Pages

Monday, July 13, 2015

सह्यमेळावा २०१५ - भाग १: पूर्वतयारी आणि प्रस्थान

तो दिवस मला आजही लक्षात नाही. ती वेळ मला आजही आठवत नाही. 'यंदाचा सह्यमेळावा केव्हा घ्यायचा आणि कुठे घ्यायचा' हा वरकरणी साधाच प्रश्न कुणीतरी वॉट्सअ‍ॅप गृपवर पोस्ट केला आणि 'हर हर महादेव!'च्या आवेशात तमाम इंडिया-स्थित मेंब्रानी रात्रीचा दिवस करून सगळा मोबाईल डेटा वॉट्सअ‍ॅपवर उधळला. पार सुधागडपासून सिंधुदुर्गापर्यंत आणि कोकणच्या खाडीपासून आपापल्या घराच्या माडीपर्यंत सगळी ठिकाणे डिस्कस केली. अगदी पॉवरबँकपासून हायड्राबॅगपर्यंत आणि ट्रेकिंगसॅक पासून हेडटॉर्चपर्यंत सगळ्या गोष्टींची खरेदी होत आली, तरी ठिकाण काही निश्चित होईना! वॉट्सअ‍ॅपचा गृप नुसता ओसंडून वाहत होता. त्यात आशिषची (आशुचॅंप) 'सायकलवरून कन्याकुमारी'ची लेखमाला सुरू झाली. त्यातून भलतीच प्रेरणा घेतलेल्या काहींनी 'यंदाचा मेळावा सायकलवरून करूया' असा प्रस्ताव मांडून पाहिला. हा एखादा फॉरवर्ड मेसेज असावा अशी (सुरक्षित) समजूत करून घेऊन जवळपास प्रत्येकानेच त्या प्रस्तावाला इग्नोर मारला. त्या इग्नोराचं खरं कारण 'उभ्याउभ्या खाली बघितल्यावर स्वतःचे पाय न बघू देणारी शारिरिक अवस्था' हे होतं, हे सर्वांच्याच लक्षात आलं. गृपचा सब्जेक्ट बदलून झाला, डीपी बदलून झाला, तरी ठिकाण ठरेना! अखेर सर्वज्ञानी ओंकार ओक उर्फ ओंकीपीडिया उर्फ सीएम यांनी मांडलेला पहिलाच प्रस्ताव एकमताने संमत झाला. (ओंकार महाराष्ट्राचे आजी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांसारखा दिसतो हे मज पामराचे निरीक्षण त्या बिचार्‍याला सीएम या पदावर घेऊन आले आहे, बाकी काहीच नाही. मेळाव्याच्या संयोजनातील त्याचे काम आणि त्याच्या 'सह्य'ज्ञानाचा आवाका पाहता त्याला दिलेली सीएम ही उपाधी अगदीच किरकोळ आहे). तर ओंकारने केवळ ठिकाणच सुचवले असे नाही, तर घरून निघण्यापासून घरी पोचेपर्यंतचा सगळा प्लॅनच पोस्ट केला. इतका सखोल आणि सजीव प्लॅनपाहून आता प्रत्यक्ष मेळावा करायची गरजच नाही असा एक आगाऊ विचार माझ्या मनात येऊन गेला. तर ठिकाण होतं - बागलाणातील दोन काहीसे अपरिचित किल्ले - चौल्हेर आणि पिंपळा, आणि डेट्स होत्या - ४ आणि ५ जुलै २०१५.

बाकी आम्हा ट्रेकर्सना सीसीडी आणि पार्कातल्या डेट्सपेक्षा या डेट्सच महत्त्वाच्या आणि हव्याहव्याशा असतात. यंदाच्या सह्यमेळाव्याला कोण कोण येणार याची चाचपणी सुरू झाली. (नेहमीप्रमाणे) सुरूवातीला आकडा चाळीसच्या वर गेला. माझा हा पहिलाच सह्यमेळावा असल्यामुळे सगळ्यांनी खास ट्रेकर्स शैलीमध्ये 'विशेष सूचना आणि धमक्या' द्यायला सुरूवात केली. गेली दोन्ही वर्षे इच्छा असूनही काही ना काही कारणामुळे मला जाणे जमले नव्हते. ('इच्छा तेथे मार्ग' वगैरे सुभाषिते बॅचलर असतांना खूप आवडायची. तर ते असो.) यंदा जायलाच हवे होते.

२०१४ हे वर्ष आधी उजव्या घोट्याच्या आणि नंतर उजव्याच गुडघ्याच्या लिगामेंट इन्जुरीमुळे बर्‍यापैकी ट्रेकलेस गेले होते. पाय पुन्हा साथ देईल की नाही, झेपेल की नाही वगैरे वगैरे शंका मनात होत्याच. पण त्या कारणामुळे फारकाळ ट्रेकपासून दूर बसणे जमणार नव्हतेच. मग 'जमेल तेवढे चालू, नाहीतर पायथ्याला बसून राहू' या निर्णयाने माझेही नाव नोंदवून टाकले.

आता किल्ल्यांच्या निवडीबद्दल - हल्ली वीकेंडला मुख्य मुख्य किल्ले गर्दीने ओसंडून वाहत असतात. हायवेज, ढाबे, धबधबे, डोंगरवाटा - सगळीकडेच तुडुंब जत्रा असते. त्यामुळे आम्हाला आडवाटेवरचेच किल्ले हवे होते. एकट्या नाशिक जिल्ह्यात तब्बल ५८ किल्ले आहेत. त्यातही बागलाण तालुक्यातले किल्ले पुण्या-मुंबईपासूनच्या लांब अंतरामुळे आणि तेथील भौगोलिक परिस्थितीमुळे गर्दीपासून मुक्त आहेत. त्यामुळे जेवण-राहण्याची सोय आणि अंतर निकषांमधून चौल्हेर आणि पिंपळा हे फायनल झाले. हेमने जून महिन्यात चौल्हेर-पिंपळाचा एक पायलट ट्रेक करून बघितला.

'जेवणाचे मेनू' यावर गृपवर जितकी चर्चा झाली, तितकी क्वचितच कुठे होत असेल. (इथे तुलना करायचा मोह आवरता घेतो आहे, पण सोशल वेबसाईट्सवरचे आपले आवडते आणि लोकप्रिय फोरम आठवा). नाष्ट्याला पोहे-उपमा-मिसळ पासून जेवणाला पिठलंभाकरी-उसळ-चिकन-भात-रस्सा आणि स्वीटडिश म्हणून श्रीखंड-रसमलाई-शिरा-गुलाबजाम, रात्री झोपण्यापूर्वी हॉट चॉकलेट, कोल्ड कॉफी, मसाला दूध एवढ्या फर्माईशी आल्या. मला तर सह्यांकनचीच आठवण झाली. सीएम साहेब ज्याप्रकारे सगळ्या फर्माईशी मंजूर करत होते, ते पाहता त्यांना सह्यांकनला 'टफ' द्यायची नाहीये ना, अशीही एक शंका येऊन गेली. अखेर, गावात पुरेसे दूध मिळणार नाही हे कळले. आणि बाकी सर्व स्वीट डिश आमच्यापैकीच कुणालातरी (सॅकमध्ये घालून बसपर्यंत) आणाव्या लागतील हे समजले. मग आपोआप 'जे सहज उपलब्ध होईल ते चालेल' अशी तडजोड झाली.

पुण्याहून एक आणि मुंबईहून एक अशा दोन बस निघणार होत्या. पुणे बसच्या डायवरला (त्याचे नाव अप्पा) मागील वर्षीच्या सह्यमेळाव्याचा दांडगा अनुभव होता. त्यामुळे तो आम्हाला चांगला 'ओळखून' होता. मुंबई बसचा डायवर नवखा होता. त्याच्या चालककौशल्यावरून अप्पाने त्याचे मेळाव्यादरम्यानच्या निवांत क्षणी बौद्धिक घेतले. दोन्ही बसेस ३ तारखेला रात्री आपापल्या ठिकाणांहून निघून पुण्यक्षेत्र नाशिक येथे अपरात्री अडीच-तीन वाजता भेटणार होत्या. नाशिकहून हेम आम्हाला जॉईन होणार होता. मग दोन्ही बसेस चौल्हेरच्या दिशेने निघणार होत्या. प्लॅन तर फस्क्लास होता.

पुण्याची बस वेळेत म्हणजे चक्क वेळेत निघाली. ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या मेंब्रांचे पिकअप झाले. मला बसमध्ये चढताना प्रत्यक्ष पाहिल्यावर 'मी मेळाव्याला येत आहे' याची पवन आणि ओंकारची खात्री झाली, इतका त्यांना माझ्याबद्दल (अ)विश्वास होता. पुणे-नाशिक महामार्गावर रात्री पाऊण वाजता नारायणगावात 'मुक्ताई'ला नेहमीप्रमाणे मसाला दूधासाठी बस थांबली. तेव्हा मुंबईची बस माजिवड्यात पोचली होती. (कारण काय तर म्हणे, गिरीने उशीर केला!) अखेर मुंबईची बस तीन वाजेपर्यंत नाशकात पोचत नाही हे स्पष्ट झाल्यावर मग आम्ही मसाला दुधाचा अजून एक राऊंड केला. तिथे पवनचा वाढदिवसही वाढता साजरा केला. यथासांग दुग्धपान झाल्यावर बस निघाली. पुढचं मला काहीच आठवत नाही. सीटवर अवघडल्या अवस्थेत झोपण्यापेक्षा मधल्या कॉरिडॉरमध्ये अख्खा सहज मावेन हा साक्षात्कार ज्या क्षणी झाला, तो क्षण भाग्याचा! मग केव्हातरी साडेतीन-चारला दोन्ही बसेस नाशकात भेटल्या, तिथून धुळे महामार्गावर सोग्रस फाट्याला वळल्या, तिथून सटाणाच्या एक किमी अलिकडे तिळवण फाट्याला वळल्या आणि पहाटे साडेसहाला तिळवणला पोचल्या, हे सगळं मी दुसर्‍या दिवशी ओंकारकडून ऐकले. सुरू होणार होणार म्हणता म्हणता सह्यमेळावा सुरूही झाला होता. आम्ही पहिल्या डेस्टिनेशनला पोचलो होतो. समोर होता शिवकालीन चौल्हेरगड आणि तिळवण गावात वाट पाहत होता - चहापोह्यांचा नाष्टा...




- नचिकेत जोशी

(क्रमशः)

No comments: