Wednesday, January 18, 2012
देहरीचा गोरखगड
पावसाळ्यापासून देहरीचा गोरखगड बोलावत होता. कातळ हिरवटले, रानवाटा गच्च झाल्या, ओढे फुफाटत घाटावरून खाली उड्या मारायला लागले तरी गोरखडाची भेट पावसासारखीच वाहून जात होती. अखेर पावसाळाही संपला आणि गोरखवरून दिसणारं पावसाळ्यातलं विलोभनीय दृश्यही एका वर्षाकरता पुढं निघून गेलं. सह्यांकनमध्येही गोरखगड तीन-चारवेळा दूरूनच आठवण करून देता झाला. अखेर गेल्या आठवड्यात १५ जानेवारीचा रविवार कुठे 'सत्कारणी' लावावा हे ठरत नसताना अचानक पुण्याहून माझा सर्वात जुना ट्रेकमेट मयूरचा फोन आला. 'तू कुठेही ठरव, मी येतो' एवढ्या पाच शब्दांत त्याने काम करून टाकलं.
सुशील त्या रविवारी ट्रेक न करण्याच्या मूडमध्ये होता. मग शेवटी मी आणि मयूरनेच जायचं ठरवलं आणि एकदाही नेट न धुंडाळता गड ठरवला - न भेटलेला जुना दोस्त - गोरखगड! ओळखीच्या जवळजवळ सगळ्या ट्रेकमेट्सने गोरखगड याआधीच केला होता. न केलेला बहुधा असा मी एकटाच होतो.
शनिवारी देहरीमधल्या हमीदभाईला फोन करून 'आम्ही येतोय, चहा-नाष्टा-जेवण' याची सोय होईल ना?' असं विचारून ठेवलं. मी मुंबईतून आणि मयूर पुण्यातून येणार असल्यामुळे कल्याण-मुरबाड-म्हसामार्गे जाण्याऐवजी कर्जत-म्हसामार्गे जायचं ठरवलं. (दोन्हीकडून तिकीट साधारण तेवढंच आहे).
कर्जतहून सव्वाआठला म्हसाची एसटी आहे. त्या एसटीने म्हसाला पोचलो. तिथे संक्रातीनिमित्त म्हसोबाची आठवडाभराची जत्रा होती. आम्ही म्हसामध्ये पोचलो तेव्हा पावणेदहा झाले होते. जत्रेतले स्टॉल्स त्यांच्या मालकांप्रमाणेच झोपेत असावेत. 'जत्रेमध्ये येताना फिरू' असा विचार करून म्हसाहून देहरीला जाणार्या रस्त्यावर लागलो. ह्या रस्त्यावर समोरच एक सुंदर डोंगर दिसत होता. धुकेजलेल्या हवेमुळे तो ओळखता आला नाही (याबद्दल मी स्वतःला नंतर भरपूर दोष दिला). डावीकडे गोरख-मच्छिंद्रगडाचे दोन सुळके दिसत होते. 'छोटाच दिसतोय गड. होईल लवकर बघून' आम्ही मनात हिशेब मांडला. म्हसोबा यात्रेमुळे 'रापम'ची मिनिबस सेवा तासातासाला सुरू होती. त्या बसने देहरी गाठले.
हमीदभाईंच्या घरी गेलो. चहा-नाष्टा केला. त्याच्या व्हरांडा कम ओटी कम फरसबंदी अंगणात एक मातबर वाटणारे गृहस्थ बसले होते. त्यांच्याशी गप्पा मारता मारता देहरीचा इतिहास समजला. त्यांच्या मते, इसवीसनाच्या बाराव्या शतकात, त्या गावाचे नाव "उंबर" असे होते. महसूलकार्यालयात अजूनही देहरीचा उल्लेख उंबर असाच सापडतो. घाटावरून खाली उतरण्याचे अनेक मार्ग तत्कालिन उंबरगावाच्या आसपास होते. नंतरच्या काळात त्या घाटवाटा लुप्त झाल्या. त्या वाटा कोकणात उतरल्यावर लागणारे साडेतीन लाख चुला (चुला = चूल किंवा घरे या अर्थी) असलेले हे गाव होते. तेराव्या शतकात उत्तरेकडून मुसलमानी आक्रमणांत गावाचे नाव बदलून दहलीज (उंबर्याला उर्दू प्रतिशब्द) झाले आणि त्याचा अपभ्रंश होऊन देहरी झाले. त्या काळात देहरीमध्ये साडेदहा लाख वस्ती होती (साडेतीन गुणिले तीन - नवरा,बायको आणि एक अपत्य या हिशेबाने) याचंच मला नवल वाटत होतं. "एवढी लोकसंख्या सध्याच्या कल्याणचीही नाहीये" - ते मातब्बर गृहस्थ म्हणाले. "आता आम्ही इथले जुने, त्यामुळे आम्हाला माहित आहे गावची. मी सरपंच आहे या गावचा आणि (हमीदकडे बोट दाखवून) हे उपसरपंच!". मी मनातल्या मनात जागीच उभा राहिलो! हायला! गावच्या चक्क सरपंच-उपसरपंचांची ओळख झाली आणि तीही गावात शिरल्या शिरल्या!
