मी या सर्व लेखांमध्ये नावांचे शॉर्टफॉर्म्स वापरणार आहे. त्यामुळे आधी पात्र-परिचय करून देतो-
यो : योगेश कानडे, मुंबई. या ट्रेकचा एक मुख्य planner. मायबोलीवर ’यो रॉक्स’ या नावाने छापतो म्हणून यो, दगड, खडक इ नावांनी प्रसिद्ध आहे.
ज्यो: गिरीश जोशी, मुंबई. योचा कलिग. मायबोलीकर नसावा, कारण याआधी तिथे पाहिल्याचे आठवत नाही. :)
(या यो आणि ज्यो अशा समान उच्चार असणाऱ्या नावांनी सुरूवातीला माझा ज्जाम गोंधळ उडवला होता. नक्की कोणाला हाक मारली गेली आहे, हेच कळायचे नाही!)
अवि: अविनाश मोहिते, मुंबई. नवीन मायबोलीकर. याचा विशेष परिचय करून द्यावा लागेल. हे बाजीराव एकदा मराठी गाण्यांसाठी नेटसर्फिंग करत असतांना ह्यांना गूगलमध्ये मायबोलीची लिंक मिळाली. तिच्यावर टिचकी मारून आत प्रवेश करते झाले. तिथे ह्यांना ट्रेकसंबंधी एक दुवा मिळाला. तिथले (बहुतेक)सर्व लेख वाचून यांनी ठरवले, की आपणही ट्रेक करायचा. मग पुढे यथासांग योचा नंबर मिळवून यांनी या ट्रेकबद्दल सर्व माहिती मिळवली आणि एनसीसी मधल्या कॅम्पचा अनुभव वगळता ट्रेकींगचा फारच कमी अनुभव असूनही दादर स्टेशनवर रात्री साडेदहाला आम्हाला येऊन भेटले! अर्थात अननुभवी असल्याची कुठलीच झलक त्याच्या ट्रेकमध्ये दिसली नाही, हे उल्लेखनीय!
रोमा: रोहित निकम, मुंबई. रोहित-एक मावळा या नावाने मायबोलीवर लिहितो म्हणून रो.मा.
आणि शेवटी मी: या ’पात्रा’चा परिचय करून द्यायची गरज आहे असं वाटत नाही, पण ’नैतिक, सामाजिक इ इ जबाबदारी’ म्हणून नचिकेत जोशी, पुणे (मूळ गाव डोंबिवली म्हणजेच जन्माने मुंबईकर :) ) या ट्रेकचा अजून एक planner.
(चरितार्थासाठी प्रत्येक जण स्वत:च्या पायावर उभा आहे. कुणी बॅंकेत, कुणी मास्तरकी तर कुणी संगणक बडवण्याच्या कामात असे प्रत्येकाचे स्वतंत्र रोजगार आहेत).
*******
२४ डिसेंबर: ओळखपरेड आणि दादरहून प्रस्थान:
या ट्रेकची planning जवळजवळ एक महिन्यापासून सुरू होती. पण ठिकाण नक्की ठरत नव्हते. प्रत्येक जण सुट्टी काढून येणार होता. त्यामुळे किती दिवसांची सुट्टी मिळेल त्यावर ठिकाण अवलंबून होते. आमच्यापुढे २ पर्याय होते - बागलाण प्रांत किंवा प्रचितगड-भैरवगड-कंधारडोह. अखेर योशी बोलून आणि इतर सर्व पर्यायांवर विचार करून आम्ही पहिलाच पर्याय नक्की केला. सुरूवातीला आम्ही सात किल्ले ठरवले होते. साल्हेर-मुल्हेर-सालोटा-मोरा-हरगड-मांगी-तुंगी. किल्ल्यांचा क्रम तसेच एसटी बसेसच्या वेळा योने पूर्वानुभवी मायबोलीकरांशी बोलून फायनल केल्या. शेवटी आम्ही पाच जण नक्की झालो. मी, यो, ज्यो, रोमा आणि नवा बाजीराव अवि. गंमत म्हणजे यो-ज्यो-रोमा यांनी आधी एकमेकांबरोबर ट्रेक केला होता. मी या सर्वांबरोबर ट्रेक सोडाच, त्यांच्यापैकी कुणालाही भेटलोही नव्हतो. but, it made no difference! After all, आम्ही अट्टल भटके होतो.. पण या सर्वांबरोबरच्या पहिल्याच ट्रेकमध्ये मलाही खूप गोष्टी बघायला, शिकायला मिळाल्या हे आवर्जून लिहावेसे वाटते.
मोठी सुट्टी काढलेली असल्यामुळे मुंबईत नातेवाईकांकडेही जाता येईल व तिथूनच ट्रेकला जाऊ असा विचार करून पुणे-नाशिक अशी सोयीची एसटी असतानाही मी २१ तारखेलाच डोंबिवलीला पोहोचलो आणि मग ट्रेकसाठी थोडिफार खरेदी (तांदूळ-डाळ-पोहे वगैरे) २४ तारखेला ९.४७ च्या फास्ट लोकलने दादरला गेलो.
ठरवल्याप्रमाणे सगळेजण रात्री साडेदहाला दादर वेस्टर्नच्या प्लॅटफॉर्म नं १ च्या मेन इंडिकेटरखाली भेटलो. योने बहुधा प्लॅटफॉर्मवर आधीच मला कुठेतरी पाहिले असावे आणि माझ्या अवतारावरून ओळखले असावे. कारण मेन इंडिकेटर कुठे आहे असा प्रश्न मी तिथल्या पोलिसाला विचारत असताना हे महाशय शांतपणे मागे उभे राहून माझा आणि पोलिसाचा संवाद ऐकत होते. मी पोलिसाशी बोलून मागे फिरलो आणि मागे देव आनंद किंवा दिलीपकुमारच्या स्टाईलमध्ये माझ्याकडे बघत असलेला यो दिसला. दहा मिनिटात अवि आला आणि येरझाऱ्या घातल्यासारखा पुढे जाऊन ज्यो पुन्हा मागे आला. रोमा ठाण्याहून फ़ास्ट लोकल ऐवजी स्लो लोकलने येत असल्यामुळे ’दहा मिनिटे उशीराने अपेक्षित’ होता. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या या सगळ्या मुंबईकर ट्रेकमेट्समध्ये मीच काय तो (योच्या भाषेत ’बाटलेला’) पुणेकर होतो. उगाच उशीर झाला तर सुरूवातीलाच पुण्याचा उद्धार नको म्हणून मी अगदी वेळेवर पोहोचलो. :P योने डोंबिवलीहून ९.४७ची फास्ट लोकल दादरला साडेदहापर्यंत पोचेल असं वाटत नाही असं म्हणून आधीच त्या उद्धाराचे संकेत दिले होते. माझा मात्र मुंबईच्या रेल्वेवर पूर्ण भरवसा होता. असो. तर मुद्दा हा, की सगळे जमायला पावणेअकरा झाले.
तेवढ्यात रोमा आणि योच्या लक्षात आले की चहाचे गाळणे कुणीच घेतलेले नाही. झाले! मी आणि ज्यो तेवढ्या रात्री दादर स्टेशनच्या बाहेर कुठे गाळणी मिळते का ते पहायला निघालो. अर्थात, एवढ्या रात्री गाळणीचे दुकान उघडे असणे शक्यच नव्हते (मुंबई असली म्हणून काय झालं? ;) ) शेवटी तर आम्ही एक-दोन हॉटेलमध्येसुद्धा स्पेअर गाळणी आहे का असेही विचारून आलो!! :D अखेर नाशिकची एसटी चुकायला नको म्हणून आम्ही गाळणीला वगळूनच निघालो. सव्वा अकरा वाजता शिर्डी एसटीने मार्गस्थ झालो. रात्री कसारा घाटाच्या अलिकडे छोट्या पुलावर (बहुधा खर्डीचा असावा) नेहमीचा ट्राफिक जाम लागला. बाकी सर्व ठीक घडले असावे, कारण मध्ये एका ढाब्यावर गाडी थांबली तेव्हा फक्त जाग आली होती. त्यानंतर थेट नाशिकला महामार्ग स्थानकावरच जाग आली. अर्थात झोप बसल्याबसल्या जेवढी होते तेवढीच झाली होती...
(क्रमश:)
- नचिकेत जोशी
No comments:
Post a Comment