Pages

Tuesday, December 27, 2011

'दुर्ग दुर्गट भारी' - एक वेगळा उपक्रम

सह्याद्री पर्वतरांग ही एक अत्यंत मोहमयी चीज आहे. सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांत भटकायचं व्यसन लागलं की ते इतर तमाम व्यसनांप्रमाणेच सुटता सुटत नाही. गेली काही वर्षे अशी भटकंती केल्यानंतर या भटकंतीमधल्या अनुभवाचा कसा उपयोग करून घेता येईल यावर 'ई-साहित्य प्रतिष्ठान'च्या सुनिल सामंत यांच्याशी गप्पा मारता मारता 'दुर्ग दुर्गट भारी'ची कल्पना सुचली.

सध्याच्या काळात, "डोंगर थोडे, ट्रेकर फार" अशी अवस्था आहे. पण तरीही, उपयुक्त माहिती नवख्या उत्साही ट्रेकर्सना बर्‍याचदा मिळतेच असं नाही. मग अशा प्रकारची माहिती एकाच जागी मिळाली तर किती फायदा होईल? आणि अशी वाचनीय माहिती घरबसल्या ईमेलवर मिळाली तर? आणि तीही विनामूल्य मिळाली तर? ह्या सर्व गोष्टी 'दुर्ग दुर्गट भारी' मधून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत.

'दुर्ग दुर्गट भारी' ही 'ई-साहित्य प्रतिष्ठान'ची किल्ल्यांवर आधारित अशी एक ई-पुस्तक मालिका आहे. एक किल्ला, त्याचा इतिहास-भूगोल, पायथ्यापर्यंत पोचायचे मार्ग, किल्ल्यावर जाणार्‍या वाटांची माहिती, राहण्याची-पाण्याची सोय, त्या किल्ल्याच्या भटकंतीबद्दल ब्लॉग/वेबसाईटवर उपलब्ध असलेले दर्जेदार लेख(अर्थात लेखकाच्या पूर्वपरवानगीने) , ट्रेकींगला जाताना करायची पूर्वतयारी अशी भरगच्च माहिती असलेला 'दुर्ग दुर्गट भारी'चा अंक सध्या पीडीएफ स्वरूपात पोहोचवला जातो. जून २०११ मध्ये शिवराज्याभिषेकदिनाच्या सुमुहुर्तावर किल्ले रायगडावर उद्घाटन झालेल्या या उपक्रमाचे आतापर्यंत रायगड, पेब, पन्हाळगड ते विशाळगड (जंगली मार्ग), सिंहगड आणि रायरेश्वर-केंजळगड असे पाच अंक वितरित झाले आहेत. पहिला अंक साधारण ८०००० वाचकांपर्यंत पोहोचला. सध्या हा आकडा एक लाखापेक्षा अधिक आहे.

देश-विदेशातून सर्व वयोगटातील वाचकांचे भरभरून तसेच भावनिक, व्यावहारिक, मार्गदर्शक प्रतिसाद या उपक्रमाला लाभत आहेत. सध्या साधारण महिन्याला एक अंक अशी योजना आहे. सह्याद्रीतल्या किल्ल्यांची संख्या पाहता हा एक दीर्घकाळ चालणारा प्रवास आहे, हे सांगायला नकोच!

हा अंक जर कोणाला विनामूल्य हवा असेल, तर durgabhari@gmail.com इथे तसा इमेल करावा.

तसेच, या अंकांच्या निर्मितीमध्ये आपापले उद्योग सांभाळून जर कुणाला सहभागी व्हायचे असेल तर मला संपर्कातून लगेच कळवा अथवा तसा इमेल वरील पत्त्यावर पाठवा. त्यासाठी 'मनापासून, उत्साहाने, चिकाटीने केवळ छंद म्हणून काम करणारा/री' एवढीच पात्रता आहे. किल्ल्यांची माहिती नसली तरी चालेल. मराठी टायपिंग, page setup इ बाकीच्या कामांतही तुमची मदत होऊ शकेल. योग्य माणसाची निवड करण्यास आम्हीही उत्सुक आहोत.

आपला,
- नचिकेत जोशी (आनंदयात्री)
मुख्य संपादक,
'दुर्ग दुर्गट भारी'

तळटीपः 'दुर्ग दुर्गट भारी' हा एक संपूर्ण 'छांदिष्ट' प्रकल्प आहे. या अंकाच्या विक्री तसेच जाहिरातीतून कुठलीही आर्थिक कमाई केली जात नाही.

Monday, December 26, 2011

दूर चालली वाट

दूर चालली वाट अनामिक कितीक आले, कितीक गेले
या वाटेने मुक्कामाला शोधत हे आयुष्य निघाले

कधी थांबलो वळणावरती, जरा विसावा हवा म्हणूनी
नंतर कळले, निसटून गेली, मोठी संधी क्षणात पुढुनी
पुन्हा जुळविता पाऊल सोबत, दु:ख जरासे हलके झाले
या वाटेने मुक्कामाला शोधत हे आयुष्य निघाले १

कधी गवसले आपुलकीचे झरे आगळे मातीमधले
तहान शमता पुढे जावया, थकले चेहरे पुन्हा उजळले
कमान होऊन अवतीभवती इंद्रधनुने रंग उधळले
या वाटेने मुक्कामाला शोधत हे आयुष्य निघाले २

ऋतुराजाचे अन् राण्यांचे इथे पाहिले रम्य सोहळे
स्वतःमध्येही रमण्याइतके इथे भोगले बाल्य कोवळे
कधी काळच्या शपथांमधले भावविश्व गलबलून आले
या वाटेने मुक्कामाला शोधत हे आयुष्य निघाले ३

धुळीत इथल्या दिसते जगणे निघून गेल्या वाटसरूंचे
कुठेच नसती ठसे पुसटसेही माघारी आलेल्यांचे
पाऊल पाऊल जगता जगता हेही कोडे उलगडले
या वाटेने मुक्कामाला शोधत हे आयुष्य निघाले ४

- नचिकेत जोशी (१७/१२/२०११)
वृत्त - वनहरिणी (८-८-८-८)
या कवितेवर आधारित ध्वनिचित्रमुद्रण जालरंग प्रकाशनाच्या ’शब्दगाऽऽरवा २०११’ या हिवाळी अंकात प्रसिद्ध झाले आहे.
त्याची लिंक -
http://hivaaliank2011.blogspot.com/search/label/%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3?max-results=1

Wednesday, December 14, 2011

स्वप्न

तुझं पहिल्यापासून असंच!

स्वप्नांची पेरणी करत करत
वाट चालायचा तुझा स्वभाव!
पण स्वप्नं रुजून वर आली की
ती खुडून ओंजळीत घ्यायला तू
तिथे नसणारच!
तू पुढच्या वळणाच्याही पुढे पसार!
आणि यांचा उपभोग घेणारे नेहमी वेगळेच असणार!
बरं, याला तुझा नि:स्वार्थीपणा म्हणावं तर तसंही नाही!
तुझा हेतू फक्त पेरणीचाच - फळाची आशा तुला नाहीच!
उमलून आलेली तुझीच स्वप्नं
ऋतुभर तुझी वाट बघत डोलायची...
आणि एक दिवस पुन्हा मातीमोल होऊन जायची..

तुला असा स्वप्नांचा फक्त प्रवासच करायचा होता,
हे उशीरा कळलं..

आता वाटतं, मी तुझं स्वप्न झालो नसतो,
तर फार फार बरं होतं!
'हे स्वप्न फार वेगळं आहे,
हे एकवेळ पुन्हा मातीत मिसळेल,
पण दुसर्‍या कुणाच्या हवाली होणार नाही'
असं येणारे जाणारे म्हणायचे ते खरंच होतं!

- नचिकेत जोशी (१४/१२/२०११)

Wednesday, December 7, 2011

भैरवगड (मोरोशी) - केवळ थ रा र क!

हजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर! आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर यावी इतकी खोली, सकाळी अकरा वाजताही सूर्यकिरणे अडवली जातील अशा डोंगरांचा शेजार! त्याच्या एका बाजूला सरळसोट भिंत आणि दुसर्‍या बाजूच्या पोटात कोरलेली वेडीवाकडी कातळवाट! त्या भिंतीखाली थोडंस मोकळं पठार, त्याखाली बर्‍यापैकी उताराच्या वाटा आणि पायथ्याला वळसा मारून माळशेजकडे जाणारा कल्याण-नगर रस्ता! - भैरवगड या वर्णनापेक्षाही अधिक काहीतरी आहे!


कल्याण डेपोला शनिवार, ३ डिसेंबरला रात्री सगळे जमलो तेव्हा एक थरारक ट्रेक आपल्या नशिबात वाढून ठेवला आहे, याची मला अजिबात कल्पना नव्हती. 'ऑफबीट'च्या ब्लॉगवर टेक्निकल ट्रेक असं लिहिलं होतं, माहितीसाठी फोटो टाकलेले होते तरीही त्या फोटो-माहितीवरून भैरवगडाचा रोमांच कळला नाही. तो अनुभव प्रत्यक्षच घ्यायला हवा.

यावेळी "ऑफबीट"च्या भैरवगड ट्रेकचे लीडर होते - प्रीती, राजस आणि कदाचित टेक्निकल असल्यामुळे - सुन्या आंबोलकर. यष्टीमध्ये दोन-अडीच तासांचा प्रवास करून कल्याण-नगर रस्त्यावरील 'मोरोशी' या भैरवगडाच्या पायथ्याला असणार्‍या गावाला पोचायचे होते. एसटीमध्ये बसल्या बसल्या झोप घेता येईल अशा कल्पनेत जुन्या ओळखीच्या ट्रेकमेट्सची ख्याली-खुशाली विचारून झाली. थोड्याच वेळात "एसटी आली" असा आवाज झाला आणि प्रचंड गर्दी असल्यामुळे एसटी थांबत असतानाच खिडक्या उघडून खालूनच आतमध्ये बॅगा टाकून दिल्या. थोड्यावेळाने कळले, ती आमची एसटी नव्हतीच! मग पुन्हा खालूनच आतल्या प्रवाशांना सांगून त्या बॅगा काढून घेतल्या. (त्या धांदलीत बहुधा आमच्यापैकी कुणाच्याच नसलेल्या एक-दोन बॅगाही खाली आल्या असाव्यात असे नंतरच्या गोंधळावरून वाटले). मग आमचीही एसटी थोड्याच वेळात आली आणि कशाबशा दोन सीट्स मिळवल्या. मोरोशीपर्यंत प्रवास उभ्यानेच करावा लागणार होता.

एसटी सुरू झाली आणि आमची गाणीही! ट्रेकच्या मूडमध्ये असलो की एसटी, बाकीचे पेंगुळलेले लोक, काळ-वेळ याचं भान राहत नाही! (आजूबाजूचे लोक बर्‍याचदा आमचे हे 'उद्योग' चालवून घेतात.) पण तेव्हा मात्र आमची सूर-ताल(आणि प्रसंगी शब्दही) या सर्वांना सोडून चाललेली गाणी ऐकून कंडक्टर खवळला! "तुमचं हे जे काय आहे ते मुरबाड गेल्यावर करायचं" - इति कंडक्टर! ट्रेकमधल्या आमच्या एका जिव्हाळ्याच्या कार्यक्रमाचा असा उद्धार झालेला पाहून २२ फुल ऐवजी ४४ हाफ तिकीटे काढावीत असा "सूडविचार" माझ्या मनात येऊन गेला! अखेर कंडक्टर शेवटच्या सीटपर्यंत राउंड मारून गेला, लाईट बंद झाले आणि आमची गाणी मुरबाड यायच्या आधीच पुन्हा सुरू झाली!

मोरोशीला उतरलो तेव्हा बारा वाजून गेले होते. रस्त्यालगतच्या एका घर कम हाटेलात संयोजकांनी आधीच कल्पना देऊन ठेवलेली असावी. सुनसान रस्ता, उगवतीकडे काळोखात अस्पष्ट दिसणारी भैरवगडाची रांग, थोडीशी थंडी आणि त्या घरवाल्यांनी ऑफर केलेला चहा! क्या बात! कोण नाही म्हणेल? मग चहाचा राऊंड झाला. त्यांच्या अंगणात परिचयाचा कार्यक्रम पार पडला. मी नुकतेच घेतलेले हंटर शूज 'टेस्ट' करण्यासाठी घातले होते. त्यांच्या लांबलचक लेस त्या वेळात मी लावून घेतल्या.


प्रीतीने कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त घाबरवून सोडणार्‍या सूचना दिल्या. 'या भागात भरपूर विषारी साप आहेत. ते रात्रीच्याच वेळी अधिक अ‍ॅक्टीव्ह असतत. मान्सून नंतर या भागात येणार आपण दुसरे किंवा तिसरेच असू, त्यामुळे एकत्र चाला, प्रत्येकाकडे टॉर्च.... इ इ इ ' नुकत्याच झालेल्या वासोटा ट्रेकमधल्या अनपेक्षित "हिस्स" प्रसंगामुळे ही खबरदारी असावी. आम्हाला मुख्य चढणीचा भाग पार करून पठारावरच्या भैरोबाच्या वाडीपर्यंत जायचे होते. तिथे मुक्काम करून मग दुसर्‍या दिवशी सकाळी गड चढायचा होता. तिथलाच एक गावकरी वाटाड्या म्हणून येणार होता. पाऊण वाजता बॅगा पाठीवर टाकून निघालो. थोडे अंतर रस्त्यानेच चालून मग शेतातून एक पायवाट पकडली. नाकाबंदीसारखं काहीतरी रस्त्यावर लागलं होतं. तिथल्या पोलिसाने "भैरवगड का? वाटाड्या घेतला आहे का?" वगैरे चौकशी केली.

पायवाटेने थोडे अंतर चाललो असू, तेवढ्यात आमच्या वाटाड्याने एका बंद घराच्या पडवीत नेले आणि इथेच आराम करा असे म्हणू लागला. रानात वाट काट्यांची आहे, साप आहेत, रात्री चढता येणार नाही वगैरे वगैरे कारणे दिल्यावर आम्हाला 'वेगळीच' शंका आली. लीडरलोक्सांनी त्याला बाजूला नेऊन काय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकला. आणि मग त्या वाटेने वीसएक टॉर्च एकापाठोपाठ लखलखू लागले. सवयीने आमच्या जागाही आता ठरून गेल्या आहेत. नेहमीप्रमाणे सुशील आणि मी सुन्याबरोबर बॅकलीडला होतो. उतरताना आम्ही बरोब्बर फ्रंटलीडला असतो. वाट शोधायची असेल तर आम्ही कुठेही असतो - झाडीत, घळीत, निवडुंगात इ.इ. लीड-बिड ह्या सगळ्या मोहमयी गोष्टी आहेत! everyone will walk either behind us or in front of us असं सोप्पं सूत्र आहे! असो. 'पहिलटकरांना' "चले चलो"चा नारा देत, मागे कुणीही राहणार नाही याची काळजी घेत दोन-अडीच तास उभट चढ, सपाट पठार यावरून चालून अखेर भैरोबाच्या वाडीजवळ आलो. इथे दोन-चार उत्साही लोक शेकोटीसाठी लाकडं शोधायला निघून गेले.

शेकोटी पेटवली आणि पाच पर्यंत फक्त भुतांच्याच गप्पा टाकल्या.


उघड्यावर तासभर झोप लागली असावी. थंडी वाढल्यामुळे तमाम जनता कुडकुडत होती. मी पावणेसहा पासून जागाच होतो. काळोख संपत जातानाची ही वेळ फार सुंदर असते. एकही शब्द न बोलता, कसलाही विचार न करता, शांतपणे श्वास घेत फक्त स्वस्थ पडून होतो. साडेसहाच्या सुमारास आकाश हळूहळू उजळायला लागलं आणि आजूबाजूचा नजारा दिसायला लागला.


मुक्कामाची जागा नि:संशय सुंदर होती. डोंगरकड्यापासून वीसएक फुटांवर आम्ही पथार्‍या पसरल्या होत्या. विरूद्ध बाजूला भैरवगडाची भिंत. बाजूला घळ आणि लगेचच अजून एक भैरवगडापेक्षाही उंच डोंगर. तिथून उजवीकडे पार नानाच्या अंगठ्यापर्यंत गेलेली डोंगररांग. नुकताच गिलावा दिला असावा असे सरळसोट कडे आणि त्यांच्या समोर दूरवर नजर जाईल तिथपर्यंत जमीन!


टाईमपास करत सगळं आवरून निघायला आठ वाजले. भैरोबाची वाडी निर्मनुष्य आहे. पूर्वी इथे वस्ती होती असं म्हणतात. आता एखाद-दुसरं पडकं घर आहे. तिथलीच लाकडं आणून आमचा आदल्या रात्रीचा 'शेकोटीचॅट' पार पडला होता. भैरवगडाला पायथ्याला डाव्या दिशेने पूर्ण वळसा घालून वाट जाते.
त्यावाटेवर ही काकडीसारखी दिसणारी वनस्पती दिसली..


वाटेत एके ठिकाणी पाण्याचे टाके आहे. तिथे बाटल्या भरून घेतल्या.
टाक्याजवळ सुन्या - द लीडर!


डाव्या हाताला गेलो की भैरवगडाकडे एक सोंड चढून वाट जाते. (ही एकमेव वाट आहे). 'खरा' ट्रेक इथून सुरू होतो.


तिथून बाजूच्या डोंगररांगेचा फोटॉ -


एक थोडासा घसरडा पॅच पार केला की आपण गडाच्या मागच्या बाजूला येतो. आणि.... इतका वेळ पायवाटेशी असलेला संपर्क संपतो. इथून फक्त आणि फक्त सरळसोट कातळ लीडरवरच्या विश्वासापेक्षाही स्वत:वर अधिक विश्वास ठेऊन चढायचे.
या टप्प्यावर एके ठिकाणी एक खोलगट रिकामं टाकं असावं अशी जागा आहे. तिथे सर्वांनी बॅगा ठेवल्या. इथून वर ट्रॅवर्स मारून चढायचे असल्यामुळे, पाय ठेवण्यास योग्य खाच नसल्यामुळे आणि मागे लगेचच एक्स्पोजर असल्यामुळे (दोन-तीन पावलांवर खोल दरी असली की वाटेच्या त्या बाजूला 'एक्स्पोजर' असे म्हणतात) लीडर्सनी तिथे बिले लावले होते. अप्पर बिलेपाशी विश्वेश, तर लोअर बिलेपाशी सुन्या उभा होता. तो पॅच घाबरत, धडधडत किंवा आरामात पार करून एखादा वर आला की त्याच्या कमरेला लावलेला बोलाईन (हा नॉटचा एक प्रकार आहे) सोडायला अस्मादिक तिथे हजर होते. (जल्ला एकदा हे रॉक क्लायबिंगचे तंत्र शिकायचे आहे!) कुठलाही गोंधळ न होता, शिस्तबद्धपणे सर्वच्या सर्व २२ जण एकामागून एक तो पॅच चढण्याचा पराक्रम करते झाले. त्याचे हे फोटो -
सुन्या आणि प्रीती


सुन्या आणि वर विश्वेश बिले लावत असताना -


ज्याच्या भरवशावर ही चढाई झाली तो अँकर -


हे आमच्यातले सर्वात 'तरूण' नारायणकाका (यो रॉक्सच्या वासोट्यावरील लेखात यांच्या उडीचा फोटॉ आहे)


यानंतरही गडाचा माथा बराच वर आहे. त्या पॅचपासून पुढे अरूंद, अनियमीत अशा चिक्कार पायर्‍या आहेत. (हे सगळे इंग्रजांचे उद्योग असावेत!)