मग त्यांची परवानगी वगैरे घेऊन गडाकडे निघालो. थोडंसं अलिकडे येऊन डाव्या हाताला एक वाट मंदिराकडे जाते.
तिथून एक ठसठशीत पायवाट मधलं एक टेपाड चढून पलिकडे थोडंसं गोरखगडाच्या पायथ्याला खाली उतरते. दुपारी अकराच्या उन्हात सुरू केल्यामुळे अर्ध्याच तासात माझा आणि मयूरचा 'डॉबरमॅन झाला'. (डॉबरमॅन होणे - दमल्यामुळे जीभ बाहेर काढून श्वास घेणे). पण वाट अगदी सोपी आहे. "हे दोघे ट्रेकमध्ये असले की हमखास वाट चुकते" असा लौकिक असलेले आम्ही दोघेच या ट्रेकमध्ये असूनही एकदाही वाट चुकलो नाही, इतकी वाट सोपी आहे! गडाच्या दिशेने चालत रहायचं मात्र!
टेपाड उतरून पलिकडच्या सोंडेवर उतरून गडाच्या दिशेने वीस-एक मिनीटं चाललं की एक पणती येते. तिथून डावीकडे वरच्या दिशेने गोरखगडाकडे वाट जाते. तर सरळ वाट समोरच्या डोंगराच्या कुशीतल्या भवानी मंदिराकडे जाते. जाताना दिसलेला सुंदर सिद्धगड आणि त्याच्या अलिकडे साखरमाची डोंगराची सोंड -
कातळामध्ये कोरलेल्या पायर्यांचा पहिला चाळीस एक फुटांचा भाग आहे. त्या भागाच्या शेवटी गोरखगडाचा छोटा पण सुंदर दरवाजा आहे.
आम्ही त्या दरवाजात फोटो काढत असताना गावातून देवाला नारळ वहायला चाललेली दोन तरूण मुले आली - दिनू आणि प्रशांत. आणि मग खाली उतरपर्यंत आम्ही एकत्रच होतो. तिथून वर गेलं की गुहा लागतात. नवनाथांपैकी गोरक्षनाथांनी इथे समाधी घेतली अशी आख्यायिका सरपंचांनी सांगितली होती. म्हणून हा गोरखगड! गुहा प्रशस्त आणि शांत असून आत मुक्कामाची, स्वयंपाकाचीही सोय होते.
गुहेतून दिसणारा मच्छिंद्रगड -
गडाच्या माथ्यावर जाण्यापूर्वी आम्ही गडाला प्रदक्षिणा मारायचं ठरवलं. मागच्या बाजूला कातळात कोरलेल्या दोन छोटेखानी गुहा आहेत. (ही 'कपलगृहे' असावीत - इति प्रशांत!) ती गुहा साधारण १०-१२ फूट उंचीवर असल्यामुळे मयूर-दिनू-प्रशांत यांनी प्रस्तरारोहणाची हौस भागवून घेतली. धडपडत, पाय रोवत वगैरे चढले आणि उतरताना तीच कसरत करून सुखरूप खाली आले. मला कंटाळा आल्यामुळे मी खालूनच त्यांची मजा बघत बसलो होतो.
त्यानंतर पुन्हा आम्ही गुहेपासून वर जाणार्या पायर्यांपाशी आलो. गोरखगडाचा अवघड म्हणता येईल असा पॅच इथून सुरू होतो. सरळसोट कातळामध्ये खड्या पायर्या आहेत.
मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे, कातळातच कोरून काढलेल्या पूर्ण वर्तुळाकार खाचा! सर्वसाधारणपणे, चार बोटांची पेरे मावतील, इतक्या खाचा बघितल्या होत्या. इथे मात्र, एक छोटा अँकरही आरामात बसेल इतक्या आकाराच्या खाचा पाहिल्या.
चढताना पाठीमागे थेट दरी असली तरीही या खाचांच्या आधारे हा पॅच कोरड्या ऋतूमध्ये अगदी सोपा आहे. पावसाळ्यात त्या पायर्यांवर पाणी वाहत असल्यामुळे आणि कातळ गुळगुळीत होत असल्यामुळे गुहेपासून वर जाता येत नाही, असे ऐकले. (आता पावसाळ्यात गोरखगड करायचा आहे!)
वर गोरक्षनाथांचे छोटेसे मंदिर आहे. गडाचा माथा साधारण बाराशे ते पंधराशे स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा (इतकाच) आहे. आजूबाजूचा नजारा केवळ अप्रतिम! डावीकडे नानाचा अंगठा दिसल्यावर तर मी एकदम उत्तेजितच झालो. कारण सह्यांकन २०११ च्या वेळी याच भागात चार दिवस पायपीट झाली होती. आणि गोरखगडावरून काही क्षणात पुन्हा 'सह्यांकन' फिरून आलो. डावीकडून नाणेघाट, अलिकडे जीवधन-वानरलिंगी, पायथ्याचं सिंगापूर गाव (अंदाजाने), आंबोली घाटाची खाच, सर्वात उंच दिसणारा ढाकोबा डोंगर (दुर्ग दिसला नाही), त्याच रेषेत अहुप्याचा कडा, अहुपे पठाराचा माथा, त्याच्या अलिकडच्या डोंगरावर आत भट्टीचं रान, साखरमाचीचा पुढे आलेली सोंड, दमदम्या, राजाची लिंगी, सिद्धगड! सह्याद्रीच्या मुख्य धारेपासून काहीसा अलग असल्यामुळे गोरखगडावरून ही रांग नुसत्या डोळ्यांनीही दिसते.
पायथ्याचे, जिथून वाट सुरू होते, ते मंदिर -
मच्छिंद्रगड -
मच्छिंद्रगड आणि मागे खोपिवली गाव -
पंधरा-वीस मिनिटे थांबून खाली उतरलो. आता दरी समोर होती -
दोन केव्हाच वाजून गेले होते. झपाझप उतरून तासाभरात पायथा गाठला. हमीदभाईंकडे गेल्यावर भात-भाकरी-रस्सा-कांदा-पापड असं फर्मास पान समोर आल्यावर 'आता न जेवता निघू, नाहीतर मयूरला पुण्याची ट्रेन गाठायला उशीर होईल' हा आधी केलेला विचार विसरूनच गेलो.
मिनिबसने म्हसाकडे येताना मी सिद्धगडच बघत बसलो होतो. मला गड बघतच बसावं वाटत होतं!सिद्धगडाला वळसा घालून रस्ता असल्यामुळे गडाची चतकोर प्रदक्षिणा झाली.
म्हसाच्या अलिकडे, सिद्धगडाचा डोंगर बाजूला झाला आणि थेट दूरवर नजर गेली - पदरगड! आह!! "नानाचा अंगठा-नाणेघाट-जीवधन-ढाकोबा-अहुपे टोक-साखरमाची-दमदम्या-सिद्धगड-भीमाशंकर-पदरगड-" असला विस्तीर्ण नजारा एका रेषेत दिसला. अजून काय हवं?
