Pages

Tuesday, May 11, 2010

एक उनाड दिवस

डिसेंबर मध्ये तोरणा-रायगड हा ड्रिम ट्रेक केल्यानंतर चार महिन्यात दमवणारी सोडाच, पण साधी भटकंती टाईप मुशाफिरीही केली नव्हती. आणि आता मरणाचा उन्हाळा सुरु आहे. म्हणून ट्रेक बंद आहेत. पण मागच्या शनिवारी बोपदेव घाटाच्या वर कानिफनाथाला जाऊन आलो आणि ट्रेक नाही तर बाईकवर कुठेतरी जायला हवं, हा विचार मूळ धरू लागला आणि आठवड्याच्या आतच फळालाही आला.. बाईकवर भटकायला जायचं आणि तेही ट्रेकसाठी नाही तर मग प्रवास ओढ लावणारा हवा आणि बाईक चालवण्याचं समाधान देणारा हवा! आणि हे सगळं एक दिवसात जमवायला हवं! म्हणून मग यावेळेचं डेस्टिनेशन होतं - सातारा! भटकंतीसाठी सातारा आणि कोल्हापूर हे घाटावरचे माझे दोन सर्वात आवडते जिल्हे आहेत. दुर्गभ्रमणाबरोबरच धार्मिक क्षेत्रांसाठीही हे दोन जिल्हे नावाजलेले आहेत. फरक इतकाच होता की यावेळी आम्ही किल्ल्यांऐवजी देवळांना भेटी देणार होतो.

गुरुवारी सकाळी पावणेसात वाजता मी, सुजय आणि ’हमारा बजाज’ (डिस्कव्हर १३५) निघालो तेव्हा फक्त सातारा हे एकच ध्येय होतं. शिरवळला (सुप्रसिद्ध) श्रीराम वडापाव खाऊन थेट साताऱ्यात पोचलो तेव्हा नऊ वाजले होते. दिवसभराचा प्लॅन जाता जाता बाईकवरच ठरत गेला. साताऱ्यात पोचल्यावर पहिलं टार्गेट होतं - अजिंक्यतारा किल्ला! देवळांना भेटी द्यायला निघालो होतो हे खरंच आहे, पण किल्ल्यावरही देऊळ असेलच की, हा फक्त ट्रेकरलाच सुचणारा विचार डोक्यात आला आणि बाईक गडाकडे वळवली. एरवी ट्रेकला निघाल्यावर चुकुनही या किल्ल्याकडे वळलो नसतो, त्यामुळे आजच्या दिवसासाठी हा किल्ला उत्तम होता. गाडी वरपर्यंत जाते आणि किल्ला तासाभरात बघून संपतो. आम्ही नेहमीप्रमाणे किल्ल्याच्या काठाकाठाने (म्हणजे दरीच्या काठाकाठाने) किल्ल्याला प्रदक्षिणा घातली. जवळजवळ सगळ्या तटबंदीची आता पडझड झाली आहे. गडावरच्या उत्तराभिमुख हनुमानाचे दर्शन घेतले आणि साडेदहाला गड उतरलो. आता पुढचं ठिकाण होतं - अवघ्या १२ किमी वर असलेला परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड!

साताऱ्यापासून सज्जनगडाकडे जाताना बोगदा पार केला की लगेच डाव्या हाताला एक रस्ता जातो. त्या रस्त्यावर एक किमीवर साताऱ्याचे ग्रामदैवत "खिंडीतला गणपती" आहे. त्याच आवारात कुरणेश्वर महादेव आणि दत्तात्रयाचे मंदिर आहे. आवारात झाडे विचारपूर्वक वाढवलेली असल्यामुळे भर दुपारीही गारवा वाटत होता. मंदिराच्या आवारात खूप प्रसन्न वाटतं. त्या तीन देवळांमध्ये दर्शन झाल्यावर आम्ही बाईक सज्जनगडाकडे हाकली. एव्हाना साडेअकरा झाले होते आणि बाराच्या आरतीपर्यंत आम्हाला सज्जनगड गाठायचा होता. मागच्या आठवड्यातील पुण्याचे पावसाळी हवामान आणि पश्चिम महाराष्ट्रातील अवकाळी पावसाळी वातावरणाबद्दल पेपरमध्ये वाचलेल्या बातम्या यावरुन त्यादिवशी आम्ही अगदी पावसाची नाही तरी ढगाळ वातावरणाची अपेक्षा करत होतो. (मी तर पावसाळी जाकीटही सॅकमध्ये घेऊन निघालो होतो). पण तसे काहीही घडले नाही आणि भर उन्हात आम्ही तो घाटरस्ता चढू लागलो. मंदिर बंद व्हायला दहा मिनीटे असताना आम्ही गडावर पोचलो. दर्शन व महाप्रसाद घेऊन गड फिरयला निघालो. चौदा वर्षांपूर्वी शाळेतल्या सहलीबरोबर सज्जनगडावर आलो होतो. आता खूप सुधारणा झाल्या आहेत. समर्थ रामदास सेवा समितीतर्फे भक्तांसाठी आणि समर्थांच्या विचारांच्या प्रसारासाठी खूप कामे चालू आहेत. धाब्याच्या मारूतीचे दर्शन घेऊन अडीच वाजता गड उतरलो. अजून चार तास हातात होते. साडेसहाला जरी सातारा सोडले असते तरी आठपर्यंत पुण्यात पोचलो असतो कारण आता परत जाताना खंबाटकी घाटाऐवजी फक्त एक बोगदा पार करायचा होता. त्यामुळे आम्ही ठिकाणे वर्कआऊट करायला लागलो. कास मार्गावरील यवतेश्वर आणि हायवे ओलांडून कोरेगाव मार्गावरील कृष्णा-वेण्णा संगमावरील माहुली ही दोन फ़ायनल केली आणि निघालो.

