पुस्तकाचे नावः बेलभंडारा
लेखक - डॉ. सागर देशपांडे
प्रकाशन - सह्याद्री प्रकाशन
प्रथमावृत्ती - ३ ऑगस्ट २०११
किंमत - रू. ६९९
*********************
एखाद्याने व्यवहारात साधं-भोळं म्हणजे किती साधंभोळं असावं? एखाद्याने ध्यासमग्न जगावं म्हणजे नेमकं कसं जगावं? एखाद्याने सर्वस्व अर्पून कश्शाचीही पर्वा न करता एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करावा म्हणजे नक्की किती करावा? सध्यातरी माझं उत्तर आहे - शिवशाहीर श्रीमंत बळवंतराव मोरेश्वरराव उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांच्याइतका! नव्वदी पार केलेल्या या महान शिवयोग्याचं 'बेलभंडारा' हे चरित्रात्मक पुस्तक वाचताना किती वेळा डोळे भरून आले, किती वेळा छाती-मन अभिमानाने तुडुंब भरून आलं हे मोजलंच नाही!
बाबासाहेब पुरंदरे या नम्र, शालीन, डोळस इतिहासप्रेमी संशोधकाबद्दल कुतुहल शमेल, समाधान होईल ते सर्वकाही या पुस्तकात आहे. त्यांचा जन्म, शाळकरी आठवणी, शाळामास्तर, इतिहास नावाच्या जिवलगाशी जुळलेलं मैतर आणि उर्वरित आयुष्यात जडलेला एकच ध्यास - शिवचरित्र आणि शिवचरित्राचं पारायण, आख्यान, प्रसार, आणि एक समर्पित आयुष्य!
शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास हा नजीकच्या काळात कायम वादातच सापडला आहे. ज्या इतिहासाची दखल परदेशांतल्या लष्कराने आणि तिथल्या संशोधकांनी (संशोधक म्हटलं की आपल्याला फक्त जेम्स लेन आठवतो. त्याच्याव्यतिरिक्त इतर अनेक संशोधकांनी शिवाजीराजांबद्दल संशोधन केलेली अनेक कागदपत्रे परदेशांतल्या लायब्ररींमध्ये आजही आहेत) घेतली त्याबद्दल आपण अभिमानही बाळगत नाही, किंवा फक्त दाखवण्यापुरता बाळगतो. म्हणूनच कदाचित बाबासाहेब मार्मिकपणे लिहून गेलेत - "इतिहासात चंदन खूप आहे आणि कोळसाही. आपण चंदनच उगाळू, कोळसा नको. आणि चंदनाचा कोळसा करून उगाळण्याचा उपद्व्याप तर नकोच नको!"
सगळीच मोठी माणसं वेडी असतात खरंच! बाबासाहेब तर 'वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसंच इतिहास घडवतात' असं साभिमान म्हणून गेलेच आहेत. पण कुठल्याही मोठ्या माणसाकडे डोळसपणे पाहिलं की दिसतं - सर्वस्व अर्पून घडवलेलं एक साधं सोपं पण केंद्रित आयुष्य! वयाच्या सोळा-सतराव्या वर्षी शिवचरित्र लिहिण्याचा संकल्प सोडल्यावर आलेल्या अनंत अडचणींतून मार्ग कसा निघाला त्याची थरारक गोष्ट या पुस्तकात जागोजागी वाचायला मिळते.
काय काय आहे या पुस्तकात? बाबासाहेबांचं बालपण भेटतं, १९३० सालातलं पुणे वाचायला मिळतं, दमण आणि दादरा नगरहवेलीचा स्वातंत्र्यसंग्राम ओझरती भेट देऊन जातो. इतिहासकारांची संशोधने, आणि आजूबाजूच्या हकीकती वाचायला मिळतात. शिवचरित्रासंदर्भाने संपर्कात आलेल्या राजकारण्यांच्या चक्क चांगल्या बाजू वाचायला मिळतात. शिवचरित्र साकार करण्यासाठी वाट्टेल ते कष्ट करणारा, रोज पुण्यातून भाजी घेऊन वाशी मार्केटमध्ये विकायला जाणारा, पुस्तके घरोघरी जाऊन विकणारा, घसा पूर्णपणे कामातून गेलेला असतानाही व्याख्यानांवर व्याख्याने देणारा, ऐतिहासिक पुरावा सापडल्याचा निरोप प्रतापगडच्या पुजार्याकडून येताच भर पावसात पुण्याहून प्रतापगडावर सायकलने जाणारा एक झपाटलेला 'बाबासाहेब' भेटतो आणि या दीर्घ बिकट बाका प्रसंगांमधून तावून सुलाखून घडलेले, 'अणुरणी या थोकडा' वाटणारे आणि 'आकाशाएवढे' मोठे झालेले आपले सर्वांचे लाडके 'शिवशाहीर बाबासाहेब' घडताना वाचायला मिळतात. (आयुष्यभर एवढा हलकल्लोळ केल्यावरही बाबासाहेब म्हणतात, 'मला सव्वाशे वर्षांचं आयुष्य हवंय शिवचरित्र ब्रह्मांडापल्याड नेण्यासाठी!' देवाने उदंड आयुष्य बाबासाहेबांना द्यावं!)
शिवाजी महाराज प्रसिद्ध झाले कारण त्यांनी नामोहरम केलेले त्यांचे शत्रूही तितकेच तुल्यबळ होते. 'राम मोठा वाटतो कारण रावणही तितकाच शूर होता' अशा आशयाचं उदाहरण प्रा. नरहर कुरुंदकरांनी 'श्रीमान योगी'च्या प्रस्तावनेत दिलं आहे. खूप सुरेख प्रस्तावना आहे ती! एकदा नक्की वाचा! असो. विषयांतर झालं. हां, तर त्या शत्रूंची सहीसही ओळख करून दिली, ती बाबासाहेबांनीच! अफझुलखान असो, सिद्दी जौहर असो, किंवा खुद्द आलमगीर औरंगजेब असो, बाबासाहेबांनी 'राजा शिवछत्रपती'मध्ये त्या शत्रूंचे सद्गुणही तितक्याच मोकळेपणाने मांडले आहेत. शिवचरित्र लिहिताना हा विवेक असणं ही अत्यावश्यक गोष्ट होती. मराठेशाहीच्या सर्व शत्रूंच्या वाईट गोष्टी समोर आणतानाच चांगल्याही गोष्टी वाचकासमोर ठेवणे हे संतुलन असण्यासाठी मुळात लेखक तेवढा सुसंस्कृत, शालीन आणि जाणता हवा. या जाणतेपणाचा प्रवास 'बेलभंडारा' आपल्यासमोर ठेवतं.
बाबासाहेबांनी ज्या आत्मीयतेने शिवाजी महाराजांचं आयुष्य उलगडलं, त्याच आत्मीयतेने डॉ. सागर देशपांडे बाबासाहेबांचं आयुष्य उलगडतात. माहित नसलेल्या अनेक गोष्टी-प्रसंग तर यातून समजतातच, पण एक ध्येय साध्य करण्यासाठी किती किती खस्ता खाव्या लागतात, किती गोष्टींचा त्याग करावा लागतो याचंही प्रत्यंतर येतं. बाबासाहेबांचं चरित्र लिहिण्याचं काम ज्यांच्या हातून झालं ते डॉ. सागर देशपांडे मला फार फार लकी वाटतात. अर्थात, त्यांनी ज्या अचूकपणे आणि समर्थपणे ते काम केलंय, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!
व्यक्तिश: माझ्या लाडक्या 'शिवाजी'शी माझी ओळख बाबासाहेबांनीच करून दिली. राजा शिवाजी कायमचा लाडका झाला, पण नुसत्या जयजयकारात आणि लाऊडस्पीकर लावून नाचण्यात शिवप्रेम नसून ते त्या राजाच्या गुणांमुळे आणि कार्यामुळे वाटू लागलं, हे देणंही बाबासाहेबांच्याच लिखाणाचं! तासनतास 'राजा शिवछत्रपतीची' पारायणं करण्यात कॉलेजवयातले घालवलेले दिवस आणि त्यातून झोप उडालेल्या रात्री आज अभिमानास्पद वाटतात, हे उपकारही त्यांचेच! कधीकधी असं वाटतं, की बाबासाहेबांनी शिवचरित्र लिहिलंच नसतं तर शिवाजीराजा एवढा आवडता झाला असता का? सद्यस्थितीतले गड-किल्ले आणि त्यावरचे अवशेष बघून हे अशक्यच होतं म्हणा!
अजून काय लिहू? 'बाबासाहेब पुरंदरे' म्हटल्यावर त्यांनी दिलेलं शिवचरित्राचं दान दिसतं, आणि ते घ्यायला अपुरी पडणारी माझी झोळीही दिसते...
- नचिकेत जोशी (२५/४/२०१४)
No comments:
Post a Comment