Pages

Tuesday, February 23, 2016

किती लांबचे रोज घ्यावेत वळसे...

'सुमंदारमाले'तला हा प्रयत्नच, स्वतःला तपासून बघतो जरा!
अशा दीर्घ वृत्तामध्ये व्यक्त होणे, जमावे मला, हेच परमेश्वरा!

**************

किती लांबचे रोज घ्यावेत वळसे...

कधी आठवावे, कधी विस्मरावे, असे हेलकावे - भिती वाटते!
जरी बंद केली कवाडे घराची, झरोक्यातुनी ऊन डोकावते

नको वाटते ही जखम पावसाची, जुन्या वेदना फक्त हिरवाळती
उन्हाच्या झळा आत शिरतात तेव्हा मनाची भुई खोल भेगाळते

मनाचे रकाने भरावेत असले विषय सापडू देत देवा मला
(तिची बातमी वाचती रोज डोळे, छबी मन तिची सारखी छापते!)

कुणी भाळतो क्षणभरी फूल पाहत, खुळे फूलही आत गंधाळते
प्रवासी स्वत:च्याच धुंदीत निघतो, बिचारे मुके फूल कोमेजते

तुझ्या मैफली गाजती रोज आता, शहरही तुला आपलेसे करी
जुने खास कोणी, तुझ्या ओळखीचे, तुला ऐकण्या कान टवकारते

पुन्हा त्याच कविता, पुन्हा तीच हुरहुर, पुन्हा तेच छळणे, स्वतःला स्वतः!
किती लांबचे रोज घ्यावेत वळसे, पुन्हा वाट तेथेच रेंगाळते

'नको दु:ख वाटून घेऊस काही, मुक्यानेच हे भोग भोगायचे'
दया फार माझीच येता मला मग, कुणी आतले छान समजावते!

नचिकेत जोशी (३१/५/२०१३)

No comments: