Pages

Monday, December 17, 2012

उत्तर

इच्छा आणिक पूर्तीइतके अपुल्यामधले अंतर आहे
कळून चुकले आहे अन् हा प्रवासही जीवनभर आहे!

वाटेवरच्या खुणेऐवजी तुझे नि माझे नाते ठेवू
साथ सोडता चुकण्याचे भय पदोपदी वाटेवर आहे

जगण्यामध्ये सदा असावे दु:ख पुरेसे सुखावणारे
सुखी बनविण्याची ताकद या सुखात अगदी कणभर आहे

स्पर्शामध्ये नाहित आता भास मुलायम स्मरणांमधले
स्मरणांमध्ये अजून हळव्या स्पर्शामधली थरथर आहे

पहाल बाहेरून मनाला, दिसेल पडक्या गढीप्रमाणे
आत रहा, मग कळेल तेथे, कुणाकुणाचा वावर आहे!

जाता जाता प्राणांसोबत प्रेमच माझे ने बेलाशक!
कळेल तुजला साथ तुला माझ्या प्रेमाची कुठवर आहे!

नकोस घेऊ शपथा आता, नकोस देऊ जुने दाखले
तुझे वागणे उत्तर होते, तुझे वागणे उत्तर आहे

काळाने फाडून टाकली स्पर्शांनी बनलेली झालर
स्पर्श न होताही बसलेला पीळ अजुनही कणखर आहे

चवीचवीने जगता जगता आयुष्याला गोडी आली
मला खातरी झाली की मृत्यु याहुनही रुचकर आहे!

- नचिकेत जोशी (२४/५/२०१२)

(पूर्वप्रकाशित - मायबोली.कॉम दिवाळी अंक २०१२ - http://vishesh.maayboli.com/node/1241 )

Thursday, November 15, 2012

सोपस्कार

दाटते आहे निराशा फार हल्ली
देत नाही दु:खही आधार हल्ली

बंद काचेमागचे दिसते कुणाला?
लाजही करते खुला व्यभिचार हल्ली

प्रेम, नाती, दु:ख, शपथा, मौन, ओळी
वाटती हे फक्त सोपस्कार हल्ली

मुखवटे ती घालते जुलमी सुखाचे
वेदना जगते तिची लाचार हल्ली

सर्व कामे एकटा पैसाच करतो
भावना झाल्यात अन् नादार हल्ली

ठेचली जातात स्वप्ने शेकड्यांनी
धावते आयुष्य बेदरकार हल्ली

भेट अपुली हेच औषध फक्त आता
(हा नवा जडला मला आजार हल्ली)

सत्य हे सापेक्ष नव्हते पण तरीही -
रोज घेते ते नवे आकार हल्ली

कोणते संकट नवे येणार आता?
वारही करतेस तू हळुवार हल्ली!

उत्तरे देण्यास मी बांधील नसतो
प्रश्न मग मी ठरवतो बेकार हल्ली

सोसण्याची सवय झाली पाहिजे ना?
म्हणुन नाही करत मी तक्रार हल्ली

आणखी उरले कमी आयुष्य आता
हीच वार्ता आणतो अंधार हल्ली

नचिकेत जोशी (१०/११/२०१२)

Tuesday, November 6, 2012

'मै अपनी फेवरिट हूँ' अर्थात 'गीत'!


आयुष्य नामक प्रवासाला निघालेल्या प्रत्येक मुसाफिराची कहाणी वेगळी! आयुष्य म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशांतून प्रवास करत करत शेवटी एका शाश्वत मुक्कामाला पोचण्याची औपचारिकता! पण तो मुक्काम अटळ आहे, म्हणून प्रवास करायचं थोडीच टाळावं?

गीत - एक अतिशयच बिनधास्त तरीही भाबडी 'भटिंडा की सिखणी'! आयुष्य जगण्याच्या कल्पना अगदीच मोकळ्या-ढाकळ्या! तरीही खानदानी परंपरा, संस्कार, कुटुंब यांना मानणारी! आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर मनापासून प्रेम करणारी!

ट्रेनच्या प्रवासात तिला आयुष्याकडून फसवणूक झाल्यामुळे आयुष्यालाच कंटाळलेला 'आदि' भेटतो. तिथपासून सुरू झालेला हा प्रवास अखेर अनेक चढ-उतारांमधून पडद्यावर अपेक्षित शेवटाकडे पोचतो, पण मनात ठसा उमटवून जाते ते 'गीत'ची व्यक्तिरेखा!

'गीत'मध्ये मला सर्वाधिक भावला, तो प्रामाणिकपणा आणि कुठलाही अभिनिवेश नसणारा खुला स्वभाव! हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला होता, तेव्हा खरं सांगायचं तर मला 'अशी मुलगी प्रत्यक्षात असू शकते' यावर विश्वासच बसला नव्हता. पण 'हा एक चित्रपट आहे' अशी समजूत करून घेणंही मला तेव्हा पटलं होतं. नंतरच्या प्रत्येक पाहण्यात चित्रपटातील 'गीत' अधिकाधिक वास्तववादी वाटत गेली.

गीतचं आपल्यावर पहिलं इंप्रेशन पडलं ते एक अतिच बडबडी, जगाला सिक्रेट वाटाव्यात अशा गोष्टी अनोळख्याशीही शेअर करणारी - 'उथळ' म्हणून घ्यावं हिला अशी मुलगी! अगदी तिचं काहीही ऐकून न घेण्याच्या मनस्थितीत असलेल्या 'आदि'लाही आपण पळून जाणार आहोत, हे सांगणारी! अर्थात मुलींमध्ये एक उपजत शहाणपण असतेच. आदिचं तिकीट ती ट्रेनमध्येच काढून देते, टीसीला कन्विन्स करते, तो मध्येच ट्रेनमधून उतरून जातो तेव्हा त्याच्यामागे 'इन कपडोंमे, स्लीपर्स पहनके बादनगर नामके स्टेशनके प्लॅटफॉर्म' वर धावत जाते - त्याला सांगायला - की ट्रेन छूट रही है! तो रिस्पॉन्स देत नाही, आणि त्या गडबडीत तिचीही ट्रेन मिस होते. त्यावर ती सगळा राग त्याच्याचवर काढते आणि वर त्याला धमकीही देते की 'अब तुम मुझे भटिंडा छोडोगे - मेरे घर तक, और वो भी मेरे सामान के साथ!' गीत केवळ आदिवरच नाही, तर आपल्यावरसुद्धा अशी स्वतःला लादून घेते! या गीतला समजून घेतलं नाही तर 'कुणी सांगितलं होतं हिला या उठाठेवी करायला' हा प्रश्न चित्रपट संपल्यावरही आपली पाठ सोडत नाही. आणि गीत समजली, तर हा प्रश्नच उरत नाही!

पहिल्या भेटीत आदिला कितीही जवळ केल्यासारखं दाखवलं तरी, स्वत:च्या 'इज्जत' नावाच्या गोष्टीची तिला पुरेपूर जाणीव आहे. गीत स्वभावाने जितकी मोकळी आहे, तितकीच आत्मकेंद्रितही आहे! तिच्या प्रत्येक वागण्याला 'मै वही करती हूँ, जो मेरा दिल कहता है' चं समर्थन आहे. 'अकेली लडकी खुली हुई तिजोरीकी तरह होती है' म्हणणार्‍या स्टेशनमास्तरच्या वयाचा विचार न करता त्याला 'बुढ्ढे! तू अपना काम कर! बाकी मेरी प्रॉब्लेम है, मै संभाल लूंगी' असं तोडफोड उत्तर देण्याची हिम्मत तिच्या या मोकळेपणाने दिली आहे, आणि वेश्यांच्या रांगेतून सुटल्यावर आदिला भेटल्यावर पुन्हा त्याच्यावर स्वतःची जबाबदारी ढकलण्याची हिम्मत या आत्मकेंद्रितपणाने! 'तुम अपने कामसे काम नही रख सकती?' असा आदिने तिला विचारलेला प्रश्न आपल्याही ओठांवर येतो, आणि गीत तिच्या उपजत बिनधास्त उत्तराने तो मारून टाकते.

'डिसेंट' हॉटेलवाल्याच्या 'आपको रूम घंटोंके हिसाबसे लेंगे?' या प्रश्नाचा रोखच न कळलेली गीत 'हम रूम घंटों के हिसाबसे लेंगे' बोलून जाते, आणि आपण आदिच्या नशिबाला बोल लावतो. आणि या सर्वात कडी म्हणजे हीच गीत आदिला 'क्या खुसुरफुसुर कर रहे थे उसके साथ?' अशी हजेरी घेते आणि 'मै बस क्लीअर कर रही हूँ, तुम्हे कोई राँग सिग्नल न मिले' असं सुनावते. गीत इतकी प्रामाणिक आणि भाबडी आहे. जगाचे नियम, समज-गैरसमज यांची पर्वा न करता, स्वत:च्या विश्वात स्वतःच्याच समजुतींचे पंख लावून उडणारी!

तिच्या जगण्याच्या कल्पना जितक्या ओबडधोबड तितक्याच प्रभावीही आहेत. हॉटेल डीसेंट मध्ये आदिला ती "इस लडकीने तुम्हे डिच किया, जला दो इस फोटो को और हमेशा के लिये उसे अपनी जिंदगी से फ्लशआऊट कर दो" असा सोप्पा उपाय सुचवते! (आपलं भूतकाळात रमणारं मन 'ह्यॅ! याने काय होणार' असा बेकाम विचार करत राहतं!) एवढेच नव्हे, तर 'तुम्हे इससे अच्छी लडकी मिल जाएगी' असं दिलासाही देते! आदि आणि गीत यांचा तो सीन आत स्पर्शून जातो. उत्साहात सळसळणारी गीत आपल्यालाही आयुष्याकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन देऊन जाते.

तळ्याच्या वर अर्धवट डोकावणार्‍या फळीवर बसून दोघे सफरचंद खात असतात, तो सीनही असाच! 'मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगून घ्यायला हवा' हे ती किती सहज सांगून टाकते, आणि 'अब पागलपन ट्राय करो' असं म्हणून आदिला त्या तळ्याच्या पाण्यात उडी घ्यायला लावते. कारण? - काहीच नाही! पागलपन!! जगाच्या लेखी अशी माणसं खरंच विचित्र असतात नाही का?

'अंशुमन' नावाच्या विश्वात ती लवकरच स्वतःला सामावून टाकणार आहे, हे ती आदिला सांगून टाकते. पण "बाऊजी मानेंगे नही, लडका सीख नही है" ही अडचण आहे. यावर उपायसुद्धा तिने शोधला आहे - पळून जाऊन लग्न करणे! तिची चुलतबहीण रूपसोबत त्याने पळून जाऊन लग्न करावं आणि "फिर चारो इकठ्टे रहेंगे - पहाडोंमे! बडा मजा आयेगा!" अशी तिची कल्पना (जगाच्या दृष्टीने बकवास) आहे! ती याबाबतीत इतकी क्लीअर आहे, की जेव्हा आदि तिला सोडायला भटिंडा जातो, तेव्हा ती आदिला माघारी जाऊ देत नाही - कारण त्याने रूपला भेटावं!

ती अंशुमनसाठी वेडी आहे. आदिला तिची काळजीही वाटतेय आणि थोडं प्रेमही! अंशुमनशी कुठलाही संपर्क झालेला नसताना ती कायमची त्याच्याकडे जायला निघते तेव्हा ती आणि आदिचा टेरेसवरचा सीन - असाच! स्पर्शून जाणारा! आदि 'तिचं काय होणार' व्यावहारिक विचाराने बैचेन आहे, आणि ती त्याला 'कंसोल' करते. ती खरंच वेडी आहे, भाबडी आहे! अतिशय सोप्या शब्दात ती स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मांडते. 'ये जो वक्त है ना, ये बहुत अच्छा टाईम है! देखो, आगे चलकर हम इसे याद करेंगे और हसेंगे!' - झालं! न सांगता घरातून पळून जाण्याची चूक करत असल्याची थोडीफार भावना आहे, पण त्यावर 'आके उनके पैरोंपे गिर जाऊंगी' असं म्हणत फॅमिलीकडे परत यायचा प्रामाणिकपणाही आहे.

आदि तिला मनालीला अंशुमनच्या घराजवळ सोडतो आणि अंशुमनला न पाहताही स्वतःवर काबू ठेवत परततो तो एक नवीन आदि बनून! गीत नावाच्या दैवी स्पर्शाने त्याच्या आत्महत्येकडे निघालेल्या आयुष्याला पुन्हा झेप घेण्याची उभारी दिली आहे. प्रत्येक गोष्ट करताना त्याला आता "गीत असती तर तिने काय निर्णय घेतला असता" असा प्रश्न पडतोय आणि तो तसाच डिसीजन घेऊन मोकळा होतोय. त्याची कंपनी, त्याचे छंद, या सगळ्यांमध्ये तो आता मनापासून सामील झालाय. ती, तिचे विचार, तिचं वागणं जणू त्याच्यासाठी आता एक प्रेरणा बनलंय! काही माणसं इतकी प्रभावशाली असतात खास!

तिच्या नशिबात मात्र नियतीने वेगळंच वाढून ठेवलंय. तिचं प्रेमही तिच्यासारखंच आहे - भाबडं, मोकळंढाकळं, स्वत:च्या विश्वात रममाण झालेलं आणि जगाच्या दृष्टीने अव्यवहारी! अंशुमनबद्दलच्या तिच्या भावनेला ती प्रेम म्हणतेय, त्याच्यासोबतच्या संसाराची स्वप्नं, पडदे, ती रंगवून तयार आहे. या जगात अतिप्रामाणिक असणं, अतिशय सरळमार्गी असणं हा गुन्हाच आहे. समोरच्यावर आश्वासून प्रेम करणं हाही गुन्हाच! समोरच्याला गृहीत धरून त्याच्यावर प्रेम करणं हा तर सगळ्यात मोठा गुन्हा! गीतने हे तीनही गुन्हे कायमच केलेत! अंशुमन समाजाच्या सो कॉल्ड दबावामुळे तिला नाकारतो आणि त्याच्यासाठी अख्खं घरदार सोडून आलेली गीत उघडी पडते. स्वप्नांच्या दुनियेतून फेकली गेलेली गीत व्यावहारिकतेच्या या पहिल्या चटक्यातून सावरू शकत नाही! ती शिमल्यामध्ये एकाकी जगणं पत्करते. 'आओगे जब तुम साजना' या गाण्यातली आर्तता शब्दश: थेट पोचते.

एकीकडे आदि त्याला भेटलेल्या गीतसारखं जगायला लागतोय आणि गीत अपरिहार्यपणे आणि असहायपणे त्याला भेटलेल्या आदिसारखं! ती आदिलाही बोलवत नाही, आणि घरच्यांनाही. 'ये मेरी जिंदगी है' चं भूत अजून मानगुटीवरून उतरलेलं नाहीये! 'अंशुमन स्वीकारेल' या एकमेव भाबडी आशेवर ती अजूनही जगतेय.

थोडंफार साहस गोळा करून अंशुमन परततो आणि स्वतः तिच्या घरी जाऊन मागणी घालण्याचं तिला वचन देतो. तिच्यावर मनापासून प्रेम करणारा आदि दोघांना घेऊन शिमल्याहून घरी भटिंडाला जातो. घरी निघण्यापूर्वीचा त्या दोघांचा हॉटेलमधला सीन असाच! - स्पर्शून जाणारा! पहिल्यांदाच आदि भाव खाऊन जातो. 'शादी के बाद अपना पहला अफेअर तुम मेरे साथ कर लेना' हा त्याचा ड्वायलॉक काळजात अक्षरशः खोल जातो! पण 'तिला अंशुमनबद्दल अजूनही फीलींग आहेत' हे माहित असल्यामुळे स्वतःच्या भावना बोलून दाखवू शकत नाही. अखेर शेवटी गीत तिच्या जुन्या 'एक अजीबसा डर लग रहा था... कुछ गलत हो रहा है.. जैसे कोई ट्रेन छूट रही है' या स्वप्नातून बाहेर येते आणि 'सही ट्रेन 'पकडते'.

शेवटी चित्रपट म्हणजे दुसरं काय असतं? समाजमनाचं थोडं स्वप्नील, थोडं वास्तविक, थोडं भावुक, थोडं वेदनादायी असं प्रतिबिंबच ना? गीतच्या व्यक्तिरेखेला वास्तवाच्या धगीवरूनही चालायला लावून दिग्दर्शक इम्तियाज अलीने खूप छान बॅलन्स साधला आहे. 'जब वी मेट' या चित्रपटाने आणि त्यातल्या गीतने मला काय दिलं हे शब्दांत सांगताच येत नाही. काम करता करता कंप्युटरची विंडो मिनिमाईज करून 'जब वी मेट' केवळ 'ऐकणं' हाही आता सरावाचा भाग झालाय. अर्थात सकारात्मक दृष्टिकोन, आयुष्य भरभरून जगण्याची इच्छा, खुलेपणा, प्रामाणिकपणा हे तिचे सगळे गुण आदिच्या असण्यामुळे निष्ठूर व्यावहारिक जगात सावरून घेतले जातील हेही खरेच! गीत पूर्ण चित्रपटभर व्यापून राहिली असली तरी वास्तविक आयुष्यातही गीतला समजून घेणारा आदि भेटायलाच हवा, अन्यथा गीतसारख्या मनस्वी, मूडी आणि फक्त स्वत:च्याच मनाचं ऐकणार्‍या मुलीच्या स्वप्नांची राख होणार हेही कटू सत्य आहे! कदाचित त्याचमुळे काही कहाण्या पडद्यावरच पहायला चांगल्या वाटतात. गीत प्रत्यक्षात भेटलीच तर तिला आदिच्या नजरेतूनच बघता यायला हवं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. अन्यथा गीत पडद्यावरच बरी!

- नचिकेत जोशी
(३१/०८/२०१२)

Saturday, October 27, 2012

अजूनही

मनामध्ये कुठे कुठे तुझे ठसे अजूनही
फुलांत राहिले सुगंध खूपसे अजूनही

दिशा दिशा जरी तमास शरण जाऊ लागल्या
लपून राहिलेत आत कवडसे अजूनही

दिशा ढगाळताच मी तुझीच वाट पाहतो
नभात दाटतात रोज भरवसे अजूनही

तुम्ही किती मुजोर राख पसरलीत गावभर!
(निमूट थंड झोपलेत कोळसे अजूनही!)

उगाच चेहरा पुन्हा पुन्हा पुसून पाहतो
तसेच काळवंडतात आरसे अजूनही

- नचिकेत जोशी (१६/११/२०१)

Friday, October 19, 2012

समाधान व्हावे!

असे वाटते फार नादान व्हावे
जरासे तुझ्याहून बेभान व्हावे

पुरे लेखणीसारखे टोचणे हे!
कधी सोसणारे मुके पान व्हावे

नका वय विचारू, नका जात पाहू
अशाने कधी प्रेम सज्ञान व्हावे?

