Pages

Thursday, January 23, 2025

मागे वळून पाहताना - भाग तिसरा (अंतिम): यापुढे काय आणि कसं?

NJ Training उर्फ स्वत:चं काही चालू केल्याला १ सप्टेंबर २०२४ ला सहा वर्षे झाली. त्यानिमित्ताने एकूणच माझ्या ट्रेनिंग करिअरचा मीच घेतलेला हा धांडोळा.

*****

आकड्यांमध्ये मांडायचं झालं तर NJ-Training चं आजपर्यंत १३ कॉलेजेस/universities मध्ये ट्रेनिंग झालं आहे. २०१२ पासून मी ट्रेनिंग दिलेल्या कॉलेजेसची संख्या लवकरच शंभरला पोचेल. तसंच १६ Private Institutes किंवा training providers साठी ‘Training as a service’ह्या तत्त्वावर ट्रेनिंग दिलं आहे. ही संख्या आणि दर्जा दोन्ही वाढता राहो अशी माझी माझ्याकडून अपेक्षा आहे.

सप्टेंबर २०२२ मध्ये मी Telepathic Animal Communication चा कोर्स केला. तो करत असताना universeशी आपलं असलेलं घट्ट नातं थोडंफार उलगडलं. थोडंफार अशासाठी की, ‘कळतंय पण वळत नाही’ असं सुरू आहे. युनिवर्समधला प्रत्येक घटक एकमेकांशी आणि युनिवर्सशी जोडला गेलेला आहे. त्यांची स्वत:ची एक भाषा आहे. तिला आधुनिक शब्दांत टेलिपथी म्हणतात. तोंडाने न बोलताही एकमेकांचं बोलणं एकमेकांना कळू शकेल अशी ही भाषा आहे. ‘आपल्यासाठी जे बेस्ट आहे तेच युनिवर्सकडे मागावं’ हा मोठा धडा हा त्या कोर्सचा साइड-इफेक्ट म्हणता येईल. अर्थात ही धारणा आधीही झाली होतीच ही मागच्या भागाच्या शेवटी मी लिहिलं आहेच. पण त्यावर शिक्कामोर्तब झालं असं म्हणता येईल. स्वत:चा व्यवसाय असताना ही समज फार महत्त्वाची आहे. कारण आपल्याला स्वत:च्या व्यवसायात कुठे थांबावं, कुठे नाही म्हणावं, कुठे हो म्हणावं हे कळायला हवं – तेवढी सुरक्षितता आतून यायला हवी. इथून पुढे त्याकडे लक्ष देण्याची इच्छा आहे.

Aptitude मध्ये मी आजवर QA आणि RAचीच ट्रेनिंग घेत आलो आहे. ह्याच ट्रेनिंगचा तिसरा भाग VA ह्यांकडे लक्ष देता आलेलं नाही. आता इथून पुढे तिकडे देण्याचा मानस आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा माझी पहिली पसंती असलेले VA ट्रेनर उपलब्ध नसतील तेव्हा मी माझ्याकडून पूर्ण न्याय देणारं VA ट्रेनिंग घेऊन शकेन. ह्याव्यतिरिक्त C-SQL-DS ह्याचीही ट्रेनिंग घेण्याची इच्छा आहे. अर्थात ही इच्छा जुनी म्हणजे तरी अंदाजे ३-४ वर्षे जुनी आहे. त्या दिशेने पहिलं पाऊल २०२४ मध्ये पडलंही आहे. एका engineering कॉलेजमध्ये SQL आणि PL/SQLचं workshop घेतलं, त्याचा feedback उत्तम आला. आता त्यात प्रगती व्हावी, अशी universe कडे प्रार्थना आहे.

नवीन आर्थिक वर्षापासून NJ-LMS नवीन स्वरूपात (NJ-LMS 2.0) वापरात आली आहे. NJ-LMS चा सुयोग्य वापर वाढवणे हे एक आव्हान असेल. माझं असं निरीक्षण आहे, की एवढी ताकदवान आणि बहूपयोगी LMS सध्याच्या घडीला मार्केटमध्ये इतर कुणीही फ्री-लान्सर किंवा प्रोपरायटर बेसिसवर काम करणारा ट्रेनर देत नाही.  पण बहुतांश कॉलेजेसमधली मुलं ती म्हणावी तशी वापरत नाहीत. त्यांना ट्रेनिंग फार आवडतं, त्यांना शॉर्टकट मेथड्स आवडतात पण ट्रेनिंग संपल्यावर LMSमध्ये उपलब्ध असलेलं कोर्सवेअर आणि टेस्टस् कडे त्यांचं फारसं लक्ष जात नाही. त्यामुळे त्याबाबतचा awareness वाढवणे आणि त्यांना LMSचा पूर्ण वापर करायला प्रवृत्त करणं ही एक मोठं काम असेल.

मोठी टीम बनवणं आणि त्यातून एकावेळी एकापेक्षा जास्त कॉलेजेसची ट्रेनिंग करणं किंवा एकाच कॉलेजच्या पाच-सहाशे मुलांना ट्रेनिंग देणं यात सध्यातरी मला रस नाही. ह्याचं मुख्य कारण म्हणजे quality घसरते आणि अशा कॉलेजेसना ते चालत असलं तरी मला आजही ते मान्य नाही. २०१२ पासून मी स्वत: अशा अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये एक ट्रेनर म्हणून काम केलं असल्यामुळे किती भोंगळ, बेशिस्त आणि गुणवत्तेशी तडजोड करत (दोन्ही बाजूंनी) काम चालतं ही जवळून पाहिलं आहे. त्यामुळे शक्य होईल तोवर मी स्वत: ट्रेनिंग देत राहणार आणि अशीच कामं करणार असं ठरवलं आहे. भविष्यात माझ्याशी जुळेल असा एखादा सहकारी ट्रेनर मिळाला तर ते मोठं सुभाग्य असेल पण आलीच तर अशी वेळ अगतिकतेपोटी येऊ नये - योग यावा आणि वेळ यावी.

बाकी ‘आपण बरं आपलं काम बरं’ आणि ‘जे करायचं ते नीट करायचं’ असा ‘भुवनेश्वर कुमार’ किंवा ‘राहुल द्रविड’ टाइप स्वभाव असल्यामुळे आपलं काम हीच आपली ओळख झाली पाहिजे यावर आपसूकच लक्ष दिलं गेलं आणि ह्यापुढेही दिलं जाईल.

तर वाचकहो, इथपर्यंत आलात तसे तुम्ही कायम सोबत असाल अशी आशा आहे!

भेटूच कधीतरी!

(समाप्त)

- नचिकेत जोशी

No comments: