Pages

Tuesday, January 25, 2011

स्वरभास्कराचा अस्त...

काल पंडितजी गेले...
१० वर्षांपूर्वी पु.ल. गेले तेव्हा आत काहीतरी हललं होतं... काल exactly तेच feeling होतं... दिवसभर ofc च्या गडबडीत असल्यामुळे खूप इच्छा असूनही कलाश्रीवर जाता आलं नाही. त्यामुळे माझ्या एका पंडितजींच्या अत्यंत निस्सिम भक्त असलेल्या मित्राला फोन केला. तो फोनवर रडतच होता.. परवाच एका छोट्या मैफलीत भेटला तेव्हा तो म्हणाला होता की मला पाच रागांच्या नावाने पाच अत्तराचे frangrance तयार करायचे आहेत.. पंडितजींच्या सगळ्या दुर्मिळ रेकॉर्ड्स त्याच्याकडे आहेत.. इतकं वेड्यासारखं प्रेम करणार्‍या त्याच्यासारख्याची ही अशी अवस्था पाहून माझ्या आतलं हललेलं अजूनच खोल खोल जाऊ लागलं होतं.

रात्री घरी गेल्यावर news channels लावून बसलो. सुदैवाने, रात्री १० ते साडेअकरामध्ये दूरदर्शनने गुलजारसाहेबांनी पंडितजींवर काढलेला लघुपट दाखवला. मला जsssरा बरं वाटलं... पंडितजींनी त्यांचा जीवनप्रवास त्या मुलाखतीमध्ये उलगडला.. जुन्या मैफलींची क्षणचित्रे, त्यांच्याकडचे अंदाजे १०० वर्षे जुने असलेले उ.अब्दुल करीम खाँसाहेबांचे तानपुरे आणि नवीन पिढीतल्या कोणत्या शिष्यांकडून अपेक्षा आहेत या प्रश्नाला "आनंद भाटे" हे पंडितजींनी दिलेले उत्तर (आनंद भाटे हे COEP चे माजी विद्यार्थी, डिसेंबर ०९ मध्ये एका कार्यक्रमात मी निवेदक होतो आणि आनंदजींनी गायलेल्या "केतकी गुलाब जूही.." ने सभागृह भारून गेलं होतं, ते अनुभवायला मी त्यांच्या शेजारीच बसलो होतो, ते काल आठवलं), त्यांचा कार चालवण्याचा शौक, त्यांच्या गुरुबंधूनी - उ अमजद अली खाँ साहेबांनी सांगितलेल्या त्यांच्या आठवणी या सगळ्यांनी ती मुलाखत काल रंगली...
आज मटाने सुंदर लेख दिले आहेत, सकाळनेही त्यांचा प्रवास छान मांडला आहे..

आता फक्त आठवणीच उरल्या आहेत...

हिमालयाएवढं कर्तृत्त्व असलेली ही एक एक माणसं आपलं हे जग सोडून चालली आहेत. पु.ल. गेले, भटसाहेब गेले, बिस्मिल्लाह खाँसाहेब गेले, विंदा गेले, अजून किती तरी... अशा वेळी आतमध्ये कातरत राहते..
भटसाहेब म्हणतात तसं "विजा घेऊन येणार्‍या पिढ्यांशी बोलतो आम्ही" हे कितपत खरं आहे? काल मुलाखतीमध्ये सुद्धा पंडितजींनी "माझं नाव गुरूस्थानी लावणारे बरेच आहेत, पण आशादायी गाणारे फार कमी" असं विधान का केलं असावं?

काही दिवसांपूर्वी सारेगमामध्ये कल्याणजी आले होते. स्पर्धक गात असतांना हे उस्ताद कानाला काही हेडफोन वगैरे न लावता चेहर्‍यावर एक प्रकारचा टवटवीतपणा घेऊन गाण्यांचा आनंद घेत होते. आणि तरीही सुरांचं परीक्षण अगदी बरोब्बर करत होते. मला खूप कौतूक वाटलं... हे त्यांनी कुठून कमवलं? किती साधना केली असेल? किती वर्षं लागली असतील? निष्ठा, एकाग्रता, पैसा, पोट कसं balance केलं असेल?

