Pages

Tuesday, July 17, 2012

वाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली! (भाग १)

हा ट्रेक ध्यानीमनीही नसताना अवचित घडला! करायचा होता वेगळाच, आणि झाला वेगळाच! पण सह्याद्रीमधल्या एका सुंदर आडवाटेची ही भ्रमंती आहे, असं म्हटलं तरी ते चुकीचे नाही! शनिवार-रविवार मोकळे मिळत आहेत अशी शक्यता दिसायला लागली आणि लगेच सूरजला फोन लावला. अट्टल ट्रेकर्स लोकांना सोबत ट्रेक करायला ओळखी लागत नाहीत, कंफर्ट नावाचा प्रकार लागत नाही.. समान आवड जुळली की निघाले सॅक पाठीवर टाकून!

मागे एकदा मुंबईहून सकाळी इंद्रायणी एक्सप्रेसने पुण्याला येत असताना गर्दीमध्ये (नेहमीप्रमाणे) दरवाजात अंग मुडपून बसलो होतो. मागच्या बाकावरून ढाकला निघालेल्या तीन-चार तरूणांच्या गप्पा ऐकल्या आणि ओळख-बिळख नसतानाही (गरजच काय ओळख असण्याची?) थेट त्यांच्या गप्पांत सामील झालो. मग एकत्र ट्रेक करण्याचे वादे झाले आणि या ट्रेकमध्ये ते पूर्ण झाले!

आधी लोणावळा ते भीमाशंकर (उर्फ सुप्रसिद्ध 'लोभी' ट्रेक) करावा असं ठरवत होतो. पण दोन दिवसात ७० एक किमी ची भ्रमंती झेपणार नाही असे वाटून प्लॅन बदलला. आयत्यावेळी ग्रूप जमवण्यापेक्षा दोघेच एखादा आडवाटेचा ट्रेक करू, असे ठरवले आणि 'मायबोली' वर ठाणाळे ते तैलबैला हा विमुक्तचा लेख आठवला. त्याच्या लेखामध्ये सुदैवाने वाटेचा कुठेही सुस्पष्ट उल्लेख नव्हता, त्यामुळे आमच्यासाठी वाटा शोधण्याचा एक नवीन अनुभव मिळणार होता. 'ठाणाळे ते तैलबैला (व्हाया लेण्या), तैलबैला गावात किंवा भिंतींच्या बेचक्यात मुक्काम करायचा आणि दुसर्‍या दिवशी तैलबैला ते सुधागड असा (फक्त ऐकलेला) ट्रेक करायचा' एवढ्याच प्लॅनवर सॅक बांधून निघालो.

मी शनिवारी, ३० जूनला, पुण्याहून सिंहगड एक्स्प्रेस पकडली आणि सव्वाआठला कर्जतला पोचलो. सूरज (मु.प. जोगेश्वरी, मुंबई पश्चिम रेल्वे) दादरहून समस्त ट्रेकर्स लोकांची नेहमीची दादरला सकाळी ५.५८ येणारी कर्जत लोकल पकडून त्याच सुमारास कर्जतला पोचला. तिथून लोकलने खोपोली स्टेशन आणि मग खोपोली एसटी स्टँड! साडेनवाला पालीसाठी एसटी होती. खोपोलीहून नाडसूरला सकाळी आठ वाजता एसटी आहे.

पालीहून थेट ठाणाळेसाठी सकाळी पावणेआठला पहिली एसटी आहे (अंतर अंदाजे १० किमी). तसेच रात्री आठला ठाणाळे मुक्कामी एसटी आहे. ठाण्याहून सकाळी सहा वाजता ठाणाळेसाठी थेट एसटी आहे.

पालीतून दिसणारा सरसगड - मागच्या पावसाळ्यात चोरवाटेने केलेल्या सरसगडाच्या ट्रेकच्या आठवणी जागवतच पालीहून सव्वाअकराची एसटी पकडली. वाटेत तैलबैलाच्या जुळ्या भिंतींनी पहिल्यांदा दर्शन दिले. शेजारचा डोंगर म्हणजे भोराईचा किल्ला उर्फ सुधागड! स्थानिक लोकांमध्ये सुधागडला भोराईचा किल्ला आणि सरसगडला सुधागड अशी म्हणण्याची पद्धत दिसली. (मी काही लगेच त्यांची चूक दुरूस्त करायला गेलो नाही!) नाडसूर गावात पोचलो तेव्हा बारा वाजले होते. वाटेत निवडुंगाला फुले (मी पहिल्यांदाच) पाहिली - हवेत भयंकर उकाडा आणि दमटपणा होता. नाडसूरपासून ठाणाळे २ किमीवर आहे. वाटेत एका शेताच्या बाजूने वाहणार्‍या पाटाच्या पाण्यात ओंजळ बुडवली, तर पाणीसुद्धा गरम लागले! अखेर तसेच पुढे निघालो. एव्हाना माझ्या नव्या कोर्‍या अ‍ॅक्शन ट्रेकिंग शूजमध्ये पाय मनमुराद सरकत होता, घसरत होता आणि अंगठ्यावर जोर येऊ लागला होता. (बहुधा मी एक नंबर मोठा साईझ घेतला आहे). ठाणाळे गावात एका घराच्या उघड्या अंगणात सॅक टाकली, दोन तांबे पाणी रिचवले आणि बुटांमध्ये रद्दीपेपरचे कुशनिंग घालून घेतले.

लेण्यांमध्ये जाण्यासाठी मुंबईहून आलेले सहा लोक थोड्याच वेळापूर्वी पुढे गेले असल्याची माहिती मिळाली. गृहलक्षुमीला लेण्यांची वाट विचारून घेतली. 'या समोरच्या वाड्यापासूनच वाट हाये. नीट जावा. कुठेही वाट सोडू नका' - इति गृहलक्षुमी. आम्ही होय म्हणून निघालो. का कुणास ठाऊक, इतका थकवा जाणवायला लागला होता की पाय उचलून पुढे जाऊच नये असे वाटत होते. डोके काम न करेनासे होणे, वेळेवर हव्या त्या गोष्टी न सुचणे, काहीही न सुधरणे अशा गोष्टी ट्रेकमध्ये घडतात हे केवळ ऐकले होते. याचा प्रत्यक्ष अनुभव थोड्याच वेळात येणार होता. सूरज मालुसरे हा ताज्या दमाचा ट्रेकर. AMK (अर्थात अलंग-मदन-कुलंग) एका दिवसात करणार्‍या दुर्मिळ लोकांपैकी हा एक. नुकत्याच मदन ते कुलंग दरम्यान शोधल्या गेलेल्या जवळच्या वाटेच्या शोधपथकाचा एक सदस्य. त्या दिवशी वाड्याजवळून डावीकडे निघणारी मळलेली पायवाट सोडून देऊन गडी उजव्या हाताला वळला आणि मी कुठल्यातरी अनामिक शक्तीने अडवून धरल्याप्रमाणे काहीच बोललो नाही. लेण्या नेमक्या कुठल्या दिशेला आहेत याचा नक्की अंदाज दोघांनाही नव्हता. थोडे अंतर चालल्यावर माझी तब्येत ढासळायला लागली. पाय जड झाले, डोळ्यासमोर अंधार येऊ लागला, भयंकर थकवा जाणवू लागला. पुढचे दोन तास मी नक्की कशाप्रकारे चाललो ते मलाही आता आठवत नाही. फक्त अधूनमधून 'पायाखालची ठाणाळेपासून दूर जाणारी वाट सोडून शेजारच्या डोंगराच्या माथ्याकडे नेणारी वाट शोध/तयार कर' एवढेच सूरजला सांगत होतो. कारण लेण्या त्या दिशेला नक्की नाहीयेत एवढेच मला समजत होते. तो मात्र एका दिवसात AMK करण्याच्या वेगाने पुढे निघाला होता. 'हा डोंगर संपला की मग आपल्याला नक्की दिशा कळेल' असे त्याचे मत होते. "पायाखालची वाट सोडू नये" हे त्याचे तत्त्वज्ञान तर "दिशा माहित असेल तर प्रसंगी बिंधास्त वाट सोडून दिशेकडे निघावे" हे माझे सूत्र! अखेर पाय भयंकरच जड झाले आणि सॅक टाकून खाली बसलो. इलेक्ट्रॉल नावाची पूड गरज म्हणून पाण्यातून घेण्याचा इतक्या वर्षातला हा पहिलाच प्रसंग! (हाही अनुभव मोलाचाच!)

त्या डोंगराला पायथ्याशी समांतर झाडोर्‍यातून चालत राहिलो. एक पठारसदृश प्रदेश पार केला. वाटेत डोंगराच्या पोटात एक लेणीसदृश जागा सापडली. त्यात एकच खोली होती. (त्यांना 'महारलेणी' म्हणतात हे दुसर्‍या दिवशी कळले.) अखेर तीनच्या सुमारास सूरजला बळेबळेच डोंगरावर चढाई करण्यास फर्मावले. वास्तविक, हा निर्णय घेतला तेव्हा चढाईसाठी त्या दिशेला अजिबातच वाट नव्हती. केवळ झुडुपांना धरून, दगडांमधून वर सांभाळत चढावे लागणार होते. एरवी अशा वाटेनेही आरामात चढलो असतो. पण निघून चाललेला वेळ आणि बरी नसलेली तब्येत यामुळे नकारात्मक विचार डोक्यात वाढू लागले होते. अगदी 'ट्रेकसंन्यास' पर्यंत मन धावून पुन्हा माघारी आले. त्या नसलेल्या वाटेने कसेतरी स्वतःला ओढत त्या टेकाडाच्या माथ्यावर पोचलो आणि एका झाडाच्या दाट सावलीत विसावलो. जेवणाच्या पुड्या सोडल्या आणि थोडेसे खाऊन घेतले. एव्हाना तैलबैला तर दूरच, पण लेण्यांपर्यंत तरी पोचू की नाही हे माहित नव्हते. ('लो-भी' चा लोभ टाळला हे बरेच झाले म्हणायचे!) लेण्या कुठे गायब झाल्या होत्या ते (नेहमीप्रमाणे) सह्याद्रीलाच ठाऊक होते!

पण कसे कुणास ठाऊक, दोन घास (आणि कदाचित इलेक्ट्रॉलही) पोटात गेल्यावर थोडे बरे वाटू लागले आणि त्या डोंगरमाथ्यावरील सपाट पायवाटेने पुन्हा ठाणाळेच्या दिशेने पाय उचलायला सुरूवात केली. पाच मिनिटात दृश्य खुले झाले आणि समोरच्या डोंगराच्या पोटात लेण्या दिसल्या!
वाट कुठे चुकलो होतो या प्रश्नाचे एका क्षणात उत्तर मिळाले. ते उत्तर होते - गावातून निघताना लागलेल्या पहिल्याच वाड्यापाशी! तिथून डावीकडे निघणारी वाट सोडून उजवीकडे शिरलो होतो आणि पुढचे चार तास भरकटत इथे पोचलो होतो. अंधार पडायच्या आत लेण्यांपर्यंत आजच पोचणे अवघड असले तरीही लेण्या दिसल्यामुळेही अचानक उत्साह आला. अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतराने माझ्या मनस्थितीत झालेला हा बदल खूपच आनंददायी होता. तिथेच उभे राहून उरलेल्या वेळेचा अंदाज घेतला आणि डोंगर उतरून उत्साहाच्या भरात लेण्यांकडे निघून अंधार पडला तरी लेण्या गाठण्यापेक्षा आजची रात्र गावातच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. उद्या सकाळी उठल्यावर नव्या उत्साहाने निघणे अधिक श्रेयस्कर वाटले. समोर डोंगरावर पायवाट गेलेली होती. त्या वाटेने निघालो. डावीकडे लांबवर सरसगड ढगात डोके खुपसून उभा होता. पायथ्याच्या गावांमधली चित्रासारखी दिसणारी शेते-खाचरे - पंधरा फुटांचा एक रॉकपॅच उतरण्यातले थ्रिल पुरेपूर अनुभवून गावात आलो तेव्हा फक्त पाच वाजले होते. उतरताना सूरजला एका लांबलचक सर्पाने दर्शन दिले, एवढीच काय ती भीतीची गोष्ट!

