थोडक्यात पात्रपरिचय: नाव आणि कंसात माबो आयडी
यो : योगेश कानडे (यो रॉक्स)
ज्यो: गिरीश जोशी
अवि: अविनाश मोहिते (अवि_लहु)
रोमा किंवा रो: रोहित निकम (रोहित एक मावळा)
मी: नचिकेत जोशी (आनंदयात्री)
२७ डिसेंबर: मोरागड, उर्वरित मुल्हेर आणि मुक्काम भिलवडी
मुल्हेरमाचीवरच्या सोमेश्वरमंदिरामध्ये लागलेली शांत झोप ही दीर्घकाळ स्मरणात राहील. पहाटे साहा वाजता गजर झाला, आणि उठलो तेव्हा एकदम फ़्रेश वाटत होते. उजाडतानाच निघायचे होते. आजचे पहिले लक्ष्य होते - मोरा. काल रात्री झोपताना यो सोडून बाकी सर्वांचे मत हरगड वगळून थेट मांगी-तुंगीकडे निघावे असे होते, पण रात्रीच्या शांत आणि आरामदायी झोपेमुळे पहाटे पाच वाजता उठलो तेव्हा मी, रोहित आणि ज्यो आम्हा तिघांनाही हरगडही होईल असे वाटायला लागले होते. तीन किल्ल्यांच्या आतापर्यंतच्या अविस्मरणीय ट्रेकमुळे अवि एकदम खुश होता. त्यामुळे त्याला इथून पुढचा ’हर’गड म्हणजे बोनसच वाटत होता.. :)
चहा आधी करायचा की नंतर हे ठरवण्यात तब्बल १० मिनिटे गेली (थोडाफार थंडीची हुडहुडी होतीच), त्यामुळे मोराकडे निघायलाच जवळजवळ साडेसात वाजले. (शेवटी काहीही न खाता निघालो!) आज मोराकडे आम्ही मंदिरासमोरच्याच वाटेने जाणार होतो.. ही वाट सोपी आहे... आणि मुख्य म्हणजे जवळजवळ संपूर्ण वाटभर मागे सोमेश्वरमंदिर दिसत राहते. त्या सुंदर वाटेने धापा टाकत वर पोचायला खरं तर अर्धा तास पुरेसा होता, पण आम्हाला तब्बल ५० एक मिनिटे लागली! वाटेत एका निवडुंगावर आलेली ही फुले -
भिंतीचा हा फोटॉ-
वर भिंतीच्या अलिकडे दोन दरवाजे लागतात. भिंतीवरून सुंदर नजारा दिसतो. झाडीमधले सोमेश्वर मंदिर एखाद्या हिरव्यागर्द हारामध्ये खोवलेल्या शुभ्र गुलाबाच्या फुलाप्रमाणे दिसते.
हा रोमा-
त्या भिंतीवरून ज्यो, अवि आणि यो कालचा हुकलेला दरवाजा नक्की कसा आणि कुठे आहे हे पहायला मुल्हेरच्या दरवाजाकडे गेले. मी मोराच्या पायऱ्यांकडे गेलो. तर रोमा अस्सल ट्रेकरच्या धर्माला जागून तीन दिवसांत दुसऱ्यांदा दिवसाच्या सुरूवातीच्या चढाईमध्ये पोटाला ’न्याय’ देण्यासाठी मागे थांबला होता. ;)
मुल्हेरकडून मोराकडे भिंतीवरून येणारी वाट एका अत्यंत छोट्या चोर दरवाज्यातून येते. त्या दरवाज्याच्या वरती एक बुरूज आहे आणि त्या बुरूजापर्यंत येण्यासाठी भडंगनाथाच्या मंदिरापासून पुढे मुल्हेरला पूर्वेकडून वळसा मारून नियमित पायवाट आहे! त्या चोरदरवाजाचा हा फोटो-
एवढंच काय, तर काल रोमा ज्या कड्याशी येऊन थांबला होता, तिथून उजव्या हाताला अगदी जरासाच वळसा मारून तो पुढे आला असता तर एका अनियमित पायवाटेपाशी पोचला असता, जिथून तो बुरूज, ती भिंत आणि त्या दरवाजाच्या आतील बाजूकडच्या पायऱ्या स्पष्ट दिसल्या असत्या!! हा हन्त हन्त!!! :( हा एवढा प्रदेश मला मोराच्या पायऱ्यांपासूनही दिसत होता आणि केवळ निराश होण्यापलिकडे मी काहीच करू शकत नव्हतो. कालच्या शेवटच्या २० मिनिटांनी खरंच सगळे बेत बदलवले होते! अखेरीस फोटो काढून ते तिघे मोराकडे आले. मी आणि रोमा आधीच वर जाऊन वारा खात बसलो होतो.
मुल्हेरवरून घेतलेले मोराचे (म्हणजे गडाचे) हे फोटो -
मोरागडावर बघण्यासारखे काहीच नाही. अक्षरश: २ दरवाजे, तीन टाकी आणि गवत, यात गड संपतो. तो बघून २० मिनिटात आम्ही परत दरवाज्याशी आलो. हा दरवाजा अगदी कड्याच्या टोकावर आहे. इथून सालोटाही स्पष्ट दिसतो. (साल्हेर दिसतोच दिसतो).
टाके-
तेच टाके, पण मागे उजवीकडे मांगी-तुंगी सुळके-
हे ओळखा बरं-
<
आता ओळखा -
आतातरी ओळखा!!! -- :)
(जाहीर कबुली - हे काय प्रकरण आहे, याचा अंदाज पहिल्या नजरेतच आल्यामुळे, हे फोटो जेव्हा घेतले गेले तेव्हा मी त्या टाक्याच्या काठाच्या आसपासही नव्हतो! ६ सेकंदात १०० मी हा वेग सालोट्यापासून लक्षात होता! :) )
मोरागडाच्या दरवाजातून हरगड आणि मुल्हेर बालेकिल्ला-
मध्येच ज्यो आणि यो "आभाळाच्या छताखाली मोकळी जागा" (म्हणजे काय ते सूज्ञास सांगणे न लगे! ;) ) शोधायला गेले आणि मी, रोमा आणि अवि गप्पा मारत बसलो. बोलता बोलता राजांचे किल्ल्यांचे धोरण, किल्ल्यांवरील बांधकाम, दरवाजे, संरक्षणाच्या सुविधा, त्यांनी करून घेतलेला सह्याद्रीचा उपयोग, मग हा विषय सुरू झाला की अपरिहार्यपणे होणारी संभाजी-शिवाजी तुलना, संभाजी हा राजांइतकाच शूर होता हा निष्कर्ष, मग छत्रपती परंपरा, पेशवाई, मग पहिल्या बाजीरावाचे ठळकपणे उठून दिसणारे कर्तृत्व,(मस्तानीला आयुष्यात न पाहताही बाजीरावाचा वाटणारा हेवा) असा दीड-दोन शतकांचा प्रवास करून गप्पा बाजीरावाने उभ्या आय़ुष्यात एकही लढाई हरली नाही इथपर्यंत आल्या.
अवि- महाराजांनी जंजिरा जिंकला होता काय रे?
मी -नाही. तो किल्ला त्यांना शेवटपर्यंत जिंकता आला नाही. एवढंच काय, संभाजीराजांनाही तो जिंकता आला नाही.
अवि-हो, म्हणून त्यांनी त्याच्या समोर पद्मदुर्ग बांधला होता ना-
मी -हो.
अवि-बाजीरावाने जिंकलेला काय रे जंजिरा?
मी - माहित नाही रे. वाचलं नाही कुठे.
अवि- हो ना राव! मी ही नाही पाहिलं.
मी - पाहिलं?? कुठे? का?
अवि - अरे मी टेल्कोची फाईल घेऊन पुण्याला गेलो होतो, बॉसचा फोन आला म्हणून. त्यामुळे पाहता नाही आलं.
मी - ??
पुन्हा मीच (कारण रोमाचे हात आणि तोंड चुरमुरे खाण्यात गुंतले होते) - टेल्को मध्येच कुठून आली??
अवि - अरे टेल्को आमची client आहे.
मी - ते ठीक आहे रे. पण टेल्कोचा बाजीरावाशी आणि जंजिऱ्याशी काय संबंध??
अवि - (माझ्याकडे ’याला मगाचपासूनची माझी जीव तोडून केलेली मौलिक बडबड कळली नाही, हा खरंतर कडेलोट करण्याच्या लायकीचा आहे’ या अर्थी कटाक्ष टाकून) अरे, टीव्हीवर बाजीराव-मस्तानी serial लागते ना, त्यात जंजिऱ्याच्या लढाईचा episode बघता नाही आला मला, कारण त्या दिवशी टेल्कोची फाईल घेऊन पुण्याला जावं लागलं (टेल्को आमची client आहे ना!)...
मी - ............
:D :D :D :D
हा खुलासा ऐकून मी आणि रोमा खरंच हसून कोसळायच्या बेताला आलो होतो! तो प्रसंग, ती जागा आणि ती वेळ सगळं जुळून आले होते! संध्याकाळी हा प्रसंग जसाच्या तसा उरलेल्या दोघांना ऐकवला तेव्हा तेही कोसळायचे बाकी होते! ( I am sure, आत्ताही ते चौघे पोट धरून हसत असणार!) पण यानिमित्ताने आमच्या गप्पा चालू शतकामध्ये आल्या आणि वेळेचेही भान आले! अर्थात चूक अविची नव्हती. इतिहासाचे दांडगे वाचन आणि सर्व ऐतिहासिक serials कोळून प्यायलेल्या अविला इतिहास आणि वर्तमान यांच्या मधले smooth transition सहज शक्य होते. त्यामुळे घटकेत खरा बाजीराव कसा होता आणि घटकेत टेल्को कोण आहे हा प्रवास त्याला जमला, आम्हाला कळायला वेळ लागला एवढंच! जाता जाता अवि उर्फ बाजीरावांचा आणखी एक पराक्रम सांगून ठेवतो. यांचा इतिहासावरील वाचनाचा व्यासंग एवढा मोठा आहे, की डॉ. अमोल कोल्हे फेम ’राजा शिवछत्रपती’ मालिका बघताना ह्यांना पडणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देता न आल्यामुळे यांच्या वडिलांनी ती मालिकाच बघणे सोडून दिले आहे!!! ;) हे प्रश्न जर अविने नितीन देसाईंना विचारले असते, तर कुणास ठाऊक, त्यांनी मालिका बनवणेही सोडून दिले असते!! :D
वेळेचे भान आल्यावर घाईघाईत खाली उतरलो. ज्यो आणि यो मागून येणार होते. आम्ही खाली जाऊन चहा तरी करू असे म्हणून भराभर खाली आलो. घड्याळ आधीच वेगात पळत होते आणि तब्बल १० वाजलेले दाखवत होते! खाली आल्यावर सर्दीच्या भीतीने मी चुलीजवळ जाण्याचा प्रश्नच नव्हता आणि सगळी लाकडे आदल्या रात्री "चुलीत" घातल्यामुळे आता चहासाठीही लाकडे नव्हती. म्हणून मग नुसतेच आजूबाजूची हिरवाई बघत बसलो. हा टॉर्च-
अगदी खरं सांगायचं तर, ट्रेकचा तिसरा दिवस होता, सालोटा-साल्हेर-मुल्हेर-मोरासारखे मातबर किल्ले झाले होते, मांगी-तुंगी लिस्टवर नक्की होते, त्यामुळे नकळत थोडासा relaxation चा मूड होता. :)
यो परत आल्यावर आम्ही नुसतेच *** टेकवून हवा खात बसलेलो बघून (पुन्हा) ’हे तिघे कडेलोट करायच्या लायकीचे आहेत’ अशा नजरेने बघून त्यानेच मंदिरामागची लाकडे आणली, मग अविने चहा केला, मी आणि अविने गाळला आणि दिवसाचा पहिला चहा घेतला. मॅगी बनवली. (आम्ही ट्रेकमध्ये जेवणही करत होतो हा दाखवणारा एकमेव पुरावा :))
सॅक्स भरल्या. संन्यासीबाबा दीड-दोन किमी वरच्या शंकरमंदिरात ’आस्थापने’साठी निघून गेले. एव्हाना योला मंगळवारीच मुंबईत परत यायचे असल्यामुळे हरगड cancel करून मांगीकडे निघावे असं त्याचं मत बनलं होतं आणि उलट रात्री मस्त झोप मिळाल्यामुळे एवढ्या जवळ येऊन सातवा किल्ला सोडू नये असे आमच्या तिघांचे मत बनले होते. अवि खुश होता! अखेर बराच वेळ खलबतं करून शेवटी आम्ही हरगड वगळायचा निर्णय घेतला. (हा निर्णय चुकला हे आमच्या खूप उशिरा लक्षात आले). मग आता काय? आज सोमवार होता, उद्या दुपारी नाशिकहून परतीची गाडी पकडायची होती. मधल्या वेळात फक्त मांगी-तुंगी बाकी होते. आम्ही उत्साही लोकांनी तर संध्याकाळी मांगी चढून तिथेच गुहेत मुक्काम करू इत्यादी प्लॅन बनवला होता. तात्पर्य, आणखी टाईमपास सुरू झाला आणि मुल्हेरवरून निघायला १२ वाजून गेले.
निघताना मंदिर साफ केले, कचरा गोळा करून घेतला, उरलेला झाडीमध्ये टाकला, फोटो वगैरे काढले आणि निघालो. मुल्हेर उतरायच्या आधी रामेश्वरमंदिर बघायचे होते. रामेश्वरमंदिराची एक वाट गणेशमंदिरावरून जाते. ट्रेकमध्ये मांगी-तुंगीच्या साडेतीन हजार पायऱ्या अजून बाकी असल्यामुळे आणि मागील वर्षीच्या तोरणा ते रायगड ट्रेकमधल्या गुडघेदुखीच्या आठवणीमुळे मी शक्यतो कमी दगदग करण्याचा निर्णय घेतला होता. इतक्या सुंदर ट्रेकचा शेवट मला गुडघेदुखीमध्ये व्हायला नको होता. तात्पर्य, मी रामेश्वरमंदिर बघायला येणार नाही असे जाहीर करून टाकले. उरलेल्या चौघांनी (लगेच खुश होऊन) आपापल्या सॅक्स माझ्याकडे सांभाळायला दिल्या आणि मंदिर बघायला निघून गेले. ती २०-२५ मिनिटे मी गणेशमंदिराबाहेर शांतता ’ऐकण्यात’ घालवली. truely memorable!! . रामेश्वरमंदिरसुद्धा तितकेच प्रेक्षणीय होते हे मला नंतर कळले. त्याबद्दल सविस्तर यो लिहीलच.
मंदिर बघून मुल्हेर उतरू लागलो. रोमा आणि यो-ज्यो ने उतरताना एक सोपा short-cut शोधला आणि आम्ही जेमतेम तासाभरात गड उतरलो. माझ्या आणि अविच्या येताना पक्क्या रस्त्याजवळ तो कालचा बाबाजी भेटला. त्याची ख्यालीखुशाली विचारून मुल्हेर गावाकडे निघालो. येताना मात्र कालसारखी टमटम मिळाली नाही आणि ते २ किमी चे अंतर पायीच चालून आलो. वाटेत एके ठिकाणी सोयाबीनची यंत्रावर झोडपणी चालू होती. आम्हाला रस्त्यावरच उभे राहून ते पाहताना बघून मालकाने आत येण्याचे निमंत्रण दिले आणि यंत्राची माहितीही दिली. आम्हीही माग सराईत आडते असल्यागत सोयाबीन हातात घेऊन ’तपासून’ वगैरे पाहिले. :D त्याचे हे काही फोटो -
मुल्हेर गाव ऐतिहासिक आहे. प्रत्येक घर इतिहासाची साक्ष देते. आम्ही रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या घरांचे बांधकाम निरखत, फोटो घेत चाललो होतो. इतक्यात एका घराच्या ओसरीवर बसलेल्या एका म्हातारशा बाबांनी योला हाक मारली. सुरूवातीची ’चौकशी’ झाल्यावर त्यांनी चक्क स्वत:चे घर पाहण्यासाठी आम्हाला आत बोलावले. लाकडी दणकट दरवाजे, छत, झोपाळा तसेच त्यावरील नक्षी ही कलाकुसर अगदी जवळून पाहायला मिळाली! पार परसदारापर्यंत नेऊन दळायचे जाते, देव्हारा, आड हे सगळे दाखवले. आम्ही खुश! :) आधुनिक काळातही अस्सल ऐतिहासिक वारसा जपून ठेवलेल्या मोजक्या गावांमध्ये मुल्हेरचा उल्लेख करावा लागेल! घरामध्ये फरशी बसवलेली असली तरी घराचे बाकी जुने "घरपण" टिकून आहे. ही बांधकाम शैली मुघलांच्याही आधीची आहे! कारण मुल्हेर गडावरच्या सोमेश्वर-गणेश-रामेश्वरमंदिरांमधले खिळे आणि या घरांमधले खिळे एकमेकांशी जुळणारे होते!
खिळे-
घर पाहून झाल्यावर बाबा बहुतेक गप्पा मारायच्या मूडमध्ये आले (रोमा आणि यो घड्याळात बघत होते!) बाबांनी मग घरातून जुना दस्त ऐवज बाहेर आणला. त्यात मुल्हेरकर देशमुखांची वंशावळ होती. ती नाशिकमध्ये कुठे मिळेल तेही सांगितले. एवढे झाल्यावर मग बाबांच्याबरोबर फोटो वगैरे काढले. बाबांचे नाव पांडुरंग रामचंद्र बागूल!
एवढा इतिहास पाहिल्यानंतर तृप्त होऊन गावातील सुप्रसिद्ध उद्धवस्वामींचा मठ बघायचा पूर्वनियोजित कार्यक्रम मग आम्ही रद्द केला. एक टमटम ठरवली आणि मधल्या खिंडीच्या रस्त्याने मांगी-तुंगीकडे निघालो.
खिंड ओलांडल्यावर झालेले मांगी(डावा सुळका) आणि तुंगीचे(उजवा सुळका) दर्शन-
मांगीजी-तुंगीजी सुळके हे जैन धर्मीयांचे एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. पायथ्याच्या गावाचे नाव भिलवडी. इथे अनेक (बघायला) मंदिरे आणि (रहायला) धर्मशाळा आहेत. :) जेवणाचीही सोय होते. इथून दोन किमीवर प्रत्यक्ष मांगी-तुंगीचा पायथा आहे. तिथून साडेतीन हजार पायऱ्या चढून सुळक्यांवर जावे लागते. आमच्या प्लॅननुसार आधी मांगी-तुंगी दोन्ही बघून सूर्यास्त बघून खाली भिलवडीमध्ये मुक्कामाला यायचे असे होते. वाटेत कुणाशीतरी बोलताना ’मांगीवरती गुहा आहेत’ असे कळल्यामुळे तर आम्ही मांगी बघून तिथेच मुक्काम करून उद्या तुंगी पाहू असे ठरवले. भिलवडीला पोहोचलो तेव्हा चार वाजले होते. धर्मशाळेच्या कार्यालयामध्ये गेल्यावर असे कळले की वर राहता येत नाही आणि जेवण साडेपाच ते साडेसहा याच वेळात असते. सूर्यास्तानंतर जैन भोजन करत नाहीत, म्हणून असेल. इतकेच नव्हे, तर आवारात शिजवायलाही परवानगी नाही. तसेच, पायथ्यापर्यंत जीपची सोय होऊ शकेल पण चारनंतर जीप बंद असतात. आमच्यापुढचे पर्यात अशा प्रकारे संपले होते. उरलेली संध्याकाळ तिथेच घालवून पहाटे लवकर पहिल्या जीपने मांगीकडे निघणे, लवकरात लवकर दोन्ही सुळके पाहून भिलवडीमध्ये येणे आणि साडेअकराची नाशिक एसटी पकडण्यासाठी ताहराबाद गाठणे हा सर्वोत्तम पर्याय उरला होता. (जल्ला हे आधी माहित असतं तर हरगड नसता का केला?? नाहीतरी संध्याकाळभर टाईमपासच करायचा होता! :( ) धर्मशाळेमध्ये खोली घेऊन आत शिरलो. चक्क गाद्या-उश्या आणि खोलीमध्ये लाईट तसेच नळाला फ़ुल पाणी पाहिल्यावर आमचा ट्रेक all of a sudden ट्रिपमध्ये बदलून गेला! अत्यानंदामध्ये गाद्यांवरती घेतलेल्या उड्या -
लगेच रोमा आणि ज्योने आंघोळ करून घेतली. माझे आणि योचे मात्र ट्रेकमध्ये पाण्याचे नैसर्गिक साठे सोडून इतर ठिकाणी अंघोळ करणे म्हणजे पाप असते यावर एकमत झाले. ;) त्यामुळे आम्ही नुसतेच हातपाय धुतले. फ्रेश झालो. एके घरात चहा (विकत) मिळत होता तिथे चहा घेतला. साडेसहासारख्या ’अवेळी’ जेवण झाल्यावर रात्री ’नेहमीच्या’ वेळी भूक लागली तर काय हा प्रश्न डोक्यात होताच. म्हणून मग मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या एका घर कम दुकानामध्ये त्या गृहलक्ष्मीला तुमच्याकडे जेवणाची सोय होते का असे विचारून आलो. तिनेही ”मिळेल पण बाजरीची भाकरी आणि शेवभाजी एवढेच मिळेल” असे उत्तर दिले.
"चालेल. तुम्ही कितीपर्यंत जागे असता? (कारण साडेसहानंतर दोन तासात भूक लागणं अवघड आहे! :D )" - मी आणि ज्यो!
’आम्ही साडेदहा-अकरापर्यंत जागे असतो. तुम्ही साडेनऊपर्यंत सांगायला या.’ - इति गृहलक्ष्मी!
आम्ही आनंदाने तिला नक्की सांगतो असे म्हणून निघालो. जेवणाची वेळ होईपर्यंत फोटो काढले. जेवणाची उत्तम सोय तिथल्या भोजनशाळेमध्ये होते. जवळजवळ तीन दिवसांनी तयार, चौरस आहार जेवत होतो. त्यामुळे अर्थात जेवणावर आडवा हात मारत होतो. त्याचा परिणाम असा झाला की तिथला वाढपी नंतर नंतर आमच्याकडे दुर्लक्ष करतो आहे असा आमचा समज व्हायला लागला!! जेवण झाल्यावर मंदिरे बघितली. (त्याचे फोटो पुढील भागात) एका मंदिरात आलेल्या एका जैनधर्मियाबरोबर मी आणि अविने जैन तीर्थंकर, त्यांचे प्रभाव, जैन मायथॉलॉजी, मांगी-तुंगीचे महत्त्व इ. विषयांवर गप्पा मारल्या.
हे सगळं करेपर्यंत नऊ वाजले. जेवलेले अजून जिरले नव्हते. त्यामुळे बाजरीची भाकरीचा आस्वाद पुन्हा केव्हातरी घेऊ असे म्हणून पुन्हा एकदा चहा घेतला. योने केव्हापासून ’उद्या चार वाजता उठायचे आहे’ असा घड्याळाविना गजर सुरू केला होता. ”कुणीही नाही उठलात तर मी एकटा जीपने निघून जाईन” वगैरे (उगाच) धमकी वगैरे दिली. :) अखेर पहाटे पाचच्या पहिल्या जीपने मांगीकडे निघायचे असे ठरवून खोलीवर आलो. आतापर्यंतचा खर्चाचा हिशेब केला, जेव्हा शेवटी कुणालाच तो समजेनासा झाला तेव्हा अस्मादिकांनी (अनुभवाच्या जोरावर) तो सर्वांना समजावून दिला! :D आणि मागच्या तीन रात्रींच्या मुक्कामाच्या तुलनेत अत्यंत अलिशान अशा बिछान्यावर पाठ टेकली. ट्रेकच्या शेवटच्या चढाईसाठी आम्ही पूर्णपणे तयार होतो. गेले तीन दिवस वेड्यावाकड्या वाटांनी सह्याद्रीत भटकल्यावर आता पुस्तकात वाचलेल्या साडेतीन हजार पायर्या आम्हाला खुणावत होत्या...
(क्रमश:)
--नचिकेत जोशी
सर्व फोटो- यो रॉक्स, रोहित मावळा आणि आनंदयात्री
No comments:
Post a Comment