Pages

Friday, December 26, 2014

'तुझे दु:ख माझे'

'तुझे दु:ख माझे'
कुणी बोललेले
खरे वाटलेले
कितीदा मनाला

सभोताल सारे
फुलारून येई
मला दूर नेई
भुलोनी जगाला

थरारून जावी
उभी सर्व काया
दिसे फक्त माया
खुळा जीव झाला

अकस्मात यावे
ढगानेच खाली
तसा भोवताली
महापूर आला

मला जागवाया
बिछानी तपेले
दिसे ओतलेले
तळे हे उशाला

तसे स्वप्न माझे
पुराच्या प्रवाही
उसासून वाही
सकाळी दहाला

'तुझे दु:ख माझे'
कधी ऐकताना
हसू आवरेना
कितीदा मनाला

- नचिकेत जोशी (२५/१२/२०१४)

Thursday, December 18, 2014

पुनर्भरारी

दिसू लागली आहे हल्ली
वाळवंटातही हिरवळ,
जाणवू लागली आहे
दगडांखाली खळखळ
चलबिचल होऊ लागलीये
मरगळलेल्या देहावर
कुठलीशी नवथर उमेद
उमटू लागली आहे चेहर्‍यावर

आधार वाटतोय आतून
नवे पंख आल्याचा
पावलोपावली होतोय भास
स्वप्न खरे झाल्याचा

फुंकर बसते आहे आता
धुळीखालच्या खुणांवर
खपली धरली आहे आता
जुन्या जखमांवर
ऐकू येऊ लागलीये टिकटिक घड्याळाची
जुन्या, बंद पडलेल्या
प्रवास सुरु होणार आता वाटेचा
नवीन, नुकत्याच उघडलेल्या

- नचिकेत जोशी (१७/१२/२०१४)

Wednesday, December 10, 2014

खूप दिवसात

नभ खाली आले नाही
खूप दिवसात
माती ओलावली नाही
खूप दिवसात

दिशा धुंडाळू लागल्या
स्वतःलाच आता
आला नाही कुणी यात्री
खूप दिवसात

दु:ख दिसे खिन्न मूक
मीलना आतूर
कुणी आले न साजेसे
खूप दिवसात

किती वेडी स्वप्ने माझी
मातीत माखली
सुचले ना रुजणेही
खूप दिवसात

- नचिकेत जोशी (१०/१२/२०१४)

Friday, October 17, 2014

आता नको!

(ज्येष्ठ गझलकारा संगीता जोशी यांची 'हे असे आभासवाणे चांदणे आता नको' ही ओळ व्हॉट्सअ‍ॅप वर एका गप्पांमध्ये मिळाली. त्यावर गझल लिहिण्याचा हा प्रयत्न.)

लाघवी बोलून हे नाकारणे आता नको
हे असे आभासवाणे चांदणे आता नको

एकट्याच्या सोबतीला ज्याक्षणी आलीस तू -
अन् मला वाटून गेले, थांबणे आता नको!

बहर ओसरताच आले भान वार्‍याला पुन्हा -
ह्या सुगंधाभोवती रेंगाळणे आता नको

त्या निरोपाच्या क्षणी ती बोलली नजरेतुनी -
एकही कुठलेच हळवे मागणे आता नको

मी मनाच्या जवळ आता जात नाही फारसा
खोल या डोहामध्ये डोकावणे आता नको

तूच बोलावेस आता, 'हो' म्हणावे मी तुला
पण अबोल्याच्या दिशेने खेचणे आता नको

यापुढे भेटायला तू नेहमी दिवसाच ये!
सावली लपवून कोठे भेटणे आता नको!

धूळ साचू दे जराशी आरशावरती तुझ्या
रोज डोळ्यांना तुझ्या तू फसवणे - आता नको!

वाट संपायास येता फार वाटू लागले -
ऐकणे आता नको अन् बोलणे आता नको

- नचिकेत जोशी (१७/१०/२०१४)

Thursday, August 14, 2014

क्षणिक उमाळे

देशावरचे प्रेम उफाळुन येते
फेसबूकची भिंत थरारून येते

झोपेमध्ये घोरत असतो कायम
जाग मनाला मध्येच दचकुन येते

पोट स्वतःचे भरले की मग सार्‍या -
उपेक्षितांची भूक जाणवुन येते

पुष्कळ चर्चा होते पेपरमध्ये
जनता नंतर रद्दी देउन येते

कर्तव्यांचे भान अचानक होता
भाषणसुद्धा टाळ्या घेउन येते

क्षणिक उमाळे बघून हसतो आता
दया स्वतःची स्वतःस पाहुन येते

देश बिचारा जिथल्या तेथे असतो
जबाबदारी खांदे बदलुन येते

पडेल हाही थर पोकळ भिंतींचा
वेळ कुणाची केव्हा सांगुन येते?

