तो नववीत आहे. आपणही नववीतच आहोत. त्याचा वर्ग, मुख्याध्यापक अप्पा, बेंद्रीण बाई, परांजपे बाई, मांजरेकर सर, घंटा देणारा शिपाई असं सगळं कंटा़ळवाणं विश्व आहे. आपलंही असणार! सुर्या, फावड्या, चित्र्या हे जानी दोस्त आणि मिसाळ, बिबिकर, सुकडी, आंबेकर असे ठळक नमुने! हे सगळेही आपलेच! त्याची टिपिकल आई, अंबाबाई, पोराला चक्क समजून घेणारे वडील, त्याचा लाडका नरूमामा - हे तर आपलेच सगे! पण.... त्याला वर्गातली एक मुलगी ज्ज्जाम आवडते. ही गोष्ट तो सगळ्यांपासून लपवतो. मित्रांमध्ये, मामाबरोबर बोलताना प्रेमाबिमाचा विषय निघाला की विषयच बदलतो किंवा निघून जातो, तिच्यासाठी आपल्या दोस्तांनाही बरोबर 'वापरून' घेतो - असं काय काय करतो. पण वेळ येते तेव्हा मात्र तिला थेट सांगतो. आपण केलं होतं असं? आणि ते ही शाळेत असतांना? अर्थात, आता आपण एकमेकांजवळ कबूल करायला हरकत नाही - हो! अनेकदा केलं होतं, पण मनात! कारण मुख्य प्रॉब्लेम हा होता, की 'हे' नक्की काय वाटतंय हे तेव्हा आपल्याला कळलंच नव्हतं! ही मनात जपलेली, आणि काळाच्या ओघात पुसट झालेली 'शाळा' घेऊन दिग्दर्शक सुजय डहाके आपल्याला भेटायला आलाय!
मिलिंद बोकीलांच्या प्रसिद्ध "शाळा" या कादंबरीवर आधारित 'मधल्या सुटी'सह दोन तासांचा 'शाळा' हा चित्रपट म्हणजे गतकाळाची सुंदर सफर आहे. चित्रपटाला कथानक असं विशेष नाही. जे कादंबरीत आहे तेच, पण थोडक्यात आणि प्रभावीपणे! शाळकरी वयातलं भावविश्व, मनात फुलणारे वसंत, अधमुर्या वयातली हिरवळ... असं सगळं सगळं चित्रपटात खूप सुंदर टिपलंय! मुकुंद जोशी (अंशुमन जोशी) या मुलाभोवती फिरणारा हा चित्रपट! पहिल्या परिच्छेदातला 'तो' म्हणजेच हा मुक्या! मग त्याचे दोस्त, त्या प्रत्येकाचं 'सामान', जणू 'त्या' एका मंजिलसाठी जगायच्या इच्छा - अगदी आपल्याही जिव्हाळ्याचं विश्व! शिरोडकर (केतकी माटेगावकर) ही मुक्याची 'लाईन'!
अंशुमन जोशी आणि केतकी माटेगावकर ही निवड अत्यंत अचूक झाली आहे. त्या दोघांचे सीन्स, त्या वयातील भावना, ती उर्मी, लज्जा, एकंदरीत वागणं - केवळ लाजवाब! सर्वात कौतुक म्हणजे, त्या धडधडत्या भावना संवादातून बाहेर येताना कुठेही थिल्लरपणा, उथळपणा झालेला नाही! अत्यंत संयमित तरीही थेट पोचणारा अभिनय करून घेण्यात दिग्दर्शकाला पैकीच्या पैकी गुण! एक-दोन ठिकाणी केतकी थोडी भूमिका सोडून बाहेर आल्यासारखी वाटते, पण इट्स ओकेच! ती खूप फ्रेश आणि सुंदरही दिसली आहे! इंटर्वलच्या आधी त्याला 'लाईन' क्लिअर असल्याचं सांगताना, 'चेस'स्पर्धेच्या वेळी 'आता जिंकून टाक' हे सुचवताना तिने दिलेले 'सिग्नल' पाहून थेटर 'खल्लास' होतं हे 'त्या' सरलेल्या वयाचे स्मरणे! अंशुमनचा चेहरा पूर्ण चित्रपटभर छान बोलतो. मुळात त्यांचं खरं वय लक्षात घेतलं तर अभिनयातले अगदी बारकावे माफ करावेसे वाटतात. सुर्या, चित्र्या, फावड्या - एकदम झक्कास! 'चष्मा लावणार्या ढासू मुलांमुळे देशाचं काहीही होत नाही, ते होतं ते या असल्या मुलांमुळेच!' हे सांगणारा नरूमामा (जितेंद्र जोशी) आपल्यालाही हवा होता एवढं वाटतं, ते पुरेच आहे! मुक्याच्या वडिलांच्या भूमिकेत नंदू माधव अगदी मस्त - अगदी समजूतदार बाप! मुख्याध्यापक अप्पा (दिलीप प्रभावळकर), बेंद्रे बाई (देविका दफ्तरदार) ठीक. मांजरेकर सर (संतोष जुवेकर) म्हणजे 'आपले' सर वाटतात. बाकी अमृता खानविलकर का आहे याचं उत्तर बहुधा पहिल्याच प्रसंगात दडलेलं असावं! (तात्पर्य सुरूवात चुकवू नका!)
भाज्यांचे भाव, पात्रांचे वेष, जुनी घड्याळं यातून १९७५ चा काळ छान उभा राहिला आहे. छायाचित्रण, संगीत - ठीकठाक. मुळात चित्रपटाचा प्राण हा त्या वयातलं विश्व असल्यामुळे फोकस तिथेच ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.
बाकी अजून सांगण्यासारखं विशेष काही नाही! तुम्ही कादंबरी आधी वाचून नंतर चित्रपट बघायला जात असाल तर उत्तम आणि न वाचता जात असाल तर अति-उत्तम! पण तुम्ही कुठल्याही प्रकारातले असा, अल्लड वयातल्या नागमोडी आणि बहुधा अव्यक वळणांवर भरलेली ही 'शाळा' एकदा नक्कीच बघण्यासारखी आहे!
- नचिकेत जोशी
4 comments:
NACHIKET JOSHI 1 ASHTAWADHANI vyaktimatwa
zakas parikshan ahe. cinema pahayacha nakki kelay pan marathi cinemachya vela he maxxxxxd multiplex vale asha lavatat ki ravivar sodun pahayala jamatach nahi. ata tar 2ra athavada aahe, tikla tar yetya ravivari pahin.
शाळा पाहिला. आवडला पण नाटका एवढा नाही. नाटक 'गमभन', सुसाट आहे.
मराठी चित्रपटाची इंग्रजी श्रेय नामावली खटकली.
राजन
thanks Rajan :)
Amrita, ;)
thanks!
Post a Comment