म्हसाच्या जत्रेमध्ये गर्दी व्हायला लागली होती. मी फोटो काढत, स्टॉल पाहत चाललो होतो. उंच पाळणा बघून त्यात बसण्याची बालइच्छा जागी झाली! मयूरने "कर्जतहून प्रगती नाही निदान डेक्कन क्वीन तरी मिळू दे" असं विनवत ती इच्छा मोडून टाकली! एके ठिकाणी उसाचा रस प्यायलो आणि त्या रसवाल्या जोडप्याचा फोटो काढला. तो त्यांना दाखवल्यावर त्यांच्या फर्माईशीनुसार त्या मावशी मयूरला रस देतानाचा एक फोटो काढला. आणि मग त्यांनी आमच्याकडून रसाचे पैसे घ्यायलाच नकार दिला! मग त्यांची समजूत काढली आणि पैसे दिले.
पुढे एके ठिकाणी तसबिरीचा फोटो घेतल्यावर त्या विक्रेत्याने त्याच्यासकट सोबतच्या तिघांचा फोटो घ्यायला सांगितलं. पण इथे मामला वेगळाच होता! कारण फोटो घेतल्यावर त्या बाईने 'उद्या पेपरात येईल ना हा फोटो?' असं विचारलं.
म्हसाहून मयूर कर्जतला गेला (त्याची डेक्कन क्वीन चुकली आणि त्यानंतर 'हात दाखवा ट्रेन थांबवा' उर्फ सह्याद्री एक्प्रेसने त्याला घरी पोचायला पावणेअकरा झाले) आणि मी म्हसा-मुरबाड-कल्याणमार्गे मुंबईत आलो.
फॉर अ चेंज, वाटा न चुकताही ट्रेक करावा! असे ट्रेकही आनंद देतातच की! आता एकदा गोरखगड ते सिद्धगड असा मुक्कामी ट्रेक करायचा आहे!
- नचिकेत जोशी
Subscribe to:
Post Comments (Atom)
8 comments:
मस्तं, खुप भरभरुन लिहिलय.....
गडांबद्दलचं प्रेम लिखाणातुन छान व्यक्त झालयं......आणि फोटो सगळेच मस्तं आले आहेत...
घर बसल्या 'गोरखगड' पाहुन आल्यासारखं वाटलं....
आता पटकन पुढचे ट्रेक करा आणि लेख टाका :)
छान लेख..
माझाही करायचा राहिलाय हा गड ..
बघू या हंगामात करुन टाकतो..
लेख आणि फ़ोटो दोन्हीही मस्त !! करायचा आहे हा ट्रेक !
nachiket, info is in detail. Pics are superb. I liked it , keep up. all d best.
खासच लेख! फोटो तर
'प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट' :)
thanks all..
Kranti tai - :)
नमस्कार. लेख व वर्णन अप्रतिम आहे. आपले सर्वच लेख अप्रतिम आहेत. नुकतेच गोरखगडावर जाऊन आलो. आपल्या लेखातून पार्श्वभूमी समजून घ्यायला मदत झाली होती. आपण आरामात केला असला, तरी पहिल्यांदाच ट्रेक करत असल्यामुळे गोरखगड जाम अवघड गेला.... आपल्या भैरवगडच्या ट्रेकमधले उत्साही तरुण- नारायणकाका आमच्या सोबत होते आणि आघाडीवर व निवांत होते!!!! धन्यवाद- निरंजन.
साधारण सत्तावीस अठ्ठावीस वर्षापुर्वी मी गोरखगडावर गेले होते तेव्हा सभामंडपाला भगवा रंग दिलेला नव्हता अन गडाच्या वरती दोन पाण्याची कुंड आहेत अन पाणीही गोड होते अन एका कुंडात सितेने वनवासात असताना तिच्या बाळांचे कपडे धुतल्याची आख्यायिका आहे अन सभामंडपाच्या मागच्या बाजुला लढाईची चित्रे कोरलेली आहेत ती मामा भाच्याच्या लढाईची आहेत असे म्हणतात आता गड चढणे मला शक्य नाही तरीही वाटते तिथे जावुन पुन्हा शोधावे कुठे शिलालेख वगैरे आहेत का...सिध्दगडावर मोठ्या दगडी दरवाजातुन आत गेले की महादेव कोळी समाजाची वस्ती आहे त्याही वरती वरच्या डोंगरावर जावुन आलोय त्यालाच साखरमाची म्हणतात का मला आता आठवत नाही पण तिथे एक तोफ होती ती नंतर चोरीला गेल्याचे ऐकले
Post a Comment