Pages

Wednesday, January 20, 2016

कधीकाळी तुझ्यासाठी

मनाच्या खोल मातीने उन्हाळे सोसले होते
तरी मी पेरता स्वप्ने ऋतू पान्हावले होते

अबोला फार दिवसांचा तुझा हा अन तिथे माझ्या-
घराच्या स्वच्छ काचांवर धुके अंधारले होते

नसावी काय जगण्याला जरा खोली, जरा रूंदी?
तुम्ही नुसतेच श्वासांचे मनोरे बांधले होते

कळीचे फूल होताना तिथे मी नेमका होतो
जणू चोरून कवितेने कवीला गाठले होते!

अहो जे वाटते ना ते मला प्रत्यक्ष सांगा ना!
असे बरळून पाठीवर कुणाचे हो भले होते?

तशी ती भेट शेवटचीच होती आपुली तेव्हा
पुढे नुसतेच शब्दांना उरी कवटाळले होते

मला वाटायचे मजला फुलांनी गूज सांगावे!
(कितीही वाटल्याने का कुणीही आपले होते?)

नको दुस्वास दु:खाचा ठरवले मी, कुठे तेव्हा-
कुशीमध्ये सुखाच्या ते सुखाने झोपले होते

कधीकाळी तुझ्यासाठी दिला मी जीवही असता –
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते

- नचिकेत जोशी (२०/१/२०११)

No comments: