नेहमीप्रमाणे डिसेंबर उजाडला, वाटा-खोपटांमध्ये उतरलेली थंडी हाडांमध्ये शिरू लागली आणि नेहमीप्रमाणे वेध लागले ते सह्याद्रीमधल्या मोठ्या भ्रमंतीचे! २००९ मध्ये तोरणा ते रायगड, २०१० मध्ये बागलाण प्रांतातली ४ किल्ले आणि २ सुळक्यांची भटकंती असे सलग दोन डिसेंबर सार्थकी लावल्यानंतर यंदा काय, हा प्रश्न जसा अचानक पडला तसा ताबडतोब सुटलाही! आणि उत्तर होते - चक्रम हायकर्स, मुलुंड, आयोजित "सह्यांकन २०११"!
१९८३ पासून 'चक्रम' दरवर्षाआड 'सह्यांकन' या नावाने सह्याद्रीमधली दीर्घमुदतीची मोहीम आयोजित करते. यंदाच्या मोहिमेचा प्लॅन पुढीलप्रमाणे होता -
दिवस १ - रात्री मुलुंडहून प्रयाण, ढाकोबा पायथ्याच्या सिंगापूर (पळू) गावामध्ये मुक्काम.
दिवस २ - आंबोली घाटाने चढून ढाकोबा पायथा गाठणे व मुक्काम.
दिवस ३ - ढाकोबा डोंगर पाहून, उतरून दुर्ग किल्ल्याकडे प्रयाण, दुर्ग किल्ला पाहून, पायथ्याच्या दुर्गवाडीपासून हातवीज-डोणी मार्गे अहुपे येथे मुक्काम.
दिवस ४ - अहुपेहून गायदराघाटमार्गे सिद्धगडमाची, सिद्धगडकिल्ला पाहून पुन्हा माचीवर मुक्काम.
दिवस ५ - गायदराघाट चढून भट्टीच्या रानातून कोंडवळमागे भीमाशंकर व मुक्काम.
दिवस ६ - भीमाशंकरहून पदरगड पाहून, गणेशघाटाने खांडस येथे उतरून "सह्यांकन २०११"ची सांगता.
मोहिमेचा नकाशा -
(सौजन्यः 'चक्रम'ची वेबसाईट)
(प्लॅनमध्ये नकाशापेक्षा काही बदल झाले होते- दुसर्या दिवशी दुर्गवाडीऐवजी आम्ही ढाकोबा पायथ्याला मुक्काम करणार होतो आणि चौथ्या दिवशी तावलीघाटातून साखरमाचीमार्गे न जाता गायदर्याच्या पठारावरूनच गायदरा घाट उतरून सिद्धगड गाठणार होतो)
यातले बरेचसे भाग उदा. अहुपे ते भीमाशंकर, भीमाशंकर ते खांडस, दुर्ग-ढाकोबा, सिद्धगड, पदरगड हे एकेकटे ट्रेक म्हणून करता येतात. पण एकाच मोहिमेत या सर्वांना जोडून घेणार्या काहीशा परिचित-अपरिचित वाटांनी भ्रमंती हे यंदाच्या 'सह्यांकन'चे वैशिष्ट्य होते. आमची संपूर्ण मोहीम तशाच वाटांनी पार पडल्यामुळे संपूर्ण वर्णनामध्ये कदाचित काही अनवट वाटांबद्दल वाचायला मिळेल.
मला स्वतःला 'चक्रम'च्या 'सह्यांकन'बद्दल खूप उत्सुकता होती. चोख संयोजनासाठी 'सह्यांकन'चे आणि पर्यायाने 'चक्रम'चेही अतिशय आदराने नाव घेणारे अनेक जण भेटले होते. त्यामुळेच सह्यांकन २०११ च्या तारखा आल्या आल्या, ऑफिसमधून पाच दिवसांची सुट्टी टाकली आणि पहिल्याच बॅचमध्ये नाव नोंदवून टाकले. माझा खूप जुना आणि पहिल्यापासूनचा ट्रेकमित्र मयूरही येणार होता, पण त्याला आयत्यावेळी हापिसने परदेशी पाठवल्यामुळे अखेर मोहीम सुरू होताना माझ्या बॅचमध्ये मला ओळखणारा असा मीच एकटा उरलो. तसेच आमच्या बॅचमध्ये (होतकरू, हौशी इ) फोटोग्राफरही मी एकटाच असल्यामुळे या पूर्ण मोहिमेमध्ये माझे स्वतःचे फोटो कमी घेतले गेले आहेत (तुम्ही आनंदाने टाकलेला सुटकेचा निश्वास मी ऐकलाच नाही बरं!)
सह्यांकनच्या आयोजनाबद्दल खरंतर स्वतंत्र लेख लिहावा लागेल. थोडक्यात सांगायचे तर अतिशय सुनियोजित, शिस्तबद्धरित्या आखलेली आणि मुख्य म्हणजे गेली २८ वर्षे नियमितपणे सुरू असलेली एक प्रचंड दुर्गमोहीम असं वर्णन करावं लागेल. नाष्टा-चहा-जेवण - संयोजकांतर्फे! कसल्याही, अगदी कसल्याही अडचणीला तोंड द्यायला दांडगा अनुभव असलेल्या कार्यकर्त्यांची फळी टप्प्याटप्यावर सज्ज! खरं सांगतो, सह्यांकन म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ! (ते वर्णन पुढे येईलच).
सह्यांकनसाठी माझी तयारी नाव नोंदवल्या दिवसापासूनच सुरू झाली. नवे शूज, स्लीपिंग बॅग इथपासून सराव म्हणून ढाकबहिरी आणि भैरवगड असे दोन पावरफुल ट्रेकही करून झाले. ११ डिसेंबरच्या pre-सह्यांकन गटगमध्ये 'आपल्या बॅचमध्ये जवळजवळ सगळेच पन्नाशीच्या आसपासचे तरूण आहेत' हा नवा शोध लागला आणि मी पुरता बेचैन झालो! "इतका मोठा ट्रेक करायला हे वय योग्य आहे का" हा पहिला आणि 'इतर' उरलेले प्रश्नही शेवटपर्यंत मनातच राहिले. हां हां म्हणता दिवस उलटले आणि पाच दिवसांच्या मोठ्या, दीर्घ, खडतर, कष्टप्रद इ इ (स्वतःहून ओढवून घेतलेल्या) पायपीटीच्या प्रस्थानाचा दिवस उजाडला. मी पहिली बॅच घेतल्यामुळे १९ डिसेंबरला रात्री मुलुंडहून निघायचे होते.
११ तारखेच्या गटगमध्ये 'चक्रम'च्या एका पदाधिकार्याने वेळेचे महत्त्व बराच वेळ भाषण करून समजावून दिले होते. काय वाट्टेल ते झाले तरी गाडी नऊ वाजता सुटेल, तुम्ही साडेआठलाच हजर रहा अशी भक्कम तंबीही होती. त्यामुळे १८ तारखेला जरी 'उद्या गाडी साडेनऊला सुटेल' असा 'चक्रम'मधून निरोप आला असला तरी मी उगाच 'बस मिस' व्हायला नको म्हणून जेवण सोडून आठ वाजताच चक्रमच्या ऑफिसमध्ये पोचलो. आणि तिथे गेल्यावर कळले, की काही खरंच अपरिहार्य कारणामुळे बस अनिश्चित काळ उशीरा येणार आहे! ('सह्यांकन'चं आयोजन हे खरंच एक प्रचंड मोठं काम आहे, त्यात अशा आयत्यावेळेच्या अडचणींना गोष्टींना संयोजकांना सामोरे जावंच लागतं. आमच्यानंतर एकाही बॅचला असा उशीर झाला नाही, हे उल्लेखनीय!)
