अष्टविनायकातील सुप्रसिद्ध बल्लाळेश्वर
गणपतीचे पाली हे सरसगडाच्या पायथ्याचे गाव. २८ ऑगस्टला भल्या सकाळी भर पावसात इर्शाळगडाच्या
दिशेने निघालेल्या आम्हा ६ जणांच्या नशिबी सरसगडाचा अनपेक्षित ट्रेक आणि तोही चोरवाटेने
व्हावा ही त्या बल्लाळेश्वराचीच इच्छा असणार!
चौकफाट्याला इर्शाळगडाकडे जायचा
रस्ता विचारायला एका हॉटेलमालकाकडे गेलो आणि त्याने "यवड्या पावसात काय गड चडणार
तुमी, वाटच सापडायची न्हाई" असं म्हणून गडाखालीच मात दिली. मग पुन्हा एकदा मृगगड,
सोनगिरी, पेठचा किल्ला, सुधागड, अगदी ड्युक्सनोज असं करत करत शेवटी सरसगडच "करून"
येऊ असा ठराव सर्वानुमते पास झाला! नशिबाने आदल्या दिवशी का कुणास ठाऊक पण सरसगडाचीही
माहिती चाळून ठेवली होती. त्यात गणेशमंदिराच्या मागून सरळ, सोपी वाट आहे असे दिले होते.
त्यानुसार पालीमध्ये गाडीतळावरील चौकीदाराला "गडावर जायचे आहे, गाडी कुठे लावू"
असे विचारल्यावर त्याने "गडाची वाट PWD/MSEB ऑफिसशेजारून आहे" असे उत्तर
दिले! पुन्हा गाडी मागे आणली आणि MSEB कार्यालयाच्या शेजारच्या बोळात घुसवली! तिथे
शेवटच्या घरापर्यंत जाऊन गाडी लावली तेव्हा सरसगडाच्या पालीतून दिसणार्या भिंतीच्या
डाव्या टोकाच्या खाली आलो होतो आणि मंदीर पार उजव्या टोकाखाली होते. पण तरीही, पहिल्यांदाच
जात असल्यामुळे स्थानिक गावकर्यांचे म्हणणे प्रमाण मानून त्या खडबडीत रस्त्यावरून
आम्ही पायी चालायला सुरूवात केली. सरसगडाच्या कातळभिंतीच्या आम्ही पूर्ण डाव्याबाजूला
होतो. त्याच वाटेने पुढे गेल्यावर एक वस्ती लागते. त्या वस्तीच्या बरंच अलिकडे एक पायवाट
सरसगडाकडे निघते. ही वाट एकच आणि अत्यंत छोटीशी आहे. त्या वाटेने चढू लागलो. मधला चढ
पार करून एका छोट्याशा पठारावर थोडावेळ थांबलो. पावसामुळे अंबा नदी दुथडी भरून वाहत
होती. हिरव्यागार प्रदेशामधून नदीचे मातकट लालसर पात्र वळणे घेत लांबवर पसरले होते.
तेवढ्यात जोरात पाऊस सुरू झाला
आणि क्षणात सगळा परिसर ढगांमध्ये अदृश्य झाला! वाटेत एके ठिकाणी कातळात कोरलेल्या सुबक
पायर्या लागल्या आणि आता या पायर्या आपल्याला (गडा) वर घेऊन जाणार अशा खात्रीने वर
चढू लागलो. तो आनंद फार कमी वेळ टिकला कारण त्या पायर्यांवरून झरे वाहत होते आणि कातळ
कमालीचे घसरडे झाले होते. पुढे सुबक पायर्याच दिसेनाशा झाल्या. शोधाशोध केल्यावर कातळात
जेमतेम पाऊल ठेवता येईल एवढ्या खाचेच्या पायर्या दिसल्या. आणि पुढचा अर्धा-पाऊण तास
आम्ही केवळ त्या निसरड्या पायर्या, अधूनमधून आडवे जाणारे धबधबे, जोरात पाऊस, आणि गच्च
झुडुपे यांच्याशी झगडत होतो. ती तशा प्रकारची वाट पाहून सोप्या सरसगडाबद्दलची कल्पना
केव्हाच नाहीशी झाली होती आणि आम्ही खूप सावधपणे पाऊल टाकू लागलो होतो. ही वाट नक्कीच
राजवाट नाही आणि आपण नक्कीच एखाद्या चोरदरवाजातून आत जाणार हे एव्हाना कळलेच होते!
सारेच अनपेक्षित आणि हवेहवेसे घडले होते! चोरदरवाज्यातून आत शिरलो आणि अजून एक अवघड,
घसरडा रॉकपॅच चढून बालेकिल्ल्यावर गेलो.
बालेकिल्ल्यावर एक महादेवाचे
मंदिर, पाठीमागे कोनाड्यात "बाप्पा", मंदिराजवळच एक तळे आणि दर्गासदृश बांधकाम आणि माचीवर अत्यंत प्रशस्त गुहा
आहेत. उतरताना राजवाटेवरच्या दरवाजाच्या बाहेरच्या उंच घसरड्या पायर्यांवरून सावकाश
उतरत पायवाटेने गावात उतरलो.
ध्यानीमनी नसताना सरसगडाची सफर
झाली आणि तीही फारशा माहित नसलेल्या - चोरवाटेने! ट्रेकला निघताना संपूर्ण माहिती गोळा
करूनच निघावं हे जरी खरं असलं तरी पूर्ण खबरदारी घेतली तर सह्याद्रीचं प्रेमळ रूप अशा
आडवाटांवर पाऊल टाकल्यावरच बघायला मिळतं, हेही तितकंच खरं!
- नचिकेत जोशी
2 comments:
सर नेहमीप्रमाणेच उत्तम!! पण फोटो??
thanks Niranjan..
तुफान पाऊस होता, त्यामुळे कॅमेरा बॅगेत ठेवावा लागला, फोटॉ नाही काढले फारसे..
Post a Comment