गडाच्या माथ्यावर अस्ताव्यस्त वाढलेला निवडुंग! त्याचे टोचणारे काटे टाळत प्रसंगी रांगत, घसरत चढावे लागते. हे एवढे सगळे उपद्व्याप करून जेव्हा वर पोचतो, तेव्हा स्वागताला असतो - आजूबाजूचा नितांतसुंदर नजारा. अफाट पसरलेला व्ह्यू इथून दिसतो. साधारण ईशान्येला हरिश्चंद्रगड-तारामती शिखर आणि सुप्रसिद्ध कोकणकडा, त्याच्या उजवीकडे घड्या पडलेल्या डोंगररांगा, पश्चिमेकडे नानाचा अंगठा, नैऋत्येकडे नाणेघाटाचे पठार, बोरांड्याच्या नाळेने नाणेघाट चढून गेल्यावर लागणारे वीजेचे टॉवर्स आणि उत्तर-पश्चिमेकडे नजर पोचेल तिथपर्यंत विस्तीर्ण सपाट प्रदेश, एवढा मामला आहे!!


गडावर बाकी काहीही नाही. दरवाजा नाही, निवासी बांधकाम नाही, तटबंदी नाही, बुरूज नाही! गडाचा वापर माळशेजसारख्या महत्त्वाच्या प्रदेशावर केवळ टेळणीसाठीच होत असावा.

अर्ध्या तासात परत फिरलो. आता उतरताना तर आणखी अवघड प्रकार होता. कारण कडा, कातळ, एक्सपोजर हे सगळे आता डोळ्यांसमोर असणार होतं.
तिथे भीतीचे अ‍ॅटॅक येण्यापेक्षा अशावेळी कड्याकडे तोंड आणि दरीकडे पाठ करून उतरणे हा उत्तम उपाय असतो. १० पायर्‍यांच्या एका पॅचवर माझी काही सेकंद ज्ज्जाम टरकली होती. पाठीमागे खोल दरी असताना पाय ठेवायला जागा नाही असे वाटणे, ही भीती फार भयानक असते. इतकी, की पुढच्या पॅचला असली भीती टाळण्यासाठी सरळ दरीकडे तोंड करून उतरावे का, असा (अ)विचार मी करत होतो.
(अवांतरः अनुभवांती असे वाटते की, नवख्या ट्रेकरला चढ/उतरताना दिली गेलेली त्याच्या दृष्टीने सर्वात भीतीदायक सूचना ही आहे - "तू जिथे हात ठेवला आहेस तिथे पाय ठेवायला हवा होतास!") असो. तर उतरतांना पन्नास फुटाच्या एका पॅचजवळ लीडर्सलोकांनी रॅपलिंगचा वापर केला आणि आम्ही सर्व २२ बहाद्दर वीर सुखरूप खाली परतलो.
हा दोरावर मी, खाली सुन्या -


ढाकचा रॉकपॅच हा आपण केलेला सर्वात थरारक ट्रेक होता' ही माझी समजूत चुकीची होती. ढाक जर यत्ता पहिली असेल तर भैरवगड यत्ता चौथी ('स्कॉलरशिप-अ‍ॅबॅकस' वगैरे परीक्षांसकट यत्ता तिसरी) असायला हरकत नाही! असो. आयुष्य सार्थकी वगैरे लावलेला अनुभव घेऊन पुन्हा पायथ्याकडे आलो. जेवणाच्या पुड्या सोडल्या आणि मागच्या तीन तासांचा थरार खाण्याबरोबर चवीने चघळला. येताना पुन्हा टाक्याजवळ पाणी भरून घेतले आणि उतरायला सुरूवात केली.उतरताना माझा निसर्गदत्त आणि स्वाभाविक वेग अडवून सर्वांत पुढे जाऊ द्यायला सुन्या मास्तरांनी सपशेल नकार दिला आणि थोड्याच वेळात स्वतःच गायब झाले! ए-ओ च्या हाका देत त्याच्या मागून जाणारा सुशील गोंधळला आणि सुशीलला डोळ्यांसमोर ठेवून उतरणारे आम्ही चार जण अडकलो. अखेर ट्रेकमध्ये वाट चुकण्याची माझी जुनी (गौरवशाली वगैरे) परंपरा पाळली गेली म्हणून मी विलक्षण 'खूश' झालो. मागचा ग्रुप बराच मागे होता आणि प्रीती-राजसबरोबर असल्यामुळे सुरक्षित होता. समोर खालच्या दिशेने जाणारी वाट होती. गावाची दिशा माहित होती. परिस्थिती अवघड वगैरे अजिबातच नव्हती. थोडे उतरून खाली आलो, तर सुन्याला शोधत असलेले अजून तीन जण भेटले! मग आम्ही ८-९ जण वाट शोधू लागलो. आमच्या हाका ऐकून गावाच्या विरूद्ध दिशेकडून मला एक अनो़ळखी आवाज ऐकू आला. त्या आवाजाचा वेध घेत मी पुढे जाऊ लागलो तर "शिद्धा जा शिद्धा जा" अशी हिंदी सूचना ऐकू आली. अस्सल मराठमोळ्या सह्याद्रीच्या कुशीत ही हिंदी हाक कुठून आली असा विचार करत मी पुढे गेलो. कुठल्या दिशेने "शिद्धा जा"यला हवं होतं हे कळणं फार आवश्यक होतं, नाहीतर भलतीकडेच उतरलो असतो. "सीधा जा" हे असल्या 'प्रायोगिक' भाषेत सुचवणारा तो आवाज म्हणजे काल रात्री काट्यांत शिरायला बुजणारा आमचा गाईड कम गावकरी होता. काल त्याने अंगभर कांबळ पांघरलं होतं. त्यामुळे आज मी त्याला ओळखलंच नाही. मागून आलेल्या सुशीलने त्याची ओळख पटवून दिली. आता आम्ही न चुकता गावात पोहोचणार हे नक्की झाले होते. तिथून अर्धा पाऊण तास चालून जेव्हा हायवेवरच्या 'जय मल्हार' या हॉटेलची पाटी दिसली तेव्हा "फायनली आपण पोचलो" हा आनंद जगातल्या कुठल्याही आनंदापेक्षा जास्त होता. सुन्या कालच्याच घर कम हाटेलात चहा-नाष्त्याबद्दल सांगायला मावळ्याच्या गतीने पुढे निघून आला होता हे आम्हाला नंतर कळले. (आम्हाला वाटत होतं की, हाही हरवला!)

