Pages

Monday, January 9, 2012

सह्यांकन २०११ - भाग ४ : अहुपे ते सिद्धगड व्हाया गायदरा घाट

अहुप्याच्या शाळेत अतिशय शांत झोप लागली, आणि पहाटे पाच वाजताच मी जागा झालो. मीच काय, सगळेच्या सगळे शिट्टी वाजायच्या आधीच जागे झाले होते आणि बेड-टीची वाट बघत बसले होते. हे सातत्य पुढचे तीन दिवसही टिकून राहिले.

'पाणी कमी असल्यामुळे सर्वांनी सिद्धगडमाचीला पोचल्यावर दात घासायचे आहेत' हा फतवा निघाला. मी मात्र वेळ वाचला म्हणून खूश झालो! तसंही भल्या पहाटे सव्वापाचला 'विसर्जना'साठी दूरवर फेरफटका झाल्यामुळे कंटाळा आलाच होता. मग दोन-तीन चॉकलेट्स चघळली आणि सर्वात आधी सॅक पॅक केली, शूज चढवले आणि पीटीसाठी कॅमेरा घेऊनच बाहेर आलो. पूर्व समोरच्या बाजूला असल्यामुळे सूर्योदय दिसण्याची शक्यता होती.




पीटी झाली, आणि नाष्ट्याला गरमगरम पोहे समोर आले. मग पुन्हा चहा, ओळखपरेड (आदल्या दिवशी ओळखपरेड बाकी होती) झाली आणि बरोब्बर साडेसातला आम्ही कँप सोडला. अहुपेमधली ही शाळा, जिथे आम्ही काल मुक्काम केला होता -


आज सुरूवातीच्या टप्यात प्रचंड लांबलचक गायदर्‍याच्या पठारावरून चालून मग घाट उतरायचा होता. समोर दिसणार्‍या टेकाडावरून पुढे सुंदर, शांत रानातून वाट जाते -


त्या टेकडीवरून घेतलेला अहुपे गावाचा फोटो -




अहुपे ते गायदरा टॉप हे अंतर कापायला अर्ध्या तासाच्या विश्रांतीसह आम्हाला सव्वातीन तास लागले. वाटेत एके ठिकाणी बाजूच्या पायवाटेवर 'B' लिहिलेला, उलट दिशेने जाणारा बाण दिसला. याचा अर्थ, उद्या इथपर्यंत माघारी येऊन त्या वाटेने भीमाशंकरकडे जायचे होते. त्या बाणापासून गायदरा टॉप फक्त पंधरा मिनिटावर होता, हे सुदैव! जवळच पायवाटेच्या बाजूला एक विहीर दिसली आणि आम्ही तिथे थोडावेळ रेंगाळलो. (दात घासायचे बाकी होते, आठवयंय ना?)

गायदरा टॉपला पोहोचलो तेव्हा पावणेअकरा झाले होते. या फोटोतील कातळ उतरून पुढे निघालो.


A म्हणजे अहुपे, B म्हणजे भीमाशंकर, आणि S म्हणजे सिद्धगड -


गायदरा घाट म्हणजे आधी घळीसारख्या वाटेने थोडे अंतर चालल्यावर झाडीतून जाणारा दगड-धोंड्यांचा अनियमित उतार! क्षणाक्षणाला गुडघ्यांवर इतका ताण येत होता, की थोड्या वेळाने काटकी मोडल्याचा आवाज सुद्धा गुडघ्याच्या वाटीनेच केलेला आवाज नाही ना, असे (मला) वाटायला लागले होते! रात्री जेवताना वाट्या कमी पडल्या तर गुडघ्यातल्या दोन काढून देता येतील असेही वाटायला लागले होते. साखरमाचीचा अवाढव्य डोंगर उजव्या बाजूला ठेवून ही वाट खाली उतरते. वाटेत एके ठिकाणापासून डाव्या डोंगराआड दूरवर सिद्धगडाची माची हळूच डोकावते. ती पाहिल्यावर खाली उतरल्यानंतरही अजून तास-दीड तास चालायचे आहे, ही जाणीव होतेच!

गायदर्‍याच्या याच वाटेवर मी आणि लांबा सर्वात पुढे चालत असताना 'एमबीए परीक्षांचे बदलते स्वरूप आणि भविष्य' नावाच्या शीर्षकविरहीत विषयावर पाऊणतास एकतर्फी संवाद केला. म्हणजे फक्त मी बोलत होतो आणि लांबा ऐकत होता. हा क्षण भाग्याचाच! लांबा इतक्या आज्ञाधारकपणे ऐकत होता, की शेवटी मला असेही वाटायला लागले होते की हा भोळा बनून माझी परीक्षा घेतो आहे! आमच्या त्या गप्पा सिद्धगडकँपचे लीडर्स राजेश, पिनाक पुराणिक उर्फ पिपु, अनिकेत (हा अनिकेत वेगळा. हा मला स्वभावाने अतिशय गरीब वगैरे वाटला) आणि शार्दूल दिसेपर्यंत सुरू राहिल्या.

'तुम्हाला एवढा उशीर का झाला? तुम्ही इथे दहा वाजता पोचणार असं आम्हाला (घरून) लिहून देण्यात आलं होतं' - इति राजेश! तो उतार उतरून आल्यावर दमसास घेत असताना हा प्रश्न ऐकल्यावर माझे पुढचे एक-दोन श्वास घ्यायचेच राहिले! कुठल्या पायलटवीराने अहुपेपासून इथपर्यंतचे अंतर अडीच तासात काटून होईल हा टाईमलॉग दिला असावा हे कळेना! आमची गती व विश्रांती हे गणित पाहता आम्ही बर्‍यापैकी वेग राखून होतो हे नक्की होते! शेवटी आमची बॅच किती फास्ट चालते वगैरे त्याला उदाहरणासहित समजावून दिल्यावर तो दुसर्‍या बॅचेससाठी उद्यापासून साडेअकराला यायला तयार झाला! मागचे लोक्स बरेच मागे होते. एक तर चढावर फुल फॉर्ममध्ये असणारी आमची बॅच उतारावर सपाट व्हायची! त्यामुळे सर्वांची वाट न बघता, दोन कँपलीडर्सना घेऊन आम्ही पाच-सहा लोक्स पुढे निघालो आणि एमबीए परीक्षांवरील 'चालतं' चर्चासत्र लांबाने आपणहून पुन्हा सुरू केलं.
(त्या वरच्या फोटोमधल्या तीन बाणांपैकी "A"वाल्या बाणाकडून आलो असतो, तर आम्ही दहा-साडेदहापर्यंत पोचलो असतो, हे मागाहून कळलं.)

वळणावळणांची, झाडीतली पायवाट दोन डोंगरांना वळसा मारून तास-सव्वातासाने दमदम्याच्या खाली आणि सिद्धगडाच्या समोर येते (सिद्धगड आपल्या समोर असतो, दमदम्या डाव्या हाताला).


सिद्धगडाचा (माचीचा) पडका दरवाजा सुंदरच आहे!


इथून उजव्या हाताला वळून चार-पाच फर्लांग (एक फर्लांग म्हणजे किलोमीटरचा सहावा भाग) चाललो की आपण सिद्धगडमाची या गावात पोचतो. आम्ही कँपमध्ये पोचलो तेव्हा एक वाजून गेला होता. कँपप्रमुख विंदावहिनींनी सर्वांचं हसर्‍या चेहर्‍याने स्वागत केलं आणि थोड्याच वेळात भाजी-पोळीचं जेवण समोर आलं.

आम्ही पोचायच्या दोन दिवस आधी कँप लागला होता. पायथ्याच्या बोरवाडी गावातून २५ किलोंची पंचवीस पोती (तर मुलामुलींनो, सांगा बरं एकूण किती किलो?) इतके कँपचे सामान (शिधा, लॉजिस्टीक्स इत्यादी) त्यांनी स्थानिक गावकर्‍यांच्या मदतीने वर चढवले होते. सर्वच कँप्स कमी-अधिक प्रमाणात अशाच पद्धतीने लागले होते.

जेवल्यावर अडीच वाजता सिद्धगडाच्या दिशेने निघालो. सिद्धगड माचीची उंची २०२० फूट, तर सिद्धगडाची उंची ३२१६ फूट! म्हणजे आजच्या उरलेल्या दिवसात साधारण बाराशे फूट अजून चढून उतरायचे होते. सॅक्स कँपवरच ठेवल्या आणि पिट्टू सॅकमध्ये पाण्याच्या बाटल्या घेऊन निघालो. सोबत राजेश-पिपु-अनिकेत आणि स्थानिक गावकरी रमेश येणार होते. इथून वरच्या अंगाला 'बाबाची गुहा' आहे.


एका सधन गृहस्थाने संसारातून विरक्ती घेऊन पूर्वी या गुहेत मुक्काम ठोकला होता. त्याचा मुलगा त्याला सर्व शिधा दर आठवड्याला आणून देत असे. गुहेमध्ये फरशा घातलेल्या आहेत. (थोडक्यात अलिशान निवास होता). 'त्याच्या हातच्या चहाची चव अप्रतिम असायची तसेच तो तिथे जाणार्‍या सर्वांना चहा आग्रहाने पाजायचा' अशी आठवण मी ऐकली. सध्या ते बाबाजी पुन्हा मुलाकडे राहायला गेले आहेत असेही ऐकले. पण पंचक्रोशीमध्ये बाबाजी प्रसिद्ध होते, हे मात्र नक्की!
मग बाबांच्या गुहेमध्ये थोडा 'प्रकाश टाकला' -







त्या वाटेवरून घेतलेला फोटो. फोटोत सावली आणि सूर्याच्या सीमारेषेवरची घरं म्हणजे सिद्धगडमाची गाव.


या फोटोत समोर साखरमाची डोंगर आणि उजव्या हाताला दमदम्या डोंगर. साखरमाची डोंगराच्या खालच्या झाडीत साखरमाची गाव आहे. साखरमाची आणि दमदम्या यांच्यामधल्या घळीत गायदरा घाट आहे. दमदम्याच्या पायथ्याच्या जंगलभागातून सकाळी आम्ही आलो होतो. यावरून वाचक वाटांचा अंदाज लावू शकतील.


गुहेपर्यंतची वाट सरळ चढाची आहे. खरी मजा गुहेपासून पुढे येते. अरूंद चढ, मागे थेट दरी आणि थोडीशी स्क्री (सुटे दगड, वाळू, माती) अशी रंगतदार वाट आहे. मोहिमेमध्ये पहिल्यांदाच अशी वाट अनुभवत होतो.


वर पोचलो तेव्हा चार वाजले होते. समोरच उघड्यावर स्थानापन्न झालेले शिवलिंग -


कोण्या एके काळी उभ्या असलेल्या पडक्या वाड्याच्या दरवाजाची कमान -


सिद्धगडाच्या माथ्यावरून दिसणार्‍या दृश्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतील. दक्षिणेला दूरवर भीमाशंकरचे पठार (जिथे आम्ही उद्या असणार होतो), नागफणी, त्याच्या उजवीकडे खाली पदरगड, त्याच्या मागे लांबवर पेठचा किल्ला (कोथळीगड), सिद्धगडाच्या पायथ्याला बोरवाडी गाव, हुतात्मा भाई कोतवालांच्या स्मारकाचे बांधकाम, वायव्येकडे बदलापूरचा बारवी डॅम, उत्तरेकडे गोरखगड, त्याच्या मागून हळूच डोकावणारा मच्छिंद्रगड, साखरमाचीचा डोंगर व झाडीतले साखरमाची गाव, आणि त्याच्या मागे अहुप्याचा डोंगर, त्याच्या उजवीकडे दमदम्या आणि राजाची लिंगी! (प्रस्तरारोहणासाठी गिर्यारोहक जे छोटे-मोठे सुळके निवडतात त्यांना लिंगी म्हणतात). याठिकाणी स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण झाली! (हरये नमः हरये नमः |). उपलब्ध हवामानामध्ये आम्हाला एवढं पाहायला मिळालं. हवा अजून स्वच्छ असती तर कदाचित अजूनही एखादा किल्ला दिसला असता. फोटो घेण्याइतकी स्वच्छ हवा नसल्यामुळे ते फोटो घेता आले नाहीत.

पण सिद्धगडाच्या एका टोकापाशी जाऊन घेतलेले हे फोटो - ह्या त्रिकोणी पठाराच्या उंचीवर सिद्धगडमाची गाव आहे.




झूम करून सिद्धगडमाची गाव -

उतरतांना तर अधिक थरार होता. कारण - तेच नेहमीचेच! दरी डोळ्यांसमोर असणार होती! पण लीडर्सलोकांनी कडक शिस्तीमध्ये सर्वांना खाली आणले. लांबाने तर मला 'बाबाच्या गुहेपाशी जाईपर्यंत मोठमोठ्याने बडबडलास तर वरून दगड मारेन' असा सज्जड दम दिला होता. (मग मी गुहेपर्यत पिपुला पुणेकर वर्सेस मुंबईकर वरून छळत बसलो होतो. तोही काही कमी नव्हता हे लिहिणे महत्त्वाचे!). उतरेपर्यंत अंधार पडला होता. माचीवर पोचलो तेव्हा साडेसहाच्या अंधुक प्रकाशात सिद्धगड-दमदम्याची फक्त किनार दिसत होती. फ्रेश होऊन आलो आणि (इथे पहिल्यांदाच) ओळखपरेड झाली. आतापर्यंत आम्ही एकमेकांची ओळख करून देण्याइतके सर्वांना ओळखू लागलो होतो. तो कार्यक्रम छानच रंगला.

जेवायला व्हेज पुलाव व दाल आणि भजी असा मेनू होता. भरपेट जेवून व्यायामशाळेमध्ये आलो. (मुक्कामाची सोय तिथे होती. कृपया गैरसमज नसावाच!) पायांना तेल लावायची इच्छा झाली. माझ्याकडे तेल होतेच. पण लांबाकडेही एक असरदार वारीचे तेल होते (आषाढीच्या वारीमध्ये वारकर्‍यांच्या पायाला मोफत मालीश करायचे बहुगुणी तेल). 'तू करणार की करून द्यायला हवंय?' - इति लांबा! मग लगेचच पायाला मालिश करण्यासाठी मी याचक बनून लांबापुढे 'पाय पसरून' बसलो. सहभागी सभासदांची स्वतःहून सेवा करणारा असा लीडर आतापर्यंत पाहिला नाही! थोड्याच वेळात अजून दहा पावले लांबासमोर जमा झाली. तो कार्यक्रम पार पडल्यावर अंथरूणावर अंग टाकलं तेव्हा दहा वाजून गेले होते. गेल्या दोन दिवसांपेक्षा झोपायला थोडा उशीरच झाला होता. पडल्यापडल्या झोप लागली, हे सांगणे न लगे!

आजचा हिशेबः
२२ डिसेंबर २०११
एकूण चाल - अंदाजे १३ किमी
वैशिष्ट्ये - दमवणारा गायदरा घाट आणि रंगतदार सिद्धगड. तीन दिवस संपले. अजून दोन बाकी.

(क्रमशः)
- नचिकेत जोशी


Friday, January 6, 2012

सह्यांकन २०११ - भाग ३ : ढाकोबा, दुर्ग आणि मुक्काम अहुपे व्हाया हातवीज

साडेपाचला शिट्टी मारून लीडर्सलोकांनी सर्वांना उठवलं. आणि काही 'लाडू' तरीही अंथरूणात पडून राहिले होते, म्हणून त्यांना येऊन पेशल ट्रीटमेंट देऊन उठवलं. 'मोहिमेमध्ये वेळा पाळल्या गेल्याच पाहिजेत' या एकमेव सर्वोच्च नियमाची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली होती. गरमागरम बेड-टी तंबूबाहेरच्या लाकडी कट्ट्यावर तयार होता. 'साडेसहाला पीटीसाठी सर्वांनी शूज घालून आणि सॅक पॅक करूनच यायचे आहे' - इति सौरभ उर्फ बल्लू, आमचा मुख्य लीडर. (लांबामहाराज को-लीडर होते). नाही म्हटलं तरी, इतकी थंडी, त्यात वेळेच्या नियमांनी बांधलेला ट्रेक करायची सवय नाही, पहिल्याच दिवशी आतली सर्व 'प्रेशर्स' वेळेवर येतीलच याची खात्री नाही वगैरे वगैरे गोष्टींचा परिणाम म्हणून मी साडेसहाला धापा टाकत तंबूकडे परतलो तेव्हा, सॅक पॅक करायची बाकी होती आणि शूजही चढवायचे बाकी होते. माझ्या हंटर शूजच्या बांधलेल्या लेसकडे पाहून - 'XXXच्या, उद्या डोंगरामध्ये जर कुणाच्या मदतीसाठी १० सेकंदात शूज काढून XXXला पाय लावून पळायची वेळ आली तर काय करणार आहेस? एक सेशन घ्यायला हवं यावर!' (लांबाच! दुसरं कोण बोलणार इतक्या प्रेमळ भाषेत!)

पीटीसाठी सगळे जण वर्तुळात उभे राहिलो. पीटी म्हणजे इतक्या मोठ्या पायपीटीसाठी शरीराच्या स्नायूंना मोकळे करण्याचे बेसिक व्यायामप्रकार होते. पण त्या ढाकोबाच्या पायथ्याच्या पठारावर उगवतीच्या सूर्याला साक्षी ठेवून सर्वांची वर्तुळातील पीटी हे एक सुंदर दृश्य होते.






पीटी संपली आणि मी सॅक बांधायला पळालो. कमीत कमी आकाराची, सॅकमध्ये बसेल अशी स्लीपिंग बॅगची गुंडाळी करणे हा ट्रेकमधला एक अतिशय कंटाळवाणा प्रकार असतो. सकाळी सॅक भरताना 'नकोच ही स्लीपिंग बॅग' हा एकमेव विचार असतो. (रात्री थंडी वाजायला लागली की काय विचार असतो, ते सांगायला नकोच!) तात्पर्य, पुढच्या ट्रेकला एक 'जादूची' सॅक आणायची हा विचार मी नक्की केला आणि बाहेर आलो. गरमागरम साबुदाण्याची खिचडी तयार होती! अन् त्या खिचडीची चव काय सांगू राजांनु!! केवळ अप्रतिम! सगळ्यांनीच ढाकोबा लगेचच चढायचा आहे हे विसरून यथेच्छ हादडलं. अर्थात पूर्ण मोहिमभर सर्व जेवण, नाष्टा, चहा अनलिमिटेड होतं, हा भाग वेगळा!

बरोब्बर साडेसात वाजता आम्ही १७ 'वारकरी' दोन लीडर्स आणि दोन कँपलीडर्सच्या सोबत ढाकोबाकडे निघालो. अर्धा-पाऊण तास चालून ढाकोबावर पोचलो. ४१४८ फूट उंचीचा ढाकोबा हा डोंगरच आहे, किल्ला नाही! घाटाखालून वर चढणार्‍या अनेक छोट्या मोठ्या वाटांवर लक्ष ठेवायला वगैरे याचा उपयोग होत असावा. इथून व्ह्यू मात्र जबरी दिसतो. माझ्या मते नाणेघाटाचे पठार सर्वात देखणे जर कुठून दिसत असेल, तर ते ढाकोबावरून!


फोटोत जीवधन किल्ला, वानरलिंगी, काल जिथून चढलो ती दरी आणि आजूबाजूचा परिसर -




वरून दिसणारा कँप (झूम करून)


मागे भैरवगडावरून नाणेघाट-नानाचा अंगठा पाहिले होते. त्याच्या बरोब्बर पलिकडच्या बाजूने इथून बघता येते. त्याच रेषेत दूरवर सिंदोळा किल्ला दिसतो. पश्चिमेकडे दुर्ग, थोडंसं उजवीकडे खूप मागे गोरखगड - मच्छिंद्रगड असे ओळखीचे दोस्त दर्शन देतात. ढाकोबावर भन्नाट वारा सुटला होता. थोडा वेळ तिथे टाईमपास करून खाली उतरलो. पुन्हा कँपवर पोचलो तेव्हा नऊ वाजले होते. पॅक-लंच व सॅक घेऊन साडेनऊ वाजता निघायचे होते. त्याप्रमाणे घड्याळाने काटे त्या जागी नेल्यावर आमची परेड निघाली. आता लक्ष्य होते दुर्ग किल्ला!


ढाकोबाला उजव्या हाताला ठेवून झाडीतून एक वाट दुर्ग किल्ल्याकडे जाते. ही वाट बरीच लांब आहे. दोन डोंगर उतरून-चढून असे दोन अडीच तास चालल्यावर एकदाचे आम्ही दुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो.
दुर्गच्या वाटेवरच्या एका पठारावर घेतलेला फोटो. मागे जिथून निघालो होतो तो ढाकोबा डोंगर.


दुपारच्या बाराच्या उन्हात किल्ला चढायचा होता खरा! पण पायथ्यापासून किल्ला अगदी दहा-पंधरा मिनिटात चढून होतो. दोन्ही बाजूला पूर्ण झाडी आहे. पायथ्याला दुर्गादेवीचे अतिशय सुंदर, शांत मंदिर आहे.






उंचीने ढाकोबापेक्षा कमी असलेल्या या किल्ल्यावर (उंची - ३८५५ फूट) बघण्यासारखे काहीही नाही. तटबंदी, दरवाजे कधीकाळी असलेच, तर आता पूर्ण पडले आहेत. दुर्गला पोहोचण्यासाठी थेट आंबोलीपासूनही वाटा आहेत.

उतरल्यावर थोडीशी विश्रांती घेऊन एक वाजता आम्ही डोणीच्या दिशेने चालायला सुरूवात केली. या फोटोत पुढचा दुर्ग व मागचा ढाकोबा.



डोणी हे पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातलं एक छोटंसं गाव. इथून अहुपेपर्यंत आमच्यासाठी जीपड्याची सोय केलेली होती. दुर्गवाडीपासून एक वाट दरीत उतरून पलीकडचा डोंगर चढते. त्या सपाटीवर जुन्नर तालुक्यातलं हातवीज हे गाव आहे.
या विहीरीपाशी ती पायवाट हातवीजमध्ये येते.


त्या गावातूनच पुढे आणखी एक पठार पार करून वाट दरीमध्ये उतरते.




उतार उतरून एका ओढ्याच्या काठी आम्ही दोन वाजता जेवणाच्या पुड्या सोडल्या. बसल्या बसल्याच थोडा वेळ झोपून तीन वाजता ओढ्यापलीकडचा चढ चढायला सुरूवात केली. इतके खाल्यानंतरही ज्या गतीने तो खडा चढ चढून आम्ही सगळे वर पोचलो, ते पाहून हा सह्याद्रीही सुखावला असेल (असं मलाच वाटत राहिलं).

'घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नसताना' एक माणूस मात्र याला अपवाद होता - तो म्हणजे अर्थातच लांबा! अर्थात, सचिन करंबेळकर नावाचे सर्वात वडील असलेले काकाही (काका फक्त म्हणायला, एरवी मी त्यांना 'अहो सचिन' म्हणूनच हाक मारली असती!) लांबाला हळूहळू जॉईन होऊ लागले होते. अतिशय मिष्कील, नकलाकार सचिननी (ब्रँच मॅनेजर, एसबीआय, लालबाग म्हणून आमच्यातील 'लालबागचा राजा') अख्खा ट्रेकभर आम्हाला प्रचंड हसवलं.
तर, तो चढ चढल्यावरही वाटेत डोणीच्या वाड्या-उपवाड्या लागल्या. घेवड्याची शेतं डोलत होती.


तिथून पुढे बरंच चालल्यावर अखेर साडेचारच्या सुमारास आम्ही डोणीला पोहोचलो. आमचा जीपवाला गायब होता. मग तिथेच एका घर कम दुकानाच्या ओसरीवर सगळे पसरलो. फोटोत भगव्या टी-शर्टमधली व्यक्ती म्हणजे 'सचिन करंबेळकर'.


वाट पाहून अखेर जीपऐवजी एका टेंपोतून पुढे निघायचे ठरवले. टेंपोमध्ये उभं राहण्यापेक्षा डायवरच्या डोक्यावरच्या टपावर बसलेलं चांगलं म्हणून आम्ही काही लोकांनी तिकडे मोर्चा वळवला. वाटेत झालेला सूर्यास्त त्या हलत्या टपावरूनच टिपला आणि अर्ध्या तासात ते अंतर पार करून अहुपेला पोचलो.




अहुपेला स्वागताला SAP (सह्यांकन आयोजक प्रमुख) अनिकेत उर्फ पप्पू आणि गॅरीकाका (गॅरीकाका म्हटल्याचं त्यांना कळलं तर माझी काही खैर नाही, असं मला सांगण्यात आलं आहे!) हजर होते. कमालीच्या खर्जातल्या आणि एकाच पट्टीतल्या गूढसम आवाजात गॅरीकाकांनी उच्चारलेलं 'त्या तिकडे एक मंदिर आहे, त्याचे दर्शन घेऊन या' हे वाक्य सचिननी (नेमकं) 'त्या तिकडे दरी आहे, काल तिथे ३ मर्डर झाले, दोन सुसाईड केसही आहेत आणि आज तुम्ही आलात' असं काहीतरी ऐकलं आणि आम्हाला हसून लोळायला अजून एक मुद्दा मिळाला.

ते मंदिर पाहून आम्ही अहुपे टॉप बघायला गेलो. अहुपेजवळचं ते पठार विलक्षण सुंदर आहे. अतिशय विस्तीर्ण असं माळरान, कड्याच्या टोकाशी असलेली दोनच झाडं, समोर खोल दरी, खाली खोपीवली गाव, डाव्या हाताला डोंगराआडून गोरख-मच्छिंद्रगडाचे डोकावणारे सुळके, मावळलेला सूर्य आणि कातरवेळ.... तिथे माझ्यातल्या मी मनभर राहून घेतलं...






पुन्हा माघारी येऊन अहुपे गावातल्या शाळेकडे, जिथे आमचा कँप होता, निघालो. दिवसभराच्या पायपीटीनंतरही संध्याकाळच्या त्या प्रहरी, त्या सुनसान रस्त्यावरून अंधुक प्रकाशात, टॉर्च वगैरे अजिबात न लावता, सर्वात शेवटी मी एकटाच चालत होतो. ट्रेकमध्ये अशा स्वतःबरोबर राहण्याच्या वेळा अगदी ओढून स्वतःजवळ घ्याव्याशा वाटतात.

अहुपे कँपमध्ये पोचलो तेव्हा सात वाजले होते. सकाळी ढाकोबाकडे निघाल्यापासून तब्बल साडेअकरा तासांनी आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी आलो होतो. चहा-शंकरपाळे झाल्यावर स्वीट कॉर्न सूप आलं. (मी फक्त कॉर्नच शोधून खाल्ले). राहायची सोय आज खोल्यांमध्ये होती (म्हणजे चैन होती!). जनरेटरच्या कृपेमुळे लाईट होते. जेवणात पिठलं-भाकरी, कोशिंबीर, पापड, आमटी-भात असा फर्मास मेनू होता.

जेवताना मला चांगलीच थंडी वाजायला लागली. बाहेर गार वाराही सुटला होता. मोहिमेचे दोन दिवस संपले होते. मोहीम अंगात चढू लागली होती. वेळापत्रक ठरलेले होते. त्यात कुठलाही बदल होणार नव्हता. उद्या गायदर्‍याने उतरून सिद्धगड गाठायचा होता. उद्याही बरीच चाल होती. झोप पुरेशी मिळणे आता आवश्यक होते. त्यामुळे कालच्याप्रमाणे कुठलीही मैफल, गप्पाटप्पा आज जमल्या नाहीत. जेवून स्लीपिंग बॅगमध्ये शिरलो आणि माझ्या बाजूलाच 'घोरासूर ऑफ द बॅच' असूनही कसलाही अडथळा न येता स्वस्थ झोपूनही गेलो.

आजचा हिशोबः
२१ डिसेंबर २०११
एकूण चाल - अंदाजे १२ किमी.
वैशिष्ट्यः प्रामुख्याने दुर्गवाडी-हातवीज-डोणी ह्या अनवट वाटेने भ्रमंती. नियमीत चढ-उतार तसेच सपाटीवरून चिक्कार पदभ्रमण.

(क्रमशः)
- नचिकेत जोशी


Wednesday, January 4, 2012

सह्यांकन २०११ - भाग २ : आंबोली घाट आणि मुक्काम ढाकोबा पायथा

डोंगरामध्ये स्वच्छ हवेमुळे चार तासाची शांत झोपही पुरेशी असते असं म्हणतात. त्या दिवशी पळू-सिंगापूरमध्येही असंच झालं. साडेतीनला झोपूनही साडेसहालाच जाग आली तेव्हा बरंच फ्रेश वाटत होतं. व्हरांड्यातून बाहेर आलो तेव्हा, समोर जीवधन किल्ला, वानरलिंगी आणि डाव्या हाताला नाणेघाटाच्या पठाराचा उंचवटा दिसत होता. सिंगापूर गाव जीवधन किल्ला आणि आंबोली घाट यांच्या मधल्या डोंगराच्या पायथ्याशी वसले आहे. दोनदा चहा आणि विलासदादाच्या हातचे फस्क्लास पोहे हादडल्यावर ओळखपरेड झाली. सुदैवाने अतिशय अनुभवी मंडळी आमच्या बॅचमध्ये होती. काही जण हिमालयात ट्रेक केलेले तर काही यापूर्वीच्या ५-६ 'सह्यांकन' मध्ये सहभागी झालेले होते. तो अनुभव पाहता आपले हे पहिलेच 'सह्यांकन' आहे असे वाटून अचानक मीच स्वतःला अतिशय क्षुद्र जीव समजायला लागलो.

(अवांतर माहिती - उभे डावीकडून - महेश शिंगणे उर्फ यत्ता दहावी, अभिषेक शिंगणे, शंतनु अभ्यंकर(उलटी टोपी), लीडर सौरभ भिडे उर्फ बल्लू, लीडर लांबा, विद्या कामत, सुहास कुलकर्णी, आठवले काका(पांढरी दाढी), विनायक कर्वे, रोहित पाटकर, ललिता, लहू डफळे, मिलिंद हर्डी़कर. बसलेले डावीकडून - रूची गोसालिया उर्फ सीओईपी, पंक्ती शाह उर्फ टीचर, जय उर्फ यत्ता आठवी, सचिन करंबेळकर, प्रसाद (श्री. ललिता) व फोटॉ काढणारे अस्मादिक)

'चक्रम'तर्फे सर्वांना टोप्या आणि स्लिंग(कधी चढ-उताराला आधार म्हणून वापरायचा ८-१० फुटी रोप) वाटपाचा कार्यक्रम पार पडला. कॅरीमॅट सॅकला कशाने बांधायची हा मला पडलेला प्रश्न त्या स्लिंगने कायमचा सोडवला. 'चक्रम' आम्हाला (खर्‍याखुर्‍या) टोप्या घालणार आहे हे आधीच समजल्यामुळे मी घरून निघतानाच टोपीचे ५० ग्रॅम वाचवले होते.

निघा, निघा असं एकमेकांना म्हणत पॅक-लंच (सॉस आणि पराठे) सोबत घेऊन सर्वांनी निघायला ९ वाजले. संपूर्ण मोहिमेमध्ये आम्हा सहभागी लोकांमुळे झालेला हा एकमेव उशीर! सुरूवातीला सपाटीवरून चालत आंबोलीघाटाच्या पायथ्याशी पोचायचे होते.


जीवधन किल्ला आणि वानरलिंगी -


खास सह्यांकनसाठी पायलटवीरांनी आखलेले (मोहीम ठरवताना जे ट्रायल ट्रेक केले जातात, त्यांना पायलट ट्रेक किंवा रेकी असं म्हणतात) दिशादर्शक बाण पळूपासूनच दिसायला सुरूवात झाल्यावर माझा पुरता हिरमोड झाला. आता वाट चुकायची शक्यता जवळजवळ शून्य होती! हे वाट चुकण्याचं आणि स्वतः शोधण्याचं लागलेलं वेड हा भटकंतीचा खराखुरा प्राण म्हणायला हवा!

सुरूवातीला थोडा वेळ सपाटीवरून चालल्यावर जेव्हा डोंगरपायथा आला आणि झाडीत शिरायची वेळ आली, तेव्हा लांबाने 'मी वाट दाखवतो' असे म्हणून लीड करायला सुरुवात केली, आणि ताबडतोब आम्ही वाट चुकलो! मी अर्थातच तुडुंब खूश झालो. खरं सांगायचं तर, वाट चुकली की ट्रेक अफलातून होतो, यावर माझा अनुभवांती पूर्ण विश्वास बसला आहे. मोहिमेच्या पहिल्याच तासात वाट हरवल्यामुळे आता संपूर्ण मोहिम अत्यंत यशस्वी होणार याबद्दल माझ्या तरी मनात कुठलीच शंका उरली नव्हती. मग लाकडे तोडणारा एक गावकरी भेटला. त्याला खिंडीची वाट दाखवण्यासाठी तयार केले आणि आम्ही पुढे निघालो.




वाटेत एका पाण्यापाशी विश्रांती घ्यायला थांबलो. आणि लांबामहाराजांनी इथे 'जॅक अँड जिल' या बालपणी शिकलेल्या एका रम्य कवितेवर आख्यान सुरू केले. खजुर, गोळ्या, चिवडा, चकल्या असा मनमुराद पोटभर फराळ झाल्यावर ते आख्यानही संपले आणि आम्ही पुढे निघालो.


ही वाट खडतर आणि अत्यंत अनियमित चढाची आहे. कमालीचा दमवणारा आंबोली घाट चढून खिंडीत पोचलो तेव्हा ढाकोबाच्या पहिल्या कँपचे लीडर आमच्या स्वागताला उभे होते. खरं म्हणजे, काल रात्री आणि त्यामु़ळे आज सकाळी निघायला झालेला उशीर ऐकून ते 'घाट बर्‍यापैकी उतरून जावी लागेल' अशा विचारानेच आले होते, पण आमच्या वेगामुळे आम्हीच त्यांना वर 'खिंडीत गाठले' होते. इथपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला साडेतीन तास लागले होते. पळूपासून इथपर्यंत पोचायला पायलटवीरांनी जवळ जवळ ७ तासांचा टाईमलॉग दिला होता. यावरून आपल्या बॅचमध्ये वयाने मोठे (म्हातारे म्हणायचा मोह आवरता घेतो आहे) असले तरी मोठ्या मोहिमेसाठी पूर्ण तयार असे वीर आहेत याची झलक बघायला मिळाली.


आंबोली घाटाची ही नाळेसारखी दिसणारी वाट






ढाकोबाचे कँपलीडर MB, अक्षय दांडेकर उर्फ दांडू आणि सुदीप आमच्यासाठी सरबत घेऊन आले होते. खिंडीतून वर अर्धा-पाऊण तास चढून दोनच्या सुमारास ढाकोबाच्या जुन्या देवळापाशी पोचलो. तिथे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. आता तासभर सपाट पठारावरून चाललो की कँपमध्ये पोहोचणार होतो. मध्ये एक रॉकपॅच पार करून पुढे जावे लागते.




वरच्या पठारावर पोचलो की पळू गावाच्या विरूद्ध बाजूचा नजारा दिसतो. आंबोली गाव या बाजूला आहे.


तुम्ही कधीतरीच ट्रेकींग करता, आम्ही रोज करतो, असंच बहुधा यांना सांगायचं असेल -




इथून डोंगरमाथ्यावरूनच वळसे घेत घेत वाट ढाकोबा डोंगराकडे जाते. वाट अजिब्बात चुकू नये म्हणून ही दक्षता - ठराविक अंतरावर मारलेले तीन बाण या फोटोत दिसत आहेत.


वाटेवर ढाकोबा डोंगराचे झालेले पहिले दर्शन -


आमच्या वेळापत्रकानुसार आम्ही आज ढाकोबा पायथ्याला मुक्काम करणार होतो. दूरवर कँपचे तंबू दिसू लागले आणि सकाळपासूनच्या पायपिटीचा विसर पडला. ढाकोबाकडे जाणार्‍या वाटेपासून थोडंसं पुढे पश्चिमेकडे कलणार्‍या सूर्याला पाठीशी ठेवून कँप उभा होता. दक्षिणेकडे मोकळं पठार, उत्तरेकडे देवराई, साधारण उगवतीला ढाकोबा डोंगर असा सुंदर आसमंत सोबत होता.




आजची संपूर्ण वाटचाल संपवून संध्याकाळी पाच वाजता कँपमध्ये पोचलो तेव्हा स्वागताला एक बॅनर सज्ज होता. कँपची व्यवस्था अतिशय नेटकी होती. सुका व ओला कचरा टाकायला, तसंच पिण्यासाठी आणि वापरायच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था होती. सहभागी भटक्यांसाठी मोठे दोन आणि कँपलीडर्ससाठी छोटे तीन तंबू उभे होते. बाकी सगळा 'मामला' उघड्यावरच होता.




