Pages

Friday, February 12, 2010

टाहो

व्यर्थ टाहो शंभरांचे कोंडलेले
पाच ठरले थोर येथे जिंकलेले

हा कशाचा एवढा कल्लोळ झाला?
की कुणी आहे स्वत:शी भांडलेले?

काल मजला एक मोठे पत्र आले
मायन्यापाशीच नाते संपलेले!

नेमकी गाडी उशीरा का सुटावी?
अन्‌ कुणी मागे नसावे थांबलेले!

नेहमी नटव्या फुलांवर भाळसी तू
फूल मी साधे - कुणी ना हुंगलेले

धीर करूनी चाळला गतकाळ् माझा
गवसले निर्धार सारे भंगलेले

का तुलाही भरवसा माझा न यावा?
मी तुला जखमेपरी सांभाळलेले!

शब्द झाले घाव तेव्हा हारलो मी
(रक्त होते फार थोडे सांडलेले!)

- नचिकेत

No comments: