Pages

Tuesday, February 14, 2012

प्रेमासाठी

(एक वर्षापूर्वी सुचलेली ही कविता. आत्ता इथे टाकतोय)

प्रेमासाठी दिवस-रात्र जागायचो तेव्हाची गोष्ट.
एकदा असंच प्रेम आणायला सकाळी सकाळीच निघालो.
"किती लागतील" ते माहित नव्हतं म्हणून एटीएममध्ये शिरलो.
बाहेर पडलो तर कोपर्‍यावर एक फूलवाला दिसला.
त्याला म्हणालो, "प्रेमाचे फूल द्या हो दादा."
तर तो म्हणाला, "घ्या की - पन्नासला दोन देतो!"
- घेऊन टाकली!

मग तसाच पुढे गेलो.
वाटलं, शुभेच्छापत्रात प्रेम नक्की मिळेल.
दुकानात शिरलो आणि काउंटरपलिकडच्या सुंदर शुभेच्छापत्रिकेला म्हणालो -
"मला प्रेमाचं ग्रीटींग हवंय..."
ती समजली आणि खपवण्याच्या शुभेच्छेने म्हणाली -
"यापैकी घ्या... पन्नासला एक, पण होकाराची गॅरेंण्टी!"
- घेऊन टाकलं!

मग रस्त्यावरून भटकत सुटलो.
बागा, कोपऱ्यातल्या जागा,
पब्लिक बस, हॉटेल्स, कॉफीहाऊस,
कॉलेजचे कट्टे, नेहमीचे अड्डे,
मॉलमधली गर्दी, मल्टिप्लेक्समधल्या 'त्या' दोन खुर्च्या...
सगळीकडे शोधलं..
पण सगळ्याच गोष्टी देव नसलेल्या देवळाप्रमाणे
आपल्याच स्थायी स्वभावात हरवल्या होत्या.

शेवटी भूक लागली म्हणून प्रेम-बिम विसरून
एका घरगुती खानावळीत शिरलो.
तर तिथेही लिहिलं होतं -
अगदी घरी जेवल्याचा भास
मायेची, चविष्ट थाळी फक्त रू पन्नास!

बराच वेळ गेला..
माझ्या या शोधात सकाळपासून ज्याला
मी गृहीत धरलं, तो माझा जुना मित्रही आता
आकाशातून उग्र होऊ लागला होता!
मी मात्र माझ्याच धुंदीत..

झगमगत्या नेकलेस, इअरिंग्ज, हॅण्डबॅग्ज,
गॉगल्स, घड्याळं,
क्लासिकल डीव्हीडी कलेक्शन..
- नाही घेतलं काहीच!
फक्त भिरभिरलो..
आणि शेवटी प्रेमाचा हट्ट सोडून परत निघालो.

येताना एका आजीबाईंना आणि एका अंध मुलीला रस्ता ओलांडून दिला,
त्यांचे आशीर्वाद आणि थॅक्स अगदी जपून खिशात ठेवून दिले.
मंद झुळूक यायला लागली होती.
दुपारपासूनची तगमग कमी व्हायला लागली होती...
गल्लीमध्ये बांधकाम चालू होतं,
तिथे मुलांबरोबर आंधळी-कोशिंबीर खेळलो..
घरी आलो तेव्हा उशीर झाला होता.
बाबा केर काढत होते, आई बेसिनजवळ भांडी घासत होती.
बाबांना म्हणालो, "द्या इकडे, मी काढतो.
मी आलोय आता, तुम्ही आराम करा.."
आतून बेसिनमधला नळाचा आवाज तेवढा वाढलेला ऐकला मी!
बाबा म्हणाले, "आजीने खास तुझ्यासाठी लाडू पाठवलेत,
मामा एसटीमध्ये रात्रभर उभा राहून घेऊन आलाय, खाऊन घे.
आणि जेवायला सगळे थांबलो आहोत तुझ्यासाठी!"

खूप वर्षं झाली या गोष्टीला.
कधीकाळी प्रेमासाठी दिवसभर भिरभिरलो होतो,
आणि
ती पन्नासची दोन फुलं आजीला आणि
होकाराची गॅरेण्टी मिळालेलं ग्रीटींग मामाला देऊन
स्वतःशीच जरासा विसावलो होतो
एवढंच आठवतं आता...

- नचिकेत जोशी (८/२/२०११)