दोन दिवसांपूर्वी डॉ. अरूणा ढेरे एक अनौपचारिक गप्पांच्या वेळी सहज बोलून गेल्या - की हल्ली केवळ प्रसिद्धीसाठी हपापलेले बरेच जण दिसतात, पण संशोधनाच्या, निर्मितीच्या क्षेत्रात अफाट कर्तृत्त्व असणारे फार फार कमी उरले आहेत..

तेवढी उंची गाठायला एक एक आयुष्य खर्ची घालावं लागतं हे आम्हाला कधी कळणार?? मला कधीकधी असंही वाटतं, की ह्या आभळाएवढी तपस्या आणि हिमालयाएवढं कर्तृत्त्व असलेल्या माणसांनंतर पुन्हा तशीच माणसं "तयार" होईपर्यंतच्या मधल्या काळात आदर्श कोण असणार?

ही सुद्धा एक प्रकारची "generation gap"च नाहीये का?

नचिकेत जोशी (२५/१/२०११)

Thursday, December 9, 2010

बाहुलीची टोपी

बाहुली म्हणे टोपी हवी
घालायला पण सोप्पी हवी
त्यावर माऊचे कान हवे
छोटे गोरेप्पान हवे
आणखी हवंय बदामी फूल
त्यावर सुंदर मोत्यांची झूल
रंगीत डोक्यावर चांदण्या फुले
टोपीच्या गोंड्यावर चांदोमामा डुले
टोपीच्या भवती सोनेरी नक्षी
इवल्याशा पंखांचा पिटुकला पक्षी

टोपी घालून भूर गेली
ढगांमधून दूर गेली
तिथे होत्या पऱ्याच पऱ्या
चॉकलेटचे डोंगर आणि आईसक्रीमच्या दऱ्या
मिठाईच्या जंगलात बर्फीचे रस्ते
झाडा-झाडांवर केशर-पिस्ते
बाहुलीच्या डोक्यावर माऊची टोपी
दिसायला सुंदर घालायला सोपी
पऱ्यांच्य़ा राज्यात एकच गडबड
टोपीसाठीच सगळी धडपड

पऱ्या म्हणाल्या बाहुलीला
"टोपी दे ना आम्हाला!
आमच्याकडे कमी नाही,
पण आमच्याकडे टोपीच नाही
आम्हाला घालावा लागतो मुकूट
त्यातून नाही कसलीच सूट
मागशील ते तुला देतो
जादूचा झूला देतो
झुल्यात बसून फ़िरता येईल
हवं तिथं जाता येईल"...

बाहुलीला पण टोपी प्यारी
पऱ्यांचाही हट्ट भारी
बाहुली म्हणे,"विचार करते,
आधी झुल्यात बसून तर बघते!"
झुल्यात बसून निघाली भूर
पऱ्यांच्या गावातून भलतीच दूर
वाटेत सुटला वारा मध्येच
उडाली टोपी लागली ठेच
बाहुली बिचारी हिरमुसली
टोपीसाठी आसुसली
शोधून शोधून दमून गेली
तळ्याकाठी निजून गेली
रात्री देवबाप्पा आला
हळूच टोपी ठेवून गेला

टोपी मिळताच खुदकन हसली
बाहुलीच्या टोपीची गोष्टच संपली

- नचिकेत जोशी (६/५/२००७)

Sunday, September 12, 2010

प्रिय आईस

प्रिय आईस,

परवा मी केर काढला,
काल भांडी लावली,
आज खोली आवरली,
त्याबद्दल तू तीनतीनदा थॅंक्यू म्हणालीस,
आणि
मी मात्र
तू केलेल्या आजपर्यंतच्या
माझ्या आवराआवरीबद्दल
एकदाही तुला थॅंक्यू म्हणालो नाहीये!!

- नचिकेत जोशी

Tuesday, May 11, 2010

एक उनाड दिवस

डिसेंबर मध्ये तोरणा-रायगड हा ड्रिम ट्रेक केल्यानंतर चार महिन्यात दमवणारी सोडाच, पण साधी भटकंती टाईप मुशाफिरीही केली नव्हती. आणि आता मरणाचा उन्हाळा सुरु आहे. म्हणून ट्रेक बंद आहेत. पण मागच्या शनिवारी बोपदेव घाटाच्या वर कानिफनाथाला जाऊन आलो आणि ट्रेक नाही तर बाईकवर कुठेतरी जायला हवं, हा विचार मूळ धरू लागला आणि आठवड्याच्या आतच फळालाही आला.. बाईकवर भटकायला जायचं आणि तेही ट्रेकसाठी नाही तर मग प्रवास ओढ लावणारा हवा आणि बाईक चालवण्याचं समाधान देणारा हवा! आणि हे सगळं एक दिवसात जमवायला हवं! म्हणून मग यावेळेचं डेस्टिनेशन होतं - सातारा! भटकंतीसाठी सातारा आणि कोल्हापूर हे घाटावरचे माझे दोन सर्वात आवडते जिल्हे आहेत. दुर्गभ्रमणाबरोबरच धार्मिक क्षेत्रांसाठीही हे दोन जिल्हे नावाजलेले आहेत. फरक इतकाच होता की यावेळी आम्ही किल्ल्यांऐवजी देवळांना भेटी देणार होतो.

गुरुवारी सकाळी पावणेसात वाजता मी, सुजय आणि ’हमारा बजाज’ (डिस्कव्हर १३५) निघालो तेव्हा फक्त सातारा हे एकच ध्येय होतं. शिरवळला (सुप्रसिद्ध) श्रीराम वडापाव खाऊन थेट साताऱ्यात पोचलो तेव्हा नऊ वाजले होते. दिवसभराचा प्लॅन जाता जाता बाईकवरच ठरत गेला. साताऱ्यात पोचल्यावर पहिलं टार्गेट होतं - अजिंक्यतारा किल्ला! देवळांना भेटी द्यायला निघालो होतो हे खरंच आहे, पण किल्ल्यावरही देऊळ असेलच की, हा फक्त ट्रेकरलाच सुचणारा विचार डोक्यात आला आणि बाईक गडाकडे वळवली. एरवी ट्रेकला निघाल्यावर चुकुनही या किल्ल्याकडे वळलो नसतो, त्यामुळे आजच्या दिवसासाठी हा किल्ला उत्तम होता. गाडी वरपर्यंत जाते आणि किल्ला तासाभरात बघून संपतो. आम्ही नेहमीप्रमाणे किल्ल्याच्या काठाकाठाने (म्हणजे दरीच्या काठाकाठाने) किल्ल्याला प्रदक्षिणा घातली. जवळजवळ सगळ्या तटबंदीची आता पडझड झाली आहे. गडावरच्या उत्तराभिमुख हनुमानाचे दर्शन घेतले आणि साडेदहाला गड उतरलो. आता पुढचं ठिकाण होतं - अवघ्या १२ किमी वर असलेला परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड!

साताऱ्यापासून सज्जनगडाकडे जाताना बोगदा पार केला की लगेच डाव्या हाताला एक रस्ता जातो. त्या रस्त्यावर एक किमीवर साताऱ्याचे ग्रामदैवत "खिंडीतला गणपती" आहे. त्याच आवारात कुरणेश्वर महादेव आणि दत्तात्रयाचे मंदिर आहे. आवारात झाडे विचारपूर्वक वाढवलेली असल्यामुळे भर दुपारीही गारवा वाटत होता. मंदिराच्या आवारात खूप प्रसन्न वाटतं. त्या तीन देवळांमध्ये दर्शन झाल्यावर आम्ही बाईक सज्जनगडाकडे हाकली. एव्हाना साडेअकरा झाले होते आणि बाराच्या आरतीपर्यंत आम्हाला सज्जनगड गाठायचा होता. मागच्या आठवड्यातील पुण्याचे पावसाळी हवामान आणि पश्चिम महाराष्ट्रातील अवकाळी पावसाळी वातावरणाबद्दल पेपरमध्ये वाचलेल्या बातम्या यावरुन त्यादिवशी आम्ही अगदी पावसाची नाही तरी ढगाळ वातावरणाची अपेक्षा करत होतो. (मी तर पावसाळी जाकीटही सॅकमध्ये घेऊन निघालो होतो). पण तसे काहीही घडले नाही आणि भर उन्हात आम्ही तो घाटरस्ता चढू लागलो. मंदिर बंद व्हायला दहा मिनीटे असताना आम्ही गडावर पोचलो. दर्शन व महाप्रसाद घेऊन गड फिरयला निघालो. चौदा वर्षांपूर्वी शाळेतल्या सहलीबरोबर सज्जनगडावर आलो होतो. आता खूप सुधारणा झाल्या आहेत. समर्थ रामदास सेवा समितीतर्फे भक्तांसाठी आणि समर्थांच्या विचारांच्या प्रसारासाठी खूप कामे चालू आहेत. धाब्याच्या मारूतीचे दर्शन घेऊन अडीच वाजता गड उतरलो. अजून चार तास हातात होते. साडेसहाला जरी सातारा सोडले असते तरी आठपर्यंत पुण्यात पोचलो असतो कारण आता परत जाताना खंबाटकी घाटाऐवजी फक्त एक बोगदा पार करायचा होता. त्यामुळे आम्ही ठिकाणे वर्कआऊट करायला लागलो. कास मार्गावरील यवतेश्वर आणि हायवे ओलांडून कोरेगाव मार्गावरील कृष्णा-वेण्णा संगमावरील माहुली ही दोन फ़ायनल केली आणि निघालो.

’परतीच्या वाटेवरती’ सज्जनगड-सातारा रस्त्यावर, भोंदवडे गावाजवळ रस्त्याच्या कडेला दाट सावली असलेले वडाचे झाड दिसले आणि एवढा वेळ प्लॅननुसार चालत असलेली ट्रिप प्लॅन सोडून गेली. ते झाड आणि ती सावली बघून बाईक सरळ रस्त्याच्या कडेला घेतली आणि त्या वडाच्या सावलीत बुंध्यावर डोके टेकून मी आणि सुजयने चक्क ताणून दिली. तो अर्धा तास मी कधीच विसरणार नाही. कारण माझे सगळे वैयक्तिक-व्यावसायिक हुद्दे, सो कॉल्ड पत-प्रतिष्ठा, जबाबदाऱ्या यांचे बंध त्यावेळी नाहीसे झाले होते. भर दुपार असूनही त्या सावलीत मात्र सुखद झुळूक होती. त्या आडवाटेवरच्या स्वर्गात फक्त अधूनमधून एसटी, तसेच गावकऱ्यांचे आवाज सोडले तर फक्त वाऱ्याचा आवाज होता. बाकी सर्व मोहमयी दुनिया तेवढा वेळ माझ्यासारख्या सामान्य अट्टल भटक्यापासून कोसो दूर होती! पडल्या पडल्या झोप कधी लागली ते कळलंही नाही. अर्ध्या तासाने मी जागा झालो. डोळ्यावरती बाजुच्या झुडुपाची फांदी आली होती. तिचे चिमुकले फूल वाऱ्यामुळे डोलत होते. पडल्या पडल्याच त्याचे हलत्या वाऱ्यामध्ये फोटो घेतले. तोपर्यंत सुजयही जागा झाला आणि आम्ही पुढे निघालो. यात एक तास कसा गेला ते कळलेच नाही. त्यामुळे पुढे कधी कास पठारावर येऊ तेव्हा यवतेश्वर करू असे ठरवून माहुलीकडे निघालो.

