Pages

Monday, August 20, 2012

पहाट

(आज जुन्या कविता चाळता चाळता ही सापडली. बरोब्बर चार वर्षांपूर्वी लिहिली होती हे खालची तारीख वाचल्यावर समजलं... :-))

उजाडताना दिसू लागली उजाड फसवी वाट
हूल देऊनी दूर उगवली मोहक धुंद पहाट

घटिका साऱ्या बोलत होत्या अंधाराची भाषा
मनात जागी तरी उद्याच्या उजाडण्य़ाची आशा
खरीच होतील स्वप्ने ऐसी समीप आली वेळ
त्या वेळेची वाट पहाती तळहातीच्या रेषा
परंतु बहुधा ठाऊक तिजला माझे भग्न ललाट        १

प्रवास थोडा तरिही होती सहवासाची आस
कुणी सावली बनून होता एक सभोती भास
वाट विलगण्य़ापूर्वीच गेला अलगद सुटुनी हात
मागे उरली आठवणींची ठसठसणारी रात
राहिलाच दूर किनारा, मी तहानलेली लाट            २

नव्या प्रवासा निघण्यापूर्वी सहज वळवली मान
मनात दाटून आले सारे, क्षणात आले भान
पहाटवेळा अनेक येतील, प्रवास आहे ध्येय
नवीन किरणे घेऊन आली प्रगल्भतेचे दान
समोर होती खुणावणारी नवीन कोरी वाट
पुढे स्वागता निघून गेली मोहक धुंद पहाट        ३

                            - नचिकेत जोशी (२०/०८/२००८)

No comments: