Pages

Tuesday, December 27, 2022

बापपण

तो निरखत असतो रात्रंदिवस तिचा चेहरा,

(कधी रात्र रात्र जागाच असतो)

तिच्या चेहर्यावर फुलणारं तेज,

मंदावत जाणार्या हालचाली.

पाहत असतो आशेने

बदलत जाणार्या आवडीनिवडी,

सैलावत जाणारं घर.

 

हौसेने पुरवत असतो तिचे

नवीन हट्ट, लाडिक आग्रह

झेलायला तयार असतो

तिचा प्रत्येक शब्द

 

आई-मावशा-काकवा-आज्या

कुजबुजत असतात फोनवर

औषधं-पथ्यं आणि काही कानगोष्टी

सुरू असतात दिवसभर

 

तो मात्र आठवत राहतो  -

काही महिन्यांपूर्वी दोघांनी मिळून पाहिलेलं स्वप्न,

डोळे मिटून अधीरतेने बघत राहतो

स्वप्नपूर्तीचा जवळ येत जाणारा क्षण!

एक शाश्वत आधार, एक प्रेमळ घर,

एक उगम, एक अंत

एक ओळख, एक अस्तित्त्व

आणि शब्दात बसणारी खात्री

वाटत असते त्याला

त्या स्वप्नाबद्दल

 

स्वतःच्या बाबांशी आईच्या काळजीने

बोलणार्या तिला पाहून

सुखावतो त्याच्यातला होणारा बाबा

'काही वर्षांनी आपल्याशीही असंच

कुणीतरी बोलेल' या कल्पनेने

सुखावून जातं त्यांचं मन

आणि सार्थ झाल्यासारखं वाटतं त्याचं पुरूषपण!

 

तिच्या हिंदोळ्यावर झुलत राहते

त्याची आशा

नाजुक फुलं, निरागस कळ्या, सुगंधी गजरे

तिने मागितले की

आसमानात पोचतो त्याचा आनंद.

मारामारीचे पिक्चर, जीमच्या जाहिराती, क्रिकेट मॅचेस

ती बघायला लागली की कसंनुसं होतं त्याला...

 

त्याचा असा चेहरा बघितला की

घरातले मोठे-जाणते येतात आधाराला

तो फक्त पाहतो तिच्याकडे

कळतं या मनातलं त्या मनाला

 

तो बसतो विचार करत

थोडासा घाबरत घाबरत

एकच चिंता असते

दिवसरात्र भेडसावत -

'मुलीऐवजी मुलगा झाला तर?'

 

- नचिकेत जोशी (१६//२०१४)

Thursday, January 6, 2022

एका अस्वस्थ मुलीची गोष्ट


VOPAची संचालक असलेल्या ऋतुजाने आपल्या व्यापातून वेळ काढून तिच्या ‘दादा’ला पाठवलेलं पत्र काल मिळालं आणि मन क्षणात भूतकाळात भटकून आलं. “आपल्याला कशात करिअर करायचं आहे” हे माहीतच नसलेली अनेक मुलं मला जवळजवळ प्रत्येक ट्रेनिंगमध्ये भेटतात. आणि अशा फेजमधून मी स्वत:ही गेलो असल्यामुळे ह्यात त्यांची चूक आहे असं मला कधीही वाटत नाही. पण अशांसाठी ऋतुजा नक्की एक रोल मॉडेल आहे.
*******************

