Pages

Tuesday, February 5, 2008

साद

सांजवेळी, दूर रानी,
साद घातली मला कुणी?
हिरव्या देठी, चिमण्या ओठी,
शीळ घातली खुळी कुणी? १

नभांगणाच्या हमरस्त्याने
पक्षी चालले माघारी
कि संध्येच्या नयनी रेखिले
काजळ ते आतुर कुणी? २

दिवेलागणी होता उमटे
बालसूर तो श्लोकांचा
गोशाळेतुन जणू किणकिणे
मंजुळशी गोमाय कुणी! ३

कडे-कपारी न्हाऊन निघती
संधिकाली त्या किरणांनी
समर्पणाचे तेज हे दिधले
जाता जाता मला कुणी? ४

मनामनाला करते कातर
वेळ ही हळवी क्षणोक्षणी
की चित्ताला शान्तवाया
निर्मिली ही सांज कुणी? ५

मला न ठावे कोण असे तो
सूत्रधार या खेळाचा
खेळगडी तो असेल माझा
की खेळाचा जनक कुणी? ६

- नचिकेत (२४/६/२००६)

No comments: