Pages

Friday, April 25, 2014

शिवशाहिरांच्या आठवणींचा 'बेलभंडारा'



पुस्तकाचे नावः बेलभंडारा
लेखक - डॉ. सागर देशपांडे
प्रकाशन - सह्याद्री प्रकाशन
प्रथमावृत्ती - ३ ऑगस्ट २०११
किंमत - रू. ६९९

*********************

एखाद्याने व्यवहारात साधं-भोळं म्हणजे किती साधंभोळं असावं? एखाद्याने ध्यासमग्न जगावं म्हणजे नेमकं कसं जगावं? एखाद्याने सर्वस्व अर्पून कश्शाचीही पर्वा न करता एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करावा म्हणजे नक्की किती करावा? सध्यातरी माझं उत्तर आहे - शिवशाहीर श्रीमंत बळवंतराव मोरेश्वरराव उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांच्याइतका! नव्वदी पार केलेल्या या महान शिवयोग्याचं 'बेलभंडारा' हे चरित्रात्मक पुस्तक वाचताना किती वेळा डोळे भरून आले, किती वेळा छाती-मन अभिमानाने तुडुंब भरून आलं हे मोजलंच नाही!

बाबासाहेब पुरंदरे या नम्र, शालीन, डोळस इतिहासप्रेमी संशोधकाबद्दल कुतुहल शमेल, समाधान होईल ते सर्वकाही या पुस्तकात आहे. त्यांचा जन्म, शाळकरी आठवणी, शाळामास्तर, इतिहास नावाच्या जिवलगाशी जुळलेलं मैतर आणि उर्वरित आयुष्यात जडलेला एकच ध्यास - शिवचरित्र आणि शिवचरित्राचं पारायण, आख्यान, प्रसार, आणि एक समर्पित आयुष्य!

शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास हा नजीकच्या काळात कायम वादातच सापडला आहे. ज्या इतिहासाची दखल परदेशांतल्या लष्कराने आणि तिथल्या संशोधकांनी (संशोधक म्हटलं की आपल्याला फक्त जेम्स लेन आठवतो. त्याच्याव्यतिरिक्त इतर अनेक संशोधकांनी शिवाजीराजांबद्दल संशोधन केलेली अनेक कागदपत्रे परदेशांतल्या लायब्ररींमध्ये आजही आहेत) घेतली त्याबद्दल आपण अभिमानही बाळगत नाही, किंवा फक्त दाखवण्यापुरता बाळगतो. म्हणूनच कदाचित बाबासाहेब मार्मिकपणे लिहून गेलेत - "इतिहासात चंदन खूप आहे आणि कोळसाही. आपण चंदनच उगाळू, कोळसा नको. आणि चंदनाचा कोळसा करून उगाळण्याचा उपद्व्याप तर नकोच नको!"

सगळीच मोठी माणसं वेडी असतात खरंच! बाबासाहेब तर 'वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसंच इतिहास घडवतात' असं साभिमान म्हणून गेलेच आहेत. पण कुठल्याही मोठ्या माणसाकडे डोळसपणे पाहिलं की दिसतं - सर्वस्व अर्पून घडवलेलं एक साधं सोपं पण केंद्रित आयुष्य! वयाच्या सोळा-सतराव्या वर्षी शिवचरित्र लिहिण्याचा संकल्प सोडल्यावर आलेल्या अनंत अडचणींतून मार्ग कसा निघाला त्याची थरारक गोष्ट या पुस्तकात जागोजागी वाचायला मिळते.

काय काय आहे या पुस्तकात? बाबासाहेबांचं बालपण भेटतं, १९३० सालातलं पुणे वाचायला मिळतं, दमण आणि दादरा नगरहवेलीचा स्वातंत्र्यसंग्राम ओझरती भेट देऊन जातो. इतिहासकारांची संशोधने, आणि आजूबाजूच्या हकीकती वाचायला मिळतात. शिवचरित्रासंदर्भाने संपर्कात आलेल्या राजकारण्यांच्या चक्क चांगल्या बाजू वाचायला मिळतात. शिवचरित्र साकार करण्यासाठी वाट्टेल ते कष्ट करणारा, रोज पुण्यातून भाजी घेऊन वाशी मार्केटमध्ये विकायला जाणारा, पुस्तके घरोघरी जाऊन विकणारा, घसा पूर्णपणे कामातून गेलेला असतानाही व्याख्यानांवर व्याख्याने देणारा, ऐतिहासिक पुरावा सापडल्याचा निरोप प्रतापगडच्या पुजार्‍याकडून येताच भर पावसात पुण्याहून प्रतापगडावर सायकलने जाणारा एक झपाटलेला 'बाबासाहेब' भेटतो आणि या दीर्घ बिकट बाका प्रसंगांमधून तावून सुलाखून घडलेले, 'अणुरणी या थोकडा' वाटणारे आणि 'आकाशाएवढे' मोठे झालेले आपले सर्वांचे लाडके 'शिवशाहीर बाबासाहेब' घडताना वाचायला मिळतात. (आयुष्यभर एवढा हलकल्लोळ केल्यावरही बाबासाहेब म्हणतात, 'मला सव्वाशे वर्षांचं आयुष्य हवंय शिवचरित्र ब्रह्मांडापल्याड नेण्यासाठी!' देवाने उदंड आयुष्य बाबासाहेबांना द्यावं!)

शिवाजी महाराज प्रसिद्ध झाले कारण त्यांनी नामोहरम केलेले त्यांचे शत्रूही तितकेच तुल्यबळ होते. 'राम मोठा वाटतो कारण रावणही तितकाच शूर होता' अशा आशयाचं उदाहरण प्रा. नरहर कुरुंदकरांनी 'श्रीमान योगी'च्या प्रस्तावनेत दिलं आहे. खूप सुरेख प्रस्तावना आहे ती! एकदा नक्की वाचा! असो. विषयांतर झालं. हां, तर त्या शत्रूंची सहीसही ओळख करून दिली, ती बाबासाहेबांनीच! अफझुलखान असो, सिद्दी जौहर असो, किंवा खुद्द आलमगीर औरंगजेब असो, बाबासाहेबांनी 'राजा शिवछत्रपती'मध्ये त्या शत्रूंचे सद्गुणही तितक्याच मोकळेपणाने मांडले आहेत. शिवचरित्र लिहिताना हा विवेक असणं ही अत्यावश्यक गोष्ट होती. मराठेशाहीच्या सर्व शत्रूंच्या वाईट गोष्टी समोर आणतानाच चांगल्याही गोष्टी वाचकासमोर ठेवणे हे संतुलन असण्यासाठी मुळात लेखक तेवढा सुसंस्कृत, शालीन आणि जाणता हवा. या जाणतेपणाचा प्रवास 'बेलभंडारा' आपल्यासमोर ठेवतं.

बाबासाहेबांनी ज्या आत्मीयतेने शिवाजी महाराजांचं आयुष्य उलगडलं, त्याच आत्मीयतेने डॉ. सागर देशपांडे बाबासाहेबांचं आयुष्य उलगडतात. माहित नसलेल्या अनेक गोष्टी-प्रसंग तर यातून समजतातच, पण एक ध्येय साध्य करण्यासाठी किती किती खस्ता खाव्या लागतात, किती गोष्टींचा त्याग करावा लागतो याचंही प्रत्यंतर येतं. बाबासाहेबांचं चरित्र लिहिण्याचं काम ज्यांच्या हातून झालं ते डॉ. सागर देशपांडे मला फार फार लकी वाटतात. अर्थात, त्यांनी ज्या अचूकपणे आणि समर्थपणे ते काम केलंय, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!

व्यक्तिश: माझ्या लाडक्या 'शिवाजी'शी माझी ओळख बाबासाहेबांनीच करून दिली. राजा शिवाजी कायमचा लाडका झाला, पण नुसत्या जयजयकारात आणि लाऊडस्पीकर लावून नाचण्यात शिवप्रेम नसून ते त्या राजाच्या गुणांमुळे आणि कार्यामुळे वाटू लागलं, हे देणंही बाबासाहेबांच्याच लिखाणाचं! तासनतास 'राजा शिवछत्रपतीची' पारायणं करण्यात कॉलेजवयातले घालवलेले दिवस आणि त्यातून झोप उडालेल्या रात्री आज अभिमानास्पद वाटतात, हे उपकारही त्यांचेच! कधीकधी असं वाटतं, की बाबासाहेबांनी शिवचरित्र लिहिलंच नसतं तर शिवाजीराजा एवढा आवडता झाला असता का? सद्यस्थितीतले गड-किल्ले आणि त्यावरचे अवशेष बघून हे अशक्यच होतं म्हणा!

अजून काय लिहू? 'बाबासाहेब पुरंदरे' म्हटल्यावर त्यांनी दिलेलं शिवचरित्राचं दान दिसतं, आणि ते घ्यायला अपुरी पडणारी माझी झोळीही दिसते...

- नचिकेत जोशी (२५/४/२०१४)

Monday, April 21, 2014

पडझडीनंतरची धडपड: ज्ञानप्रबोधिनी, हराळी (जि. उस्मानाबाद)

प्रस्तुत लेख ही कुणाचीही जाहिरात नाही. पण 'मी, माझं, मला' या तीन स्वयंशत्रूंपासून थोडं लांब गेल्यावर जे जग दिसलं, जी आत्मीयता दिसली तिला शब्दांत लिहिण्याचा एक प्रयत्न आहे. भयंकर काळरात्रीनंतर येणार्‍या सूर्योदयाच्या स्वागताला पुन्हा नव्या उमेदीनेही उभं राहता येऊ शकते, सर्वस्व नाहीसं झालं असलं तरीही जगणं संपत नाही, तर ते पुन्हा सुरूही होऊ शकतं ही खात्री पटवणारी ही माणसं आणि हे पुरावे!

*******************************

'परब्रह्म शक्ती स्फुरो प्रबोधिनीमध्ये'.... बरोब्बर सकाळी सव्वासहाला उपासना सुरू होते. झाडून सगळे विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक उपासनेला जमतात. अर्धवट झोपेमध्येही धीरगंभीर आवाज कानात घुमतो, आणि बराच वेळ तिथेच ठाण मांडून बसतो. साडेसहाला उपासना संपते. प्रत्येकजण आपापल्या कामाला निघतात.

१९९३ च्या किल्लारी भूकंपामध्ये मराठवाड्यात विशेष नुकसान झाले. लातूर आणि उस्मानाबाद हे दोन जिल्हे विशेषत्त्वाने भूकंपाच्या तावडीत सापडले. त्या पडझडीनंतरच्या गेल्या वीस वर्षांत काही गावे पुन्हा उभी राहिली, माणसे सावरली, पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागली. त्या पडझडीनंतर उस्मानाबाद जिल्ह्यात भूकंपात पुसल्या गेलेले 'हराळी' नावाचे एक खेडे दत्तक घेऊन तिथे 'ज्ञानप्रबोधिनी'ने शाळा बांधली आहे. एक कृषी पदविका विद्यालय (डिप्लोमा)सुद्धा सुरू केले आहे. जोडीला फळप्रक्रिया, गांडूळखत इत्यादी उपक्रमही सुरू आहेत. नुकतीच या शाळेला भेट देण्याची संधी मिळाली.

सोलापूर-हैदराबाद महामार्गावर नळदुर्गपासून अंदाजे ३० किमी वर 'आष्टामोड' इथे उतरून (मोड = फाटा) लोहारा रस्त्याने सोळा-सतरा किमी वर आत हराळीला जावे लागते. एकूणातच दक्षिण मराठवाड्याचा परिसर मैलोन्मैल सपाट, उजाड आहे. एप्रिलमधल्या ऊन्हाने तर तो अजूनच भकास वाटत होता. बाईकवरून जाताना शाळेतले सर भूकंपात पडलेल्या घरांबद्दल सांगत होते. एखाद-दुसरे पडलेले घरही दाखवत होते.

शाळेत पोचलो तेव्हा सूर्य कलतीला आला होता. एप्रिल महिन्यातही कोरडी संध्याकाळ पसरत चालली होती.
प्रवेशद्वाराशीच हा दिसला आणि दिवसभराचा थकवा दूर पळाला -


भूकंपानंतर अनेक दानशूरांनी संस्थेला जमीन दिली, कुणी पैसा दिला, कुणी यंत्रसामग्री दिली, कुणी मनुष्यबळ दिलं. नऊ एकर जमिनीवर पैसा आणि उपलब्ध सामग्री यांचा नेटका वापर करून संस्थेने शाळा उभारली, आंबा-लिंबू-काजू-चेरी यांच्या बागा फुलवल्या, उपलब्ध मुबलक सौरशक्तीचा आणि पवनशक्तीचा वापर करून पाच तास लोडशेडींग असतानाही वीज उपलब्ध करून घेतली आहे. त्याचे हे फोटो -







तिथल्या फळप्रक्रिया विभागात 'घरच्या' शेतातल्या फळांवर प्रक्रिया करून आवळ्याचे सरबत-सुपारी-लोणचे, आले-लिंबू सरबत, पेरूच्या वड्या (यांची चव आवडली मला!) असे कितीतरी पदार्थ पुणे-सोलापूर-मुंबईत विक्रीसाठी पाठवले जातात.









