दाटुनी आलो जरी नव्हतो मुळी बरसायला
उगवलो होतो तरी होतो कुठे बहरायला?
वेदनेची जाणुनी घ्यावी खुशाली एकदा
सोबती कोणीच नसता जीव हा रमवायला
शब्द माझे अधिक तुजला खातरीचे वाटले
त्याहुनी मी योग्य होतो भरवसा ठेवायला
मी कसा समजून घेऊ सारवासारव तुझी?
कोण आठवले तुला - इतके मला विसरायला?
लोक डोकावून माझा भावही ठरवायचे
खोल मी होतो कितीसा आतवर उतरायला?
सोंग आहे रोजचे - सार्यांस ऐसे वाटले
फक्त तू उठलीस माझा चेहरा निरखायला
भेटलो बागेत अवचित, चार होत्या चांदण्या
बातमी झाली चवीची - लागली पसरायला!
वार तू करताक्षणी मी दरवळाया लागलो
श्वास मागाहून माझे लागले उसवायला
- नचिकेत जोशी (२१/३/२००९)
4 comments:
छान लिहिलंयस ..... आवडली गझल.
मी कसा समजून घेऊ सारवासारव तुझी?
कोण आठवले तुला - इतके मला विसरायला?
खास! सुंदर गझल.
khup chan!!!!
Thanks all.. :)
Post a Comment