गावात आलो आणि पथार्‍या पसरायला मंदिर कुठे आहे ते विचारू लागलो. 'दोन मंदिरे आहेत - एक उघड्यावर आहे आणि दुसर्‍याचे बांधकाम सुरू आहे'! मग शाळेची चौकशी केली. तर शाळा 'जि.प.ची असून कुलुपात बंद आहे व ते उघडायची परवानगी नाही' हे उत्तर मिळाले. तेवढ्यात तिथेच एक आजीबाई भेटल्या व त्यांनी आपणहून स्वतःच्या घरात मुक्कामाला बोलावले. आमचे जणू सगळेच प्रॉब्लेम सुटले असे वाटून आम्ही त्यांच्या घरात गेलो. मग यथावकाश कुटुंब-मुले-उत्पन्नाची साधने-मुले-सुना-मूळ गाव-कुलदैवत-शेती-पाऊस-वाघजाई घाट अशा नानाविध विषयांवर आजीबाईंशी गप्पा झाल्या. चहा पोटात गेल्यावर हुशारीही आली आणि उद्या एकाच दिवसात लेण्या आणि तैलबैला करण्याचा विचार सुरू झाला. पाली एसटी स्थानकामध्ये फोन करून उद्यासाठी पुणे/खोपोलीच्या एसटीच्या वेळांची चौकशी करून घेतली. आषाढीनिमित्त आजीबाईंचा उपवास होता, तरी आमच्यासाठी त्यांनी चुलीवर रस्सा-भात-पापड असा मेनू बनवला. आजीबाईंनी दुसर्‍या दिवशी 'घालवायला' (म्हणजे वाट दाखवायला) माझा मुलगा देतो (देते नव्हे, देतो) असे सांगितले. "तो येईल, तुम्ही कोणालातरी द्यायचीच तर त्याला मजुरी द्या!" आम्हीही तयार झालो. संध्याकाळ झाली, सूर्य मावळला, रात्र पडली तरी गार सोडा, साध्याही झुळुकीचा पत्ता नव्हता. या ट्रेकची विशेष गोष्ट कोणती असेल तर अत्यंत दमटपणा आणि त्यामुळे वाहणारा घाम! आजवर कुठल्याही ट्रेकने मला इतका 'घाम गाळायला' लावला नसेल. सॅकमधून कॅरीमॅट आणि चादर काढली आणि आडवे झालो. चिक्कार डास होते. पांघरूण घेतले की घाम सुरू आणि पांघरूण काढले की डासांचे 'गुंगान' सुरू! फरसबंद पडवीत मॅटवर सूरज आणि टोपल्याखाली झाकलेल्या कोंबड्या, मधल्या खोलीत मी आणि स्वयंपाकघरात आजीबाई अशी सोय केली. रात्र कशीतरी चुळबुळत गेली आणि सक्काळी ५.३० ला आजीबाईंच्याही आधी मीच जागा झालो... (क्रमशः)

नचिकेत जोशी

4 comments:

Pankaj - भटकंती Unlimited said...

श्या... मला वाटले आज पोचतोय तो वाघजाईवरुन तेलबेल पठारावर. तू तर झोपी गेलास. आळशी.

Anonymous said...

best lihita rao tumhi!!!

Unknown said...

पाऊस आलाय….भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या***if any plan for next Trekking i like 2 part of these

Unknown said...

tumchi saglyanshi familiar vhyayachi savay matra bhari ahe barka sir