Pages

Thursday, September 22, 2011

सदरा

सुख आत खरे वरती नखरा
सदर्‍यात लपे दुसरा सदरा

जपले तुजला इतके अलगद
पुसता पुसता उठलाच चरा

जखमा हिरव्या दिसतील पुन्हा
बरसेल सखा, भिजवेल धरा

फसलास मना, स्मरलेस तिला
बघ आत पुन्हा ढवळेल जरा

तुमचे फतवे लखलाभ तुम्हा
हृदयामधला मम कौल खरा

'नचिकेत' रमे गझलेत सदा
अपुल्याच घरी असतो उपरा

- नचिकेत जोशी (३०/८/२०११)

1 comment:

क्रांति said...

तुमचे फतवे लखलाभ तुम्हा
हृदयामधला मम कौल खरा


वा! चरा तर खरंच काळजावर चरा आहे!