दक्षिणकाशी असे वर्णन केले गेलेले आणि संभाजीराजे मोगलांना जिथे मिळाले ते ऐतिहासिक ठिकाण असलेले माहुली कसे असेल याबद्दल खूप उत्सुकता होती. पण ’प्रथम तुज पाहता जीव दुखावला’ अशी अवस्था झाली. इतर अतिपवित्र देवस्थानांच्या ठिकाणी असते तशी इथेही अस्वच्छता भरपूर होती. मंदिरात पत्त्यांचे डाव रंगले होते. अशा मानवी प्रदुषणापुढे त्या नद्यांमधील ’गाळी’व प्रदुषणाची काय कथा? उन्हाळ्यामुळे कृष्णा आणि वेण्णा या दोन्ही नद्या बऱ्यापैकी आटल्या होत्या हे खरेच. पण हा संगम म्हणजे नद्यांच्या नशिबी असणारी एक भौगोलिक अवस्था यापलिकडे काहीच आत्मीयता वाटली नाही. चार वर्षांपूर्वी सांगलीजवळ हरिपूर गावी पहिलेला कृष्णा आणि वारणा नदीचा संगम आठवला. तो संगम हरिपूर गावाच्या बऱ्याच खालच्या पातळीला होत असल्यामुळे निदान संगम बघायला तरी मिळाला होता. आणि कुठलीही धार्मिक ख्याती चिकटलेली नसल्यामुळे तो संगम अस्वच्छतेपासून दूर होता. (आता तिथे काय वर्तमान असेल ते कृष्णामाईच जाणे!) तर ते असो. एव्हाना फक्त पावणेपाच वाजले होते आणि माहुलीची भेट अपेक्षेपेक्षा खुपच लवकर आटोपली होती. मग आता अजून एखादे ठिकाण करण्यापेक्षा सरळ पुणे गाठावे असा विचार केला. दिवसभर मनसोक्त भटकंती झाली होती, सर्व काही नियोजनानुसार पार पडले होते, कुठेही घाई झाली नव्हती म्हणून परत जातानाही निवांत बाईक चालवत, सूर्यास्ताच्या मनोहारी वातावरणाचा आस्वाद घेत साडेसातला पुण्यात पोहोचलो.

दोन किल्ले, चार देवस्थाने, सात देवळे, दोन येडे भटके, एक बाईक, २६५ किमी बाईकिंग अशा भटकंतीनंतर आम्ही खूप फ्रेश झालो होतो आणि नेहमीच्या शिस्तबद्ध, नियोजनप्रिय दिनक्रमामधून वेळ काढून घालवलेला एक ’उनाड’ दिवस संपवून पुन्हा शिस्तीच्या कोषात जायला सज्ज झालो होतो.

नचिकेत जोशी (१०/५/२०१०)

Monday, March 29, 2010

पालखी

(मार्च २०१० मध्ये पुण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविसंमेलनामध्ये कवि-कट्ट्यावर सादर केलेली आणि maayboli.com च्या दिवाळी अंक २००८ मध्ये प्रकाशित झालेली गझल)

मोकळा आहे बरा मी, कोणत्या गर्तेत नाही
रात्र माझी, स्वप्न माझे, झोप उसनी घेत नाही

प्रेम मी केले तुझ्यावर, यात माझी चूक नाही
प्रेम कोणावर करावे?- हा कुठे संकेत नाही

आखल्या रेघेत हल्ली बरसते आभाळ माझे
(एकही वादळ अताशा सोबतीला येत नाही)

आपुल्या नात्यास कोणी पाहिजे ते नाव द्यावे...
ते तसेही कोरलेले हातच्या रेषेत नाही

धूळ आहे, मळभ आहे, ही हवाही उष्ण आहे
उंच आकाशात उडण्य़ाचा मनाशी बेत नाही

ताटवे फुलतात बाकी आजही बागेत माझ्या
फूल तू चुरगाळलेले आजही बागेत नाही!

एक आहे विश्व माझे माणसांनी घेरलेले
एक व्यक्ती सोडुनी कोणी तुझ्या दुनियेत नाही

पालखी उठताच माझी दोन डोळे चिंब झाले
आणि विझण्याची तयारी माझिया राखेत नाही

वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही

नचिकेत जोशी (१०/१०/२००८)