जीर्णोद्धार सुरू असलेले मंदिर -


कँपवर पोचल्यावर एका कँपलीडरने काय करायचे नाही, कुठे जायचे नाही याच सूचना दिल्या. त्यांचा सारांश, जो आम्ही नंतर आठवून आठवून लक्षात ठेवला, तो असा होता -
१. सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वी विहीरीवर जायचे नाही. (मग जायचे कधी? यावर 'आत्ता' हे उत्तर मिळाले!)
२. तंबूच्या भिंतींना सॅक टेकून ठेवायच्या नाहीत.
३. तंबूच्या मधल्या खांबाला तसेच बाहेरच्या दोर्‍यांना धक्का लावायचा नाही.
४. डबा टाकायला (याचा अर्थ विचारू नका) अमुक एका दिशेला जायचे नाही.
५. रात्री उठायचे झाल्यास एकट्याने उठायचे नाही. (अजून एकाची झोपमोड करायची)
६. मोजे तंबूमध्ये न्यायचे नाहीत. इ.इ.
(यानंतर 'चुळा भरताना आवाज करायचा नाही' अशा खास पुणेरी प्रकारची एखादी सूचना येते की काय असं वाटायला लागलं होतं, पण तशी सूचना नाही मिळाली.) साहजिकच, पुढचे चार दिवस हा बिचारा सूचनादाता सूचना कशा द्याव्यात आणि देऊ नयेत यासाठी आमच्या बॅचभर आणि पुढील सर्व कँप्सवर प्रसिद्ध झाला! गरमागरम कचोरीचा नाष्टा आणि चहा झाल्यावर आम्ही तंबूमध्ये सॅक लावल्या आणि फ्रेश व्हायला विहीरीवर गेलो. सूर्यास्त दुर्ग किल्ल्याच्या पाठीमागे होणार असल्यामुळे मनासारखा देखावा बघायला मिळणार नव्हता.




अंधार पडल्यावर स्टार्टर म्हणून रस्सम तयार होते. रस्समपान झाल्यावर काही कँपलीडर्स जनरेटर सुरू करण्याच्या खटपटीला लागले आणि उरलेले आमच्याससोबत वर्तुळ करून मैफल जमवून बसले. विडंबने, कविता, भटसाहेबांच्या गझल, किस्से, चारोळ्या यांचा उगवत्या चांदण्याच्या छपराखाली मोकळ्या सपाटीवर साधारण तासभर रंगलेला तो कार्यक्रम कायम लक्षात राहिल! मध्येच दोन-तीन उल्काही पडताना पाहिल्या. खगोलपंत दांडूने त्यावर थोडी माहितीही पुरवली.

थंडी आणि वारा दोन्ही जोरदार होते. बरोब्बर साडेआठला जेवणाची हाक आली आणि आम्ही तंबूमध्ये शिरलो. तुपातला शिरा, पुर्‍या, उसळ, पापड, भात-मुगाची आमटी असा अत्यंत अनपेक्षित भरगच्च मेनू पानात आल्यावर आमची बोलती बंद झाली आणि हाता-तोंडाची गाठ पडली!

जेवणानंतर आकाशाकडे पाहिलं, तेव्हा वर समस्त चांदण्यांचं संमेलन भरलेलं होतं. व्याध, वृषभ रास, सप्तर्षी, मृगाच्या दिशेने रोखलेला बाण (बस! मला एवढंच कळतं...) असे मानवी मनावर परिणाम करणारे असंख्य ज्ञात-अज्ञात स्वयंप्रकाशी घटक तिथे रोजच्यासारखे जमा झाले होते. आम्हीच त्यांना नवखे होतो. 'जगात ठराविक काळाने घडलेल्या अशुभ घटनांच्या वेळी आकाशातील तार्‍यांची तीच विशिष्ट स्थिती दिसली होती' - इति लांबा! आणि मग पुढची पंधरा मिनिटे लांबाने समजेल अशा भाषेत मेदिनीय ज्योतिष्यशास्त्र आणि जरा वेळाने तो विषय बदलत ज्ञान मिळवण्याचे मार्ग, तीन प्रकारची कर्मे (प्रारब्ध, संचित आणि क्रियमाण) यावर (उभ्या उभ्या) आख्यान दिले. 'समोरच्याला झेपेल असे उदाहरण दिल्यास विषयामधली गोडी वाढते' हे माझे जुने मत लांबाने पुन्हा अधिरेखित केले. त्याला जेवणाची हाक आली, म्हणून नाईलाजाने तो विषय थांबवावा लागला आणि आम्ही तंबूकडे परतलो.

बाहेर थंडी वाढली होती. अजून चार पूर्ण दिवसांची मोहीम बाकी होती. थंडीमुळे थकवाही जाणवत होता. उगाच रिस्क नको म्हणून गरम पाण्याबरोबर औषध घेतले आणि स्लीपिंग मॅटमध्ये शिरलो. झोपल्यानंतर बहुतेक थोड्याच वेळात घामाघूम होऊन जागा झालो, आणि घाम पुसून पुन्हा झोपलो एवढंच आठवतं आता....

आजचा हिशोबः
दिनांक - २० डिसेंबर २०११
एकूण चाल - अंदाजे १० किमी.
वैशिष्ट्यः अंदाजे साडेतीन हजार फूट चढून चार हजार फुटांवर मुक्काम. अवघड, कंटाळवाणा आंबोली घाट पार.
(क्रमशः)
-- नचिकेत जोशी