Pages

Friday, February 12, 2016

दुबळेपण

मी चाचपडत असतो
आजूबाजूचा उजेड अधीरतेने.
टिपू पाहतो माझ्या बोटांनी
त्याचा कण अन् कण
पण तो हाती येतच नाही कधी,
फक्त व्यापून असतो माझा भवताल
त्याच्या उजळपणाने.
मी स्वत:भोवती फिरतो,
उजेड कवेत घेऊ पाहतो
तर त्याचं नितळ तेजोमय अस्तित्त्व
जाऊ देतं मला आरपार
पण हाती गवसतच नाही काही.

मी चिडतो, चरफडतो, असहाय होऊ लागतो
तेवढ्यात उजेडालाच येऊ लागतो एक सुगंध -
अस्सल, शुद्ध आणि दर्पहीन.
माझ्या श्वासात भिनू लागतो त्याचा परिमळ
इतका, की हलके हलके
माझे श्वासही सुगंधी
आजूबाजूला भासही सुगंधी.
आणि मनाला ध्यासही सुगंधीच!

उजेड आणि सुगंध - एकजीव होतात
दोघेही मनभर बागडतात,
पण माझ्या स्पर्शात गवसत नाहीत ,
माझ्या ओंजळीत मावत नाहीत.
मी थकतो, निराश होतो,
असाह्यपणे माझं दुबळेपण कबूल करतो.

मग मला एकदम तू आठवतेस.
या उजेडासारखीच तू, या सुगंधासारखीच तू,
हा उजेडही तुझाच, हा सुगंधही तुझाच.

- नचिकेत जोशी (१०/२/२०१६)

No comments: