Pages

Showing posts with label गझल. Show all posts
Showing posts with label गझल. Show all posts

Monday, February 20, 2017

समर्पण

जेव्हा विचार आला, दोघांस चिमुकलीचा
त्यांनाच विसर पडला कोर्टातल्या सहीचा!

झाला असा चुकीचा भलताच बोलबाला
दोघातल्या खर्‍या पण -  स्वप्नातल्या मिठीचा

प्रत्यक्ष सांगण्याची हिंमत कधीच नव्हती
वायाच जन्म गेला, त्याच्यातल्या कवीचा

बिलगून वाट जावी, माझ्यातुझ्या ठशांना
रानास भास व्हावा आजन्म सोबतीचा

प्रेमी कुणी बुडाला, खळबळ तिच्या तळाला!
अवघा प्रवाह गेला बदलून मग नदीचा

व्हावे असे समर्पण, की श्वास संथ व्हावा!
लवलेशही नसावा प्रेमात घुसमटीचा

- नचिकेत जोशी (३/२/२०१७)

Tuesday, February 7, 2017

प्रामाणिक

मी असे नाही म्हणत की, प्रेम हे वैश्विक असू दे
प्रेम कुठलेही असू दे - फक्त प्रामाणिक असू दे

पूर्ण मेसेज् वाचण्याचे कष्ट वाचावेत माझे -
तर तुझ्या नाकारण्याला एक प्रास्ताविक असू दे

एकमेकांना दिला होकार पण, तेव्हाच ठरले -
या नव्या लिव्ह-इनमध्येही सर्व तात्कालिक असू दे

नेमक्या वाक्यात निर्माता गरज सांगून गेला
'गोष्ट कौटुंबिक असू दे फायदा आर्थिक असू दे'

आत जाताना तुझा दर्जा मुळी विसरून जा तू
आर्जवे कर, शक्य तितका चेहरा अगतिक असू दे

तो कवी अन्, ती समीक्षक! वादळी चर्चा बिछानी!
"आपला शृंगारही का गहन वैचारिक असू दे?"

थेट बोलू आणि मिटवू आपल्यामधला दुरावा
यापुढे अंतर तुझ्यामाझ्यात भौगोलिक असू दे

एवढे झेलून धोके, मी तुझ्या दारात आलो
आज शेवटचीच इच्छा - घाव प्राणांतिक असू दे!

- नचिकेत जोशी (७/२/२०१७)

Friday, February 3, 2017

पेशा

ह्या रेषेच्या पुढे मनाची सत्ता नाही
ह्या रेषेच्या आत मनाची इच्छा नाही

कोण ठरवते, कुणी कुणावर प्रेम करावे?
नियतीही मुक्काम ठरवते - रस्ता नाही!

तुला वाटते त्यापेक्षा हे सुंदर आहे
होकाराची ह्या वाक्यास अपेक्षा नाही!

आकाशाचेही आंदण पिल्लास मिळाले
अजून त्याच्या पंखांचाही पत्ता नाही

सहनशीलता म्हणू यास की हतबल जगणे?
प्रश्न जागतिक आहे, माझ्यापुरता नाही

आपण करतो बंद आपले स्वप्नझरोके
मर्यादांना कुठलीही मर्यादा नाही

नाते विश्वासू आहे, पण नको भेटणे -
तुला भेटल्यावर माझाच भरवसा नाही

जरी चेहरे चिकार येथे, बघू कशाला?
नटलेले सारेच, एकही हसरा नाही

कधीतरीही लिहून फिटते हौस जिवाची
आणि तसेही, लिहिणे माझा पेशा नाही!

