Pages

Monday, January 8, 2018

ढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग १


फेब्रुवारी २०१७.
'मायबोली'करांच्या लिंगाणा मोहिमेतली थकलेली संध्याकाळ.  लिंगाण्यावर गुहेपर्यंतच जाऊन आम्ही १८ जण दमून मोहरीत परत आलो होतो. शिवाजी पोटेंकडे रात्रीच्या जेवणाची सोय होती. जेवणाची तयारी होत असतानाच शिवाजीदादांच्या घराच्या कट्ट्यावर सह्याद्रीतल्या घाटवाटांचा एक अस्सल आणि अट्टल भटक्या मनोज आणि सह्याद्रीचा गूगल अर्थात ओंकार ओक ह्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. विषय होता - "महाबळेश्वर भागातल्या घाटवाटा". तसा विषय नक्की कुठला होता ते आठवत नाही. कारण दोघेही डोंगररांगांचा जबरा अनुभव असलेले गडी. त्यामुळे विषय अगदी जव्हार भागातले किल्ले इथूनही सुरू झालेला असेल. पण त्यांच्या त्या गप्पांमध्ये मी ढवळे, जोर, बहिरीची घुमटी, आर्थरसीटचा उल्लेख ऐकला. जणू महाबळेश्वराच्या कड्यावर उभे राहून समोरचा भूगोल दाखवावा असे हातवारे करत त्या कट्ट्यावर ते स्थलवर्णन करत होते. (मध्येच मधुमकरंदगड ते कोळेश्वर हे दोन हात पसरून दोन टोकांना आहेत असं काहीतरी सांगताना ओंकारचा हात माझ्या चेहर्‍याच्या दिशेने आला आणि तो मी चुकवला). तेव्हा त्या गप्पांमध्ये ऐकलेलं ढवळे, चंद्रगड, आर्थरसीट हे सह्याद्रीचं जावळीवैभव प्रत्यक्ष केव्हातरी बघायला मिळू दे अशी मनातल्या मनात प्रार्थना केली होती.
*********************

एप्रिल २०१७. 
सुनिलच्या कृपेने पुणे ट्रेकिंग गृपसोबत मधुमकरंदगड ट्रेकला जायची पहिली आणि शेवटची संधी मिळाली. (शेवटची एवढ्यासाठी, कारण त्यानंतर आजतागायत त्यांनी मला त्यांच्यासोबत नेलं नाहीये. त्या ट्रेकला मी खरंतर खूप चांगला वागलो होतो पण... असो.) त्या ट्रेकमध्ये रात्री जेवण झाल्यावर गप्पांमध्ये पुन्हा एकदा महाबळेश्वर परिसरातल्या घाटवाटांची नावं ऐकली. अफझलखानाला महाराजांनी महाबळेश्वरापासून पार गावापर्यंत ज्या वाटांनी आणलं त्यातल्या वाटा, प्रतापगडाभोवतीच्या ज्या प्रदेशात लढाई झाली तो प्रदेश, त्यावेळची महाराजांची युद्धनीती हा सगळा भूगोल मधुमकरंदगडावरून दिसतो. तेव्हा रडतोंडी घाट, प्रतापगडापलिकडचं दाभिळ खोरं, त्यापलिकडची चंद्रराव मोर्‍यांची राजधानी असलेला चंद्रगड हे पहिल्यांदा सविस्तरपणे ऐकलं. आणि पुन्हा महाबळेश्वराच्या आसपासच्या घाटवाटा करायची इच्छा उफाळून आली.
**************************

शुक्रवार, १ डिसेंबर २०१७. 
रात्री दहाच्या पुणे - महाड गाडीत बसलो, तेव्हा कुठे आपण ढवळे ते आर्थरसीट हे स्वप्न खरोखरच पूर्ण करायला निघालो आहोत, ह्यावर विश्वास बसला. (कुठल्याही ट्रेकला गाडीत चढेपर्यंत मायबोलीकर मित्रांना आणि गाडी पुण्याच्या वेशीबाहेर पडेपर्यंत मला आपण खरोखरच ट्रेकला निघालोय ह्यावर विश्वास बसत नाही. उगाच नंतर हळहळ कशाला?) ऑक्टोबरच्या मध्यात केव्हातरी नरेश परब उर्फ गिरी'काकां'नी गृपवर जाहीर केलं की ढवळे-आर्थरसीट ट्रेक मी प्लॅन करतोय, नावनोंदणी करा. माझा तर विश्वासच बसला नाही. स्वप्नं एवढ्या लवकर पूर्ण केव्हापासून व्हायला लागली?

मी येतोय म्हणून कळवून टाकलं आणि ढवळे-आर्थर-रडतोंडी भागाची माहिती शोधायला सुरूवात केली. घाटवाटांच्या अनेक बादशहांपैकी एक - साईप्रकाश बेलसर्‍यांच्या ब्लॉगची पारायणं केली, सह्याद्रीतील एक मनस्वी आणि विनम्र भटके तुषारदांना माहिती विचारली. मनोजला तर अगदी बारीकसारीक गोष्टी विचारायला फोन केले. त्यानेही फोनवरच ढवळे घाटाचा नकाशा वर्णन करून सांगितला. प्रीतीलाही विचारलं, गूगललाही विचारलं. शेवटी माहिती इतकी मिळाली की 'आता प्रत्यक्ष ट्रेकला जायची गरजच नाही' असा विचार मनात यायला लागला. मग मात्र माहिती काढणं थांबवलं. काहीतरी first-hand बघण्यासाठीही शिल्लक ठेवूया असं वाटायला लागलं. अर्थात ही पूर्वासुरींकडून मिळालेली माहिती आणि प्रत्यक्ष अनुभव ह्यात आर्थरसीट आणि ढवळे गाव ह्यांच्या अंतराएवढाच फरक होता, हे आवर्जून सांगावंसं वाटतं.

शेवटी तारीखवारांसकट प्लॅन जाहीर झाला. प्लॅन तर जबरा होता. - "ढवळे गावातून २ डिसेंबरच्या शनिवारी सकाळी लवकर निघायचं, पहिल्यांदा चंद्रगड करायचा. तिथून मधल्या खिंडीच्या उतारवाटेने ढवळे घाटाच्या वाटेला लागायचं. संध्याकाळपर्यंत महाबळेश्वरचा आर्थरसीट पॉईंट गाठायचा. रात्री मेटतळ्यात मुक्काम करून दुसर्‍या दिवशी ३ तारखेला रडतोंडी घाटाने उतरून पारगाव, वरदायिनी मंदिर आणि मग दाभिळ टोकावरून दाभिळ गावात उतरायचं." मला प्लॅन वाचतानाच धाप लागली होती.

ढवळे ते आर्थरसीट हा ट्रेक सह्याद्रीतला निर्विवादपणे एक प्रदीर्घ असा ट्रेक आहे. मी जितकी माहिती गोळा केली होती, त्यात एक समान धागा होता - ह्या ट्रेकला कमीत कमी ६ तास लागतात. आणि ह्या संपूर्ण ट्रेकमध्ये जवळजवळ चार हजार फूट उंचीची चढण  होते. (ढवळे - कोकणातले गाव, आर्थरसीट - सह्याद्रीच्या सरासरी उंचीच्याही वर) त्यात आम्ही चंद्रगडसुद्धा करणार होतो. म्हणजे आणखी ३-४ तास वाढणार होते. आदल्या रात्री झोप अपुरी होणार होती. लाल डब्ब्याने ट्रेक करायची हुक्की आल्यामुळे सगळं सामान पाठीवर घेऊन हा ट्रेक करायचा होता. (मी सुचवून पाहिलं, की खाजगी गाडी करू, आणि फक्त गरजेचंच सामान पाठीवर घेऊन चढू. बाकी झोपण्याचं आणि इतर सामान गाडीतच ठेवून गाडीवाल्याला थेट आर्थरसीटला बोलवू. ह्यावर 'मग ट्रेक कशाला करायचा' असं उत्तर आल्यावर मी गुमान पुण्यातून निघणार्‍या सगळ्यांचं दोन्ही वेळेचं एसटीचं रिझर्वेशन करून टाकलं!)

पुण्याहून सात आणि मुंबईहून सात असे चौदा जण महाडमध्ये भेटणार होते. सगळेच जण एकमेकांना चांगलेच 'ओळखून होते' हे ह्या गृपचं वैशिष्ट्य होतं. काही काही जण तर मॅरेथॉन रनर्स, सायक्लिस्ट, क्लाईंबर्स होते (काही जण ह्या तिन्ही प्रकारात प्रवीण होते - माणसानं अष्टपैलू तरी किती असावं ना?) प्रचंड शारिरीक-मानसिक क्षमता असलेल्या ह्या गृपबरोबर ढवळे-आर्थरसीट करण्याचा विचार करताना एका क्षणी मीच स्वत:ला लिंबूटिंबू वाटायला लागलो होतो.

रात्री दहाची पुणे-महाड गाडी चालकाने आपल्या अतीव कौशल्याच्या जोरावर मध्यरात्री पावणेदोनलाच महाड स्टँडात नेऊन उभी केली (निर्धारित वेळेपेक्षा सव्वातास आधी). मुंबईकरांची गाडी पाच वाजता आली. महाडातून ढवळे गावापर्यंत नेणार्‍या टमटमवाल्याने आयत्यावेळी फोनच उचलला नाही. मग दुसरा टमटमवाला शोधावा लागला. (समोर आलेली चोरवणे बस पकडून वासोटा करण्याची टूमही तेवढ्यात निघाली आणि ती गंमत होती हे मला मागाहून कळलं) अखेर ढवळे गावात पोचलो तेव्हा साडेसहा वाजले होते. (ह्या वेळेला आम्ही चंद्रगडासाठी निघणं अपेक्षित होतं).

नाष्टा झाला, आणि सॅकमध्ये पाणी भरून चौदा गडी आणि एक वाटाड्या सज्ज झाले - एका हौसेने ओढवून घेतलेल्या पराक्रमासाठी - ढवळे ते आर्थरसीट व्हाया चंद्रगड! निर्विवादपणे आयुष्यभर जपून ठेवावं असं काहीतरी आज हाती लागणार होतं.

 (क्रमशः)
- नचिकेत जोशी

7 comments:

उनाड भटकंती said...

हौसेने ओढवून घेतलेल्या पराक्रमाची
खूप हसलो 😂😂
जबरी ब्लॉग, पुढच्या भागाची फारच उत्सुकता वाढवली.

हेमंत पोखरणकर said...

... And our Nachya is back again! Hurrey!!

कुशल देशमुख said...

मस्त रे मस्त... परत ट्रेक ला निघालो अस वाटायला लागल... पटकन येउदे पुढचा भाग

प्रमोद खराडे said...

भारीच! लवकर लिही..

Sidhu Patil said...

नाचि मस्त रे,

या ट्रेकच्यात लिखानाची सुरुवात पाहून मला या ट्रेकला यायला जमलं नाही याची आता हळहळ वाटत आहे...

आणि कृपया तुझ्या मनात काही गैरसमज असेल तर कृपया दूर कर मित्रा... गेल्या वर्षभरापासुन सायकलिंगच्या नादापायी मी ट्रेक्सपासून जवळपास घटस्फोटच घेतला आहे..

मधुमकरंदगड नंतर मी फक्त सह्यमेळावा आणि फड़ताड़ नाळेचा ट्रेक केलेलं आठवतंय...पण without ट्रेक आता थोड़ा मलाही जड़ चाललंय...बघू लवकरच परत मनोमिलन होईल.. मग होतील सुरु ट्रेक्स...

असो..


पुढच्या भागाची वाट पाहतोय..

Unknown said...

जबरी लेखन !!!!

SaRang Wakodikar said...

मस्त...