Pages

Sunday, May 8, 2011

कवीला कधीच विचारू नये...

कवीला कधीच विचारू नये - ही कविता कशी सुचली?
त्यालाही हे माहित नसतं की कुठली वेदना कधी प्रसवली?
नेमकी कुठली शिवण उसवली?
असा कुठला धागा कातरला गेला आणि
ओळ विणून तयार झाली?

बाकीचे जे बोलून मोकळे करून टाकतात
ते हा शब्दात बांधत बसतो..
जुनी कहाणी जुन्या दुखण्यासारखी
पुन्हा उगाळत बसतो...
तेव्हा वाटतं, की जावं आणि हलवावं त्याला.
अशा वेळी एखादा कोरा कागद त्याच्यापुढे द्यावा
आणि समजून घ्यावं आता इथून पुढे त्याची आणि आपली वाट वेगळी...
पण कवीला कधीच विचारू नये - ही कविता कशी सुचली?

कवितेवरून कवीच्या भूतकाळाची चिकित्सा वगैरे अजिबात करू नये,
कारण तोही तेच करतोय...
गतकाळातील एकेका क्षणाला त्याने वाहिलेली
श्रद्धांजली केव्हातरी आपल्या हातात पडलीच
तर त्यातील अजरामर भावनांना फक्त दाद मात्र द्यावी...
कारण आपल्यासाठी जरी त्या कवितेच्या ओळी असल्या तरी
त्याच्यासाठी ते असतं जाणिवांच्या प्रसवांतून जन्माला आलेलं
एक शाश्वत सत्य!
ते सत्य स्वीकारण्या अथवा नाकारण्याआधी -
त्याच्याकडे फक्त पाहावं हसून,
जमलंच तर डोलवावी मान बिन...
तेवढ्यानेही नेहमीसारखीच पुन्हा बसेल
त्याच्या त्या चिरंतन जखमेवर खपली
पण...
तरीही कवीला कधीच विचारू नये - ही कविता कशी सुचली?

- नचिकेत जोशी (३/३/२०११)