- नचिकेत जोशी (१४/८/२०१४)

(सर्वच काफियांमध्ये र्‍हस्व उकाराची सूट घेतली आहे.)

Monday, July 28, 2014

पाऊस - रायगड प्रदक्षिणेतला!

तो कोसळला! बरोब्बर मुहुर्त साधून कोसळला. एखाद्याला खिंडीत गाठावं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण देत बरसला. तेही खर्‍याखुर्‍या खिंडीतच! एकदा धाडबिडीच्या खिंडीत आणि नंतर काळकाईच्या खिंडीत! सोमजाई मंदिरापासून प्रदक्षिणेला सुरूवात केली तेव्हा त्याने जोरदार सलामी दिली. भातशिवारं हिरवीगार रोपांनी डोलत होती. पाऊलवाटांमध्ये पाणी पाणी झालं होतं. चिखल मायेने पाय धरून ठेवत होता. सारवलेल्या अंगणातून आणि पागोळ्यांच्या तळ्यांतून आम्ही झपाझप पाय उचलत होतो. पावसाचा दमटपणा त्या कौलातून आत उतरणारा. घरातले म्हातारे आम्हाला निरखून बघणारे. घरातले कर्ते भातखाचरांमध्ये लावणीमध्ये बुडालेले.

उजव्या हाताला महादरवाजापासून निघालेली तटबंदी. कडा चढायला जाल, तर अजूनही अभेद्य! हा कडा जिथे संपतो, त्या माथ्यावर साडेतीनशे वर्षांपूर्वी 'आपला' राजा राहायचा. टकमक टोकाखाली पाऊस कमी झाला. रेनकोट नावापुरताच अंगावर. पाठीवरच्या बॅगेलाही हौसेने कव्हर चढवलेलं. बॅगेत कॅमेरा! पावसाला थट्टा करायची लहर आली आणि त्याने एक वेडीवाकडी सर धाडून दिली. आता सगळीकडून पाऊस. सगळीकडून ओली सोबत. पायवाटेशेजारच्या लुशलुशीत गवतात अंग झोकून द्यावं, मनसोक्त लोळावं इतकं ते लोभस रूप! रायनाक किल्लेदाराच्या समाधीपाशी थोडं रेंगाळलो. पाऊस तिरक्याचा सरळ झाला.

कावळ्या-बावळ्याची खिंड, कोकणदिवा, लिंगाणा, भवानी कडा - काही दिसत नव्हतं. धुकं, ढग आणि पाऊस. खिंडीखालच्या रानात पावसाने धुमाकूळ घातलेला. झाडं पाडून वाट रोखलेली. त्यांची खोडं, फांद्या, काटे तोंडावर सपके मारत होते. त्यावर समजूत काढायला हा होताच! निरनिराळे डास, किडे, माश्या यांच्याकडून मग स्वतंत्र पाहुणचार झाला. हे सगळे इथलेच खास रहिवासी. यांच्या घरात आपण पाहुणे, त्यामुळे काही बोलताही येईना. खिंडीच्या चढाने दम काढला. पावसाने ओली गच्च झालेली माती बुटाने घसरायला लागली. नंतर कळलं की घसरत  मी होतो, माती तर पावसाने केव्हाच जमिनीत घट्ट रुजवली आहे.

खिंडीत निम्मी प्रदक्षिणा झाली. राजाचे पाय इथे लागले असतील. 'राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट,चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे,दीड गाव उंच,पर्जन्यकाळी कडीयावर गावात उगवत नाही आणि धोंडा तासीव एकाच आहे.दौलताबाद हि पृथ्वीवर चखोट गड खरा;पण तो उंचीने थोटका.दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट जाले आणि बोलिले,तख्तास जागा हाच गड करावा.' आज दिसतंय आणि पटतंय हे!

खिंड ओलांडून पलीकडे उतरलो आणि जेवणाच्या पुड्या सोडल्या. तर पुन्हा पाऊस सुरू. भर पावसातली पंगत. कुणी झाडाखाली उभ्याने खातंय, कुणी दगडावर बसलंय, कुणी गवतावरच गोल करून बसलंय. कुणाच्या डब्यातल्या पराठ्यात पाऊस, तर कुणाच्या चमच्यावरच्या लोणच्यामध्ये पाऊस. कुणी भातावर पाऊस ओतून खातंय तर कुणी पिशवीतल्या चिवड्यावर पेरून खातंय. डबा उलटा केला की पाऊस रिकामा आणि जॅम-बटर पुन्हा जेवण्यात रुजू! वर 'अन्न कोरडं खाऊ नये, ओलं करून खाल्लं की पचतं' हे समाधान!

उतार दिसला की ओहळ सुरू. सगळ्या आसमंतात पाऊस होता. पोटल्याच्या डोंगरावरती होता, रोपवेभवती होता, खाली रानात होता, कोकम-लिंबात होता, धबधब्यात होता, कातळावरच्या शेवाळात होता. महाडात काळ नदीला आलेलं पाणी पाहिल्यापासून माझ्या मनातही शिरला होता. कुडकुडणारी थंडी नशिबाने यावेळी सोबत नव्हती. या पावसाची मायाच अशी होती की थंडीलाही त्याने दूर ठेवलं.

चालायला सुरूवात केल्यापासून साडेपाच तास होत आलेत. आता अंगावर एकही जागा अशी नाही की जिथे पाऊस नाहीये. प्रदक्षिणेच्या या बाजूचं रान प्रेमळ आहे. त्या बाजूसारखी काट्याची झाडं जाब विचारायला नाहीयेत. इथल्या फांद्या वाट अडवून उभ्या आहेतच, पण दूर होताना हातालाही मऊशार शुभेच्छा देतायत.

मी एकटाच पुढे आलो. दुखर्‍या गुडघ्यामुळे इतरांना उशीर होऊ नये म्हणून थांबत नव्हतो कुठेच. आता भवती बंद जंगल आहे. मगाशी काहीतरी झुडूपातून धावत गेलं. रानडुकर असावं. तेही पावसाने कावलं असेल, झुडूपात शिरलं असेल, आणि त्यात माझी चाहूल लागून गांगरून धावलं असेल. पाण्याचा आवाज वाढत चाललाय आता. बहुतेक  धबधबा येतोय वाटेत. हा या बाजूचा सगळ्यात मोठा धबधबा आहे. अंदाज लावायचा झाला तर हा वाघ दरवाजातून निघणारा धबधबा असणार. म्हणजे कुशावर्त तलाव आलाच. आणि मग रोपवे.

अवकीरकरांच्या 'जय मल्हार' मध्ये अगत्याचा चहा झाला, कपडे बदलले, आणि पाऊस घेऊन परतीला लागलो. सोबत होता शिवराजाचा अभिमान - नेहमीसारखाच! थोडा जास्तच!

- नचिकेत जोशी (२८/७/२०१४)

Wednesday, June 25, 2014

हुरहूर


एक खूप जुनी गझल पोस्ट करतोय...

वेगळे हे माणसांचे नूर आता
वाटतो सर्वांस मी निष्ठूर आता

मी स्वतःच्या ऐकतो गाणे मनाचे
समजुतींचा कोष झाला दूर आता

शेवटी तुजला हवे ते मिळवले तू
गमवल्याचा नाटकी का सूर आता?

शब्दही माझा जिथे कळलाच नाही
मौन का वाटे तुला मग्रूर आता?

राख झाली त्या अबोली भावनांची
आठवांचा येत आहे धूर आता

दु:ख वाटावे असे काहीच नाही
हीच आहे नेमकी हुरहूर आता

- नचिकेत जोशी (२२/७/२००८)

Wednesday, June 11, 2014

आलायस तर खरा!

आलायस तर खरा...
आता थांबणार आहेस की
दडी मारणार आहेस लगेच
हुरहूर लावून?

मनाचं ओसाड माळरान आधीच तापलंय, वैतागलंय...
त्यावर आता पाऊलभर हिरवी शाल पांघरशील,
निष्प्राण पायवाटेत नवी ओढ रुजवशील
आणि नंतर नेहमीच्या लहरीपणाने पाठ फिरवशील!
मग पहिल्याहून अधिक असह्य
दुष्काळ सोसावा लागेल...

हे सगळं व्हायच्या आधीच सांगतोय -
एकतर थांब तरी, किंवा मग जा तरी!

तुझी वाट पाहणं चालूच राहील - 
तू सगळे बहाणे विसरून, तुझा हट्टीपणा सोडून,
आवेगाने, ओढीने आणि तृप्त मनाने
बरसू लागेपर्यंत!

तेवढा उन्हाळा सहन होईल या मनाला...

- नचिकेत जोशी (९/६/२०१४)

Monday, May 12, 2014

'आजोबा' प्रिमीअर


'कृपया सगळ्यांनी लवकरात लवकर बसून घ्या. खुर्च्या पुरणार नाहीयेत, त्यामुळे मिळेल तिथे बसून घ्या प्लीज. मराठी चित्रपटांच्या प्रीमिअरला इतकी गर्दी होत असेल तर मराठी सिनेमाला किती चांगले दिवस येतील हे आपण बघू शकतो'... दिग्दर्शक सुजय डहाकेच्या या वाक्यांवर जोरदार टाळ्या पडल्या आणि आम्ही (पुरूष मायबोलीकर) पायर्‍यांवर बसलो.

त्याआधी खूप लवकर सिटीप्राईडला पोचल्यामुळे डॉ. विद्या अत्रेय यांच्याशी गप्पा मारता आल्या. बँडबरोबर दोन 'आजोबा' दाखल झाले, एक एक कलाकारही आले. केतकी माटेगावकर आल्यावर अख्खी गर्दी तिच्याभोवती गोळा झाली. प्रीमिअरचं नक्की टाइमिंग काय होतं हे कुणालाच कळलं नाही, पण शो सुरू व्हायला सव्वा आठ वाजले.

चित्रपटाबद्दल बर्‍याच धाग्यांवर बोलून झालंच आहे. मला फक्त काही काही अ‍ॅनिमेशन्स आवडली नाहीत. 'उपलब्ध बजेट आणि एकूणच उपलब्ध साधनसामुग्रीत' केलेला (जमवलेला) सिनेमा असं माझं मत झालं. मग त्यात काही गोष्टी जमून गेल्या, काही जमल्या नाहीत. ट्रेकिंगमुळे (बिबट्या-वाघ प्रत्यक्ष पाहिला नसला तरी) डोंगरदर्‍यात फिरायला मिळत असल्यामुळे पडद्यावर दाखवली गेलेली जंगल-दर्‍या-डोंगरांची दृश्ये मला तरी अपुरी वाटली.

पण खरं सांगायचं तर (त्या सुरूवातीच्या सीननंतर) मी लहान मुलांच्या नजरेतून हा चित्रपट पाहायचा प्रयत्न केला आणि मला सगळं आवडलं.

शेवटच्या ज्ञानोबा-मॅडम च्या फोनवरील सीनमध्ये माझ्या गळ्यात काहीतरी दाटल्यासारखं वाटलं. (तो सीन पाहून डोळ्यात पाणी आलेलेही अनेक जण असणार याची खात्रीच आहे!)

'आजोबा' एकदा पहायला हरकत नाही! :)

फोटो -


डॉ. विद्या अत्रेय


सुजय डहाके


विभावरी देशपांडे


हृषिकेश जोशी


गजेंद्र अहिरे


'शाळा'फेम अंशुमन जोशी


गर्दी!!!
या चित्रपटाच्या कॉस्च्युम डिझायनर नीलिमा गोगटे


- नचिकेत जोशी (१२/५/२०१४)

Friday, April 25, 2014

शिवशाहिरांच्या आठवणींचा 'बेलभंडारा'पुस्तकाचे नावः बेलभंडारा
लेखक - डॉ. सागर देशपांडे
प्रकाशन - सह्याद्री प्रकाशन
प्रथमावृत्ती - ३ ऑगस्ट २०११
किंमत - रू. ६९९

*********************

एखाद्याने व्यवहारात साधं-भोळं म्हणजे किती साधंभोळं असावं? एखाद्याने ध्यासमग्न जगावं म्हणजे नेमकं कसं जगावं? एखाद्याने सर्वस्व अर्पून कश्शाचीही पर्वा न करता एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करावा म्हणजे नक्की किती करावा? सध्यातरी माझं उत्तर आहे - शिवशाहीर श्रीमंत बळवंतराव मोरेश्वरराव उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांच्याइतका! नव्वदी पार केलेल्या या महान शिवयोग्याचं 'बेलभंडारा' हे चरित्रात्मक पुस्तक वाचताना किती वेळा डोळे भरून आले, किती वेळा छाती-मन अभिमानाने तुडुंब भरून आलं हे मोजलंच नाही!

बाबासाहेब पुरंदरे या नम्र, शालीन, डोळस इतिहासप्रेमी संशोधकाबद्दल कुतुहल शमेल, समाधान होईल ते सर्वकाही या पुस्तकात आहे. त्यांचा जन्म, शाळकरी आठवणी, शाळामास्तर, इतिहास नावाच्या जिवलगाशी जुळलेलं मैतर आणि उर्वरित आयुष्यात जडलेला एकच ध्यास - शिवचरित्र आणि शिवचरित्राचं पारायण, आख्यान, प्रसार, आणि एक समर्पित आयुष्य!

शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास हा नजीकच्या काळात कायम वादातच सापडला आहे. ज्या इतिहासाची दखल परदेशांतल्या लष्कराने आणि तिथल्या संशोधकांनी (संशोधक म्हटलं की आपल्याला फक्त जेम्स लेन आठवतो. त्याच्याव्यतिरिक्त इतर अनेक संशोधकांनी शिवाजीराजांबद्दल संशोधन केलेली अनेक कागदपत्रे परदेशांतल्या लायब्ररींमध्ये आजही आहेत) घेतली त्याबद्दल आपण अभिमानही बाळगत नाही, किंवा फक्त दाखवण्यापुरता बाळगतो. म्हणूनच कदाचित बाबासाहेब मार्मिकपणे लिहून गेलेत - "इतिहासात चंदन खूप आहे आणि कोळसाही. आपण चंदनच उगाळू, कोळसा नको. आणि चंदनाचा कोळसा करून उगाळण्याचा उपद्व्याप तर नकोच नको!"

सगळीच मोठी माणसं वेडी असतात खरंच! बाबासाहेब तर 'वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसंच इतिहास घडवतात' असं साभिमान म्हणून गेलेच आहेत. पण कुठल्याही मोठ्या माणसाकडे डोळसपणे पाहिलं की दिसतं - सर्वस्व अर्पून घडवलेलं एक साधं सोपं पण केंद्रित आयुष्य! वयाच्या सोळा-सतराव्या वर्षी शिवचरित्र लिहिण्याचा संकल्प सोडल्यावर आलेल्या अनंत अडचणींतून मार्ग कसा निघाला त्याची थरारक गोष्ट या पुस्तकात जागोजागी वाचायला मिळते.

काय काय आहे या पुस्तकात? बाबासाहेबांचं बालपण भेटतं, १९३० सालातलं पुणे वाचायला मिळतं, दमण आणि दादरा नगरहवेलीचा स्वातंत्र्यसंग्राम ओझरती भेट देऊन जातो. इतिहासकारांची संशोधने, आणि आजूबाजूच्या हकीकती वाचायला मिळतात. शिवचरित्रासंदर्भाने संपर्कात आलेल्या राजकारण्यांच्या चक्क चांगल्या बाजू वाचायला मिळतात. शिवचरित्र साकार करण्यासाठी वाट्टेल ते कष्ट करणारा, रोज पुण्यातून भाजी घेऊन वाशी मार्केटमध्ये विकायला जाणारा, पुस्तके घरोघरी जाऊन विकणारा, घसा पूर्णपणे कामातून गेलेला असतानाही व्याख्यानांवर व्याख्याने देणारा, ऐतिहासिक पुरावा सापडल्याचा निरोप प्रतापगडच्या पुजार्‍याकडून येताच भर पावसात पुण्याहून प्रतापगडावर सायकलने जाणारा एक झपाटलेला 'बाबासाहेब' भेटतो आणि या दीर्घ बिकट बाका प्रसंगांमधून तावून सुलाखून घडलेले, 'अणुरणी या थोकडा' वाटणारे आणि 'आकाशाएवढे' मोठे झालेले आपले सर्वांचे लाडके 'शिवशाहीर बाबासाहेब' घडताना वाचायला मिळतात. (आयुष्यभर एवढा हलकल्लोळ केल्यावरही बाबासाहेब म्हणतात, 'मला सव्वाशे वर्षांचं आयुष्य हवंय शिवचरित्र ब्रह्मांडापल्याड नेण्यासाठी!' देवाने उदंड आयुष्य बाबासाहेबांना द्यावं!)

शिवाजी महाराज प्रसिद्ध झाले कारण त्यांनी नामोहरम केलेले त्यांचे शत्रूही तितकेच तुल्यबळ होते. 'राम मोठा वाटतो कारण रावणही तितकाच शूर होता' अशा आशयाचं उदाहरण प्रा. नरहर कुरुंदकरांनी 'श्रीमान योगी'च्या प्रस्तावनेत दिलं आहे. खूप सुरेख प्रस्तावना आहे ती! एकदा नक्की वाचा! असो. विषयांतर झालं. हां, तर त्या शत्रूंची सहीसही ओळख करून दिली, ती बाबासाहेबांनीच! अफझुलखान असो, सिद्दी जौहर असो, किंवा खुद्द आलमगीर औरंगजेब असो, बाबासाहेबांनी 'राजा शिवछत्रपती'मध्ये त्या शत्रूंचे सद्गुणही तितक्याच मोकळेपणाने मांडले आहेत. शिवचरित्र लिहिताना हा विवेक असणं ही अत्यावश्यक गोष्ट होती. मराठेशाहीच्या सर्व शत्रूंच्या वाईट गोष्टी समोर आणतानाच चांगल्याही गोष्टी वाचकासमोर ठेवणे हे संतुलन असण्यासाठी मुळात लेखक तेवढा सुसंस्कृत, शालीन आणि जाणता हवा. या जाणतेपणाचा प्रवास 'बेलभंडारा' आपल्यासमोर ठेवतं.

बाबासाहेबांनी ज्या आत्मीयतेने शिवाजी महाराजांचं आयुष्य उलगडलं, त्याच आत्मीयतेने डॉ. सागर देशपांडे बाबासाहेबांचं आयुष्य उलगडतात. माहित नसलेल्या अनेक गोष्टी-प्रसंग तर यातून समजतातच, पण एक ध्येय साध्य करण्यासाठी किती किती खस्ता खाव्या लागतात, किती गोष्टींचा त्याग करावा लागतो याचंही प्रत्यंतर येतं. बाबासाहेबांचं चरित्र लिहिण्याचं काम ज्यांच्या हातून झालं ते डॉ. सागर देशपांडे मला फार फार लकी वाटतात. अर्थात, त्यांनी ज्या अचूकपणे आणि समर्थपणे ते काम केलंय, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!

व्यक्तिश: माझ्या लाडक्या 'शिवाजी'शी माझी ओळख बाबासाहेबांनीच करून दिली. राजा शिवाजी कायमचा लाडका झाला, पण नुसत्या जयजयकारात आणि लाऊडस्पीकर लावून नाचण्यात शिवप्रेम नसून ते त्या राजाच्या गुणांमुळे आणि कार्यामुळे वाटू लागलं, हे देणंही बाबासाहेबांच्याच लिखाणाचं! तासनतास 'राजा शिवछत्रपतीची' पारायणं करण्यात कॉलेजवयातले घालवलेले दिवस आणि त्यातून झोप उडालेल्या रात्री आज अभिमानास्पद वाटतात, हे उपकारही त्यांचेच! कधीकधी असं वाटतं, की बाबासाहेबांनी शिवचरित्र लिहिलंच नसतं तर शिवाजीराजा एवढा आवडता झाला असता का? सद्यस्थितीतले गड-किल्ले आणि त्यावरचे अवशेष बघून हे अशक्यच होतं म्हणा!

अजून काय लिहू? 'बाबासाहेब पुरंदरे' म्हटल्यावर त्यांनी दिलेलं शिवचरित्राचं दान दिसतं, आणि ते घ्यायला अपुरी पडणारी माझी झोळीही दिसते...

- नचिकेत जोशी (२५/४/२०१४)

Monday, April 21, 2014

पडझडीनंतरची धडपड: ज्ञानप्रबोधिनी, हराळी (जि. उस्मानाबाद)

प्रस्तुत लेख ही कुणाचीही जाहिरात नाही. पण 'मी, माझं, मला' या तीन स्वयंशत्रूंपासून थोडं लांब गेल्यावर जे जग दिसलं, जी आत्मीयता दिसली तिला शब्दांत लिहिण्याचा एक प्रयत्न आहे. भयंकर काळरात्रीनंतर येणार्‍या सूर्योदयाच्या स्वागताला पुन्हा नव्या उमेदीनेही उभं राहता येऊ शकते, सर्वस्व नाहीसं झालं असलं तरीही जगणं संपत नाही, तर ते पुन्हा सुरूही होऊ शकतं ही खात्री पटवणारी ही माणसं आणि हे पुरावे!

*******************************

'परब्रह्म शक्ती स्फुरो प्रबोधिनीमध्ये'.... बरोब्बर सकाळी सव्वासहाला उपासना सुरू होते. झाडून सगळे विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक उपासनेला जमतात. अर्धवट झोपेमध्येही धीरगंभीर आवाज कानात घुमतो, आणि बराच वेळ तिथेच ठाण मांडून बसतो. साडेसहाला उपासना संपते. प्रत्येकजण आपापल्या कामाला निघतात.

१९९३ च्या किल्लारी भूकंपामध्ये मराठवाड्यात विशेष नुकसान झाले. लातूर आणि उस्मानाबाद हे दोन जिल्हे विशेषत्त्वाने भूकंपाच्या तावडीत सापडले. त्या पडझडीनंतरच्या गेल्या वीस वर्षांत काही गावे पुन्हा उभी राहिली, माणसे सावरली, पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागली. त्या पडझडीनंतर उस्मानाबाद जिल्ह्यात भूकंपात पुसल्या गेलेले 'हराळी' नावाचे एक खेडे दत्तक घेऊन तिथे 'ज्ञानप्रबोधिनी'ने शाळा बांधली आहे. एक कृषी पदविका विद्यालय (डिप्लोमा)सुद्धा सुरू केले आहे. जोडीला फळप्रक्रिया, गांडूळखत इत्यादी उपक्रमही सुरू आहेत. नुकतीच या शाळेला भेट देण्याची संधी मिळाली.

सोलापूर-हैदराबाद महामार्गावर नळदुर्गपासून अंदाजे ३० किमी वर 'आष्टामोड' इथे उतरून (मोड = फाटा) लोहारा रस्त्याने सोळा-सतरा किमी वर आत हराळीला जावे लागते. एकूणातच दक्षिण मराठवाड्याचा परिसर मैलोन्मैल सपाट, उजाड आहे. एप्रिलमधल्या ऊन्हाने तर तो अजूनच भकास वाटत होता. बाईकवरून जाताना शाळेतले सर भूकंपात पडलेल्या घरांबद्दल सांगत होते. एखाद-दुसरे पडलेले घरही दाखवत होते.

शाळेत पोचलो तेव्हा सूर्य कलतीला आला होता. एप्रिल महिन्यातही कोरडी संध्याकाळ पसरत चालली होती.
प्रवेशद्वाराशीच हा दिसला आणि दिवसभराचा थकवा दूर पळाला -


भूकंपानंतर अनेक दानशूरांनी संस्थेला जमीन दिली, कुणी पैसा दिला, कुणी यंत्रसामग्री दिली, कुणी मनुष्यबळ दिलं. नऊ एकर जमिनीवर पैसा आणि उपलब्ध सामग्री यांचा नेटका वापर करून संस्थेने शाळा उभारली, आंबा-लिंबू-काजू-चेरी यांच्या बागा फुलवल्या, उपलब्ध मुबलक सौरशक्तीचा आणि पवनशक्तीचा वापर करून पाच तास लोडशेडींग असतानाही वीज उपलब्ध करून घेतली आहे. त्याचे हे फोटो -तिथल्या फळप्रक्रिया विभागात 'घरच्या' शेतातल्या फळांवर प्रक्रिया करून आवळ्याचे सरबत-सुपारी-लोणचे, आले-लिंबू सरबत, पेरूच्या वड्या (यांची चव आवडली मला!) असे कितीतरी पदार्थ पुणे-सोलापूर-मुंबईत विक्रीसाठी पाठवले जातात.

पुरूष व महिला कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र निवास नुकतेच बांधून झाले आहेत. स्थानिकांबरोबरच बाहेरगावातून कामासाठी येणार्‍या लोकांसाठी इथे राहण्याची सोय होते.व्यसनमुक्ती केंद्राचं बांधकाम सध्या सुरू आहे.


या कामासाठी लागणार्‍या विटाही तिथेच तयार होतात -


दोनमजली शाळा, उपासना वर्ग, स्वतंत्र भोजनगृह, वाचनालय, भोजनगृहासाठी खास करून बसवण्यात आलेले सोलर पॅनल्स. या पॅनल्समुळे संपूर्ण शाळेचे दुपारचे जेवण बनवले जाते.
अतिशय ओसाड भागावर अविरत प्रयत्नांमधून आता हळूहळू हिरवळ फुलू लागली आहे.


तीन दिवसांच्या मुक्कामात तिथे अनेक माणसे भेटली. वयाने, अनुभवाने माझ्यापेक्षा कितीतरी मोठी. ज्ञानप्रबोधिनी सोलापूर आणि हराळी ज्यांनी बांधली ते अण्णा ताम्हणकर भेटले.(डॉ. स्वर्णलता भिशीकर किंवा लताताई आणि अण्णा ताम्हणकर या दोन ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांचं या कामी योगदान मोठं आहे. कामानिमित्त पुण्यात गेल्यामुळे लताताईंशी भेट होऊ शकली नाही.) वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षीही भर दुपारच्या उन्हात परिसरात देखरेखीसाठी 'राऊंड' मारण्यास जाणारा हा अवलिया माणूस म्हणजे शिस्त, जिद्द, ज्ञान, चिकाटी, निष्ठा यांचा नतमस्तक व्हावं असा अनोखा मिलाफ आहे. केवळ अण्णाच नव्हे, तर त्यांच्या संपर्कात आणि सहवासात आलेली प्रत्येकच व्यक्ती थोड्याफार फरकाने अशीच आहे. मीराताई आणि त्यांचे पति हराळीची शाळा सांभाळतात. पुण्याच्या अशोक विद्यालयातून निवृत्त झाल्यावर मीराताई आता तिथेच शिफ्ट झाल्या आहेत. आज उतारवयातही त्यांची धावपळ, प्रत्येक छोट्यामोठ्या बाबीकडे लक्ष देऊन काम करायची सवय, आपुलकी, मुलांबद्दलची माया बघत राहावी अशी आहे!

ही सगळीच माणसे वेळ पाळण्यात तत्पर आहेत. दिलेला शब्द आणि दिलेली वेळ पाळण्याची वृत्ती हे गुण माणसाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात असं मला वाटतं. हळूहळू मोठा होत चाललेला पसारा सांभाळतानाही इथले सगळेच जण सेवाभावी वृत्ती जराही सोडत नाहीत, हे वैशिष्ट्य! पाट्या टाकून कामं करण्याची सवय इथल्या अस्सल सेवाव्रतीना ठाऊकच नाहीये, असं सारखं वाटत राहिलं. मग ते शाळेतल्या तासाबद्दल चर्चा करणं असो अथवा भोजनगृहात जेवताना एखादा पदार्थ वाढण्याबद्दल असो, जी सेवाभावी वृत्ती पाहुण्याबद्दल, तीच तिथल्या शाळकरी मुलांबद्दलही!

मी तिथून निघताना त्या अनोळखी, बुजर्‍या पण लाघवी मुलांनाही 'अजून एक दिवस तरी थांबा की' असा आग्रह करावासा वाटला, यापेक्षा अधिक माझ्यासारख्या एका सामान्य शिक्षकाला काय हवं होतं? हे समाधान शब्दांत मांडता येण्यासारखं नाहीच.

लिंबाआड मावळतीला उतरत जाणारा सूर्य पुन्हा चढण्याची उमेद घेऊनच गेली वीस वर्षे उगवतोय आणि यापुढेही उगवेल. पुढच्या वेळी जेव्हा हराळीत जाईन तेव्हा अशीच नवी पालवी तरारलेली दिसेल अशी खात्री आहे.


- नचिकेत जोशी

Tuesday, March 25, 2014

... तितकीच आहे!

आजही जखमेत माझ्या वेदना तितकीच आहे
प्रार्थनेमध्ये अजूनी याचना तितकीच आहे

विषय कुठलाही असू दे, बोलण्याचा हक्क आहे!
हातवारे ठाम जितके, वल्गना तितकीच आहे

'लांबुनी पाहेन' म्हणतो, सर्वथा रममाण होतो
घेउनी संन्यास अजुनी, वासना तितकीच आहे

टाकतो कुंपण सभोती, आत मग बेफाम जगतो
जेवढे आहे खरे हे, कल्पना तितकीच आहे

या ढगांच्या आतले कोणी रिते झाले असावे!
बरसणे झाले कमी पण गर्जना तितकीच आहे

फार भारावून जाण्याएवढे काहीच नाही
(या नव्या दु:खातसुद्धा यातना तितकीच आहे)

- नचिकेत जोशी (१९/२/२०१४)

Friday, January 31, 2014

रिकामेपण

तुझ्या आकाश होण्याच्या प्रयत्नांची दया येते
कितीही व्यापुनी जागा, रिकामेपण तुला येते

जरी आशा-निराशेला भिकार्‍याचे जिणे देतो
तरीही सोबती कुणि ना कुणी कायम पुन्हा येते

म्हणालो, 'हे असे का'? - तर म्हणाले, "मागणी आहे"!
अशी झटक्यात प्रश्नांची उकल, सांगा कुणा येते?

भराभर श्वास घेण्याने गरज तर भागते सारी
कधी हळुवार श्वासांना रुबाबाची मजा येते

कुणी जगतात अस्सल तर कुणी मरतात निष्ठेने
तशी बहुतेक सार्‍यांना हजेरीची कला येते

ऋतूही कोरडे सारे, दिशाही ओस पडलेल्या
अशा निष्प्राण जगण्याला विरक्तीची नशा येते

- नचिकेत जोशी (३०/१/२०१३)

Monday, January 20, 2014

कुटं कुटं जायाचं ट्रेकिंगला....?

राजगडला, लोहगडला
मोरोशीच्या भैरवला
साल्हेर, वासोटा, माळशेजला
कुटं कुटं जायाचं ट्रेकिंगला...?

वाटाच वाटा - जाऊ कुटं
थंडीचा काटा - र्‍हाऊ कुटं
उन्हात रापायला, वार्‍यात टाकायला
सोबत चला नं भटकायला
कुटं कुटं जायाचं ट्रेकिंगला?

पायात अ‍ॅक्शन घालून,
पाठीस हॅवर लावून
कातळ चढून, दरीत पाहून
कधी कधी जाऊया रॅपलिंगला
कुटं कुटं जायाचं ट्रेकिंगला...?

कोकण कडा तर आवडीनं
टक्कमक बघूया जोडीनं
सनसेट पाहून, शेकोटी लावून
गुहेत जाऊया झोपायला
कुटं कुटं जायाचं ट्रेकिंगला...?

- नचिकेत जोशी
(पूर्वप्रसिद्धी - 'चक्रम हायकर्स' तर्फे प्रकाशित 'सह्यांकन २०१३' स्मरणिका)

Wednesday, January 8, 2014

काय झाले ते कळेना

काय झाले ते कळेना
सत्य बिल्कुल ऐकवेना

संपली केव्हाच मैफल
पाय पण माझा निघेना

पोचलो वरती अचानक
आणि खाली उतरवेना

विस्मृतीने जन्म घ्यावा
स्मरणवेणा सोसवेना

जवळचे सोडून गेले
हट्ट तरिही सोडवेना

भोवती ओसाड दुनिया
आतली गर्दी हटेना!

शोधुया मुक्काम नंतर
सोबतीचा हात दे ना!

भोगण्याचा मोह नाही
अन् विरक्तीही जमेना!

नेहमी कर्तव्य केले
देव का अजुनी दिसेना?

नचिकेत जोशी (८/१/२०१३)