Pages

Friday, April 20, 2012

रायगडः छोट्या दोस्तांसमवेत (भाग १)

शिवतीर्थ रायगड! एका अद्भूत इतिहासपुरूषाने उभ्या केलेल्या सार्वभौम साम्राज्याची तितकीच मनोहर राजधानी! कुणी त्याला 'गरूडाचं घरटं' म्हटलं, तर कुणी 'पूर्वेचं जिब्राल्टर'! कितीही वेळा रायगडाला भेट द्या, समाधान आसपासही फिरकत नाही, हे विशेष! पुन्हा पुन्हा तो परिसर डोळे भरून पाहावासा वाटतो, इतिहासातील सर्व वाद बाजूला ठेवून मनातल्या शिवरायांची पूजा करावीशी वाटते आणि त्या महापुरूषाच्या सद्गुणांसमोर नतमस्तक व्हावंसं वाटतं. यावेळीही तेच झालं!




निमित्त होते, शैलेंद्र सोनटक्के (उर्फ कॅप्टन) आणि टीम आयोजित वय वर्षे ५ ते १७ मधील पन्नासएक मुलांच्या रायगड ट्रेकमध्य सहभागी होण्याची मिळालेली संधी! आजोबा डोंगर, गणपती गडदच्या गुहा, यानंतर त्यांच्याबरोबर केलेला हा तिसरा ट्रेक कम ट्रीप (मुलांसाठी ट्रेक, आमच्यासाठी ट्रीप!). हा ट्रेक लहान मुलांसोबत असल्यामुळे मी आधीपासूनच जरा जास्तच उत्साही होतो. छोट्या मुलांचा अपार उत्साह मला थक्क करून सोडतो (कधीकधी वैतागही येतो पण त्याला इलाज नाही). त्यातच आदल्याच दिवशी नवी ५५ लिटरची ट्रेकिंगसॅक घेतल्यामुळे उत्साह अजून वाढला होता.

शुक्रवारी, १३ तारखेला रात्री दादरला बसमध्ये चढल्यावर कॅप्टननी हातात यादी ठेवली आणि 'हजेरी' घेऊनच सर्वांना बसमध्ये चढवायला सांगितले. नाहूरला मोठी गँग बसमध्ये चढल्यावर बसमध्ये जिवंतपणा आला. कळंबोलीमार्गे बाहेर पडताना हायवेवर तुफान ट्राफिक लागला. दोन दिवसांची जोडून सुटी आल्यामुळे बहुधा मुंबई आपापल्या किंवा भाड्याने घेतलेल्या चारचाकांवरून बाहेर पडत असावी. त्यामुळे कळंबोली मॅकडोनाल्डपाशी शेवटच्या पिकअपला पोचेपर्यंत पावणेदोन वाजले. (ते बिचारे अकरा-साडेअकरापासून येऊन थांबले असणार!) बस फुल्ल भरली आणि आम्ही दोघे-तिघे खर्‍या ट्रेकरच्या गुणधर्माला जागून कॅरीमॅट बसच्या कॉरिडॉरमध्ये अंथरल्या आणि बिनधास्त आडवे झालो. मध्यरात्री एकदा कम्पल्सरी ब्रेकसाठी आणि एकदा माणगाव एसटी स्टँडवर बस थांबली. (मी झोपलोच होतो) बाकी काही नाही.

शनिवारी सकाळी रायगडपायथा गाठला तेव्हा काटा सात वाजल्याचे दाखवत होता. नियोजित वेळेपेक्षा आम्ही तासभर मागे होतो. ग्रुपमधल्या गोवेकर काकांच्या वाढदिवसानिमित्त खूबलढा बुरूजाच्या साक्षीने केककटाईचा कार्यक्रम झाला. संदीप खांबेटे उर्फ घारूअण्णा (या ट्रेकचे अधिकृत गाईड) यांनी थोडक्यात गडाच्या पायथ्याची माहिती देऊन एक-दोन प्रश्नांची पिलावळ पोरांच्या डोक्यात सोडून दिली (त्याचे परिणाम नंतर माझ्यासारख्या सामान्य ट्रेकर्सना भोगावे लागले. त्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी उत्सुक मुलामुलींनी माझा इतका पिच्छा पुरवला की बस रे बस!)

सोयीसाठी कॅप्टननी ५ ग्रूप पाडले होते. एका ग्रूपच्या लीडरपदी अस्मादिकांची नेमणूक झाली होती. अर्थात ट्रिपच्या शेवटी हे ग्रूप फक्त कागदावरच राहिले, ही गोष्ट वेगळी. बालसुलभ हालचाली आणि इच्छा यामुळे ही मुलेमुली आपला ग्रूप सोडून इतर सर्व ग्रूपमध्ये असायची. तात्पर्य, 'काऊंट' या एकाच गरजेपोटी हे ग्रूप बनवले गेले होते and that purpose served well!.

सव्वासातला पायर्‍यांनी चढाई सुरू केली आणि पावणेनऊपर्यंत महादरवाजा गाठला सुद्धा! विलक्षण उत्साहाने सर्वच मुले चढली. महादरवाज्याची रचना यावर घारूअण्णाने (इथून पुढे 'घारू') सविस्तर माहिती दिली आणि महाराजांबद्दलचा आदर अजून वाढला. शिरकाईदेवीच्या मंदिराजवळ काऊंट घेतला आणि होळीच्या माळाच्या खालच्या अंगाला असलेल्या धनगरवस्तीकडे पावले वळवली. उद्या दुपारी निघेपर्यंत आमचा मुक्काम संजयभाऊंच्या घरी असणार होता.




चहा आणि उपम्याचा नाष्टा आटोपून नगारखाना आणि राजसदर पाहायला निघालो. हे सगळंच खरं तर अजून वर्णन करून लिहायला पाहिजे. कारण, यावेळी मी अट्टल भटक्यांसोबत नव्हे, तर एका वेगळ्याच वयातल्या सळसळत्या उत्साहासोबत मोहिमेवर होतो. आणि हा उत्साहही कसा तर, समोरच्यालाही स्वतःसोबत ओढून घेणारा! 'दादा, तुला कोडं घालू का?', 'ए दादू, बोअर नको मारूस रे' पासून 'तुला डोरेमॉन आवडतो का (डोरेमॉनच ना?)', किंवा 'हा चॉकलेटचा कागदाचा कचरा तुझ्या खिशात ठेव ना' इथपर्यंत आणि 'बाबा म्हणतायत सायन्सलाच जा' पासून ते 'तो दरवाजा फार सेक्सी होता नै?' असं म्हटल्यावर एक सीक्रेट कळल्यासारखे वेगळेच भाव चेहर्‍यावर सहज उमटून जाणार्‍या ह्या वयापर्यंत सर्वत्र सारखंच चैतन्य होतं. त्याबद्दल तितकंच मिसळून लिहायला हवं. बघूया. प्रयत्न करतो.

होळीचा माळ, नगारखाना, राजसभा, महाराजांचे खाजगी महाल, अष्टप्रधानमंडळाच्या कचेर्‍या, राणीवशाच्या विरंगुळ्यासाठी उभारलेले अष्टकोनी मनोरे, गंगासागर तलाव, कारखान्यांची कोठारे इ इ सगळा परिसर फिरलो. कळत्या वयातली मुले माहिती लक्ष देऊन ऐकत होती. बाकीची मनसोक्त हुंदडत होती. त्यांच्याकडे पाहून 'यांना आत्ता इतिहास कळत नाहीये, तो लक्ष देऊन ऐकायचं यांचं वयसुद्धा नाहीये, पण आपण इथे आलो होतो आणि इथे येऊन फार छान वाटलं होतं, एवढ्या जाणिवेवर जरी पुढेमागे किल्ले भटकायची सवय लागली तरी पुरेसे आहे' हा विचार माझ्या मनात येऊन गेला. घारूच्या माहितीसोबतच मीही अधूनमधून शिवरायांबद्दल जमेल तेव्हा बोलत होतो. अर्थात, माझा वाटा अगदी खारीपेक्षाही कमीच होता. पण मुलांना आवड वाटत होती, जाणून घ्यायची उत्सुकता होती, हे कारण मला पुरे होते.




रायगडाबद्दल काय आणि किती लिहावं? प्र के घाणेकरांनी एक साडेतीनशे-चारशे पानांचं अख्खं पुस्तक फक्त रायगडासंबंधी लिहिलंय. शिवाय बखरी, दस्तऐवज, कागदपत्रे, पत्रव्यवहार यातून तर रायगडाचं चिकार वर्णन सापडतं. किल्ला देखणा खराच! पण त्याचबरोबर मराठ्यांच्या सार्वभौम राज्याची राजधानी असल्याच्या खुणा प्रत्येक बांधकामरचनेमध्ये सापडतात. असा किल्ला फिरायला कधी गेलात तर सोबत माहितगार माणूस न्याच! टेक माय वर्ड्स, परत फिराल तेव्हा काहीतरी अमूल्य भावना घेऊन याल.

दोन तास तो परिसर फिरल्यावर उन्हामुळे आणि भुकेमुळे मुलांची नव्हे, तर आमची चुळबूळ सुरू झाली. मग पुन्हा मुक्कामाचा रस्ता पकडला. नाचणीची भाकरी-रस्सा-भात-आमटी-पापड-लोणचे-कांदा असा फक्कड मेनू आणि यासोबत मीठ-तिखट लावून कैर्‍यांच्या फोडी!


हे जेवल्यावर मला झोपच आली आणि लगेचच मी अर्धा तास डुलकी काढून घेतली. संध्याकाळी जगदीश्वर मंदिर आणि टकमक टोकावरून सूर्यास्त असा कार्यक्रम होता. टकमकटोकावरून दिसणारा सूर्यास्त हा एक अतिशय सुखद अनुभव असतो. त्यामुळे कॅप्टन आणि घारूशी बोलून मी टकम़कटोकाची भेट दुसर्‍या दिवशी सूर्योदयाऐवजी आदल्या दिवशी सूर्यास्ताची करून घेतली होती. आणि आता टकमकच्या कड्यावर रेलिंग लावलेले असल्यामुळे मुलांना घेऊन तिथे जाण्यात धोकाही नव्हता. (रेलिंग नसताना मजा अधिक यायची हे सांगायला नकोच!)

जगदीश्वर मंदिराच्या पहिल्या पायरीला वाकून नमस्कार केला आणि रायगड बांधणार्‍या हिराजीला मनोमन सलाम केला. मराठी वाचता येणार्‍या मुलांकडून (वय वर्षे ८-१०) त्या पायरीवरचा शिलालेख वाचून घेतला आणि अर्थही त्यांच्याचकडून काढून घेतला. स्वतःला अर्थ लावता आला म्हणून ते खूश आणि त्यांनी प्रयत्न केला म्हणून मी खूश! महाराजांच्या समाधीचेही दर्शन घेतले.









जगदीश्वर मंदिर बघून टकमक टोकाकडे आलो तेव्हा सूर्य चांगला हातभर वर होता. टकम़कवरून घेतलेले काही फोटो -








सूर्यास्ताची वेळ कायम भुरळ पाडते. मी नकळत माझ्या मनस्थितीची आणि सूर्यास्त किती सुंदर असतो हे कळण्याच्या वयापर्यंत न पोचलेल्या त्यातल्या काही छोट्या सवंगड्यांच्या मनस्थितीची (शब्द जड होतोय, मान्य आहे!) तुलना करू लागलो. सूर्यास्त, निसर्ग, कातरवेळ, अंधूक होत जाणारा आसमंत, पश्चिमेकडून येणारा झुळूकवारा, पक्ष्यांची माघारी जाणारी रांग, हे सर्व अनुभवांच्या कसोट्यांवर तोलून क्षणोक्षणी भावनिक हिंदोळ्यांवर झुलणारा मी आणि 'पाटी कोरी' असल्यामुळे निश्चिंत असणारे ते! सूर्यास्त पाहत असताना माझं मन हलकं होत जातं हे खरं असलं तरी ते रोजच्या 'संसारा'मुळे मुळात जड झालेलं असतं ही वस्तुस्थिती आहेच! यांच्या मनावर असले दिवस पाहायची वेळ अजून यायची आहे त्यामुळे इथे जड-हलकं असं काही नाहीच! घरच्यांनी यांना बिंधास्तपणे सहलीला सोडलं आहे, आणि यांनी स्वतःला कॅप्टन-दादा-ताई-काका यांच्या हवाली केलं आहे - बात खतम! संपूर्णपणे विश्वास टाकण्याचं आणि त्यात खोट-बिट नसतेच हे मानण्याचं आणि असली तरी चालू शकण्याचं हे वय एकदाच मिळतं हेही खरं! असो. फारच वेगळा विषय सुरू झाला.



टकमक टोकावर गर्दी व्हायला लागली आणि दुसर्‍या एका ग्रूपला जागा करून देण्यासाठी आम्ही टोकावरून मागे येऊन बसलो. अंधार पडायच्या आधी कॅप्टननी सर्वांना तिथून निघण्याची सूचना केली. मी मात्र ग्रूप काऊंट घेण्याची जबाबदारी को-लीडरला देऊन सूर्य पूर्ण मावळेपर्यंत तिथेच बसून राहिलो. समोर महादरवाजा काळोखाच्या कुशीत शिरू लागला होता. शिरकाईमंदिरापासून निघालेल्या आणि महादरवाजातून उतरलेल्या, हिरकणी बुरूजाखालून जाणार्‍या आणि डोंगराच्या मध्यातून पार खूबलढा बुरूजापर्यंत दृष्टीपथात येणार्‍या पायर्‍यांवर त्या संपूर्ण पट्ट्यात कोणीही नव्हतं. होती ती फक्त शांतता! कधी माझ्या शब्दांमध्ये जर तेवढी ताकद आली तर सूर्यास्ताच्या अशा अनुभवांवर एकदा स्वतंत्रपणे लिहायची इच्छा आहे. नक्की काय वाटतं ते सांगता येतंय असं वाटत असतानाच निसटून जातं. काहीच न बोलता, सांगता शांत बसून राहण्याची इच्छा प्रबळ होते. अखेर एक सुंदर सूर्यास्त पाहून माघारी वळलो आणि टॉर्च सोबत असूनही तो न लावता टकम़क टोक ते होळीच्या माळापर्यंतचं अंतर फिक्कटल्या उजेडातच पार करून सोबत्यांना येऊन मिळालो.



मुक्कामाकडे जातानाच्या पाच मिनिटाच्या उतारावर सोबत मुले होती. तेव्हा टॉर्च बंद केल्यावर मात्र मुलांचा गोंधळ उडाला. अंधारातही वाट सापडू शकते हे त्यांना शिकवण्याची ती वेळ नव्हती, पण पाच सेकंदाचा एक अनुभव मात्र त्यांच्यासाठी वेगळा ठरला असावा अशी मी समजूत करून घेतली. शेवटी, नुसत्या सहलीपलिकडेही स्थळ-काळ-वेळ बघून जर काही देता आलं तर का देऊ नये? त्यांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाची एक छोटीशी परतफेड "अंधारातही हा सह्याद्री तितकाच आपला आहे" हा विश्वास त्यांच्या मनात पेरण्याची सुरूवात का करू नये? अर्थात, खरं सांगायचं तर त्यावेळी डोळ्यासमोर होतं ते फक्त मुलांसोबत असणं आणि त्यांच्यासोबत आनंद वाटून घेणं. आणि ते खूप आनंददायी होतं.

अंगणामध्ये अंधारातच फरसाण-बिस्कीटाच्या पुड्या फिरल्या आणि अंताक्षरीला सुरूवात झाली. जेवण तयार होईपर्यंत धम्म्माल गाणी झाली. जेवायला तांदळाची भाकरी-फ्लॉवर रस्सा-भात-आमटी-कांदा-लोणचे-पापड असा मेनू होता. रस्सा तिखट लागलेल्या बालचमूमध्ये मीही सामील झालो आणि सॅकमधून जॅम मागवून घेतला.

'जेवल्यावर मूनलाईट वॉक आहे' हे मुलांना आधीच सांगितल्यामुळे दुसर्‍या पंगतीमध्ये आम्हा संयोजकांची जेवणे होण्याची वाट बघत मुले टॉर्च घेऊन आणि बूट चढवूनच गप्पा मारत बसली होती. काहींना झोप फारच अनावर झाली होती. त्यामुळे त्यांच्या झोपण्याची आधी व्यवस्था लावून मग होळीच्या माळावर निघालो.

नगरपेठेच्या पायर्‍यांवर टेलिस्कोप मांडून आदित्य छत्रे आणि टीम तयार होती. शनि, मंगळ, सप्तर्षी, त्यांच्या रेषेत ध्रुव तारा, सिंह-कन्या-मिथून या राशी सुपरवर्गो हा क्लस्टर (आदित्यभौ, चुकून हे वाचलंत आणि काही चूक बिक सापडलं तर क्षमा करा हो!) असं काय काय त्याने उत्साहाने दाखवलं आणि समजावूनही दिलं. शेवटी मला झोप अनावर व्हायला लागली. म्हणून 'समदु:खी' गडी (त्यात कॅप्टनसुद्धा होते) पकडले आणि मुकाटपणे मुक्कामाची वाट पकडली.

बहुतांश जनता शाकारलेल्या अंगणात झोपणार होती. मला तिकडे उकडण्याची भीती असल्यामुळे मी उरलेल्या जनतेप्रमाणे अंगणाच्याही बाहेर, उघड्या आकाशाखाली झोपणं पसंत केलं. स्लीपींग मॅटमध्ये शिरलो तेव्हा साडेअकरा झाले होते. वारा पडला होता. भयंकर उकडत होतं. पहिला दिवस संपला होता.
(क्रमशः)

 - नचिकेत जोशी
(फोटो - नचिकेत जोशी आणि विश्वेश नवरे)

5 comments:

अनिकेत वैद्य said...

mast re.
waiting for mext day.

Rajan Mahajan said...

मित्रा,
मस्त जमलाय ब्लॉग. वाचून एखादा ट्रेक मुलांबरोबर करावा असे वाटतेय (जे मी टाळत आलोय).

मुलांच्या टिप्पण्या लई भारी, भिडल्या !

"ध्वज संहिता" वाचली पण 'लाल किल्ला' आणि 'रायगड' बद्दल त्यात काही उल्लेख नाही. श्री. सदानंद आपटे(आपटे काका) यांना त्याबाबत विचारले. त्यांचा किल्ल्यांवर अभ्यास आहे. त्यांच्याही वाचनात व ऐकण्यात असे
कधी आलेले नाही. या माहितीचा स्त्रोत मिळाला कि कळवणे.

बादवे - घारू उर्फ ड्रूम पटाक (त्यांची रिक्शा होती) उर्फ खम्बुष्ट्या माझा वर्गमित्र, १० वी पर्यंत.

पुढचा भाग येऊ दे लगेच.

राजन महाजन

swap said...

bhari.... tujhe lekh chan asatat...

Ajinkya said...

lovely.....! khup bhari....!

नचिकेत जोशी said...

Thank you all.. :-)