’परतीच्या वाटेवरती’ सज्जनगड-सातारा रस्त्यावर, भोंदवडे गावाजवळ रस्त्याच्या कडेला दाट सावली असलेले वडाचे झाड दिसले आणि एवढा वेळ प्लॅननुसार चालत असलेली ट्रिप प्लॅन सोडून गेली. ते झाड आणि ती सावली बघून बाईक सरळ रस्त्याच्या कडेला घेतली आणि त्या वडाच्या सावलीत बुंध्यावर डोके टेकून मी आणि सुजयने चक्क ताणून दिली. तो अर्धा तास मी कधीच विसरणार नाही. कारण माझे सगळे वैयक्तिक-व्यावसायिक हुद्दे, सो कॉल्ड पत-प्रतिष्ठा, जबाबदाऱ्या यांचे बंध त्यावेळी नाहीसे झाले होते. भर दुपार असूनही त्या सावलीत मात्र सुखद झुळूक होती. त्या आडवाटेवरच्या स्वर्गात फक्त अधूनमधून एसटी, तसेच गावकऱ्यांचे आवाज सोडले तर फक्त वाऱ्याचा आवाज होता. बाकी सर्व मोहमयी दुनिया तेवढा वेळ माझ्यासारख्या सामान्य अट्टल भटक्यापासून कोसो दूर होती! पडल्या पडल्या झोप कधी लागली ते कळलंही नाही. अर्ध्या तासाने मी जागा झालो. डोळ्यावरती बाजुच्या झुडुपाची फांदी आली होती. तिचे चिमुकले फूल वाऱ्यामुळे डोलत होते. पडल्या पडल्याच त्याचे हलत्या वाऱ्यामध्ये फोटो घेतले. तोपर्यंत सुजयही जागा झाला आणि आम्ही पुढे निघालो. यात एक तास कसा गेला ते कळलेच नाही. त्यामुळे पुढे कधी कास पठारावर येऊ तेव्हा यवतेश्वर करू असे ठरवून माहुलीकडे निघालो.

दक्षिणकाशी असे वर्णन केले गेलेले आणि संभाजीराजे मोगलांना जिथे मिळाले ते ऐतिहासिक ठिकाण असलेले माहुली कसे असेल याबद्दल खूप उत्सुकता होती. पण ’प्रथम तुज पाहता जीव दुखावला’ अशी अवस्था झाली. इतर अतिपवित्र देवस्थानांच्या ठिकाणी असते तशी इथेही अस्वच्छता भरपूर होती. मंदिरात पत्त्यांचे डाव रंगले होते. अशा मानवी प्रदुषणापुढे त्या नद्यांमधील ’गाळी’व प्रदुषणाची काय कथा? उन्हाळ्यामुळे कृष्णा आणि वेण्णा या दोन्ही नद्या बऱ्यापैकी आटल्या होत्या हे खरेच. पण हा संगम म्हणजे नद्यांच्या नशिबी असणारी एक भौगोलिक अवस्था यापलिकडे काहीच आत्मीयता वाटली नाही. चार वर्षांपूर्वी सांगलीजवळ हरिपूर गावी पहिलेला कृष्णा आणि वारणा नदीचा संगम आठवला. तो संगम हरिपूर गावाच्या बऱ्याच खालच्या पातळीला होत असल्यामुळे निदान संगम बघायला तरी मिळाला होता. आणि कुठलीही धार्मिक ख्याती चिकटलेली नसल्यामुळे तो संगम अस्वच्छतेपासून दूर होता. (आता तिथे काय वर्तमान असेल ते कृष्णामाईच जाणे!) तर ते असो. एव्हाना फक्त पावणेपाच वाजले होते आणि माहुलीची भेट अपेक्षेपेक्षा खुपच लवकर आटोपली होती. मग आता अजून एखादे ठिकाण करण्यापेक्षा सरळ पुणे गाठावे असा विचार केला. दिवसभर मनसोक्त भटकंती झाली होती, सर्व काही नियोजनानुसार पार पडले होते, कुठेही घाई झाली नव्हती म्हणून परत जातानाही निवांत बाईक चालवत, सूर्यास्ताच्या मनोहारी वातावरणाचा आस्वाद घेत साडेसातला पुण्यात पोहोचलो.

दोन किल्ले, चार देवस्थाने, सात देवळे, दोन येडे भटके, एक बाईक, २६५ किमी बाईकिंग अशा भटकंतीनंतर आम्ही खूप फ्रेश झालो होतो आणि नेहमीच्या शिस्तबद्ध, नियोजनप्रिय दिनक्रमामधून वेळ काढून घालवलेला एक ’उनाड’ दिवस संपवून पुन्हा शिस्तीच्या कोषात जायला सज्ज झालो होतो.

नचिकेत जोशी (१०/५/२०१०)

2 comments:

शंतनू देव said...

Chaan lihilas. As Always !

Pranav Joshi said...

Namaskar Nachiket,

Aapla ha lekh mala khup avadla. Me Pranav Joshi, Netbhet ha blog majha ahe. June 2010 chya aanka satha aapla ha lekh ghenyachi faar icha aahe. Aapan jar aapla e mail id kalavla tar aapnas savistar mahiti deta yeil.majha e mail id ahe pranav@netbhet.com. Dhanyawad.
www.netbhet.com