Pages

Wednesday, September 2, 2009

मनोगत

आपण दोघे स्वत:स चोरून हळूच कोठे निसटून जाऊ
पुन्हा एकदा मंतरलेले क्षण ते सारे जगून घेऊ

आठवते का?- रानामध्ये आपण दोघे चुकलो होतो
वारा होऊन संध्याकाळी पानातुन भिरभिरलो होतो
सूर्य नेमका जाता जाता पाणवठ्यावर आला होता
मोजत आपण श्वास आपुले काठावरती बसलो होतो
कातरवेळी जाळीमधुनी शीळ अनामिक घुमली होती
भिती तुझी अन्‌ चेहऱ्यावरती माझ्या दाटून आली होती
पानांमधुनी दुधी चांदणे चंद्र धरेवर शिंपत होता
त्या वाटेवर तुझी नि माझी ओळख पुरती पटली होती
झुळूक होऊन पुन्हा एकदा रानातुन त्या फिरून येऊ
पुन्हा एकदा क्षण ते सारे तुझे नि माझे जगून घेऊ १

आठवतंय - त्या दिवसांमध्ये एक कहाणी जुळली होती
सरळ होती वाट अचानक, वळणे घेऊन गेली होती
वाट चालता प्रवास अवघा नवीन गाणे देऊन गेला
कवितेमधली न कळलेली ओळ पुरेपुर कळली होती...
आठवते ना? चुकार पाऊस अपुल्या सोबत भिजला होता
अपुल्या नकळत डोळ्यांमध्ये हळूच येऊन निजला होता...
बालपणी त्या जत्रेमध्ये आपण दोघे चुकलो होतो
गर्दी पाहून अनोळखी अन्‌ भेदरलो, बावरलो होतो... २

आज भोवती दोघांच्याही आठवणींचीच गर्दी आहे
जरा मोकळा श्वास घ्यायची जणू अघोषित बंदी आहे
आठवती त्या गोष्टी साऱ्या म्हातारीपरी उडून गेल्या
आपण आता केवळ सोबत, इच्छा साऱ्या विरून गेल्या
हाक मारता कुणी आजही धावत जातो दोघे आपण
तशी साद पण परस्परांना घालत नाही दोघे आपण
ओळख पुरती मिटण्याआधी नवीन ओळख करून घेऊ
पुन्हा एकदा मंतरलेले क्षण ते सारे जगून घेऊ ३

नचिकेत (३/१२/२००८)