अंबाजोगाईवरून आलेली कल्याण एसटी पकडली आणि बसण्याची अपेक्षाच न ठेवता दोन तास उभे राहण्याची मानसिक तयारी ठेवली. झालेही तसेच. अशावेळी माझ्या फारसं आकारमान नसणार्‍या तब्येतीचा हमखास एक फायदा होतोच - मी उभ्या जागीच, WTC जसा सरळ खाली कोसळला, तसा सरळ खाली बसतो. दोन-तीन इंच अधिक जागा मिळाली तर मांडी घालूनही बसता येते! येताना मी तेच केले. मग यथासांग आठ वाजता कल्याण, स्लो ट्रेनने साडेनऊ वाजता दादर असा भैरवगड थरारनाट्याचा शेवटचा अंक पार पाडून दिवसाचा पडदा पडला, तेव्हा ज्ज्जाम थकलोही होतो आणि खूssssशही होतो...

अशा ट्रेकहून आलो की नेहमीच वाटतं, की 'दिवस चांगला गेला' याचा भटक्यांच्या प्र'चलित' शब्दकोशातला अर्थ असल्या अनुभवांपेक्षा अजून वेगळा काही असेल का?- नचिकेत जोशी

(फोटॉ - सोहम बॅनर्जी, राहुल खोत, नचिकेत जोशी)

Monday, December 5, 2011

दंश

त्याच पात्रांचे तमाशे रोज येथे...
एक होता, त्यात हा दुसरा उघडला!

*****************

पावसावर आज माझा जीव जडला
भावना समजून माझ्या तोच रडला

पटकथा एकाच नात्याची बदलली
आज अंकाचा नव्या पडदा उघडला

लाघवी हास्यास मी उत्तर समजलो
प्रश्न मग ओठांवरी कायम रखडला

चार घटका लाज सैलावून निजली
दंश चारित्र्यास ओघानेच घडला

मी जरी पत्रामध्ये नव्हतो कुठेही
अक्षरावरती तुझ्या हा जीव जडला

स्पर्श कवितेने कधी केलाच नाही
ढीग शब्दांचा ­­मनामध्येच सडला

सावलीही शेवटी सोडून गेली
भाबडा विश्वास माझा फार नडला

- नचिकेत जोशी (३/१२/२०११)

Saturday, December 3, 2011

बातमी

दाटुनी आलो जरी नव्हतो मुळी बरसायला
उगवलो होतो तरी होतो कुठे बहरायला?

वेदनेची जाणुनी घ्यावी खुशाली एकदा
सोबती कोणीच नसता जीव हा रमवायला

शब्द माझे अधिक तुजला खातरीचे वाटले
त्याहुनी मी योग्य होतो भरवसा ठेवायला

मी कसा समजून घेऊ सारवासारव तुझी?
कोण आठवले तुला - इतके मला विसरायला?

लोक डोकावून माझा भावही ठरवायचे
खोल मी होतो कितीसा आतवर उतरायला?

सोंग आहे रोजचे - सार्‍यांस ऐसे वाटले
फक्त तू उठलीस माझा चेहरा निरखायला

भेटलो बागेत अवचित, चार होत्या चांदण्या
बातमी झाली चवीची - लागली पसरायला!

वार तू करताक्षणी मी दरवळाया लागलो
श्वास मागाहून माझे लागले उसवायला

- नचिकेत जोशी (२१/३/२००९)

Wednesday, November 30, 2011

कुठून पोचलो इथे

कुठून पोचलो इथे
कुठे इथून जायचे
तुला दुरावलो तरी
तुझ्याकडेच यायचे ||

जरा वसंत दे मला
जरा उसंत दे मला
राहिले फुलायचे
भरून श्वास घ्यायचे
तुला दुरावलो तरी... ||१||

धुक्यात पाहिले खुळे
उन्हात स्वप्न संपले
मनातल्या धुक्यामध्येच
अर्थ सापडायचे
तुला दुरावलो तरी... ||२||

- नचिकेत जोशी (१०/४/२०११)

Thursday, November 24, 2011

धक-धक धाक-धाक ढाक-ढाक...

ढाक-बहिरीबद्दल चिक्कार ऐकलं होतं. सह्याद्रीमधला एक अवघड, थरारक ट्रेक ते शेवटच्या टप्प्यात भल्याभल्यांची XXX फाटते इथपर्यंतचे किस्से ऐकले होते. "रॉकपॅचवर स्वत:चेच ठोके स्वतःला ऐकू येतील इतके घाबरलेलो असतो आपण", "पाय नीट ठेवला नाही तर खाली दरी 'आ' करून तयारच असते, सो, ओन्ली वरी अबाऊट दॅट!" इ. इ. इ.

काही दिवसांपूर्वी "ऑफबीट"वाले (आम्ही XXXवालेच म्हणतो, पद्धत आहे तशी!) ढाकला ट्रेक नेत आहेत असं कळलं. मग काय! जायचं ठरवून टाकलं! सह्याद्री एक्सप्रेसमधल्या त्या अविस्मरणीय प्रवासानंतर लोणावळ्याला स्टेशनच्या विरुद्ध बाजूला उतरलो तेव्हा साडेआठ वाजले होते. हवेत उबदार गारवा होता. ट्रेन गेल्यावर प्लॅटफॉर्म वर चढलो आणि डावीकडून आलेल्या मकरंद आणि तुषारने (त्यांची ओळख नंतर झाली) 'ऑफबीट का?' असा प्रश्न टाकला. ट्रेकर लोकांचं हे एक बरं असतं! अजिबात ओळख नसतानाही 'आपलं ध्यान' त्यांना बरोबर ओळखता येतं!

"चला लवकर, ट्रेन सुटेल ३ नं वरून" - मग त्यांच्याबरोबर मी प्लॅ.क्रं ३ कडे (पुढचे तिकीट न काढताच) धावलो. ठरलेल्या वेळेपूर्वीच सर्व जमल्यामुळे एक ट्रेन आधीच निघणे, कामशेतला पोचणे, तिथून रंगोली ढाब्यावर बसने येणार्‍या तिघांची वाट पाहत नवीन कराव्याशा वाटणार्‍या ट्रेकच्या (हवेतल्या) गप्पा करणे इ इ सर्व गोष्टी यथासांग पार पडल्यावर पुढे निघालो.ढाकला जायला जवळजवळ ८ ते १० वेगवेगळ्या वाटा आहेत. सर्वात सोपी वाट - आम्ही जाणार होतो ती - जांभिवली मार्गे. कामशेतहून शेवटची एसटी सायं ६ ची आहे. रात्रीच्या या प्रहरी आमच्यासाठी "हर सफर मे कहानी है" असं ढाकसाठी तरी सार्थ ब्रीदवाक्य असणारी टाटा मॅजिक उभी होती. ७ आसनक्षमतेच्या त्या गोंडस, नीटस आकाराच्या गाडीत एक तास आम्ही १२ जणांनी तुफान येंजॉय केला. डायवर, त्याच्यासोबत एक माणूस, मी आणि अजून एक ट्रेकमेट - राकेश, पुढे बसलो होतो. त्या एवढ्याशा जागेत मी आधी त्या अशिष्टंटच्या मांडीवर बसून पाहिलं. मग काचेजवळ रस्त्याकडे पाठ करून बसून पाहिलं. "टोचायला" लागलं म्हणून मग मुडपून खाली फतकल मारली. जरा वेळाने माझ्या पायापाशी गरम लागायला लागलं. हेडलाईटचा आतला भाग असेल म्हणून मी आधी दुर्लक्ष केलं, पण शेवटी न राहावून डायवरला विचारलं.
"इंजिन आहे ते!" - मी उडालोच! टाटा मॅजिकच काय पण कुठल्याही चारचाकीची इंजिने कुठे असतात याच्याशी माझा तसा काहीच संबंध नव्हता. इंजिनाशी डील करण्याचा प्रश्न कधी आलाच नाही - अभ्यासातही नाही, आणि रोजच्या लोकलप्रवासातही नाही! पण आता ऑप्शन नव्हता. मग कसंतरी पाय आखडून घेतले आणि अंताक्षरी गात बसलो.

त्या सुनसान खडबडीत रस्त्यावरून जांभिवली गावात पोचलो तेव्हा साडेअकरा झाले होते. मग पिठलं-भाकरीचं जेवण, ओळखपरेड झाल्यावर प्रीती-झीनत-राजस(लीडरलोक्स)यांनी सूचना दिल्या. ढाकच्या वाटेवर रानामध्ये उघड्यावर मुक्काम करायचा होता. जांभिवलीतून कोंडेश्वर महादेवाला डाव्या हाताला ठेवून डोंगराच्या धारेने चढून जायचे. वर पोचलो की डाव्या हाताला मांजरसुंभ्याचा डोंगर, समोर दूरवर खालच्या अंगाला सांडशी-कर्जत ही गावे दिसतात आणि उजव्या हाताला ढाकचा डोंगर दर्शन देतो. आम्ही रात्री चढत असल्यामुळे त्याचे फोटो घेता आले नाहीत. मुक्कामाची जागा ब्येष्ट होती. झाडोर्‍यात मध्यभागी एका सपाट जागेवर पथार्‍या पसरल्या. कृष्णपक्ष असल्यामुळे रात्री अडीच वाजताही चंद्राचा पत्ता नव्हता. शेकोटी पेटवली आणि साडेचारपर्यंत गप्पा 'टाकल्या'. या ट्रेकमध्ये निम्मे लोक्स ट्रेक्सवर मनापासून प्रेम करणारे असल्यामुळे गप्पा भुतांच्या अनुभवांपासून सुरू होऊन, सह्याद्रीतल्या जुन्या अविस्मरणीय ट्रेक्सवर येऊन थांबल्या. बाकीच्यांनी दुसरी पंगत मांडून गाणी म्हणून घेतली.अखेर 'दोन तास तरी झोप घ्या' असा 'आदेश' आल्यामुळे शेकोटी तशीच ठेवून अंथरूणावर आडवे झालो. मध्येच कधीतरी सॅकमधून जर्कीन काढून घातल्याचे आठवते. त्याच वेळी समोरच्या झाडाच्या फांद्यांमधून चांदोबाने कोरभर दर्शन दिले. आजूबाजूच्यांचा घोरण्याचा आवाज सोडला तर बाकी जंगल शांत होते.

मुक्कामाची जागा -


अगदी घरच्यासारखं झोपायचं, ट्रेक असला म्हणून काय झालं? ;)


साडेसहा वाजता जाग आली तेव्हा झुंजुमुंजू की काय म्हणतात ते होऊन गेलं होतं. दिसण्याइतपत उजेड होता. आटोपून, नाष्ता करून, जागा स्वच्छ करून साडेसात वाजता बहिरीच्या गुहेकडे निघालो, तेव्हा सगळीकडे कोवळे उन्हं पसरली होती. ढाक-बहिरीचा खरा ट्रेक आता सुरू होणार होता.

ढाकचा किल्ला हा एक दक्षिणोत्तर पसरलेला अजस्त्र डोंगर आहे. साधारण २७०० फूट उंच, एक-दीड किमी लांब आणि बराच रूंद अशा या किल्ल्याच्या पोटात बहिरीची पश्चिमाभिमुख गुहा आहे. त्यामुळे माध्यान्हीच्या आत उतरून खाली यायचे होते. साधारण अकरानंतर कातळांवर सूर्य येतो आणि मग हाताला चटके बसतात. गुहेकडे पाठ केली की समोर सरळसोट दरी, त्याखाली पठार, मग पुन्हा कडा, पुन्हा पठार आणि सर्वात खाली सांडशी गाव. ढाकच्या शेजारी डाव्या हाताला कळकरायचा सुळका आहे. त्या पलिकडे साधारण काटकोनात मांजरसुंभ्याची रांग. त्याच रेषेत दूरवर राजमाची किल्ल्याची आडवी जोडगोळी. रेल्वेतून जाताना दिसणार्‍या राजमाची किल्ल्याची बरोब्बर विरूद्ध बाजू इथून दिसते! पहिल्या नजरेत आवडून जावं असं हे रांगडं सौदर्य आहे! (तसं बघायला गेलं तर अशी ब्यूटी सह्याद्रीत जागोजागी आहे!).

ढाक आणि कळकराय या दोघांमधल्या बेचक्यातून एक वाट खाली उतरते आणि ढाकच्या कड्याला समांतर (म्हणजेच १००० फूट खोल दरीलाही समांतर) उजवीकडे सरकते. ही वाट पूर्णपणे कातळावरून आहे. अधेमधे खाचा आहेत आणि आता रोप्सही लावता येतात. शंभर एक फूट ट्रॅवर्स मारल्यानंतर वर चढायला कातळात कोरलेल्या १०-१२ पायर्‍या आहेत. वर गेलो की पुन्हा उलट दिशेने पंचवीस-तीस फुटांचा दरीला समांतर ट्रॅवर्स! आधारासाठी लोखंडी तारा लावलेल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात खरा थरार आहे. तिथे नव्वद अंशातला चढ सोपा व्हावा म्हणून साधारण १५ फूट उंचीचा एक बांबू बांधलेला आहे. त्याच्या दोन्ही बाजूला ठराविक अंतरांवर खुट्ट्या बाहेर आल्या आहेत. त्यावर पाय देऊन वर चढायचे. हा बांबू म्हणजे खरोखर एक कौतुकाची गोष्ट आहे! बांबू संपला की, वर जरासा बाहेर झुकलेला कातळ आहे. त्यावर चढलो की स्वतःला खरेखुरे, अनुभवी ट्रेकर्स मानण्याचे सार्थक वगैरे होते - आपण फायनली गुहेत पोचतो!
अशा या नितांतसुंदर ढाक-बहिरीच्या गुहेकडे जाणार्‍या या पॅचचे काही फोटू -ढाकचा कडा (बाजूने) -


ढाकचा कडा (खालून) - झेंडा म्हणजे गुहा!


ही वाट. या फोटोत आधारासाठी रोप्स दिसत आहेत -


कळकराय सुळका -
"वर्टिकल लिमिट!" -
बांबूवर!


बांबूच्या वरची स्टेप (ओन्ली वरी हिअर!)


ढाक-बहिरी अवघड मानला जाण्याचे कारण फक्त आणि फक्त वरील परिच्छेदातील रौद्रभीषण सौंदर्य! बाकी हा खूपच सोप्पा ट्रेक आहे. माझ्या मते, कोरड्या ऋतूमध्ये ढाक अजिबात अवघड नाही. थोडीशी एकाग्रता आणि आत्मविश्वास यांच्या मदतीने रोप्स, तारांचा आधार न घेताही बांबूपर्यंत पोहोचता येते (खोटं नाय बोलत, मी पोचलो होतो). बांबू पार करताना मात्र अधिक काळजी घ्यायला हवी. खाली उतरल्यावर ढाक-बहिरीमध्ये झालेल्या दुर्दैवी अपघातांच्या ज्या कहाण्या ऐकल्या त्यापैकी बर्‍याचशा त्या बांबूच्या शेवटच्या टप्प्यातच झालेल्या आहेत. तात्पर्य, स्वत:ची काळजी सर्वात महत्त्वाची!

गुहेतून घेतलेले काही फोटू -
राजमाची किल्ल्याची जोडगोळी -


साडेनऊ वाजता सगळेच्या सगळे १५ जण बहिरीचा ट्रेक संपवून खाली उतरलो तेव्हा सूर्य नुकताच त्या कातळांखालच्या जंगलावर येत होता.


आमच्याकडे अख्खा दिवस बाकी होता. उतरताना सांडशीच्या वाटेने उतरावे म्हणजे नवीन वाट माहिती होईल किंवा मग ढाकचा किल्ला बघून तिथून थेट पायथ्याला गौरकामत गावात उतरावे असे दोन पर्याय होते. आपल्या माबोकर सुन्याची 'ऑफबीट' म्हणजे एकदम झक्कास काम! अनुभवी लोक्स सोबत असतील तर वाटा चुकूही देतात आणि शोधूही देतात. ;) ढाक किल्ल्याची वाट लीडरलोक्सांना नीटशी माहित नव्हती. (ढाक किल्ला ही पूर्णपणे रनटाईम वॅल्युअ‍ॅडेड ऑपॉर्च्युनिटी होती :)) तिथे भेटलेल्या एका गावकर्‍याच्या मते, ढाक पहाडाच्या मागच्या बाजूने ढाक गावाला टाळून एक वाट किल्ल्याच्या दिशेने तासभर जाते. त्यापुढे दीड एक तासाचा चढ पार केला की किल्यावर पोचतो. ढाक किल्ला हे एक विस्तीर्ण पठार आहे. तो बघायला १ तासही कमीच होता. तसेच तिथून खाली गावात उतरायला चार-एक तास लागले असते. हा सर्व विचार करून ढाक किल्ला रद्द करून आम्ही काही उत्साही लोकांनी सांडशी गावाकडे उतरण्याचे ठरवले. बाकीचे आल्या पावली झीनतबरोबर जांभिवलीकडे निघून गेले. प्रीतीला सांडशी गावात उतरायची लांबची वाट माहित होती. या वाटेवर कुठेही पाणी नाही आणि संपूर्ण वेळ सूर्य माथ्यावर असणार होता. या वाटेने कमीत कमी चार तास लागतात. त्यामुळे प्रत्येकाकडे कमीत कमी ३ लिटर पाणी असेल तर या वाटेने जाऊ शकतो असे तिने सांगितले. त्या गावकर्‍याने उतरताना 'एका आंब्यापासून खाली उतरायला एक शॉर्टकट आहे' असेही सांगितले. त्या आंब्याजवळच एक पाण्याचा साठाही गुहेखालून लीडर प्रीतीने फोटोत कॅच केला होता. पण तो आंबा आणि ते पाणी नक्की कुठे आहे, हे शोधावेच लागणार होते. पावणेबारा वाजता २ लीडर्सबरोबर आम्ही नऊ लोक्स सांडशी 'फाट्या'वरून गावाकडे निघालो.

