवं तसंच सगळं युरोपात घडवून आणलं, त्याची सखोल आणि अतिशय विस्तृत माहिती वाचून तर हिटलरबद्दल कौतुकच वाटलं होतं. Concentration Campsची प्रकरणं वाचून त्याचा तितकाच रागही आला होता. हे श्रेय कानिटकरांचं. अतिशय संतुलित पद्धतीने, जरी हिटलर त्या पुस्तकाचा नायक असला, तरी त्याचे गुण आणि दोष, यश आणि अपयश, तितक्याच ठामपणे मांडण्याची शैली खूप आवडली. पुस्तकाच्या नावातच 'भस्मासूर' शब्द वापरून हिटलर युरोपात टिकणं किती घातक ठरलं असतं हे सूचकपणे सांगितलं. पुस्तक संपताना 'भले हिटलरचे युद्ध डावपेच, आंतरराष्ट्रीय राजकारणातली समज तत्कालीन नेत्यांपेक्षा कितीही प्रगत असली तरी त्याचा नाश झाला ते बरंच झालं' अशीच भावना माझी तरी झाली. चर्चिलशी पहिली ओळख झाली ती 'नाझी...' मध्येच.

शालेय इतिहास शिकताना 'अ‍ॅटली पंतप्रधान झाला म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळालं, चर्चिल पुन्हा पंतप्रधान झाला असता तर ते शक्य नव्हतं (म्हणजे चर्चिल चांगला नव्हता हे अनुमान)' एवढंच शिकलो होतो. चर्चिलची महती माहित करून घ्यायची असेल तर हिटलरशी ओळख करून घ्यावीच लागते. एकदा ती झाली की मग चर्चिल अजून मोठा वाटायला लागतो. इंग्लंडवरचं आणि लोकशाहीवरचं त्याचं आत्यंतिक प्रेम, आणि खंबीर युद्धनेतृत्त्व हे सगळं कानिटकरांच्या 'चर्चिल'मधून कळलं. १९३४ ते १९३९ ही पाच वर्षे हिटलर सत्तेवर असताना नेमका इंग्लंडमध्ये चर्चिल सत्तेबाहेर होता आणि त्यामुळे इतिहास कसा बदलत गेला, हा दैवदुर्विलास कानिटकरांनी दोन्ही पुस्तकातून नेमकेपणे पोचवला. किंबहुना, हिटलर आणि चर्चिल यांच्यामध्ये जवळजवळ पंधरा वर्षे समान असल्यामुळे (१९३० ते १९४५) अनेक गोष्टी दोन्ही बाजूंनी वाचायला मिळतात. माझ्यासारख्या इतिहासप्रिय वाचकासाठी ही पर्वणीच. विसाव्या शतकात जग बदलून टाकलेल्या दोन प्रभावी नेत्यांकडे बघायची दृष्टी मला कानिटकरांच्या ह्या पुस्तकातून मिळाली, हे माझं भाग्य वाटतं.

एकोणिसाव्या शतकातही असाच एक नेता जगावर प्रभाव टाकून गेला. 'फाळणी टाळणारा महापुरूष' या विशेषणाने तर कानिटकरांनी एकाच वेळी अनेक मुद्द्यांना स्पर्श करून टाकला. अब्राहम लिंकनचं त्यांनी लिहिलेलं चरित्रही असंच माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि अनेकवेळा वाचावं असं आहे.

त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातली अजून दोन पुस्तकं आता लिस्टवर आहेत. माझ्याकडून हीच त्यांना श्रद्धांजली. You will always be remembered Sir!

- नचिकेत जोशी (१/९/२०१६)