नको एकही शब्द बोलूस तूही
मनाचे मनाशीच संधान व्हावे

कधी दाटली खिन्नता जर मनावर
तुझ्या आठवांचेच थैमान व्हावे

जगावे असे अन् मरावे असे की -
कुणा ना कुणाचे समाधान व्हावे!

--- नचिकेत जोशी (१९/१०/२०१२)

Friday, October 12, 2012

तुला दुरून पाहणे...

तुझे दुरून लाजणे निमित्त वाटते मला
तुला दुरून पाहणे प्रशस्त वाटते मला

तुला जपावया कुणी जवळ कशास पाहिजे?
तुझ्यासभोवती तुझीच गस्त वाटते मला

मनातल्या मनात छान मोकळीक वाटते
घरातल्या घरात फार शिस्त वाटते मला

तुझ्यासवे समग्र विश्व पूर्ण वाटते मला
तुझ्याविना स्वतःमध्येच रिक्त वाटते मला

अनोळखी बनून वाट चालतो कधीकधी
कुणास साथ द्यायची शिकस्त वाटते मला

तुझाच वाटलो तुला - असाच भास नेहमी!
घडेल ना असे कधी? कि फक्त वाटते मला?

तुझ्या भयाण अंतरात गारठा विसावतो
तुझ्या विराण सावलीत तप्त वाटते मला

नचिकेत जोशी (१२/१०/२०१२)

Wednesday, October 10, 2012

किल्ले अंजनेरी उर्फ ऋष्यमूक पर्वत

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातली गोष्ट. ऑफिसच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने आठवडाभर नाशिकमध्ये होतो. देवही आम्हा ट्रेकर्सच्या बाबतीत कधी कधी अगदी मेहेरबान होतो. यावेळी मेहेरबानी झाली ती प्रोजेक्टच्या ठिकाणावर! यावेळी कॉलेज होते ते अंजनेरी गावापासून जेमतेम दोन किमीवर! समोर अंजनेरी किल्ला! अगदी पहिल्याच दिवशी दिवसभर गडमाथ्यावर धुकेजलेले ढग होते आणि कॉलेजमध्ये मी बैचेन! कधी एकदा अंजनेरीला जाऊन येतो असे झाले होते. कॉलेजमधूनच गडाचे फोटो घेणे 'तत्त्वात' बसत नव्हते. चार-पाच दिवस जाता-येता, चालता-चालता रोज डोळ्यासमोर असणारा अंजनेरी चक्क हात पसरून बोलावतोय असं वाटायला लागलं आणि शनिवार, अनंत चतुर्दशी च्या सुमुहुर्तावर अंजनेरीची भेट पक्की केली. सोबत कोणी येईल का याची तपासणी केली आणि 'हा माझा मार्ग एकला' या निष्कर्षाप्रत येऊन पोचलो.

नाशिकहून सकाळी सहा वाजता निघालो. त्र्यंबकेश्वर मार्गावर असणार्‍या अंजनेरीपर्यंत पोचणे अगदी सोपे आहे. सीबीएस (ठक्कर)हून सतत एसटी मिळतात. अंजनेरी गड म्हणजेच रामायणामधील सुप्रसिद्ध ऋष्यमूक पर्वत. हनुमानाचा जन्म याच गडावरचा. अंजनीमातेच्या नावावरून या गडाचे नाव अंजनेरी पडले असावे. वनवासामध्ये रामचंद्रांनी बराचसा काळ पंचवटी परिसरात घालवला असल्यामुळे नाशिकच्या आसपास अनेक रामायणकालीन स्थळे आहेत. खुद्द अंजनेरी गावातही पुराणकालीन अनेक उद्ध्वस्त मंदिरे आहेत.

अंजनेरीला जाण्यासाठी सर्वात योग्य ऋतू म्हणजे पावसाळा. मुळात हा गड सोपा असल्यामुळे पावसाळ्यातही जाता येऊ शकते. सोबतीला धबधबे असतातच. अंजनेरी गडापर्यंत पोहोचण्याचे साधारण तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यापर्यंत गाडी जाऊ शकते. तिथून पठारावरील अंजनीमातेच्या मंदिरापर्यंत पायर्‍या आहेत. तिथून तिसर्‍या टप्प्यात गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. एकूण भटकंती सोपीच आहे.

अंजनेरी गावात उतरलो, तेव्हा पावणेसात वाजले होते. अंजनेरी करून बारा पर्यंत खाली उतरायचे ठरवले होते. नंतर वेळ आणि ताकद असेल तर ब्रह्मगिरीही करून यावा असा प्लॅन होता. गावात शिरताना हे मंदिर लागले. अनायासे शनिवार होताच, त्यामुळे बजरंगबलीचे दर्शन घेऊन पुढे निघालो.


मी गाडीरस्त्याने न जाता गावामागून जाणारी पायवाट पकडली. समोर अंजनेरीची रांग सकाळच्या उन्हात चमकत होती.

अंजनेरी किल्ल्याची वाट दक्षिणोत्तर असल्यामुळे या वाटेवर सकाळी पूर्ण वेळ सूर्य असतो. त्यामुळे सकाळी लवकर सुरूवात करणे केव्हाही श्रेयस्कर! अंजनेरीच्या रांगेत अलिकडे नवरा नवरीचे सुळके दिसतात. सह्याद्रीचं हे एक बरं आहे. कुठल्याही डोंगररांगेवर आजूबाजूला दोन सुळके दिसले, की नावं ठेवण्यात वेळ घालवण्यापेक्षा 'नवरा-नवरी' म्हणून मोकळं व्हायचं. संख्येने जास्त असले तर उरलेल्यांना 'वर्‍हाडाचे सुळके' म्हणायचं (काही अपवाद सोडून!). तात्पर्य, हे दोन सुंदर सुळके लक्ष वेधून घेतात. त्यापैकी उजव्या सुळक्यावरील मंदिरापर्यंत जाता येते. फक्त मागच्या बाजूने कातळवाट आहे, असे एका गावकर्‍याकडून समजले.


एका सपाटीवर गाडीरस्ता पायवाटेला येऊन मिळतो. उजव्या कोपर्‍यात अंजनेरी गाव.

त्या सपाटीवरून थोडं चाललं की आपण पायर्‍यांपाशी येऊन पोचतो.





पायर्‍यांवरून घेतलेले काही फोटो - अंजनेरी गावाशेजारचे धरण

थोडा झूम करून

अजून थोडा झूम करून

पायर्‍या एका कड्याच्या पायथ्याशी येऊन पोचतात. अंजनेरीच्या वाटेवरचा सर्वात थ्रिलींगचा पॅच जर कुठला असलाच तर तो हा आहे.
कड्याच्या पायथ्याला वळसा घालून आपण दर्शनी भिंत आणि अंजनेरीचे पठार यांच्या मधल्या घळीत पोचतो.

त्या घळीच्या वाटेवर कातळावर रंगवलेले श्रीमारूतीराय दिसतात.

तिथून पुन्हा पायर्‍या सुरू होतात ते पहिल्या पठारापर्यंत!

वाटेत डाव्या बाजूला कातळात दोन गुहा आहेत. तिथे मुक्काम करता येऊ शकतो.



त्या पायर्‍या संपल्या की आपण येऊन पोचतो ते एका पठारावर. इथपर्यंत अर्धं अंतर पार झालेलं असतं.

या पठारावर अंजनी मातेचं एक मंदिर आहे.

मंदिराजवळच एक मोठा तलाव आहे.

त्याच्या शेजारुन दोन वाटा फुटतात. त्यापैकी पायर्‍यांची वाट माथ्याकडे जाते आणि डावीकडची पायवाट सीतेच्या आश्रमाकडे जाते. ऊन्ह वाढायच्या आत वर जाऊन येऊ असं ठरवून मी आधी पायर्‍या पकडल्या. पायर्‍यांच्या वाटेवर मध्येच एक पायवाट एका गुहेकडे जाते. त्या वाटेवर 'हनुमान जन्मस्थान' अशा अर्थाची पाटी आहे. कड्याच्या पोटात एक गुहा, गुहेच्या बाहेर झाडावर घंटा, गुहेपाशी गदा आणि गुहेमध्ये अंजनी मातेची शिळासदृश मूर्ती!





पायर्‍या संपवून पठार पूर्ण चालून आपण अखेरीस हनुमान मंदिरापाशी येऊन पोचतो. हे हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते.





अंजनी माता आणि वानरमुखी हनुमान यांच्या मूर्ती आणि पुढ्यात शिळा आहेत.



मंदिरात एक गावकरी भेटला. नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथांनी या ठिकाणी वास्तव्यास असताना खोदलेली पाण्याची कुंडे इथून जवळच आहेत अशी माहिती त्याने दिली. (नवनाथांच्या पोथीमध्येही याचा उल्लेख आहे, म्हणे!) कमी अधिक खोलीची एकूण अकरा कुंडे आहेत. काही काही बर्‍यापैकी खोलही आहेत असे वरून डोकावल्यावरही जाणवते.

अंजनेरीच्या पश्चिम कड्यावरून दिसणारा ब्रह्मगिरी आणि त्र्यंबकेश्वर गाव

आपण ज्या वाटेने चढून येतो ते पठार -

भटक्यांच्या 'visual डिक्शनरी'त एकावर एक रचून ठेवलेले दगड हे वाट चुकू नये म्हणून केलेल्या खुणेचे असतात. अंजनेरी माथ्यावर अशा अनेक दगडांचे अनेक मनोरे दिसतात. यांचा अर्थ वेगळाच आहे.

देवाला नवस बोलल्यावर हे उभे केले जातात. याचा देवासाठी मतितार्थ असा की 'नैसर्गिक क्रियेमुळे (वारा, पाऊस इत्यादी) हे एकावर एक ठेवलेले दगड कोसळायच्या आत मनातील इच्छा पूर्ण कर'!

माथ्यावरून पठाराचा आणखी एक फोटो -

या फोटोतल्या वरचा जलाशय हे पठारावरील तळं, तर खालचा पाणीसाठा हा अंजनेरीशेजारचा धरणाचा जलाशय! दोन जलाशयांमध्ये हजार फूट खोली आहे, एवढाच काय तो फरक!

पायर्‍या उतरून पठारावर आलो आणि सीतेच्या आश्रमाकडे निघालो. या गुहेमध्ये अंजनी आणि सीतामाईची भेट झाली असे सांगतात.

ही मंदिरे पाहिल्यावर मला लगेच आजोबा डोंगरकुशीतल्या वाल्मिकी आश्रमाची आठवण झाली.

आधी पठार, मग पायर्‍या मग पायवाट उतरून गावात आलो तेव्हा फक्त साडे अकरा झाले होते. बर्‍याच दिवसांनी भटकायला मिळाले होते. एकट्याने केलेली ही बहुधा पहिलीच अपरिचित किल्ल्याची भटकंती! short but sweet! नाशिक प्रांतातल्या या पहिल्यावाहिल्या किल्ल्यांनंतर हा सिलसिला सुरू होवो ही सह्याद्रीबाबाकडे प्रार्थना!



(अवांतरः अंजनेरीसारख्या डोंगराला रामायणामध्ये जर पर्वत म्हणत असतील, तर अजून तीन चारशे वर्षांनी सह्याद्रीमध्ये 'रायपर्वत', 'राजपर्वत', 'सिंहपर्वत' अशी नामे प्रचलित व्हायला हरकत नाही, असा विचार माझ्या मनात येऊन गेला, एवढंच!)

- नचिकेत जोशी

Thursday, August 30, 2012

वॉटरफॉल रॅपलिंग (फक्त फोटो)

 "वॉटरफॉल रॅपलिंग" करण्याची खूप दिवसांपासूनची इच्छा काही दिवसांपूर्वी कसार्‍याजवळील विही गावाशेजारी 'ऑफबीटसह्याद्री'च्या इव्हेंटच्या निमित्ताने पूर्ण झाली. वृत्तांत लिहिण्याइतका वेळ मिळत नाहीये, त्यामुळे फक्त फोटो...
















 - नचिकेत जोशी

Monday, August 20, 2012

पहाट

(आज जुन्या कविता चाळता चाळता ही सापडली. बरोब्बर चार वर्षांपूर्वी लिहिली होती हे खालची तारीख वाचल्यावर समजलं... :-))

उजाडताना दिसू लागली उजाड फसवी वाट
हूल देऊनी दूर उगवली मोहक धुंद पहाट

घटिका साऱ्या बोलत होत्या अंधाराची भाषा
मनात जागी तरी उद्याच्या उजाडण्य़ाची आशा
खरीच होतील स्वप्ने ऐसी समीप आली वेळ
त्या वेळेची वाट पहाती तळहातीच्या रेषा
परंतु बहुधा ठाऊक तिजला माझे भग्न ललाट        १

प्रवास थोडा तरिही होती सहवासाची आस
कुणी सावली बनून होता एक सभोती भास
वाट विलगण्य़ापूर्वीच गेला अलगद सुटुनी हात
मागे उरली आठवणींची ठसठसणारी रात
राहिलाच दूर किनारा, मी तहानलेली लाट            २

नव्या प्रवासा निघण्यापूर्वी सहज वळवली मान
मनात दाटून आले सारे, क्षणात आले भान
पहाटवेळा अनेक येतील, प्रवास आहे ध्येय
नवीन किरणे घेऊन आली प्रगल्भतेचे दान
समोर होती खुणावणारी नवीन कोरी वाट
पुढे स्वागता निघून गेली मोहक धुंद पहाट        ३

                            - नचिकेत जोशी (२०/०८/२००८)

Thursday, August 16, 2012

आपलं माणूस

आपलं माणूस जेव्हा आपलं नसल्याची शंका येते,
तेव्हा उमटतं प्रश्नचिन्ह आपल्याच नात्यावर!
एकीकडे असं काही नसण्याची आशा
आणि दुसरीकडे असण्याचं भयसूचक वास्तव
न स्वीकारण्याची इच्छा!

आपलं माणूस जेव्हा आपलं नसल्याचा समज पक्का होतो,
तेव्हा उमटतं प्रश्नचिन्ह आपल्याच असण्यावर!
'एकत्र घालवलेल्या सेकंदांचं आणि आठवणींत घालवलेल्या तासांचं
आता काय करायचं', या विचारातून आलेली हतबलता!

आपलं माणूस जेव्हा आपलंच असल्याची खात्री पटते,
तेव्हा उमटतं प्रश्नचिन्ह आपल्याच स्वभावावर,
आणि गवसतं -  संपण्याच्या वाटेवरून जीव वाचल्यागत
परत आलेलं आणि बरंच काही शिकलेलं - स्वतःचंच इवलंसं मन!

नचिकेत जोशी (९/८/२०१२)

Thursday, August 9, 2012

अपेक्षा नको!

अजून क्षणभर जगता यावे म्हणून मी रेंगाळत होतो
मुठीत आल्या वाळूलाही नजराणा अन् समजत होतो!

कधी वाटले, प्रेम खुशीने झोळीमध्ये दिलेस माझ्या
कधी वाटले, भीक तुझ्या प्रेमाची कणभर मागत होतो

तळव्यावरती अलगद जपले होते अपुले रेशिमनाते
जपता जपता नकळत त्याला प्रेमाने चुरगाळत होतो

वर्तमान हा जगता जगता निसटुन गेला, कळले नाही!
गतकाळाचे बोट धरून मी भविष्याकडे चालत होतो

'अपेक्षा नको', अपेक्षाच ही ठेवलीस ना अखेर तूही!
अपेक्षांमुळे नाते फुलते, हेच तुला समजावत होतो!

- नचिकेत जोशी (४/८/२०१२)

Saturday, August 4, 2012

मैत्री

(मैत्रीदिनाच्या निमित्ताने एक जुनी कविता पोस्ट करतोय)

वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
वयाबरोबर मनात यावी तुझी नि माझी मैत्री

रानपाखरापरी असावी स्वच्छंदी, भिरभिरती
पानावरच्या दवबिंदूपरी चमचमती, थरथरती
पंखांमध्ये ताकद यावी दोघांच्या नात्याची
तिला मोकळे भरारण्या मग आसमंत अन्‌ धरती
अशीच समजून उमजून यावी तुझी नि माझी मैत्री            १

भांडायाला निमित्त व्हावे कसलेही, काहीही
भांडणातुनी मैत्री व्हावी अजुनी स्वच्छ, प्रवाही
जरी दुरावा आला क्षणीचा तरी दूरही व्हावा
मजबूत व्हावी घाव सोसुनी- कसलेही, काहीही
अबोल्यातही मुकी न व्हावी तुझी नि माझी मैत्री        २

निघून जातील वर्षे आणि पडेल संध्याछाया
क्षण मैत्रीचे येतील धावून श्रांतवयी रिझवाया
या मैत्राची साथ निरंतर आठवणींची माया
आयुष्याची होईल सोपी वाट पुढे उतराया
त्या वाटेवर रुजून यावी तुझी नि माझी मैत्री        ३

                    -    नचिकेत जोशी (७/२/२००८)

Monday, July 30, 2012

गुंफण

दु:ख पुरातन
दु:ख चिरंतन
दु:ख जगाच्या
घरचे अंगण

दु:ख मोहवी
दु:ख बोलवी
दु:ख खुळ्या
पायातील पैंजण

दु:ख उराशी
दु:ख उशाशी
दु:ख सोबती
बनून कांकण

दु:ख चिडचिडे
दु:ख तडफडे
दु:ख सनातन
शाश्वत वणवण

दु:ख एकटे
दु:ख धाकटे
दु:ख थोरल्या
सुखास कारण

दु:ख मल्मली
दु:ख भरजरी
दु:ख सुखाशी
अतूट गुंफण!

 - नचिकेत जोशी (११/६/२०१२)

Friday, July 20, 2012

वाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली! (अंतिम भाग २)

रात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझप्रमाणे वाजत होता. साडेसहापर्यंत मी आणि कोंबडा दोघेच बहुधा जागे होतो. दार उघडले आणि बाहेर धुक्याशी भेट झाली -

अखेर पावणेसात वाजता सूरजला उठवले. आजीबाईंच्या मुलाचा पत्ताच नव्हता. आम्हाला लवकरात लवकर तैलबैला गाठायचे होते. म्हणजे मग उरलेल्या दिवसात काहीतरी प्लॅन करता आला असता. अखेर त्याची वाट पाहून आजीबाईंना मानधन दिले आणि निघालो. तर देवळापाशी एक म्हातारबा भेटले. त्यांनी 'कुठे निघालात' वगैरे चौकशी केली आणि 'थांबा गण्याला बोलावतो, तो तुम्हाला घालवून देईल' असे सांगून थांबवले. गण्याऐवजी आजीबाईंचाच मुलगा, रमेश आला आणि आम्ही (एकदाचे) निघालो. सात वाजून तीस मिनिटे!

गावाशेजारच्या आदिवासी वस्तीमधून ओढ्याच्या दिशेने निघालो. वस्तीमधल्या दोन बायकांचा हा 'हृद्य' संवाद - पहिली - "कुटं निघाले हे दोगेच?" दुसरी - "मजा करायला निघाले असतील" पहिली - "पाठीवर बोचकी घेऊन डोंगर चडण्यात कसली मजा?"

मी एवढंच बोलणं ऐकलं. मला तोरणा-रायगड ट्रेकमध्ये कोदापूर एसटीचा कंडक्टर आठवला. 'आयला पैसे देऊन वर जीवाला त्रास' असं आमच्या पाठीवरच्या सॅक्सकडे बघून तो बोलला होता. चालायचंच!

गावामागच्या ओढ्याला पाणी असेल, तर मात्र लेण्यांकडेही आणि वाघजाई घाटाकडेही जाता येत नाही. (इति रमेश!) आमच्या सुदैवाने पाणी फारच कमी होते आणि पाऊसही नव्हता. लेण्या अथवा तैलबैलाकडे हा ओढा ओलांडावाच लागतो.

ठाणाळेतून थेट लेण्यांकडे जाणारी व लेण्या वगळून तैलबैलाकडे जाणारी वाट या दोन वेगळ्या वाटा आहेत. आम्ही लेण्या वगळल्या होत्या. अर्थात वाटेत एका पठारावरून लेण्यांकडे वाट जाते. त्याचे वर्णन पुढे येईलच. ओढा ओलांडून पलिकडच्या काठाने डोंगराला डावीकडून वळसा घालावा लागतो. थोडं चालल्यावर कातळात कोरलेल्या पायर्‍या लागल्या.

जवळच पाण्याची दोन टाकीही दिसली. (पाणी पिण्यायोग्य नाही).

कालच्या तुलनेमध्ये माझी तब्येत बरीच बरी होती. वेग कमी असला तरी न थांबता सलग चढत होतो. पण या टाक्यांशेजारून वाहणारा एक झरा दिसला आणि थोडी पोटपूजा करायला थांबलो. त्या ठिकाणापासून दिसणारी ठाणाळेशेजारची आदिवासी वस्ती -

या टाक्यांच्या बाजूने डावीकडून वाट वर चढते व एका पठारावर येते.

इथून समोरच्या कुडाच्या फुलाशेजारून वाट वाघजाई घाटाकडे जाते आणि उजवीकडची लेण्यांकडे जाते. या झाडाला बारमाही फुले असतात असे कळल्यामुळे लेण्यांच्या वाटेसाठी हे खुणेचे झाड म्हणून लक्षात ठेवायला हरकत नाही.

हे पठार पार करून आम्ही सरळ पुढच्या टेकाडाला डावा वळसा मारून निघालो. आजूबाजूला दगडधोड्यांच्या राशी दिसल्या.

या टेकाडाच्या डाव्या अंगाला एक धनगरबाईची झोपडी आहे. सर्व धनगरवाडा डोंगराच्या पायथ्याला आहे. डावी वाट झोपडीच्या दिशेने, उजवी वाघजाई घाटाच्या दिशेने -

त्या टेकाडावर आलो आणि गेले पंधरा-सोळा तास जिच्यावाचून जीव तगमगत होता, ती झुळूक एकदाची सुरू झाली. मग पार सवाष्ण घाट सुरू होईपर्यंत वारा सोबत होता. या टेकाडावरून दरीच्या कडेकडेने पायवाट वर चढते.

उजव्या हाताला खाली पठार, त्यापलिकडे काल आम्ही अडकलो होतो तो डोंगर आणि त्यापलीकडे नाडसूर, ठाणाळे गावे दिसतात.

कुडाच्या फुलाकडून लेण्यांकडे येणार्‍या पायवाटेचा टेकाडावरून घेतलेला फोटो -

इतका वेळ डाव्या बाजूने किंवा डावीकडे सुरू असलेली वाटचाल संपवून आम्ही टॉवरच्या दिशेने निघालो. लेण्या आम्ही चढत होतो त्याच डोंगराच्या पोटात होत्या. वाटेत रमेशला अळुची फ़ळे सापडली. आकारावरून आधी मी 'ही न पिकलेली आलुबुखार असावीत' अशी समजूत करून घेतली होती. पण ते आलुबुखार वेगळे हे कळल्यावर केवळ त्या दोघांनी खाल्ली, म्हणून मीही बिंधास्तपणे खाऊन टाकली. (चव बरी होती!)

वाघजाई मंदिराच्या जवळ या पायर्‍या लागतात. वाघजाई मंदिराशेजारूनच एक मोठा धबधबा वाहतो.

मंदिरातली पंच-दैवते -

धबधब्याजवळून दिसणारे विहंगम दृश्य -

त्या संपूर्ण कड्यावरून काही अंतरावरून एकूण दोन धबधबे खाली उड्या घेतात आणि त्यांचाच पुढे ओढा बनून ठाणाळे गावामागून वाहतो. वाघजाई देवीचे छोटेखानी मंदिर खूप शांत आणि रम्य आहे. (वाघजाई घाट नक्की कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो हे मात्र मला शेवटपर्यंत कळले नाही. प्रचलित नाव आहे, म्हणून वाघजाई घाट म्हणायचे!)

एव्हाना सव्वादहा वाजले होते. आम्ही पावणेतीन तासात वाघजाईपाशी पोचलो होतो. आता अख्खा दिवस हातात होता. त्यामुळे मग तैलबैलाकडे न जाता सुधागडासमोरच्या सवाष्ण घाटाने खाली उतरायचे ठरवले. पुढे पाणी मिळेल न मिळेल असे वाटल्यामुळे इथेच धबधब्यापाशी थोडावेळ थांबून उरलेला ब्रेकफास्ट कम लंच करून घ्यायचे ठरवले. पुढे मग दहा मिनिटात तैलाबैला पठार गाठले.

तैलबैला भिंतींचे झालेले पहिले दर्शन -

झूम करून -

तैलबैलाला पहिल्यांदा आलो होतो ते लोणावळ्याकडून! या वेळी दुसर्‍या बाजूने भेट होत होती! पण काहीही म्हणा, तैलबैलाच्या भिंतींच्या नुसत्या दर्शनानेही माझ्या मनात नेहमीच भीती, आदर, आनंद, सुख अशा अनेक भावना एकाच वेळी येतात..

इथून एक बैलगाडीवाट तैलबैलाकडे जाते. 'त्या वाटेने पुन्हा केव्हातरी' असे म्हणून आम्ही दक्षिण दिशेच्या कड्याकडे निघालो. आता जितके चढून घाटावर आलो होतो, तितकेच पुन्हा उतरून घाटाखाली जायचे होते.

हा दुसरा ओढा कड्यावरून झेप घेऊन लेण्यांशेजारून कोसळतो .

याच ओढ्याशेजारी कड्याजवळ या पायर्‍या दिसतात (या कुठेही उतरत नाहीत, सबब ही आपली वाट नव्हे!)

सवाष्ण घाटाच्या दिशेने निघालो तेव्हा वाटेत हे विस्तीर्ण पठार लागले -

वाटेत दिसलेले हे टिपीकल फोटोजेनिक झाड -

हळदीची रोपे -

सह्याद्री घाटाखालून चढायच्या आणि उतरायच्या असंख्य घाटवाटा आहेत. कुठूनही चढायचा सरासरी वेळ तीन तास आणि उतरायचा दोन तास असे गणित आता तयार झाले आहे!

सवाष्ण घाटाच्या माथ्यावरून दिसणारा सुधागड -

सुधागडला दोन दरवाजे व एक चोर दरवाजा आहे, असे रमेशने सांगितले. त्यापैकी खालील फोटोमधल्या हिरव्या बेचक्यातून एक चोरवाट आहे -

सवाष्ण घाटाच्या 'बारशा'ची कहाणी मनोरंजक आहे. कोण्या काळी (पहिल्या काळात - इति रमेश!) एक सवाष्ण घरातून पळाली आणि डोंगर उतरून जायला या वाटेवर आली. वाट न सापडल्यामुळे कातळातच पायर्‍या खणती झाली, आणि अखेर इथेच दिव्यलोकी प्रयाण करती झाली, म्हणून हा सवाष्ण घाट! मला ते नावच इतके आवडले की आता घाट प्रत्यक्ष कसा असेल हे पाहायला मी अगदी आतूर झालो होतो.

... आणि घाटवाट सुंदरच होती. एका बाजूला सरळ खोल दरी, दुसर्‍या बाजूला डोंगरभिंत, मध्ये तीव्र तिरप्या उताराची पायवाट अशी सुरूवात असलेला घाट सुंदर का असणार नाही? घाटवाटेची ही सुरूवात -

वाटेत कातळात कोरलेल्या या पायर्‍या लागल्या ('त्या' सवाष्णीने खोदलेल्या असाव्यात. इथेच जवळपास तिची समाधीही आहे, तो फोटो हुकला)

पण हे फक्त सुरुवातीच्या थोड्या अंतरापुरतेच! काही वेळातच वाट दाट झाडीत शिरली. चिखलमातीतून पायवाटेने निघालो. पहिल्या पावसाने जमिनीबरोबरच एका दगडालाही शेवाळी शाल पांघरली होती -

वाटेत एक बांधकाम लागले. (स्थानिक लोकांपैकी कुणीतरी वाडा/गोठा बांधला असावा)

तसेच खाली उतरत उतरत तासा-दीडतासाने बहिरमपाडा या गावामध्ये शिरलो. एव्हाना एक वाजला होता. एकूण साडेपाच(च) तासात चढून उतरलो होतो. मागच्या परीक्षेत राहिलेला बॅकलॉग पुढच्या परीक्षेत डिस्टींक्शनने भरुन निघावा असे काहीसे वाटत होते.

बहिरमपाड्यातून एक लाँगशॉट - डावीकडचा डोंगर म्हणजे तैलबैलासमोरील पठार, त्याच्या उजवीकडच्या किनारीवर सवाष्ण घाट. उजवीकडे सुधागड.

उकाडा, दमटपणा, घाम हे त्रास पुन्हा सुरू झाले होते. त्यात बहिरमपाडा ते धोंडसे आणि धोंडसे ते वैतागवाडी (हे गावाचे नाव आहे!) असे दोन-अडीच किमी चालायचे होते. ते चालून वैतागवाडीतून टमटमने पाली, पालीहून खोपोलीला पोचलो तेव्हा तीन वाजले होते.

इथून सूरज खोपोली लोकलने मुंबईला गेला. खोपोली स्टँडात उभी असलेली पुणे एशियाड, गर्दी होती म्हणून सोडली आणि मग बराच वेळ पुण्याकडे जाणारी एसटी आलीच नाही. अखेर एका टेंपोतून लोणावळा गाठले आणि 'जब वी मेट' मधल्या करिना स्टाईलने कर्जत-पुणे शटल प्लॅटफॉर्महून सुटत असताना (सॅकसकट) धावतच पकडली.

पहिल्या दिवशी तब्येत बिघडली नसती तर सुधागडसुद्धा झाला असता खरा, पण जो अनुभव मिळाला, तो मिळाला नसता. आपल्या वाट्याला आलेले हे अनुभवाचे दान बिनतक्रार स्वीकारणे ही भटकंतीमधल्या आनंदाची खरी गंमत आहे!

दोस्तहो, या वाटेने फारसे कुणी गेल्याचे, व गेल्यावर त्याबद्दल लिहिल्याचे माहित नाही. त्यामुळे काही बारकाव्यांसकट ही भ्रमंती लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. इतके वर्णन वाचूनही जर तुम्ही या ट्रेकमध्ये वाट चुकलात, तरी हरकत नाही. कारण, 'वाट चुकण्याच्या आणि ती आपली आपण शोधण्याच्या' एका अत्युत्तम आनंदाचा अनुभव तुम्हाला मिळालेला असेल!

जाता जाता - या भागामध्ये उन्हाळ्यात अथवा कोरड्या ऋतुमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. वाघजाई मंदिरापाशी असणार्‍या पाण्याशिवाय, थेट ठाणाळे गावापर्यंत कुठेही पाणी नाही. काही वर्षांपूर्वी या भागात सॅकमध्ये पुरेसे पाणी न घेता आलेल्या एका भटक्याचा तडफडून मृत्यू झाल्याची कथा गावात बर्‍याच जणांनी आम्हाला सांगितली. पावसाळ्यामध्ये सुरू असणारे दोन धबधबे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बंद होतात. तेव्हा भटक्यांनी पुरेसे पाणी सोबत बाळगावे, ही सूचना! पुन्हा भेटूच!

(समाप्त) - नचिकेत जोशी