- नचिकेत जोशी (२/२/२०१७)

Thursday, February 2, 2017

कहाणी

पूर्वी जनता भले शहाणी नव्हती
सध्याइतकी तरी अडाणी नव्हती

त्या काळी ही असली गाणी नव्हती
बाजारीही खोटी नाणी नव्हती

बालपणी पक्षीही दोस्तच होते
चिमणीसुद्धा माणुसघाणी नव्हती

रबराइतके लवचिक होते नाते
तुटण्याइतकी ताणाताणी नव्हती

रस्ते होते शोधत रस्ता अपुला
त्या गावाला जुनी कहाणी नव्हती

माघारीची आज्ञा कुठून आली?
हरण्याची कुठलीच निशाणी नव्हती

तो सार्‍या विश्वाचा राजा होता
ती तर गावाचीही राणी नव्हती

- नचिकेत जोशी (२/१०/२०१४, अश्विन शुद्ध अष्टमी)

Tuesday, November 8, 2016

घुसमट

समोर आला रस्ता म्हणुनी निघून गेलो
जन्माला आलो होतो मग जगून गेलो

तिला मिळाल्या फुटक्या काचा, भग्न आरसे
तुकड्या-तुकड्यांमधे तिला सापडून गेलो

प्रेम दिले तेव्हाही झाली घुसमट माझी
प्रेम मिळाले तेव्हाही गुदमरून गेलो

हरेक जन्मी साथ द्यायला तयार झालो
एका जन्माच्या अर्ध्यातच दमून गेलो

वार्‍यावरती फडफडणारे पानच होतो
सुगंध आला नशिबी अन् दरवळून गेलो

- नचिकेत जोशी (४/११/२०१६)

Monday, August 8, 2016

मित्रा!

तसे पाहता खूप दूरचे होते अंतर मित्रा
तुझ्या सोबतीने येताना झाले सुंदर मित्रा!

किती ठिकाणी पडलो, रडलो, काचांवरती चिडलो!
जखमांवरती तुझी नेहमी आली फुंकर मित्रा!

अता अवेळी कट्ट्यावरची दिसू लागते मैफल
रमून जातो स्मरणांपाशी मग मी क्षणभर मित्रा!

शिक्षण घेताना पडलेले प्रश्न मोजके होते!
तीच उत्तरे शोधत फिरतो आता जगभर मित्रा!

फार लांबच्या स्वप्नांमागे धावत आहे नुसता
दिसते आहे सर्व जवळचे हल्ली धूसर मित्रा!

एकेकाळी वाटायाचे क्षण अपुरे दोघांना
आता नाही वाटत याचे नकोच उत्तर मित्रा!

या मैत्रीचा सुगंध जपणे हीच तिची सार्थकता!
सांग कधी जपता येते का मुठीत अत्तर मित्रा?

तसा एकट्यानेही जमला असता प्रवास सारा
दोघे असल्यामुळे पोचलो बहुधा लवकर मित्रा

कृतज्ञ मी राहीन नेहमी, अमोल या नात्याशी
अजून आहे बोलायाचे - बोलू नंतर मित्रा!

- नचिकेत जोशी (३०/९/२०१४, अश्विन शुद्ध षष्ठी)

Friday, August 5, 2016

... श्रावणाला

दाटते आभाळ त्याच्या स्वागताला
गाठते क्षितिजावरी त्या पावसाला

साजणीला भेटण्या आतूर झाला
वाट आभाळातली सोडून आला

मुक्त पागोळ्या उड्या घेतात खाली
चिंब रांगोळी सुवासिक अंगणाला

थेंब ओघळले तिच्या देहावरी अन्
गंध मोहरता नवा मातीस आला

भेट होऊ द्या अशी एकांत जागी!
पाठवा जमिनीत भिजलेल्या नभाला

वाट ओली पावलांना साद घाली
रान ओले दाखवी भय पाखराला

सातही रंगांमध्ये पाऊस मनभर!
काजळाचा रंग माझ्या श्रावणाला!

