Pages

Monday, January 31, 2011

सालोटा ते तुंगी - बागलाण प्रांतातली मुशाफिरी : भाग ५ (अंतिम)

थोडक्यात पात्रपरिचय: नाव आणि कंसात माबो आयडी
यो : योगेश कानडे (यो रॉक्स)
ज्यो: गिरीश जोशी
अवि: अविनाश मोहिते (अवि_लहु)
रोमा किंवा रो: रोहित निकम (रोहित एक मावळा)
मी: नचिकेत जोशी (आनंदयात्री)

२८ डिसेंबर: मांगी-तुंगी आणि निरोप

पायवाटा आणि पायऱ्या या शब्दांची सुरूवात सेम आणि शेवट वेगळा असला तरी दोन्ही चढून संपल्यावर होणारा आनंद मात्र अगदी सेम असतो. आणि पायऱ्या जर अडीच हजार वगैरे असतील, तर मग तो चढल्यावर आनंद सुळक्यावरून थेट आभाळात पोचतो. आणि या अडीच हजार पायऱ्या जर पाऊण तासात आणि तेही एकदाही न थांबता पार झाल्या तर मग काय सांगावे? सुदैवाने या तिन्ही घटना एकाच दिवशी एकाच ठिकाणी माझ्या बाबतीत घडल्या आणि पाऊणतासात अडीच हजार पायऱ्या चढल्याच्या आनंदापेक्षाही गुडघा एकदाही दुखला नाही अथवा दुखणार असं वाटलं नाही हा आनंद कितीतरी जास्त होता! :)

चार वाजता गजर झाला आणि योला पाच वाजता तयार राहण्याचे वचन दिल्यामुळे बरोबर चार वाजताच उठलो. बरोब्बर पाच वाजता सगळे तयार झालो. खोलीमध्ये चक्क लाईट मिळाल्यामुळे सगळ्यांच्या बॅटऱ्या चार्ज झाल्या होत्या. कॅमेरा, पाण्याच्या बाटल्या आणि थोडेसे खायला यासाठी अविची एकच सॅक घेतली. भिलवडीच्या जैन मंदिरांच्या आवारातूनच पायथ्यापर्यंत जीप असतात. अनेक जैन कुटुंबे अत्यंत भक्तिभावाने दर्शनासाठी येत असतात. आदल्या दिवशी भिलवडीदर्शन आणि दुसर्‍या दिवशी पहाटे मांगीजी-तुंगीजी दर्शन असा बहुतेकांचा प्रोग्राम असतो. आम्हीही तसेच केले. भिलवडीमधील मंदिरांचे फोटो-
परंतु त्यांपैकी बऱ्याच कुटुंबातील सदस्यसंख्या जीपच्या क्षमतेपलिकडे असल्यामुळे आम्हाला सुरूवातीच्या दोन जीपमध्ये जागा मिळाली नाही. तिसऱ्यावेळी मात्र मुंबईच्या लोकलमध्ये शिरण्याचे कसब वापरून आम्ही जीपमध्ये जागा मिळवली. सुळके अंधारात बुडाले होते. त्याच डोंगरावर आदिनाथांची १०८ फुटी उंच मूर्ती उभारण्याचे काम सुरू आहे. त्या बांधकामाचा लाईट तेवढा सुरू होता.

पायथ्याशी उतरलो तेव्हा साडेपाच वाजले होते. भिलवडीला पोचेपर्यंत पायऱ्यांची संख्या ३५०० आहे असं वाचलं होतं. काल भिलवडीमध्ये एका पुस्तकामध्ये हाच आकडा ४५०० वाचला होता. त्यामुळे नक्की किती पायऱ्या आहेत हे प्रत्यक्षच मोजूया असे अवि आणि रोमाचे मत बनले. (अर्थात वयस्कर आणि गरजूंसाठी डोलीचीही सोय आहे.) हा उत्साह पहिल्या पन्नास पायऱ्यांपर्यंत टिकला. पन्नासाव्या पायरीवर बेंचमार्क दिसल्यावर मग त्यांनी एकदमच हुश्श केले. इथून पुढे नियमीत बेंचमार्क्स असल्यास मोजण्याची आवश्यकता नव्हती. शंभराव्या पायरीच्या आसपास चौघे दम खायला बसले. मी मात्र I think i can go असे म्हणून पुढे निघालो. १००, २००, ५००... १०००... १५००... दम लागला तरी बसण्याची गरज वाटत नव्हती. एकही पायरी स्किप करून चढत नव्हतो. (त्या प्रयत्नात दम जास्त लागतो) आणि गुडघाही All is well सांगत होता. त्यामुळे मग कुठेही न बसता, तोंड बंद ठेऊन, संथ पण एकाच गतीने, अजिबात चुकीचे, अतिरिक्त पाऊल न टाकता चढत राहिलो. आमच्या आधी केवळ २ जीप आल्या असल्यामुळे त्यातून उतरलेले सर्व भाविक हळूहळू मागे पडत गेले. अपवाद फक्त तीन छोटी मुले आणि एका आजीबाईंचा. ती तीन मुले दोन हजाराव्या पायरीलाही अत्यंत उत्साहात होती. फक्त त्यातल्या एककडची पिशवी तो दमल्यामुळे तिथपासून अस्मादिकांनी स्वत:कडे घेतली होती. खरं सांगायचं तर मांगी-तुंगीच्या दर्शनाला जात असलो तरी आम्ही यात्रिक अथवा भाविक नव्हतो, फक्त पर्यटक होतो. त्यामुळे दर्शनासाठी शूचिर्भूत वगैरे होण्याच्या इतरांच्या आणि आमच्या संकल्पनाच वेगळ्या होत्या. तरीही वर चढणाऱ्या भक्तांना जमेल तेवढी मदत करावी म्हणून तो पिशवीप्रपंच!

अशा प्रकारे एकाग्रतेने, स्वत:च्या क्षमतेवर चढत मांगीच्या गुहांजवळ पोहोचलो तेव्हा सव्वासहा वाजले होते. माझ्या स्वागताला तिथे फक्त रात्रपाळीचा वॉचमन हजर होता. ;) मुले पाठोपाठ चढून आली. आणि अवघ्या पाच दहा मिनिटात त्या आजीबाईही चढून वर आल्या. मी त्यांच्या या कर्तृत्वामुळे खरोखर थक्क झालो. मीही नुकताच त्याच पायऱ्यांनी चढून आलो असल्यामुळे त्या कर्तृत्त्वाचे मोल जाणत होतो. या वयातही ज्या गतीने त्या चढून आल्या होत्या ती खरंच कौतुकास्पद होती. :) पायवाटांपेक्षा पायऱ्यांनी चढणे सोपे असते असा एक मतप्रवाह मी ऐकला आहे. मला तो व्यक्तिश: पटत नाही. चार मजल्यांच्या जास्तीत जास्त सत्तर पायऱ्या आणि अडीच हजार पायऱ्या यात नक्कीच फरक आहे. एवढ्या पायऱ्या चढायलाही तेवढाच स्टॅमिना, तेवढीच मनाची तयारी लागते. in fact, कधीकधी सरळसोट चढ परवडला पण पायऱ्या नको असे वाटण्याइतका ताण दर पायरीला गुडघ्यांवर येत असतो! आजीबाईंच्या त्या ’करामतीकडे’ बघून श्रद्धा श्रद्धा म्हणतात ती हीच असावी असे क्षणभर वाटून गेले. आणि त्यांच्या या चढाईला सलाम म्हणून मी त्यांना फक्त वाकून नमस्कार केला. त्यांनीही ’बहुत जियो बेटा’ असे तोंडभर आशीर्वाद दिले. :)

कमालीची थंडी होती आणि वाराही सुटला होता. अंधारात मी एकटाच आसमंत पाहत उभा होतो. त्या चढाईमध्ये कुठेतरी माझा उजवा हॅण्डग्लोव्ह पडला आणि त्यामुळे थंडिपासून बचाव करण्यासाठी एका वेळी एकाच हातात ग्लोव्ह घालावा लागला. पंधरा-वीस मिनिटात उरलेले चार ’गडवाले’सुद्धा दाखल झाले आणि सुव्रतनाथांचे दर्शन पटापट उरकून आम्ही सूर्योदय बघायला धावलो. मांगीच्या सुळक्यावर घालवलेला पुढचा जवळजवळ पाऊणतास आयुष्यभर लक्षात राहणार आहे. मांगीच्या "बालेकिल्ल्याला" प्रदक्षिणा घालता येते. त्या वाटेवर तुंगीच्या दिशेने एक माचीवजा सोंड जाते. त्या ठिकाणी जोरदार वारा होता. त्या सोंडेच्या टोकापर्यंत जाऊन आम्ही उड्या मारल्या, फोटो काढले. त्या उड्या आपण इथे पाहिल्या आहेतच. -
http://www.maayboli.com/node/22277
http://www.maayboli.com/node/12975

सूर्योदयाचे हे काही फोटो-


यो महाराज-उडीमास्तर यो, मग ज्यो, मग रोमा आणि मग अविने बिनधास्त उड्या मारल्या. शेवटी मलाही उड्या मारायचा आग्रह झाला आणि मी त्या सोंडेच्या टोकावरच्या छोट्या जागेमध्ये उभा राहिलो. वारा सुटला होता. मला अशी (प्रामाणिक) भीती वाटत होती की मी उडी मारल्यावर हवेत असताना वाऱ्याच्या झोताबरोबर उडून तर जाणार नाही ना? :D :D अखेर योने तू अजिबात उडणार नाहीस अशी खात्री दिल्यावर एक दोन ’पायलट’ उड्या मारून पाहिल्या आणि मग मारली उडी!! :)

आठ वाजत आले होते. आम्ही तुंगीकडे निघालो. मांगी चढताना दोन हजारव्या पायऱ्यीपाशी तुंगीकडे वाट जाते. तिथपर्यंत उतरून आलो.तुंगी सुळक्यासाठी तिथून पाचशे पायऱ्या आहेत. अशी एकूण तीनहजार शंभर पायऱ्यांची चढाई आहे. तुंगीपर्यंतची वाट लांब आहे. वाटेत एक वृंदावन लागते. - मागे तुंगी.


मांगी-तुंगीवरील मूर्तींचे हे काही फोटॉ-


तुंगी बघून उतरतांना एका डोलीवाल्याने मला माझ्या उजव्या हाताचा सकाळी पडलेला ग्लोव्ह आणून दिला. मला आश्चर्यही वाटले आणि आनंदही झाला. :)
तुंगीवरून मांगी-


(हा माझा एक आवडता फोटो)


मांगी-तुंगी ’फाट्यापाशी’ आलो तेव्हा नऊ वाजले होते. माणसांचे पूर्वज सगळीकडे विहरत होते. ज्यो आणि रोमाने त्यांचे (आणि त्यांच्याबरोबर) फोटो काढण्याची हौस पूर्ण करून घेतली. :D आता ट्रेकमधली शेवटची उतरण - २००० पायऱ्या - नऊ वाजून दहा मिनिटांनी उतरायला सुरूवात केली.
उतरतांना अजून काळजी घ्यावी लागणार होती कारण चढण्यापेक्षा उतरताना गुडघ्यावर जास्त जोर येतो. त्यामुळे योने मला तू तुझ्या स्पीडने उतर, आम्ही तागडाक् तागडाक् करत जातोय असे सांगितले. तागडाक् च्या नादात आणि उत्साहाच्या भरात सुटलेला अवि एका पायरीवर घसरला आणि *** वर आपटला. सुदैवाने किरकोळ दुखापत होती. मग तिथून मी जे सुटलो ते माझ्या पुन्हा एका नियमीत गतीने त्या उरलेल्या दोन हजार पायऱ्या उतरून (अवघ्या) वीस मिनिटात खाली पोचलो. मला ज्ज्ज्ज्जाम आनंद झाला होता. माझा स्वत:वर विश्वासच बसत नव्हता. पण येस्स्स्स!! :)


एकूणात, मागच्या तोरणा-रायगड ट्रेकपेक्षा या ट्रेकमध्ये मी माझ्या चालण्यात आणि चढ-उतारात सुधारणा केली होती आणि त्याचमुळे ६ वेडेवाकड्या वाटांचे आणि कस पाहणाऱ्या पायऱ्यांचे किल्ले चढून-उतरूनही गुडघा ठणठणीत होता. लगेच सर्व ट्रेकमेट्सने मग मला ’पायऱ्या स्पेशालिस्ट’ अशी पदवी बहाल केली. भिलवडीहून मांगीला येताना जीपच्या टपावर बसलेली माणसे पाहिली होती. त्यामुळे परत जाताना (आतमध्ये जागा असूनही) आम्ही टपावरच बसण्याचे ठरवले. जीपवाल्याला सांगून (विचारून नव्हे ;)) टपावर चढलो देखील.

मला मागच्या वर्षी तोरणा-रायगड ट्रेकमध्ये रायगडवाडीपासून महाडपर्यंत वाळूच्या डंपरमध्ये बसून आलो होतो, त्याची आठवण झाली. :)
खोलीची चावी जमा करून एका टमटमने ताहराबादला आलो. लगेच साडेअकराची सटाणा-नाशिक एसटी मिळाली. ती एसटी जुन्या सीबीएसला गेली. चौघांची मुंबईची एसटी महामार्ग स्टॅण्डवरून तर माझी पुणे एसटी जुन्या सीबीएसवरून होती. अशा प्रकारे नवीन सीबीएसच्या बाहेर, ट्रेकपूर्वी कधीही न भेटलेल्या पण त्याची जराही जाणीव न ठेवता एकमेकांच्या साथीत, एकमेकांना सांभाळून घेतलेल्या, आणि ट्रेकच्या शेवटी छान मित्र बनलेल्या पाच मायबोलीकर अट्टल भटक्या ट्रेकमेट्सचा निरोपसमारंभ (उरलेला हिशेब सेटल करून) पार पडला. :) चौघे मुंबईला आठपर्यंत पोहोचले आणि पाचवा मावळा ’गडावर’ सुखरूप पोहोचला तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते.
********

बागलाण प्रांतातल्या आमच्या सहा किल्ल्यांच्या आनंदयात्रेची ही कहाणी इथे संपते! माझ्या परीने मी ती अधिक वर्णनात्मक करण्याचा प्रयत्न केला. वाचकाच्या डोळ्यासमोर उभं राहिल अशा शब्दात वर्णन करण्याची धडपड केली. वाचकांपुढे इतकं सगळं विस्तृत लिहून नंतर या ठिकाणी जाणाऱ्यांचा ट्रेकमधला स्वत: वाटा शोधण्याचा निखळ आनंद तर आपण हिरावून घेणार नाही ना, ही भीतीही सतत मनात होती. त्यामुळे काही ठिकाणी जुजबी वर्णन करून तो आनंद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. ही लिखित आनंदयात्रा रोमहर्षक होती, रंजक होती, सुखद, थरारक, अप्रतिम, उत्कंठावर्धक की अजून काही, याचा निर्णय सर्वस्वी वाचकमित्र-मैत्रिणींनो, तुमचाच आहे. या चार-पाच दिवसांत आम्ही खूप फिरलो, खूप काही बघितले, निसर्गाच्या अनेक खेळांपैकी काहींचे साक्षीदार झालो. प्रत्येक वेळी निसर्गापुढे आपण खुजे आहोत या भावनेला पुष्टी देणारे प्रसंग, जागा अनेकवेळा पाहिल्या. सालोट्याच्या कड्याखाली उभे राहताना, साल्हेरवरच्या गुहेबाहेरून सहस्रावधी चांदण्यांनी भरलेले आकाश पाहतांना, मुल्हेरवरून सूर्यास्त आणि मांगीवरून सूर्योदय पाहतांना, सालोटा उतरतांना समोर ’आ’ करून ’तयार’ असलेली दरी पाहतांना, मुल्हेरवर अंधारात वाट शोधताना, मांगीच्या सुळक्याखाली उड्या मारतांना त्या खुजेपणाची जाणीव अधिक दृढ होत गेली. अर्थात, निसर्गाच्या अधीन राहूनही, निसर्गाच्या करामतीमध्ये आपली करामत अजरामर करणाऱ्या निर्मीकांच्या खुणाही दिसल्या. साल्हेर-मुल्हेर-मोरा-सालोटा इथल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण होय. तसं पाहायला गेलं तर निसर्गाची कारागिरी पाहण्याच्या हेतूबरोबरच स्वत:ला, स्वत:च्या क्षमतेची वेस शोधण्याचाही हेतू होता. मागल्या ट्रेकपेक्षा आपण किती ’म्हातारे’ झालो आहोत हे शोधण्याचा एक प्रयत्न होता. इतका जवळजवळ प्लॅनप्रमाणेच ट्रेक झाल्यावर अजून काय हवं होतं? आणि धकाधकीच्या जीवनापासून दूर, शांत ठिकाणी ’शब्दांच्या पलिकडले’ जे मिळालं ते शब्दात मांडण्याचा प्रयत्न करणंही अवघड आहे. पण अशा ’अजून’ काहीतरी हवं असल्याच्या मागणीमुळे ह्या आनंदयात्रा अशाच सुरू राहणार आहेत. आणि मागे एकदा म्हटल्याप्रमाणे अशा आनंदयात्रांच्या स्वागताला हा सह्याद्री आडवाटाही सजवून सदैव उभा असणार आहे! :)
(समाप्त)
नचिकेत जोशी
सर्व फोटॉ - यो रॉक्स, रोहित मावळा आणि आनंदयात्री

1 comment:

Suhas Diwakar Zele said...

पाचही भाग वाचले... काय प्रतिक्रिया देऊ हा विचार करत होतो... इतकंच सुचले..


ज ह ब र ह द स्त ह !!!!