सांडशीकडून येताना ढाकचा डोंगर दोन डोंगरांच्या मागे आहे. अतिशय खडतर आणि दीर्घ चढ चढून यावे लागते. आम्ही उतरत असलो तरी आमचीही हालत फारशी चांगली नव्हती. कारण आम्हाला ती लांबची वाट टाळायची होती. त्यासाठी तो आंब्याजवळचा शॉर्टकट शोधायचा होता. पाऊण-एक तासात एका सपाटीवर आलो. तिथून सांडशी गाव उजव्या हाताला खाली (दूरवर) होते. कुठेतरी शार्प उजवा टर्न घ्यावा (पायवाटांचा उजवा टर्न बरं का!) लागेल हे कळत होते. पण तशी वाट सापडली नाही, म्हणून तसेच पुढे चालत राहिलो. अचानक मधूनच झाडीमागून मांजरसुभ्याच्या डोंगराने दर्शन दिले. आभाळात घुसलेल्या सुळक्यावरून जणू तो आम्हाला विचारत होता - 'या बाळांनो! सांडशी शोधता शोधता वाट चुकलात आणि थेट इथेच आलात. असेच अजून थोडावेळ चालाल तर माझ्या पायथ्याशी पोचाल. येताय का?'

आम्ही वाट पूर्ण चुकलो होतो. कारण गाव मागे राहिले होते. आम्ही वरच्या बाजूने खूप पुढे निघून आलो होतो.
मागे ढाक असा दिसत होता -


थोडा झूमून -


अखेर वाटेत लागलेले बाण तपासत पुन्हा त्या पठारापाशी आलो. अडीच वाजले होते. एका झाडाच्या सावलीत बॅगा टाकल्या.


लीडरलोक्स वाट शोधायला निघून गेले. वारा सुटला होता. रणरणत्या उन्हात ती झुळूक खूपच आनंददायी होती. वाट सापडत नाही म्हणून अखेर लीडरलोक्स परत फिरले. आता एकच पर्याय होता - थोडं अंतर अजून माघारी जाऊन आंबा शोधणे व न सापडल्यास त्या लांबच्या वाटेने उतरणे. पाणी कमी झालं होतं म्हणून त्या फोटॉवरून मी पाणी शोधायला निघालो. गंमत म्हणजे, पाण्याचा तो नव्हे, पण दुसरा एक डबकंसदृश साठा जवळच्याच ओढ्याच्या वाटेमध्ये सापडला. बाटलीच्या बुचातून रूमाल लावून पाणी भरून घेतलं आणि बाकीच्यांना येऊन ही खूषखबर सांगितली. सर्वांनी मग तिथे पाणी भरले आणि माघारी निघालो. पोटात पाणी गेल्यामुळे असेल म्हणा, किंवा झाडाखाली थोडा आराम झाल्यामुळे असेल म्हणा, पण पाचेक मिनिटांत तो आंबा सापडला, ते पाणी सापडलं आणि जवळच्या चौथर्‍याजवळून खालच्या दिशेने गेलेली एक मळलेली वाटही सापडली. त्या आनंदात तिथेच थोडं खाऊन घेतलं.

त्या आंब्यापासून केवळ वाट सापडली होती एवढंच सुख होतं. सांडशी अजूनही दोन पठारांखाली दोन तास दूर होतं. ही वाट खरंच शॉर्टकटची आहे. पहिल्या टप्प्यात सत्तर एक अंशांच्या कोनात झाडीतून ही वाट खाली उतरते. मग सांडशीच्या दिशेने समांतर ट्रॅवर्स मारून अखेरच्या टप्प्यात पुन्हा खडा उतार उतरून एका नदीपाशी ट्रेकर्सचा अक्षरशः कस पाहत ही वाट येते. उतार-उन्हं-घाम - बाकी काहीही नाही! असे प्रसंग आले की मला हमखास एक प्रश्न पडतोच - कुणी सांगितलं होते हे उद्योग करायला? आणि मग उत्तरही आपोआपच मिळतं! :) किंवा कोदापूर गावात एसटीतून उतरल्यावर कंडक्टरची कॉमेंट - "आयला! पैसे देऊन वर जीवाला त्रास" आठवते. असो. अर्थात या वाटेवर अध्येमध्ये बाण आखलेले आहेत, झाडाच्या खोडावरही खुणा आहेत. देखनेवाली नजर चाहिये बस्स! ही संपूर्ण वाट उतरताना मला सतत तोरण-रायगडच्या ट्रेकमध्ये सिंगापूरच्या नाळेने दापोलीकडे जाणार्‍या वाटेची आठवण होत होती.

नदीजवळून ढाक -


त्या नदीमध्ये मासे पकडण्यासाठी सुंदर लाकडी जाळी लावली होती. त्याच्या खालच्या अंगाला आम्ही पाणी प्यायलो. थोड्या वेळाने -
सुशील: तू ते पाणी प्यायलास का?
मी : हो.
सुशीलः मी त्या मामांना विचारलं, ते म्हणाले, या पाण्यात माशांसाठी औषध टाकलं आहे. ते पीत नाही आम्ही.
मी: (मनात कपाळावर हात मारून) आत्ता सांगतोयंस? आणि जाउ दे! ते औषध माशांसाठी आहे, माणसांसाठी नाही!

आजूबाजूला डोंगर, झाडी, पाचचा सुमार, कललेलं उन्हं, विलोभनीय शांतता आणि नदीचं इतकं सुंदर, नितळ पाणी बघून त्याचा आस्वाद न घेणं हा केवळ करंटेपणा होता! आणि आता बहात्तर तासांनीही तब्येत ठणठणीत असल्यामुळे त्यावेळी ते पाणी प्यायलं हे बरंच केलं!

सर्व प्रवास संपवून सांडशी गावात पोचलो आणि सुदैवाने लगेच सव्वापाचची यष्टीही मिळाली. मग तिथून कर्जत, कर्जतहून दादर व्हाया चहाचे कप असा कंटाळवाणा प्रवास संपवून कर्मभूमीत पोचलो तेव्हा मनात एक अवघड ट्रेक सुफल झाल्याचा आनंद घुमत होता - धक-धक धाक-धाक ढाक-ढाक...- नचिकेत जोशी (२२/११/२०११)