Pages

Thursday, January 21, 2016

तुझी कविता

तुझी कविता हल्ली वाचायला घेतो खरी..
पण जरा जपूनच!

प्रत्येकच ओळ मला भिडते!
कधी लचके तोडते,
तर कधी कुरवाळते
कधी रात्र रात्र जागवते
तर कधी वेड्यासारखी वागवते...

मग कधी कधी तिच्यात
स्वत:ला शोधत बसतो ..
शब्दांचे अर्थ वळवून, चुकवून
माझ्या मनासारखे करतो..
कधी जमते मनाजोगी, पण
बरेचदा निसटते चकवा देऊन!

आधार देणारं, निराधार करणारं
डोळ्यात भिजणारं, श्वासात अडकणारं...
फुंकर घालणारं, साथ देणारं...
शब्दात दिसणारं, नि:शब्द करणारं..

इतकं कधी जगलीस तू?
ओळीत मांडायला कुठे शिकलीस तू?

ओळ, अर्थ, शब्द, अगदी कविताही
कवेत घ्यावीशी वाटते
आणि तेही पुरेसं वाटत नाही
इतकी पोकळी का दाटते?

- नचिकेत जोशी (८/२/२०१३)

Wednesday, January 20, 2016

कधीकाळी तुझ्यासाठी

मनाच्या खोल मातीने उन्हाळे सोसले होते
तरी मी पेरता स्वप्ने ऋतू पान्हावले होते

अबोला फार दिवसांचा तुझा हा अन तिथे माझ्या-
घराच्या स्वच्छ काचांवर धुके अंधारले होते

नसावी काय जगण्याला जरा खोली, जरा रूंदी?
तुम्ही नुसतेच श्वासांचे मनोरे बांधले होते

कळीचे फूल होताना तिथे मी नेमका होतो
जणू चोरून कवितेने कवीला गाठले होते!

अहो जे वाटते ना ते मला प्रत्यक्ष सांगा ना!
असे बरळून पाठीवर कुणाचे हो भले होते?

तशी ती भेट शेवटचीच होती आपुली तेव्हा
पुढे नुसतेच शब्दांना उरी कवटाळले होते

मला वाटायचे मजला फुलांनी गूज सांगावे!
(कितीही वाटल्याने का कुणीही आपले होते?)

नको दुस्वास दु:खाचा ठरवले मी, कुठे तेव्हा-
कुशीमध्ये सुखाच्या ते सुखाने झोपले होते

कधीकाळी तुझ्यासाठी दिला मी जीवही असता –
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते

- नचिकेत जोशी (२०/१/२०११)

Friday, January 15, 2016

काय करावे उर्जेचे

काय करावे उर्जेचे या समजत नाही
जोडत नाही ही काही वा तोडत नाही

क्षणाक्षणाला धांदल उडते जगता जगता
कधी श्वासही सोडुन देतो घेता घेता
गेली घटिका कोणासाठी थांबत नाही

उत्तर देते चकवा कायम वाटेवरती
प्रश्नच कोरून घेतो मग तळहातावरती
वळसे पडती, तरी शोध हा संपत नाही

लाभो उर्जा झर्‍यासारखी खळखळणारी
मुक्त सचेतन झोत होउनी सळसळणारी
प्राण बनुन ही श्वासांमध्ये अखंड वाही

जगतो आहे तोवर राहो सोबत माझ्या
ओळख माझी बनुनी येवो सोबत माझ्या
नसेन तेव्हा अर्थ तिलाही नसेल काही

नचिकेत जोशी (४/४/२०१३)

Thursday, January 7, 2016

आभाळरस्ता

ओळ घेते गूढ गिरक्या, शब्द नाचवतो मला
एक साधा सरळ मिसरा ना कधी सुचतो मला

मी खरेतर एवढाही देखणा नाही मुळी
आरशामध्ये कुणाचा चेहरा दिसतो मला?

घोळके जमतात, गर्दी बदलते वाटेमध्ये
साथ शाश्वत जोखमीची फक्त मी करतो मला

भाग्य अन् दुर्भाग्य ठरते कोणत्या रेषेमुळे?
मीच हे घेऊन कुतुहल हात दाखवतो मला

भावते झुळझुळ तुम्हाला या नदीची लाघवी
डोह फसवा या नदीचा फार आवडतो मला

अर्थ शब्दांचा भलेही कळत नाही तेवढा
रोख आवाजातला पण नेमका कळतो मला

वाटते कित्येकदा की वाट मी व्हावे तुझी
पण तुझा आभाळरस्ता दूर हाकलतो मला

- नचिकेत जोशी (२२/९/२०१४)