- नचिकेत जोशी (१७/६/२०१४)

Monday, July 4, 2016

पाउस

तिची आठवण येता, क्षणात भरतो पाउस
कोर्‍या ओळींमध्येही कोसळतो पाउस

पागोळ्यांच्या धारेखाली फुटते माती
खळग्यामध्ये स्वतःशीच मग भिजतो पाउस

चिंब फुलांच्या देहांवरचे नवथर यौवन
ढगात लपलेल्या थेंबानी टिपतो पाउस

ओढे, नाले, विहिरींमध्ये जाउन बसतो
पहा केवढा तहानलेला असतो पाउस!

कधीकधी आभाळ रिकामे होते सारे!
इतके कुठले ओझे हलके करतो पाउस?

त्याची चाहुल येता तीही गंध प्रसवते
मिठीत शिरता मातीच्या मोहरतो पाउस

कॉफी, भेटी, कट्टे सारे पुसून जातो
गालांवरती एकटाच ओघळतो पाउस

- नचिकेत जोशी (२८/७/२०१४)

Monday, May 30, 2016

... करून पाहू!

मनात आहे ते ते सारे लिहून पाहू
मनासारखे कुठेतरी बागडून पाहू

पाटी पुसली आहे सारी गतकाळाची
आता केवळ रेघोट्या आठवून पाहू

अजून त्यांचा ताबा आहे मंचावरती
ताबा घेण्यापूर्वी खाली बसून पाहू

धापा टाकत जातो कायम जिकडेतिकडे
आयुष्यच हे श्वासामध्ये भरून पाहू

भेटायाला तिने घातली आहे बंदी
तिच्याभोवती भासांमधुनी फिरून पाहू

कधी ना कधी तिथे जायचे आहे नक्की!
इथून जाण्यापूर्वी इथले असून पाहू!

नकोच आता कोणाचीही वाट पाहणे
स्वतः स्वतःची सोबत बनुनी, निघून पाहू

नचिकेत जोशी (१०/६/२०१३)

Monday, April 25, 2016

डायरी

केव्हातरी सोशिकपणा माझ्यातला संपेलही
ठेवायला डोके मला खांदा तुझा लागेलही

तंद्रीमध्ये काही बिया थुंकून ती गेली पुढे
कुठली तरी रुखरुख तिची मातीतुनी उगवेलही

नात्यातही धोरण हवे - आत्ता कुठे कळले मला!
निष्ठेतला निष्फळपणा माझा मला उमगेलही

काही दिवस सांभाळली होती तिची मी डायरी
माझ्यातल्या खोलीमध्ये घुसमट तिची नांदेलही!

बोलावणे आले मला, अद्यापही आली न ती
इतक्यात सांगावे कसे? येईलही, थांबेलही!

येणारही नाही कुणी शोधायला येथे मला
स्मरणांमध्ये आहे, उद्या दुनिया मला विसरेलही

- नचिकेत जोशी (१०/३/२०१६)

Tuesday, February 23, 2016

किती लांबचे रोज घ्यावेत वळसे...

'सुमंदारमाले'तला हा प्रयत्नच, स्वतःला तपासून बघतो जरा!
अशा दीर्घ वृत्तामध्ये व्यक्त होणे, जमावे मला, हेच परमेश्वरा!

**************

किती लांबचे रोज घ्यावेत वळसे...

कधी आठवावे, कधी विस्मरावे, असे हेलकावे - भिती वाटते!
जरी बंद केली कवाडे घराची, झरोक्यातुनी ऊन डोकावते

नको वाटते ही जखम पावसाची, जुन्या वेदना फक्त हिरवाळती
उन्हाच्या झळा आत शिरतात तेव्हा मनाची भुई खोल भेगाळते

मनाचे रकाने भरावेत असले विषय सापडू देत देवा मला
(तिची बातमी वाचती रोज डोळे, छबी मन तिची सारखी छापते!)

कुणी भाळतो क्षणभरी फूल पाहत, खुळे फूलही आत गंधाळते
प्रवासी स्वत:च्याच धुंदीत निघतो, बिचारे मुके फूल कोमेजते

तुझ्या मैफली गाजती रोज आता, शहरही तुला आपलेसे करी
जुने खास कोणी, तुझ्या ओळखीचे, तुला ऐकण्या कान टवकारते

पुन्हा त्याच कविता, पुन्हा तीच हुरहुर, पुन्हा तेच छळणे, स्वतःला स्वतः!
किती लांबचे रोज घ्यावेत वळसे, पुन्हा वाट तेथेच रेंगाळते

'नको दु:ख वाटून घेऊस काही, मुक्यानेच हे भोग भोगायचे'
दया फार माझीच येता मला मग, कुणी आतले छान समजावते!

नचिकेत जोशी (३१/५/२०१३)

Wednesday, January 20, 2016

कधीकाळी तुझ्यासाठी

मनाच्या खोल मातीने उन्हाळे सोसले होते
तरी मी पेरता स्वप्ने ऋतू पान्हावले होते

अबोला फार दिवसांचा तुझा हा अन तिथे माझ्या-
घराच्या स्वच्छ काचांवर धुके अंधारले होते

नसावी काय जगण्याला जरा खोली, जरा रूंदी?
तुम्ही नुसतेच श्वासांचे मनोरे बांधले होते

कळीचे फूल होताना तिथे मी नेमका होतो
जणू चोरून कवितेने कवीला गाठले होते!

अहो जे वाटते ना ते मला प्रत्यक्ष सांगा ना!
असे बरळून पाठीवर कुणाचे हो भले होते?

तशी ती भेट शेवटचीच होती आपुली तेव्हा
पुढे नुसतेच शब्दांना उरी कवटाळले होते

मला वाटायचे मजला फुलांनी गूज सांगावे!
(कितीही वाटल्याने का कुणीही आपले होते?)

नको दुस्वास दु:खाचा ठरवले मी, कुठे तेव्हा-
कुशीमध्ये सुखाच्या ते सुखाने झोपले होते

कधीकाळी तुझ्यासाठी दिला मी जीवही असता –
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते

- नचिकेत जोशी (२०/१/२०११)

Thursday, January 7, 2016

आभाळरस्ता

ओळ घेते गूढ गिरक्या, शब्द नाचवतो मला
एक साधा सरळ मिसरा ना कधी सुचतो मला

मी खरेतर एवढाही देखणा नाही मुळी
आरशामध्ये कुणाचा चेहरा दिसतो मला?

घोळके जमतात, गर्दी बदलते वाटेमध्ये
साथ शाश्वत जोखमीची फक्त मी करतो मला

भाग्य अन् दुर्भाग्य ठरते कोणत्या रेषेमुळे?
मीच हे घेऊन कुतुहल हात दाखवतो मला

भावते झुळझुळ तुम्हाला या नदीची लाघवी
डोह फसवा या नदीचा फार आवडतो मला

अर्थ शब्दांचा भलेही कळत नाही तेवढा
रोख आवाजातला पण नेमका कळतो मला

वाटते कित्येकदा की वाट मी व्हावे तुझी
पण तुझा आभाळरस्ता दूर हाकलतो मला

- नचिकेत जोशी (२२/९/२०१४)

Tuesday, June 16, 2015

कोरडा

नटून बसलेल्या बागेचा सोस तेवढा नाही
शोधत आहे ज्याला मी तो इथे केवडा नाही

ठरव तुझी तू तहान आधी, पाणी नंतर शोधू!
दुरून आलेला कुठलाही मेघ कोरडा नाही

शब्द तुझा घेऊन परततो, दाद-दागिने मोठे
त्या लक्ष्मीला भुलण्याइतका अर्थ भाबडा नाही

मैफल संपत असताना तो स्वतःशीच पुटपुटला -
ह्या नावाला टाळ्यांचा अद्याप तुटवडा नाही

गर्दीमध्ये इथल्या जो तो एकाकी जगणारा
हे बघताना मिळे दिलासा, मीच एकटा नाही!

नजर जगाची नको तेवढी पार पोचते हल्ली
एकहि कपडा देहावरचा तसा तोकडा नाही

'सॉरी' म्हटल्यावर हरल्याचा फील मला ना येतो
ईगो असला मला तरीही, तुझ्याएवढा नाही!

इतका प्रवास झाल्यावर हे, आता कळले आहे -
वाट वाकडी असेल माझी, पाय वाकडा नाही

- नचिकेत जोशी (२४/१०/२०१४)

Friday, October 17, 2014

आता नको!

(ज्येष्ठ गझलकारा संगीता जोशी यांची 'हे असे आभासवाणे चांदणे आता नको' ही ओळ व्हॉट्सअ‍ॅप वर एका गप्पांमध्ये मिळाली. त्यावर गझल लिहिण्याचा हा प्रयत्न.)

लाघवी बोलून हे नाकारणे आता नको
हे असे आभासवाणे चांदणे आता नको

एकट्याच्या सोबतीला ज्याक्षणी आलीस तू -
अन् मला वाटून गेले, थांबणे आता नको!

बहर ओसरताच आले भान वार्‍याला पुन्हा -
ह्या सुगंधाभोवती रेंगाळणे आता नको

त्या निरोपाच्या क्षणी ती बोलली नजरेतुनी -
एकही कुठलेच हळवे मागणे आता नको

मी मनाच्या जवळ आता जात नाही फारसा
खोल या डोहामध्ये डोकावणे आता नको

तूच बोलावेस आता, 'हो' म्हणावे मी तुला
पण अबोल्याच्या दिशेने खेचणे आता नको

यापुढे भेटायला तू नेहमी दिवसाच ये!
सावली लपवून कोठे भेटणे आता नको!

धूळ साचू दे जराशी आरशावरती तुझ्या
रोज डोळ्यांना तुझ्या तू फसवणे - आता नको!

वाट संपायास येता फार वाटू लागले -
ऐकणे आता नको अन् बोलणे आता नको

- नचिकेत जोशी (१७/१०/२०१४)

Thursday, August 14, 2014

क्षणिक उमाळे

देशावरचे प्रेम उफाळुन येते
फेसबूकची भिंत थरारून येते

झोपेमध्ये घोरत असतो कायम
जाग मनाला मध्येच दचकुन येते

पोट स्वतःचे भरले की मग सार्‍या -
उपेक्षितांची भूक जाणवुन येते

पुष्कळ चर्चा होते पेपरमध्ये
जनता नंतर रद्दी देउन येते

कर्तव्यांचे भान अचानक होता
भाषणसुद्धा टाळ्या घेउन येते

क्षणिक उमाळे बघून हसतो आता
दया स्वतःची स्वतःस पाहुन येते

देश बिचारा जिथल्या तेथे असतो
जबाबदारी खांदे बदलुन येते

पडेल हाही थर पोकळ भिंतींचा
वेळ कुणाची केव्हा सांगुन येते?

- नचिकेत जोशी (१४/८/२०१४)

(सर्वच काफियांमध्ये र्‍हस्व उकाराची सूट घेतली आहे.)

Wednesday, June 25, 2014

हुरहूर


एक खूप जुनी गझल पोस्ट करतोय...

वेगळे हे माणसांचे नूर आता
वाटतो सर्वांस मी निष्ठूर आता

मी स्वतःच्या ऐकतो गाणे मनाचे
समजुतींचा कोष झाला दूर आता

शेवटी तुजला हवे ते मिळवले तू
गमवल्याचा नाटकी का सूर आता?

शब्दही माझा जिथे कळलाच नाही
मौन का वाटे तुला मग्रूर आता?

राख झाली त्या अबोली भावनांची
आठवांचा येत आहे धूर आता

दु:ख वाटावे असे काहीच नाही
हीच आहे नेमकी हुरहूर आता

- नचिकेत जोशी (२२/७/२००८)