पुरूष व महिला कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र निवास नुकतेच बांधून झाले आहेत. स्थानिकांबरोबरच बाहेरगावातून कामासाठी येणार्‍या लोकांसाठी इथे राहण्याची सोय होते.







व्यसनमुक्ती केंद्राचं बांधकाम सध्या सुरू आहे.


या कामासाठी लागणार्‍या विटाही तिथेच तयार होतात -






दोनमजली शाळा, उपासना वर्ग, स्वतंत्र भोजनगृह, वाचनालय, भोजनगृहासाठी खास करून बसवण्यात आलेले सोलर पॅनल्स. या पॅनल्समुळे संपूर्ण शाळेचे दुपारचे जेवण बनवले जाते.








अतिशय ओसाड भागावर अविरत प्रयत्नांमधून आता हळूहळू हिरवळ फुलू लागली आहे.


तीन दिवसांच्या मुक्कामात तिथे अनेक माणसे भेटली. वयाने, अनुभवाने माझ्यापेक्षा कितीतरी मोठी. ज्ञानप्रबोधिनी सोलापूर आणि हराळी ज्यांनी बांधली ते अण्णा ताम्हणकर भेटले.(डॉ. स्वर्णलता भिशीकर किंवा लताताई आणि अण्णा ताम्हणकर या दोन ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांचं या कामी योगदान मोठं आहे. कामानिमित्त पुण्यात गेल्यामुळे लताताईंशी भेट होऊ शकली नाही.) वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षीही भर दुपारच्या उन्हात परिसरात देखरेखीसाठी 'राऊंड' मारण्यास जाणारा हा अवलिया माणूस म्हणजे शिस्त, जिद्द, ज्ञान, चिकाटी, निष्ठा यांचा नतमस्तक व्हावं असा अनोखा मिलाफ आहे. केवळ अण्णाच नव्हे, तर त्यांच्या संपर्कात आणि सहवासात आलेली प्रत्येकच व्यक्ती थोड्याफार फरकाने अशीच आहे. मीराताई आणि त्यांचे पति हराळीची शाळा सांभाळतात. पुण्याच्या अशोक विद्यालयातून निवृत्त झाल्यावर मीराताई आता तिथेच शिफ्ट झाल्या आहेत. आज उतारवयातही त्यांची धावपळ, प्रत्येक छोट्यामोठ्या बाबीकडे लक्ष देऊन काम करायची सवय, आपुलकी, मुलांबद्दलची माया बघत राहावी अशी आहे!

ही सगळीच माणसे वेळ पाळण्यात तत्पर आहेत. दिलेला शब्द आणि दिलेली वेळ पाळण्याची वृत्ती हे गुण माणसाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात असं मला वाटतं. हळूहळू मोठा होत चाललेला पसारा सांभाळतानाही इथले सगळेच जण सेवाभावी वृत्ती जराही सोडत नाहीत, हे वैशिष्ट्य! पाट्या टाकून कामं करण्याची सवय इथल्या अस्सल सेवाव्रतीना ठाऊकच नाहीये, असं सारखं वाटत राहिलं. मग ते शाळेतल्या तासाबद्दल चर्चा करणं असो अथवा भोजनगृहात जेवताना एखादा पदार्थ वाढण्याबद्दल असो, जी सेवाभावी वृत्ती पाहुण्याबद्दल, तीच तिथल्या शाळकरी मुलांबद्दलही!

मी तिथून निघताना त्या अनोळखी, बुजर्‍या पण लाघवी मुलांनाही 'अजून एक दिवस तरी थांबा की' असा आग्रह करावासा वाटला, यापेक्षा अधिक माझ्यासारख्या एका सामान्य शिक्षकाला काय हवं होतं? हे समाधान शब्दांत मांडता येण्यासारखं नाहीच.

लिंबाआड मावळतीला उतरत जाणारा सूर्य पुन्हा चढण्याची उमेद घेऊनच गेली वीस वर्षे उगवतोय आणि यापुढेही उगवेल. पुढच्या वेळी जेव्हा हराळीत जाईन तेव्हा अशीच नवी पालवी तरारलेली दिसेल अशी खात्री आहे.


- नचिकेत जोशी