Pages

Sunday, May 22, 2011

अजून काही वर्षांनी...

आता आपण मोठे झालो, नाही का?
आज आपल्या मैत्रीला काही कोवळी वर्षे पूर्ण झाली!
एकत्र घालवलेल्या जेमतेम दहा-वीस संध्याकाळ , तेवढ्याच चर्चा,
त्यातही कधीतरी मौनातल्या गप्पा,
मोजून पाच-पन्नास भांडणे,
हजारो विनवण्या, कोट्यवधी मिलिसेकंदांचा अबोला
आणि कायमचा पसेसिव्हनेस...
हा आत्तापर्यंतचा ढोबळ हिशेब!
आतली उलथापालथ आपली आपल्यालाच माहित!
अजून काही वर्षांनी
आपल्या मैत्रीला काही जाणती वर्षं पूर्ण होतील...
संध्याकाळी आकाश भरलेलं असलं, तरी दोघांचं वेगळं असेल...
चंद्र घेऊ वाटून तेव्हाही..
भांडायला शक्यतो वेळ नाही मिळाला तर उत्तम!
विनवण्या, अबोला यांची मला
आतापासूनच भीती वाटायला लागली आहे...
पसेसिव्हनेसचा अर्थ आपण लावलेल्या
झाडांची खोल गाभ्यापर्यंत गेलेली मुळं
तेव्हा सांगतील आपल्याला...
मैत्रीचं व्यापलेपण कदाचित तेव्हा समजेल दोघांनाही..
आपण आत्ता कुठे मोठे होऊ लागलो आहोत...
- नचिकेत जोशी (२३/५/२०११)

2 comments:

Anonymous said...

तोडलंस रे...
या पावसाळी वातावरणात वाचायला अजूनच ग्रेट वाटली.

Anonymous said...

खूप वेगळ्या अर्थानी हे आता व्यक्तीशः माझ्यासाठी अतिप्रचंड अर्थपूर्ण आहे... आणि मला खात्री आहे कि नंतरसुद्धा कदाचित थोडे वेगळ्या अर्थानी विचार करायला लावेल. पण मस्त.... सहज सोपे आणि मोजके शब्द तरीही खूप अर्थपूर्ण आहेत ;)