Pages

Tuesday, March 26, 2013

कदाचित

मनी तिच्याही भाव कदाचित
तिला पाहिजे नाव कदाचित

ती दिसली, पण दुखले नाही
भरून आला घाव कदाचित!

चाल नेमकी अचूक झाली
हरेन आता डाव कदाचित

मिळाले तरी टिकले नाही
अखेर नडली हाव कदाचित

इथेच उरली आहे माती
इथेच होते गाव कदाचित

नचिकेत जोशी (२४/३/२०१३)

Monday, March 11, 2013

तुझ्यामाझ्यातले नाते


सुरू राहो अशी आनंदयात्रा, हात हाती दे
नव्याने भेटतो मजला तुझ्यासोबत निघाल्यावर

**************

तुझ्यापाशीच येतो तू कितीही दूर केल्यावर
तसा विश्वासही नाही तुझ्याव्यतिरिक्त कोणावर

असे जगतो - जणू सोडून द्यावे पान पाण्यावर
दिशांच्या सोबतीने पोचतो भलत्या किनार्‍यावर

कधी निष्पर्ण माळावर कुठुन नकळत झुळुक यावी
तसे आपण अचानक भेटलो ओसाड जगल्यावर

मनाच्या कागदावरती तुझे अस्तित्व जपलेले
तसे राहील का कायम तिथे अक्षर उमटल्यावर?

तुझ्या हसण्यातुनी बरसे मुका पाऊस ओढीने
तरी अतृप्त ओंजळ मी, तृषाही पूर्ण शमल्यावर

अचानक पावले निघती नव्या कुठल्या उमेदीने?
तुझ्यामाझ्या प्रवासाचे पहाटे स्वप्न पडल्यावर!

किती सोसेल ही माती? तिचाही जीव इवलासा!
कुणाशी मोकळे व्हावे तिने आभाळ रुसल्यावर?

बरसण्याची तुझ्या आहे प्रतीक्षा या धरेलाही
सरी येणार केव्हा? तू रित्या मेघांत रमल्यावर!

खुळे आभास जपण्याची कधी थांबेल ही धडपड?
पुन्हा येती मला ऐकू, तुझे आवाज विरल्यावर

कुणासाठी? जगासाठी? तुझ्यासाठी? स्वतःसाठी!!
तुझा हमखास होतो स्पर्श, कायम ओळ लिहिल्यावर!

उन्हाच्या आडवाटेवर तुला चोरून बघणारे
खुळे हे रान ओशाळे, धुके अलगद सरकल्यावर

स्वतःवरची उधारी मी कशीही फेडली असती
इथे जगणेच तारण हे कुणाच्या फक्त असण्यावर!

जरा रेंगाळूया येथे, ठसे सोडून जाऊया
कधी होणार अपुली भेट या गर्दीत शिरल्यावर?

तुझ्यामाझ्यातले नाते फुलाया लागले आहे
हवेपासूनही लपवूच! ते बहरून आल्यावर

- नचिकेत जोशी