Pages

Tuesday, March 7, 2017

वसिमचाचा

परवाचीच गोष्ट!

वाशी नाक्यापासून बरोब्बर बाराव्या मिनिटाला कॅब एक्स्प्रेस हायवेला लागली आणि मी (मनातल्या मनात) पांढर्‍या दाढीवर आणि सुरकुतलेल्या हातांवर घेतलेली शंका अगदीच फिजूल होती, हे (मनातल्या मनात) कबूल केलं. त्याचं असं झालं -

वेळ दुपारची साडेचारची. वाशी हायवेच्या शिवनेरी आणि तमाम एसटी बसेसच्या स्टॉपवर उभा होतो, तेव्हा निळ्या (की मोरपंखी हो? माझं रंगांचं अज्ञान अगदीच गडद आहे) रंगाची कॅब चालवत एक पांढरी दाढी, टोपी, पांढरट असावी अशी शेरवानी टाईप झब्बा घातलेला एक वयस्कर त्या स्टॉपवर आला. कॅबचा स्पीड म्हणाल तर 'वयाला साजेसा' होता. त्याला तिथल्या दांडग्या एजंटने काहीतरी बोलून पिटाळलं. (त्या एजंटची तिथे 'मक्तेदारी' चालते असं नंतर कळलं). ती कॅब जातानाही जेमतेम दहा-वीसच्या स्पीडने गेल्यावर 'ही पुण्यात पोचणार केव्हा' अशी माझी नेहमीसारखी (निष्कारण) जगाची चिंता करून झाली. मलाही त्यातल्या एक-दोन एजंटनी (लांबून) घोळात घ्यायचे प्रयत्न करून पाहिले. त्यामुळे ते पुणे स्टेशन-शिवाजीनगर यापैकीच ठिकाणी नेणार ह्याची खात्री झाल्यावर मी 'स्वारगेट'लाच जायचंय, असं ठाम सांगून टाकलं. मग ते काही पुन्हा विचारायला आले नाहीत. एकतर त्यांचं रुपडं बघूनच माझी त्यांच्या आणि त्यांच्या कनेक्शनच्या कॅबमध्ये बघायची हिंमत होत नव्हती. तर ते असो. मग यथावकाश मुंबई-कराड एसटीचं येणं, तिच्या कंडक्टरचं वारज्याजवळ सोडण्याला होकार देणं, मग मी एसटीमध्ये चढणं, आणि आत बसायला रिकामी सीटच नसल्याचा साक्षात्कार होणं आणि कंडक्टरने दयाळूपणे बेल मारणं, ड्रायवरने वैतागून ब्रेक मारणं आणि एसटी थांबवताना मला झटका बसणं, या सर्व गोष्टी विधिलिखित असल्याप्रमाणे पार पडल्या आणि मी तो सर्व्हिस रोड संपता संपता खाली उतरलो. जेमतेम ३००-४०० मीटर पुढे आलो होतो, म्हणून पुन्हा एसटी स्टॉपच्या दिशेने निघालो.

तेवढ्यात ती मगाशी गेलेली निळी (की मोरपंखी?) कॅब आणि ती चालवणारे ते शुभ्र दाढीधारी मागून येताना दिसले. मग 'पुण्याला सोडतो, शिवाजीनगरला सोडतो, तिकडून स्वारगेटला जा, पैसेही शिवनेरीपेक्षा कमी घेईन' असं काय काय त्यांनी सांगितलं आणि कसं ते माहित नाही, (पण त्या कमी पैशाच्या मुद्द्यामुळे असावं) पण बसलो. एकजण आधीच बसला होता. माझ्यापाठोपाठ अजून एक जण बसला. आणि तिथपासून बाराव्या मिनिटाला कॅब एक्स्प्रेस हायवेला लागली. वाटेत सगळे खड्डे-वनवे, बसस्टॉप दाढीधारींना पाठ होते. बसल्या बसल्याच "गेली चाळीस वर्षं या रूटला गाडी चालवतोय. सेवण्टी टू ला पहिल्यांदा चालवायला लागलो." (मी लगेच मॅथ्स लावून २०१७ मायनस १९७२ हे उत्तर चाळीसच्या आसपास येतंय का ते चेक केलं. काय करणार? Professional hazards!) ''दिवसाच्या कुठल्याही वेळेला इथून गाडी चालवलीये त्यामुळे सगळे खड्डे माहित झालेत." बेलापूर अंडरग्राऊंड रोडच्या अलिकडे उजव्या बाजूने ओव्हरटेक करणे शक्य असूनही त्यांनी एका 'बेस्ट' बसला डाव्या बाजूने ओव्हरटेक ज्या सफाईने केलं, त्याला तोड नाही. "ती बस खाली जाईल बेलापूरकडे, आपल्याला डावी बाजू क्लिअर मिळते मग" - हे न विचारताच स्पष्टीकरण!

मग ओळखपाळख झाली. माझ्याव्यतिरिक्त अजून चार जण कॅबमध्ये होते. त्यातला एक खंडाळा फाटा, आणि तिघे तळेगाव फाट्यावर उतरणार होते. म्हणजे पुण्यापर्यंत जाणारा मी एकटाच होतो. तळेगाववाल्यांपैकी दोघे चाकण रोडवरच्या शोरूममधून टाटाचे डंपर न्यायला चालले होते. ते गेल्यापावली डंपर घेऊन चालवत निघणार होते. त्यामुळे अक्षरश: अंगावरच्या कपड्यानिशी होते. (आणि खिशात तलफदायी चूर्ण असेल, तेवढंच) आता चाकण रोडवर जाणार्‍या त्या दोघांना एक्स्प्रेस हायवेवरून जाणार्‍या कॅबमध्ये यायची बुद्धी का झाली ते तेव्हा काही मला कळलं नाही. वास्तविक, व्हाया तळेगाव एसटी स्टँड जाणार्‍या गाड्या त्यांना जास्त उपयोगी होत्या. तर ते असो. मग शुभ्र दाढीधारींनी स्वतःचीही ओळख सांगितली. "वसिमभाई म्हणतात मला". (मला हे स्वतःच्या नावापुढे राव, ताई, भाई, सर, दादा ह्या उपाध्या आपणहून जोडणार्‍यांची कीव येते. वसिमचाचांची गोष्ट वेगळी होती, म्हातारा छान होता!) आणि लगेच लिमलेटसारख्या दिसणार्‍या गोळ्या प्रत्येकाला दिल्या. मग, वडिलांचा व्यवसाय काय होता, माझा व्यवसाय काय आहे, मुलाला हा धंदा आवडत नाही, त्याला आयटीतच आवडतं हे सांगितलं.

ह्या गतीने आपण साडेसहा वाजताच घरी पोचू वगैरे स्वप्न रंगवायला मी सुरूवात केली. आता स्वप्न डोळे उघडे ठेवून बघता येणार नसल्यामुळे मग मी डोळे मिटून घेतले.  मग काही वेळ सगळेच गप्प बसले. घाट चढून कॅब खंडाळ्याकडे आली आणि तो लोणावळानिवासी पॅसेंजर उतरला. त्याने चाचांना पैसे दिले आणि त्यांनाच "मला दहा रूपये द्या हो जरा" म्हणाला. चाचांनीही काहीच न बोलता त्याल दहाची नोट काढून दिली. मग कॅब पुढे निघाल्यावर म्हणाले, "त्याला शेअरऑटोसाठी हवे असणार. दिले. मला त्या दहा रूपयांनी काय फायदा होणारे? मी फक्त रिटर्नचा टोल सुटावा म्हणून शीटा भरून घेऊन चाललोय."

मला वसिमचाचांची सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे, 'कागदपत्रं क्लिअर, लायसेंस व्हॅलिड आणि इमानेतबारे गाडी चालवण्याची सवय'. पूर्वी त्या काळ्यापिवळ्या गाड्या होत्या, तेव्हापासून ते ड्रायविंग करत आहेत. आणि पुढे लोणावळ्यात कुसगाव एक्झिटनंतरच्या शार्प आणि तरीही लांब वळणावर जेव्हा त्यांनी शंभरच्या स्पीडला कॅब वळवली, तेव्हा मी तरी थक्क झालो. हे खायचं काम नाही! मी विचारलं, "का हो चाचा? हा एवढा लांबचा वळसा आपल्या त्या ह्या ABCDEFGH सुपरस्टारची जमीन वाचावी म्हणून ठेवलाय ना हायवेला?" (मला हे पक्कं माहित झालं होतं की चाचांकडे सांगण्यासारखं बरंच काही आहे, फक्त विचारणारा पाहिजे!)

का कुणास ठाऊक, वसिमचाचांबद्दल मला आदर वाटायला लागला.

तळेगाव टोलनाक्यावर ट्राफिक पोलिसाने अडवलं. (मी मनात म्हटलं, वसिमचाचांकडे कागदपत्रे आहेतच, आता बघूया काय मजा येतेय!)
"काय चाचा? कसे आहात?" - पोलिस
"काही नाही, पॅसेंजर सोडला तळेगाव फाट्याला". - चाचा
"हो.. मी नेहमी बघतो तुम्हाला" - पोलिस (मी थक्क!)
"चला.. येऊ का?" - चाचा
"हो हो.. या... नीट जा" - पोलिस (मी स्पीचलेस!)

मग पुण्यापर्यंत कॅबमध्ये मी एकटाच होतो. त्यामुळे पिलिअन सीटवर जाऊन बसलो.
"काय चाचा? तुम्हाला तर पोलिसही ओळखतात की!"
"अरे भाऊ, आपण नीट नियम पाळत गाडी चालवतो. पेपर क्लिअर असतात, हे पोलिसांनाही माहितेय. आज बघ, गाडीत पाच पॅसेंजर होते. हे अलाऊड नाहीये. पण पोलिसांनाही माहित असतं की हा बाबा नेहमी नेहमी असं करत नाही, कधीतरीच जास्त पॅसेंजर भरून नेतो. त्यामुळे तेही काही म्हणत नाहीत. सध्या जे नवीन तरूण रक्त आलंय ना ह्या धंद्यात, त्यांचं पोलिसांशी कायम वाजतं कारण ते नियम न पाळता गाडी चालवतात, जास्त शीटा भरतात".

मग गहुंजेच्या स्टेडियमच्या समोर लोढाची टोलेजंग खुराडी बघून चाचा म्हणाले, "कोण येणारे इथे राहायला?". मी चाचांना म्हटलं, "अहो चाचा, पुढच्या दहा वर्षांनी हाच एरिया शिल्लक असेल. हिंजवडी-वाकड तर भरलंच आता. त्यामुळे इकडच्या जागांनाच भाव येणार". "असंय काय? बरोबर आहे मग" - चाचा.

चाचा एक अतिशय skilled आणि फास्ट ड्रायव्हर होते, यात शंकाच नाही. मग चाचांचा नंबर घेतला. नंबर देतानाही 'वसिमभाय' म्हणून सेव्ह करा असं सांगितलं. अर्थात चाचांची मुंबई-पुणे कॅब मलातरी परवडणारी नाही. त्या दिवशी केवळ टोलखर्च सुटावा म्हणून त्यांनी माझ्यासारख्याला गाडीत जागा दिली, हे माझं भाग्यच! त्यांचे कस्टमर्स हे श्रीमंत असतात, चाचांसाठी चिकार पैसे मोजायला तयार असतात हे कळलं. "ते आपले PQRST आहेत ना, त्यांनी घरी माणूस पाठवला होता मला बोलवायला. चाचा, तुम्हीच या, पंचवीस हजार पगार देतो. हे केव्हा? दहा वर्षांपूर्वी! मी हात जोडून म्हटलं, नको साहेब! माझी ही गाडीच मला बरी आहे!"

"चाचा, बिल द्याल का? ऑफिसमध्ये सबमिट करायचं आहे."
"बिल? हो.. देईन की! एकोणीसशे पन्नासचं देऊ?"
माझ्या डोळ्यासमोर मी 'वाशी ते पुणे' या वनवे प्रवासासाठी एकोणीसशे रूपये खर्च केल्याचं बिल वाचणारा माझा बॉस आला! मग माझी ऑफिस कन्व्हेयन्सची कॅटॅगरीही आठवली. मुळात एवढे पैसे लागलेच नसताना ते क्लेम करणे मलाही पटत नव्हतं.
"अहो चाचा! एवढे बिल नेऊन काय करू? त्यापेक्षा जेवढे घेणार तेवढेच द्या."
"तेवढ्याची पावती देता येणार नाही. ऑफिशिअल पावती जेवढी आहे तेवढीच देईन".
"मग जाऊ द्या. मी बिलाशिवायच क्लेम करेन. कारण एवढा खर्च झालेला नसताना क्लेम करणं मला पटत नाहीये".
माझ्या डोळ्यासमोर पावती नसतानाही विश्वासाने बिल अप्रूव्ह करणारा माझा बॉस आला. हे चित्र अधिक वास्तववादी आणि शक्य कोटीतलं होतं.

उतरताना चाचांना म्हटलं, "चाचा! छान वाटलं तुम्हाल भेटून!", तर खळखळून हसले आणि म्हणाले, "अरे खुदा मेहरबान है! फिर मिलेंगे!"

वसिमचाचा! अगदी परवाचीच गोष्ट!

- नचिकेत जोशी (७/३/२०१७)

3 comments:

Unknown said...

Nice one Sir

Unknown said...

खुप सुंदर शब्दांकन. वसिम चाचांबरोबर प्रवास करण्याची ईच्छा होतेय.

Bakhar Joshyachi said...

कडक...