Pages

Wednesday, December 3, 2008

घनगड आणि तैलबैला

प्रस्तुत कथेतील किल्ल्यांवर बाईकवरून जाणे ही एक दुरापास्त चूक आहे! आणि त्यातही ’अमुक एखाद्या रस्त्याने जाऊ नका’ हा जाणत्यांचा सल्ला न ऐकता जाणे ही किमान या बाबतीत घोडचूक आहे! पण आम्ही या दोन्ही चुका एकापाठोपाठ केल्या आणि तरीही फारसे काही चुकले नाही हे समाधान अंती पदरात पाडून घेतले!

हे किल्ले गौरवशाली शिवकालीन व तत्सम इतिहासात फारसे परिचित नाहीत. अर्थात सह्याद्रीच्या कलंदर भटक्यांसाठी हे सुपरिचित आहेत, हा भाग निराळा. मुळशी तालुक्यात लोणावळ्य़ाच्या दक्षिणेला किंचित नैऋत्येकडे साधारण २५ किमीवर हे दोन्ही किल्ले उभे आहेत. पुण्याहून तेथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. आम्ही दोन्ही मार्ग ’ट्राय’ केले. तीन बाईक्स वरून मी, मयूर, श्रीकांत, तिखट (ऊर्फ आशिष तिखे) आणि प्रथमच अनिकेत व रोहिणी असे ६ जण बावीस तारखेला सकाळी साडेसहा वाजता ताम्हिणीमार्गे निघालो. पौडमार्गे मुळशी, ताम्हिणीनंतर लोणावळ्याकडे उजवीकडे एक फाटा जातो. इथून लोणावळा ५२ किमी आहे. या रस्त्यावर येकोले गाव (घनगडाचा पायथा) साधारण २५ किमीवर आहे. वास्तविक, या रस्त्याने जाऊ नका असा सल्ला आम्हाला एका अनुभवी मित्राने दिला होता, पण अंतर वाचवण्य़ासाठी दुसऱ्या एका मित्राच्या सल्ल्यावरून लोणावळा मार्गे न जाता आम्ही हाच मार्ग निवडला. क्षणाक्षणाला गचके खाणारी बाईक, ’टायरखालचा रस्ता बरा’ असं वाटायला लावणारे समोरच्या रस्त्याचे दृश्य यामुळे फाट्याला वळल्यापासून काही वेळातच आम्ही ’परत जाताना या रस्त्याने अजिबात यायचे नाही’ हा निर्णय घेऊन टाकला. या वाटेने दिवे, वांद्रे(इथून जवळच कैलासगड आहे, तो आमचा ’प्लॅन बी’ होता), पिंपरी (चिंचवडवाले नव्हे) या गावांवरून खडखडत येकोलेला पोहोचलो तेव्हा साडेअकरा झाले होते. (मधला एक तास मिसळ खाण्यात (ट्रेकमधला अपरिहार्य कार्यक्रम) गेला होता)

घनगड अत्यंत सोपा आहे. गावातूनच एक पायवाट गडाकडे जाते. साधारण अर्ध्या तासात आम्ही गडाच्या अंतिम टप्प्यातल्या गुहेजवळ पोहोचलो. गुहेशेजारी एक प्रचंड शिळा डोंगराला तिरकी टेकून ठेवावी तशी उभी आहे. दोहोंमधल्य़ा घळीत छान गारवा आहे. इथून गडाचे बुरूज अजून वरच्या बाजूला दिसतात. पण तिथे पोहोचण्यासाठी गुहेशेजारून कातळ चढून जावे लागते. ती वाट न सापडल्यामुळे ’आपण वाट चुकलो’ अशी आमची समजूत झाली आणि आम्ही तो कातळ चढण्याचा प्रयत्न केला नाही. गडावरून सभोवतालचे दृश्य मात्र नजर खिळवून ठेवते. घनगडामागे सरळ खोल कोकण आहे. त्या दिवशी वाराही भन्नाट होता. त्यामुळे रोहिणीची टोपी उडाली. मी आणि मयूरने (इतरांच्या अडवणुकीला न जुमानता, स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता, वगैरे वगैरे) ती दोन पावले खाली उतरून काठीच्या मदतीने काढली. साधारणपणे अर्ध्या तासात गड उतरून खाली आलो. आता दूरवर तैलबैलाची जुळी भिंत आम्हाला खुणावत होती.

येकोलेतून ३ किमी वर तैलबैला फाटा आहे. या फाट्यावरून डावीकडे तैलबैला आणि उजवीकडे लोणावळा (२३ किमी) आहे. येकोलेहून आम्ही त्या तसल्याच रस्त्यावरून तैलबैला फाट्यावर आलो आणि हाय रे देवा! - केवळ बुलडोझर किंवा ट्रॅक्टर किंवा तसल्याच राक्षसी टायरसाठी बनवला असावा अस्सा रस्ता समोर पसरला होता! त्या रस्त्यावरून आणखी ३ किमी काटून तैलबैला गावात पोहोचलो तेव्हा जणू निधड्या छातीने गनिमी कावा खेळून सुखरूप परत आलेल्या मावळ्यांचे चेहरे व्हावेत तसे भाव आमच्या चेहऱ्यांवर होते. आता पुढची चढाई या लढाईपुढे काहीच नव्हती. तैलबैलाचीही वाट अत्यंत सोपी आहे. आम्हीच चुकून चुकलो आणि योग्य वाटेऐवजी तैलबैलाला समांतर अशा पायथ्याच्या झाडीमध्ये शिरलो. वरून पाहणाऱ्या एका ग्रुपने मग ओरडून आम्हाला मागे फिरायला लावले.

तैलबैलाची भिंत नजरबंदी करते. एकमेकींना खेटून उभ्या असलेल्या त्या भिंतींमध्ये एक आठ-दहा फूट रूंद खाच आहे. ’त्या’ अज्ञात निर्मीकाची सह्याद्रीतील ही असली कारागिरी केवळ अवर्णनीय आहे. ती भिंत चढण्यासाठी त्या दिवशी तिथे प्रस्तरारोहणाची सर्व आयुधे घेऊन एक ग्रुप आला होता. आम्ही मात्र जणु ती सबंध भिंतच हलवतोय असं वाटावे असे काही फोटो थोडिशी करामत करून काढले आणि अधिक वेळ न घालवता खाचेकडे निघालो. या खाचेत बसणे हे एक सुख आहे. त्या दिवशी हसत्या-खेळत्या प्रस्तरारोहणामुळे तिथे शांतता नव्हती. कुठल्याही ट्रेकमध्ये किमान अर्धा तास फक्त शांतता ऐकायला मिळावी ही माझी मनापासून इच्छा असते. मी एखाद्या झाडाखाली किंवा कातळावर (सावलीत) आडवा झालोय, आजुबाजूला खोल दऱ्या, हलका वारा वाहतोय, पक्षी असतील तर त्यांचा चिवचिवाट- नसतील तरी हरकत नाही, बरोबर कुणी असेल तर उत्तम, नसेल तर अत्युत्तम आणि बाकी सर्वत्र शांतता... मनात कसलेही चिंतन नाही, कसलाही विचार नाही, फक्त शां...त...ता... वा वा!! (तिथे त्यादिवशी नसलेल्या शांततेमध्ये मग मी आणि श्रीकांतने ह्या इच्छेवर पाच मिनीटे नुसतेच बोलून घेतले!) तर ते असो.

त्या खाचेत फरशा घातलेल्या आहेत आणि कपारीत भैरोबा आहे. तिथेच आम्ही पंगत मांडली कारण एव्हाना साडेतीन झाले होते आणि सकाळच्या नाष्ट्यानंतर आता भुकेची जाणीव व्हायला लागली होती. कपारीतल्या टाक्यातील पाणी गोड आणि थंडगार आहे.

पश्चिमेकडे सुधागड, दूरवर सरसगड, आग्नेयेला मागच्या डोंगराशी एकरूप झालेला घनगड दिसतो. तैलबैलाच्या लगेच पायथ्याला सर्व बाजूंना लांब पठार आहे आणि ते संपलं की लगेच खोल खोल कोकण! सुधागड आणि तैलबैलाचे पठार यामधली (हजार फूट खोल) दरी तर इतकी चिंचोळी आहे की उडी मारून पलीकडे सुधागडावर पोहोचावे असे (लांबून) वाटते. एकंदरीत ’व्ह्यू’ देखणा आहे. मनसोक्त फोटो काढून लगेच परत निघालो, कारण अंधार पडायच्य़ा आत ’तो’ भयानक रस्ता पार करायचा होता. वाटेत एका विहीरीवर ओंजळी-ओंजळीने पाणी प्यायलो आणि तिथल्या आजीबाईंचे ’घरचे वाट पाहत असतील, नीट जा रे बाळांनो’ असे प्रेमळ आशीर्वाद घेऊन गावात परतलो. ’पोरांनो, इथे गेली कित्येक वर्षे याच रस्त्यावर असेच येतोय-जातोय’ हे वाक्य ऐकल्यावर मात्र आम्ही ’त्या’ रस्त्याचा विचारच सोडून दिला.

लोणावळ्याच्या वाटेवर एका धबधब्याजवळ सूर्यास्त पाहायला थांबलो आणि माझी शांतता ऐकण्याची इच्छा पूर्ण झाली. समोर खोल दरी, दूरवर दरीत नागमोडी वळणे घेत जाणारी नदी, वातावरणात भरून राहिलेला रानफुलांचा गंध, आणि दिवसभर तेज मुक्तहस्ते वाटून अस्ताला जाणारा तो ’तेजोनिधी लोहगोल’ आणि हे सगळे असेच ’आत’ उतरावे म्हणूनच जणू हाती आलेला चहाचा ’प्याला’! एक परफेक्ट कॅनव्हास जमून आला होता तिथे! वेगवेगळे सूर्यास्त वेगवेगळी आठवण ठेवून जातात. रायगडाच्या टकमक टोकावरून पाहिलेला, राजगडावरून पाहिलेला - तोरण्याच्य़ा पाठीमागे अस्ताला जाणारा, पांडवगडाहून येताना कृष्णेच्या काठी बसून पाहिलेला, वासोट्याहून परत येताना बामणोलीला शिवाजीसागर जलाशयाच्या काठावरून पाहिलेला असे अनेक सूर्यास्त यादगार बनून राहिले आहेत! अशा वातावरणाची किमयाच अशी असते, की कितीही बेफिकीर, अलिप्त राहायचं म्हटलं तरी मनाच्या बंद कप्प्यातून काही आठवणी निसटून आजुबाजूला फेर धरतातच! अशा वेळी फक्त अस्ताचा सूर्य पाहत रहावा - मी तेच केले!

सूर्य ढगाआड अस्ताला गेला आणि तिन्हीसांज धुक्याची फिकट शाल पांघरून आसपास वावरायला लागली. कुठलाही रसिक, शौकीन माणूस रेंगाळेल असेच वातावरण तयार झाले होते. आम्हीही थोडेसे रेंगाळून, फोटो काढून परत निघालो. आंबवणे, शहापूर (कोरईगड फाटा), घुसळखांब (किल्ले तुंग फाटा) मार्गे लोणावळ्य़ात पोहोचलो. वेळेचे गणित बरोब्बर बसले तर एकाच दिवसात घनगड-तैलबैला-कोरईगड असाही ट्रेक करता येतो. येताना हायवेवरून गाडी चालवताना जणू स्वर्गसुखाचा अनुभव घेत (कारण एकच- रस्ता!!) ७०-८० किमी दीडतासात पार करून साडेआठाला पुण्यात पोहोचलो. एकूण प्रवास - १९४ किमी, एकूण पायपीट - अगदीच कमी, फारतर ५ किमी!

दुसऱ्या दिवशी रोहिणीने ’या ट्रेकला १ ते १० च्या स्केल वर किती रेट करशील (१० म्हणजे सर्वोत्तम)’ असा प्रश्न विचारला. कदाचित त्या महाभयानक रस्त्याची आठवण शरीराचे ’काही’ अवयव तेव्हाही वागवत असल्यामुळे मी ’५ किंवा ६’ असले आखडू उत्तर दिलेही, पण घनगडावरून सह्याद्रीचे सरळ खोल घाशीव कडे पाहताना, किंवा तैलबैलाच्या कड्याखाली उभा असताना हा जर प्रश्न मला कुणी विचारला असता तर त्या वेळी १ ते १० ही स्केल फारच तोकडी वाटली असती. अर्थात आपण रेटींग करायचे असते ते आपल्या अनुभवालाच. किल्ल्यांचे रेटिंग तर साडेतीनशे वर्षांपूर्वीच झाले आहे; नाही का?

नचिकेत जोशी (२९/११/२००८)

5 comments:

Deepak said...

... मस्त ट्रेक झालेला दिसतोय..!

.... आणि हो, काही फोटो वगैरे काढलेत की नाही... कुठे आहेत..?

Anand Joshi said...

छान लिहितोस मित्रा..

शेखर जोशी said...

नचिकेत,
भटकंतीवरील सर्व लेख मस्त आहेत.
शेखर जोशी

Pankaj - भटकंती Unlimited said...

मस्त आहे रे वर्णन.

Ajinkya said...

लई भारी.....! मनापासून आवडलं