गेल्या तेरा वर्षांत Aptitude Trainingच्या निमित्ताने खूप फिरायला मिळालं. ह्या काळात हजारो तासांची सेशन्स झाली, लाखभर किमी प्रवास झाला. अंदाजे अठरा-एकोणीस हजार विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्याची संधी मिळाली. हौसेने आणि आवडीने शिक्षक बनलेल्या आम्हा विद्यार्थीवेड्या ट्रेनर्सच्या आयुष्यातला सगळ्यात अमूल्य ठेवा कुठला असेल तर तो म्हणजे ट्रेनिंग संपल्यावरही पुढची अनेक वर्षे संपर्क ठेवणारे आणि मग कालांतराने मित्र बनून गेलेले विद्यार्थी-विद्यार्थीनी. सात-आठ वर्षांपूर्वी कोपरगावच्या संजीवनी कॉलेज ऑफ इंजीनीरिंगमध्ये ट्रेनिंगचा पहिल्या दिवस संपल्यानंतरची ती संध्याकाळ मला स्वच्छ आठवते. आम्ही सगळे ट्रेनर्स, आमचे बॉस कॅम्पसमधल्या कॉफी शॉपमध्ये बसलो होतो. आमच्या बॉसने त्या दिवशीच्या ट्रेनिंगबद्दलचा एका विद्यार्थीनीचा SMS वर आलेला (त्याकाळी WhatsApp नव्हतं किंवा एवढं फेमस नव्हतं) फीडबॅक वाचून दाखवला. त्यात तिने तीन ट्रेनर्सच्या शिकवण्याचं कौतुक केलं होतं. त्यातला एक मी होतो हे माझं भाग्य. आपलं शिकवणं आवडतंय हयाहून जास्त जॉब सॅटीसफॅक्शन एखाद्या शिक्षकासाठी दुसरं काहीच असू शकत नाही. त्या दिवशी ते शिकवणं अनेकांना आवडलं, पण आवर्जून सांगायला पुढे आलेल्या त्या मुलीने लक्ष वेधून घेतलं. त्या मुलीशी - ऋतुजाशी, मग नंतर ओघाने परिचय झालाच. ट्रेनिंग सुरू असतांना ऋतुजा म्हणजे अत्यंत सिंसिअर, सेशन्सला वेळेवर येणारी मुलगी एवढीच ओळख होती. ट्रेनिंग संपल्यानंतर - अगदी पासआऊट झाल्यानंतरही तिने संपर्क ठेवला. एव्हाना ‘सर’ वरुन मी तिचा ‘दादा’ झालो होतो. अर्थात अशी बहीण मिळणं भाग्याचंच! त्या ट्रेनिंगनंतर हा लेख लिहीत असेपर्यन्त आम्ही एकूण 2 वेळा भेटलो असू, पण न भेटताही संवाद होत असतोच. (आणि ऋतुजा, हा माझा समजूतदारपणा आहे, बरं का! – कधीतरी भेटावंही!) आम्ही दरवेळी फोनवर बोलायचो तेव्हा तिची स्वप्नं, तिची घुसमट, तिचं त्यावेळी क्लियर नसलेलं ध्येय, पण वाट सापडत नाहीये म्हणून असलेल frustration हे सगळं ती शेअर करायची. रूढार्थाने घरच्यांच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षा आणि तिच्या स्वत:कडून असलेल्या अपेक्षा ह्यांचा काही मेळ लागायचा नाही. पण ह्या सगळ्या प्रवासात कॉलेजमध्ये न दिसलेली निग्रही, आशावादी, जिद्दी, बंडखोर आणि संवेदनशील ऋतुजा दिसत गेली. “आपल्याला कशात करिअर करायचं आहे” हे माहीतच नसलेली अनेक मुलं मला जवळजवळ प्रत्येक ट्रेनिंगमध्ये भेटतात. अशांसाठी ऋतुजा नक्की एक रोल मॉडेल आहे. इंजीनीरिंगनंतर आयुष्याची वाट सापडेपर्यंत (नाइलाजाने) तिने सॉफ्टवेअरमध्ये जॉब केला. मग एक अटळ क्षण असा आला की निर्णय पक्का झाला आणि मग सुरू झाला एक अत्यंत संघर्षमय पण स्वेच्छेने स्वीकारलेला खडतर प्रवास. ह्या मार्गावर होकारापेक्षा नकार जास्त होते-आहेत पण कशाहीपेक्षा ‘मला आयुष्यात काय करायचं आहे हे आता नक्की झालं आहे’ हा आनंद जास्त होता. ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री फेलोशिप, मग औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्यक्ष फील्डवर्क, मग नगरला ‘स्नेहालय’मध्ये काम असे टप्पे घेत घेत ऋतुजाने VOPA (Vowels Of the People Association) ह्या सामाजिक संस्थेत कामाला सुरुवात केली. ‘समाजासाठी काहीतरी करायचं आहे’ ह्या आत्यंतिक इच्छेला अखेर हक्काचं घर मिळालं. ही मुलगी जिद्दी आहे, मनस्वी आहे, सदैव अस्वस्थ आहे. ही अस्वस्थताच हिला नेहमी पुढे पुढे घेऊन जाईल हे नक्की. ट्रेनिंगच्या पहिल्या दिवसांनंतर तिने दिलेला फीडबॅक आणि काल आलेलं पत्र ह्याचा अर्थ एवढाच की, ती आजही तशीच आहे - कृतज्ञ, संवेदनशील आणि अस्वस्थ!

आज महाराष्ट्रातल्या शब्दश: लाखो विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन शिक्षणासाठी VOPAने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. कोरोनाकाळात हे काम खरोखर अमूल्य आहे. सध्या शिक्षणाचे मानवनिर्मित हाल सुरू असतांना त्याच अनागोंदीत VOPAने तयार केलेला ऑनलाइन प्लॅटफॉर्म महाराष्ट्रभर विशेषत: खेडोपाडी भरीव योगदान देतो आहे. हे एकट्याचे काम नोहे! ऋतुजाची टीम तिच्यासारखीच ध्येयवेडी आणि धडपडी आहे. ती आणि तिची टीम आनंदाने, झोकून देऊन हे काम करत आहेत, हे महत्त्वाचे! नुकतीच ऋतुजाच्या स्टेटसला “VOPA is hiring’ची पोस्ट पाहिली आणि वाटलं - ‘सही जा रहे हो!’ 
प्रिय वाचकहो, मी काय योगदान देऊ इच्छितो हे तिला मी सांगितलं आहेच, पण VOPAसाठी आणि पर्यायाने पुढील पिढीच्या शिक्षणासाठी आपल्यालाही काही करता येणे शक्य असेल तर जरूर करा. 

VOPA ची वेबसाइट: (https://vopa.in/free-online-education/)

‘बोल भिडू’ने वोपाच्या कामाची घेतलेली दखल: https://bolbhidu.com/vschool-for-free-and-quality-education/

- नचिकेत जोशी