या सुरूवातीच्या सगळ्या भ्रमनिरासामध्ये एकच गोष्ट अत्यंत आनंददायी होती, ती म्हणजे आमच्या बॅचचा लीडर - विनय नाफडे उर्फ लांबा! वय ५० च्या आसपास, तरीही, हक्काने ज्याला 'अरे लांबा' म्हणू शकतो असा एकदम मस्त माणूस! साडेसहा फूट उंच हे व्यक्तिमत्त्व अजब आहे! गेल्या पस्तीस वर्षांपासून ट्रेक करत असलेल्या या माणसाकडे अनुभवाबरोबरच अफाट एनर्जी, कुठल्याही (लिटरली कुठल्याही) विषयावर तासनतास बोलण्याची तयारी, उत्तम विनोदबुद्धी, आणि कमालीचा खेळकर पण तोडफोड स्वभाव हे सद्गुण अगदी ठासून भरले आहेत. सह्यांकनप्रमाणेच लांबाचीही सत्कीर्ती मी ऐकली होती. त्यामुळे हा आपला लीडर आहे म्हटल्यावर मी तर अगदी ज्जामच खूष झालो होतो. लीडरप्रमाणेच बॅचमध्येही एक एक नमुने भेटले. एक गोष्ट फार उत्तम झाली ती म्हणजे, बॅचची पटसंख्या अवघी १७ होती. पण त्यात वय वर्षे १३ पासून ५७ पर्यंतची व्यक्तिमत्त्वे एकत्र आली होती. दोन शाळकरी मुले सोडली तर तिशीच्या आतला तरूण वगैरे मी एकटाच होतो. त्यातला एक तर आत्ता दहावीमध्ये शिकतोय. तो मोहिमेमध्ये आलेला पाहून मी त्याच्या ('अविचारी', पाल्याकडे 'दुर्लक्ष' करणार्या) मातापित्यांच्या धाडसाला मनातूनच साष्टांग नव्हे, दशांग नमस्कार घातला.
अखेर, बस यायला पावणेबारा वाजले. मग विलंबाबद्दल त्या पदाधिकार्याचा औपचारिक माफीनामा पार पडला आणि आम्ही सर्वांनी झोप पूर्ण होण्यासाठी लवकर बस सोडायची असल्यामुळे तो लग्गेच (मौनानेच) स्वीकारलाही! बस सुरू झाली आणि आम्ही सर्व आपापल्या सीटवर झोपलो सुद्धा! लांबा बहुधा जागा होता.
सिंगापूरला पोहोचलो तेव्हा पहाटेचे तीन वाजले होते. बसमधून उतरल्या उतरल्या अंधारात डोळे फाडून आजूबाजूला बघत असताना अचानक चिरपरिचित नानाच्या अंगठ्याने दर्शन दिले. म्हणजे पलिकडचा कडा हा नाणेघाट असणार!
एका शाळेच्या खोलीत आणि व्हरांड्यात निवासाची सोय होती. तिथे आम्ही आपापले बिछाने अंथरले. मुक्कामाच्या ठिकाणी अतिशय उशीरा पोहोचल्यामुळे उद्या साडेसात ऐवजी एक तास उशीरा निघायचे आहे, असे लीडर्सने डिक्लेअर करून जरासा दिलासा दिला. वद्यपक्षातली चंद्रकोर उगवली होती. व्हरांड्याच्या समोर उरलेल्या अंधारात जीवधन किल्ला आणि व्हरांड्यामध्ये पांघरूणांमध्ये आम्ही साडेतीन वाजता गुडूप झालो होतो.
गेले दोन महिने केवळ मनातल्या मनातच कैकदा पूर्ण केलेली सह्यांकन मोहीम प्रत्यक्ष सुरू व्हायला आता फक्त पाच तास उरले होते...
(क्रमशः)
-- नचिकेत जोशी
4 comments:
काय भाऊ?
लोकांच्या प्रतिक्रिया पाहून मग पुढचे लिवनार काय?
आपन काय तुमाला वंगाळ नाय बोललो!
काय की आपन तुमाला लय मानतो भ्हो !
जरा साव्रून घ्या !
लांबा
superb writing, i can't attend the shyakan-2011, but now i feel , i already there & enjoying each movement of camp, hats too CHAKRAM TEAM MEMBERS.- ASHOK NARVEKAR
this entire description of the events is too good to the actual trek. One thing i must appreciate about Nachiket (I mean "Koshimbeer")is that he is just fantastic human being though he has written almost nothing about himself; as they say " if you want people to talk good about u, then u should not talk anything about yourself. SAHYANKAN 2011 is WORNDERFULL experience. gr8 salute DANDU and LAMBA. Mohimechya shevti me lambachya ekandar bolnyache vajan kele , te javal javal 18 kilo bharle. sachin karambelkar
thanks! :)
Post a Comment