Pages

Wednesday, February 8, 2012

साक्षात्कार

ऐकली माझी व्यथा, वरवर दिला आधार त्यांनी
आणि नंतर त्या व्यथेचा मांडला बाजार त्यांनी

सोबतीला मी स्वतःची सावली नेईन म्हणतो
छाटले आहेत सारे वृक्ष डेरेदार त्यांनी

राहत्या वस्तीत माझा छान पाहुणचार झाला
धाडली आमंत्रणे अन् बंद केले दार त्यांनी

आज माझे गीत इतके भावले नसते तुम्हाला
छेडली नसती कधी जर वेदनेची तार त्यांनी

आतमध्ये साचलेले कागदावर मांडले मी
ते कुठे कळले? जरी केली समीक्षा फार त्यांनी

साठले होते तरीही नितळ आणि निखळ होते
डोह करुनी टाकला माझ्या मनाचा पार त्यांनी

शब्द माझ्याशीच माझे वागले परक्याप्रमाणे
बोललो आभार, माझे मानले आभार त्यांनी!

तो म्हणाल्यावर निघाले पालखी घेऊन सारे
तो म्हणाला आणि केला सामुहिक धिक्कार त्यांनी

'मी खरा त्यांच्या कृपेने येथवर सुखरूप आलो'
घडवला सरणावरीही हाच साक्षात्कार त्यांनी

- नचिकेत जोशी (८/२/२०१२)

3 comments:

Bharat Mahajan said...

Chhan kavya...

ulhasbhide said...

जबरदस्त लिहिली आहेस ही गझल.
’सावली’, ’डोह’ वाले शेर सर्वात जास्त आवडले.

नचिकेत जोशी said...

thanks all :)