Pages

Monday, January 28, 2008

ऋतू

ऋतू येत होते ऋतू जात होते
भरावे स्वताला मला ज्ञात होते

जरी धावलो भूवरी वास्तवाच्या
ठसे पावलांचे खगोलात होते

सले वेदना काळजाशी तरीही
हसू लोचनी, गीत ओठात होते

तमाची तमा मी न केली कधीही
सडे तारकांचे प्रवासात होते

उभा सूर्य झालो नभाच्या उराशी
कुठे सत्य सारे उजेडात होते?

न मी भेटलो कोणत्याही गुरूला
हरी सावळे रूप ध्यानात होते

- नचिकेत (२८/२/०७)

Sunday, January 27, 2008

कमळगड

पायथ्यापासून गड दिसावा, असं कमळगडाच्या बाबतीत होत नाही. समोर दिसणारा डोंगर चढल्यावर मग कमळगडाचा डोंगर दिसतो, हे त्या समोरच्या डोंगरावर गेल्यावरच कळतं. अर्थात, खालच्या डोंगराने चढण्याची सगळी हौस भागवलेली असल्यामुळे कमळगडाचा मुख्य डोंगर मग अगदीच सोप्पा वाटतो, आणि सोपा आहेही.
कमळगडाच्या वाटांबद्दल कोणतीही माहिती नसतांना आम्ही कमळगडच का निवडला, याचं ’वाट चुकल्यावरही न वाटणारी भीती’ हे एकच उत्तर देता येईल. बाकी त्याचा इतिहास भूगोल पाठ होता. त्यावरून ’एवढं सगळं माहित असतांना तू प्रत्यक्ष गड पाहण्य़ाची गरजच काय?’ असा पुणेरी सवालही मित्राने विचारून पाहिला. (आणि मी अर्थातच टाळला.)
यावेळी पाचच जण असल्यामुळे मयूरच्या चारचाकीतून (अजिबात थंडी न वाजता) सकाळी सकाळीच वाई गाठली आणि एवढ्या सकाळी ८ वाजता नाष्टा कुठे मिळेल असं अख्ख्या वाईत शोधायला लागलो. सुदैवाने, महागणपतीच्या मंदिराजवळ एक छोटेसे हॉटेल सापडले. मग पोटोबा झाल्यावर कृष्णेकाठच्या त्या तुंदिलतनू महाकाय ’विठोबाचे’ दर्शन घेतले आणि वासोळे गावाकडे निघालो. धोम धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून पांडवगड उजव्या हाताला ठेवून पुढे निघालो.
आमच्या अपेक्षेपेक्षा वासोळे गाव खूप दूर होते. धोम धरणाची भिंत ओलांडून पुढे जात राहायचं. डाव्या हाताला धोम धरणाचा जलाशय आपली साथ न कंटाळता करत राहतो. शेवटी आपल्यालाच कंटाळा येतो! हा अख्खा जलाशय ओलांडून मग खावली गावनंतर वासोळे गावासाठी डाव्या हाताला वळलो. या सबंध रस्त्यावर जलाशयाच्या पलीकडे नवरा-नवरीचे डोंगर आणि मागचे वऱ्हाडाचे सुळके आपलं लक्ष वेधून घेतात. (मी आधी त्या सबंध रांगेलाच कमळगड समजत होतो).
गावात गडावर जायची वाट विचारून घेतली. इथे गावकऱ्यांची मतं विभागलेली होती. काही गावकरी आम्ही मधल्या वाटेने वर जावे या मताचे होते, तर काहींनी ’तिथून वाट सापडणार नाही, तुपेवाडीच्या शाळेवरून पुढे जा, ती वाट सरळ आहे’ असा सल्ला दिला. आम्ही (अर्थातच) मधली वाट पक्की केली. ह्या दीड तासांच्या शॉर्टकट ने पहिला डोंगर पार केला आणि पठारावर पोहोचलो तेव्हा बारा वाजले होते (घड्याळात). ही वाट खरंतर सोपी आहे. फक्त चुकलो तर पुन्हा योग्य वाट गाठायला थेट पायथा गाठावा लागतो, म्हणून गावकऱ्यांनी तुपेवाडीच्या लांबच्या वाटेने जायचा सल्ला दिला असावा. पण या वाटेने बऱ्यापैकी अंतर वाचते.
पठारावर आलो आणि समोर कमळगडाचे पहिले दर्शन झाले. आणि एक गोष्ट ही लगेच जाणवली, की आता पुढची वाट घनदाट झाडीतून आहे, तसंच चढ फारसा नाहीच. माथ्यावरच्या शेवटच्या टप्प्यात दाट झाडी असलेल्या फार थोड्या किल्ल्यांपैकी कमळगड हा एक आहे. पठारावरच्या एका झाडावर थोडावेळ विसावलो आणि तडक कमळगडाकडे निघालो. भर दुपारी बारा वाजताही प्रसन्न सावलीतून साधारण २० मिनिटात माथ्यावर दाखल झालो. गड नजरेच्या एका आवाक्यात संपतो. फिरायला काहीच नाही. अगदी महादेवाचे मंदिरही नाही. फक्त सुमारे ५००-६०० फूट खोल गेरूची (काव) विहीर आहे. विहीरीत तळापर्यंत उतरता येते. खाली विलक्षण गारवा वाटतो.
गडावरून सभोवतालचा परिसर डोळ्यांचे पारणे फिटावे इतका सुंदर आहे. महाबळेश्वर-पाचगणी रांग, धोम धरणाचा जलाशय आणि दूरवर दिसणारी धरणाची भिंत, त्यापलीकडे पांडवगड, त्याच्या डाव्या हाताला मागे मांढरदेवी, रायरेश्वर, केंजळगड.. आणि खुद्द कमळगडाच्या पायथ्याला बिलगलेल्या एका बाजूला कृष्णा आणि दुसऱ्या बाजूला वाळकी नदी! तटबंदीच्या काठाकाठाने चालत, स्वत:चे फोटोग्राफीचे कौशल्य अजमावत आम्ही गड फिरलो. तटबंदीवरून गडाला प्रदक्षिणा घालण्यात मोठं सुख असतं, मजाही असते. पुनश्च गड उतरून पठारावर आलो. तिथल्या घरात राहणाऱ्या तुकारामच्या सल्ल्यावरून परत जाताना तुपेवाडीच्या वाटेने खाली उतरायचे ठरवले - केवळ दोन्ही वाटा माहित होतील म्हणून.
वाटेत गोरक्षनाथाचे मंदिर लागले. सकाळच्या नाष्ट्यानंतर काहीच खाल्लेले नसल्यामुळे त्या मंदिराच्या आवारात पाय (आणि खाद्यपदार्थांच्या पुड्या) मोकळे सोडून बसलो. अस्मादिकांनी स्वत:च्या हाताने बनवलेले पोहे इतरांना (त्यांच्या चेहऱ्याकडे न बघता) कौतुकाने खायला घातले. गोरक्षनाथाच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाही. कार्तिकस्वामींप्रमाणेच इथेही एखादी पौराणिक कथा असावी.
मंदिरातल्या महाराजांना उतरायची वाट विचारून घेतली आणि उजव्या हाताला दिसणारी अख्खी दरी डोंगराच्या रेघेवरूनच ओलांडून मग सरळ खाली उतरायचे हे लक्षात ठेवले. अर्ध्या वाटेत बहुधा योग्य फाट्याऐवजी आधीच डोंगर उतरायला लागलो. अर्थात एक खाली जाणारी बऱ्यापैकी रूळलेली पायवाट दिसल्यावर तशी समजूत झाली. अखेर त्याच वाटेने उतरत, १-२ वेळा चुकत आणि शेवटी पूर्ण चुकून एकदाचे गावात उतरलो. तुपेवाडीची शाळा सोडाच, पण शाळेसदृश एकही इमारतबांधणी वाटेत लागली नाही, आणि संपूर्ण वेगळी वाट एन्जॉय करत खाली आलो.
गाडीतून परत येताना समोरून येणाऱ्या दोन छोट्या मुलांच्या हातातल्या पेप्सीकोल्याकडे बघून प्रत्येकाला ’बालपणीचा काळ सुखाचा’ आठवला आणि पेप्सीकोले घेण्यासाठी गाडी थांबवली. मग हायवेवर एकदाच चहापानासाठी थांबून साडेआठला पुण्यात पोहोचलो.
सह्याद्रीत मनापासून भटकण्याची आवड असलेल्यांसाठी कमळगड हे ’शूड नॉट मिस’ असे ठिकाण आहे... एका दिवसात सहज पाहून होईल अशी वाईभोवतालच्या दुर्गसाखळीतली कमळगड ही दिवस सार्थ करणारी कडी नक्कीच आहे!

- नचिकेत जोशी (17/1/2008)

Sunday, January 20, 2008

पांडवगड

गेल्या ४ महिन्यांत ट्रेक सोडाच, साधी पायपीटसदृश भटकंतीही केली नव्हती. बऱ्याच दिवसांनंतर मोकळा वेळ मिळाला होता. CAT चा एक attempt झाला होता, पुढची परीक्षा गळ्याशी आलेली नव्हती, त्यातच भटक्यांसाठी आदर्श मौसम चालू झालेला! त्यामुळे Trek साठी नवीन किल्ल्याच्या (आणि त्याचबरोबर साथीदारांच्या - किमान ४ तरी हवेतच ना! ) शोधात होतो. आधी केंजळगड नक्की केला होता. पण मायबोली.com मुळे ओळख झालेल्या एका जाणत्या आणि अत्यंत अनुभवी treker चा सल्ला घेतला आणि सर्व बाजूंनी विचार करून पांडवगड नक्की केला. तीन Bike वर आम्ही सहा जण (भल्या पहाटे) साडेसहा वाजता निघालो.
पांडवगडाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला म्हणजे राष्ट्रीय महामार्ग ४ वर भोर फाट्याला वळून मांढरदेवी मार्गे जाऊन गडाच्या पायथ्याचे गुंडेवाडी गाव गाठायचे. किंवा मग NH 4 हून वाईमार्गे जायचे. आम्ही दुसरा मार्ग निवडला. याचे एक कारण म्हणजे, गाडी चालवण्यासाठी अत्यंत सुंदर असा महामार्ग! प्रशस्त आणि खड्डे विरहित रस्त्यामुळे NH 4 वर गाडी चालवणे हा एक आनंद असतो. जाताना शिरवळला "श्रीराम" चा प्रसिद्ध वडापाव खाल्ला. हाडांत शिरणारी थंडी म्हणजे काय हे तोपर्यंत कळलं होतं. ७०-८० च्या वेगाला स्वेटर आणि त्यावरून जाकीट ही दुहेरी तटबंदी थंडी रोखण्यास पुरेशी नाही हे जाणवलं. त्यामुळे दोनदा चहा हा अपरिहार्य होता. त्या हॉटेलमध्ये आलेल्या बाकीच्या लोकांना कशी थंडी वाजत नाही, याचं उत्तर त्यांच्या बाहेर उभ्या असलेल्या चार चाकी वाहनांनी मुक्यानेच दिलं आणि आम्ही खाण्यावर ताव मारायला सुरुवात केली. जवळजवळ पाऊण तास तिथे घालवल्यानंतर मात्र सरळ आधी वाई गाठली.
वाईत शिरतानाच उजव्या हाताला चौकोनी माथ्याचा पाण्डवगड दिसायला लागतो. एका डोंगराच्या मागे पांडवगड आहे, आणि गडावर जाताना हा डोंगर चढून जावं लागणार हेही लगेच कळतं. वाईतून महागणपतीच्या मंदिरावरून धोम धरणाकडे रस्ता जातो. त्या रस्त्यावर वाईपासून साधारण ३-४ किमी वर मेणवली नावाचं गाव आहे. मेणवली हे पेशवाईतील सुप्रसिद्ध साडेतीन शहाण्यांपैकी एक - नाना फडणवीसांचं गाव. गावात कृष्णेकाठी त्यांचा वाडा आहे, तसंच वाड्यापाठीमागील घाटावर चिमाजी अप्पांनी वसईच्या युद्धात जिंकून आणलेली महाकाय घंटाही बांधलेली आहे. याच घाटावर "स्वदेस" चित्रपटातली बरीच दृश्ये चित्रित झालेली आहेत हे तिथे गेल्या गेल्या कळतं. आम्ही मात्र "आधी लगीन पांडवगडाचे" असं म्हणून मेणवली गावातून पांडवगडाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याला लागलो. वाटेत धोम धरणाचा कालवा लागतो. तिथून पुढे जाऊन शेवटच्या घराजवळ गाड्या लावल्या. Helmet, जाकीट त्याच घराच्या पडवीत ठेवलं, आणि समोर दिसणाऱ्या पांडवगडाकडे मार्गस्थ झालो. एव्हाना साडेनऊ झाले होते.
चढायला अंदाजे किती वेळ लागेल हा विचार करत असतानाच, गड बराच उंच आहे, हे लक्षात आले. अर्थात, चढणारेही तबियतीचे (म्हणजे "बाळसेदार" नव्हे, तर बऱ्यापैकी अनुभवी आणि तयारीचे) असल्यामुळे त्याचा नंतर विचार केला नाही. या ऋतूमध्ये कोणत्याही गडावर जाणं हा एक सुखद अनुभव असतो. मुख्य कारण म्हणजे पावसाळा नुकताच संपल्यामुळे पाण्याची असलेली उपलब्धता. गडावरही आणि वाटेवरही पाणी उपलब्ध आहे.
डोंगर चढायला सुरूवात केली आणि वाटेवरच्या पिवळ्या गवताने बुटांत शिरून आपल्या अस्तित्वाने टोचायला सुरूवात केली. या बुटाबाहेरच्या गवताचे बुटांत शिरल्यावर काटे होतात. "दुरून डोंगर साजरे" का असतात, याचे मला आणखी एक उत्तर मिळाले.
पांडवगड चढताना लक्षात ठेवण्यासारखी एकच गोष्ट म्हणजे, समोर दिसणारी डोंगराची सोंड. या सोंडेवरूनच चालत वर जायचं. मध्येच एके ठिकाणी एक पायवाट गडाच्या उजव्या अंगाला घेऊन जाते. तिथून गेलो, तर गडाला फक्त प्रदक्षिणा होते. पण सुदैवाने खाली उतरणाऱ्या एका group ने आम्हाला योग्य "वाटेला लावलं". कोणत्याही trek मध्ये ’वाट चुकणे’ हा आमचा एक अविभाज्य घटक असतो. संपूर्ण trek भर जर एकदाही वाट चुकलो नाही, तर शेवटी आम्हालाच चुकचुकल्यासारखे होते. वाट चुकण्याशिवाय कोणत्याही भटकंतीला मजा नाही! भेटलेल्या त्या group मुळे आमचा तो भाग थोडक्यात चुकला!
वाटेत एक पठार आलं, चार घरांची एक वस्ती लागली, तिथल्या बाईने वाटेत सोबत म्हणून काठी दिली, कारण त्या उतरणाऱ्या group ने गडावर कुत्री असून ती दिसली तर "असाल तिथून मागे पळत सुटा" असं बजावलं होतं. वास्तविक, ती कुत्री गडावर गेली २० वर्षं वास्तव्यास असणाऱ्या शेर वाडिया यांची आहेत, हे आम्हाला माहीत होतं. पण "ती कुत्री दिसता क्षणी मागे फिरा" ही माहिती नवी होती! शेर वाडियांनी अख्खा गड विकत घेतला असून ते कायम गडावरच अगदी निसर्गाच्या सान्निध्यात राहतात, अगदी क्वचित खाली उतरतात. त्यांना भेटणं हाही आमच्या कार्यक्रमपत्रिकेतला एक भाग होताच. पण तिथे सर्वात शेवटी जाऊ असा विचार करून त्या बाईला आधी बालेकिल्ल्याच्या खालून उजव्या हाताने जाणारी वाट विचारून घेतली.
एकूण गड खड्या चढाचा आहे. त्या वस्तीपासून बालेकिल्लाही बऱ्यापैकी उंच दिसत होता. वाट खड्या चढाची असली, तरी अवघड अजिबात नाही. बालेकिल्ल्याच्या साधारण २०० फूट उंच कातळाखाली आलो. तिथून डाव्या हाताने जाणारी वाट गडाच्या उत्तर टोकाला बांधलेल्या शेर वाडियांच्या बंगल्याकडे जाते. आम्ही कातळाच्या उजव्या बाजूने जाणारी वाट पकडली. दरीच्या काठाकाठाने बालेकिल्ल्याला अर्धीअधिक प्रदक्षिणा घालून व वाटेतली बालेकिल्ल्याच्या कातळाला खालून लटकलेली व माशांनी लगडलेली ३-४ मधाची पोळी भीत भीत बघून आम्ही गडावर दाखल झालो. त्या पोळ्यातल्या माशा जर उठल्या तर आपलं नक्की काय होईल याचा अंदाज न आल्यामुळे शाळेत सरांनी सांगितलेले "मधमाशा उठल्यावर बचावाचे उपाय (म्हणजे कमीत कमी हानीचे उपाय)" मी मनातल्या मनात आठवून घेतले. बराच वेळ दरवाजा न आल्यामुळे व कातळाला अर्धी-अधिक प्रदक्षिणा ही होत आल्यामुळे आता चुकून आपण शेर वाडियांच्या बंगल्यालाच (व मुख्यत: कुत्र्यांना) भेट देणार अशी शंका येत होती. पण तसं काही झालं नाही. व बंगलाही बालेकिल्ल्याच्या खालच्या अंगाला आहे, हे नंतर वरून पाहताना कळलं.
गडावर बघण्यासारखं काहीच नाही. गडावरून बघण्यासारखं मात्र बरंच काही आहे. मांढरदेवी, धोम धरणाची भिंत व जलाशय, पाचगणी, महाबळेश्वराची रांग, वाई गाव, रायरेश्वराचं पठार असा चहुबाजूंनी विस्तीर्ण टापू नजरेत येतो. गड चढून गेल्याचं अगदी सार्थक होतं. एका नजरेच्या आवाक्यात न बसणारा हा सर्व प्रदेश समाधान होईपर्यंत डोळे भरून पाहून घेतला. आल्हाददायक वाऱ्याची झुळूक सगळा थकवा दूर करत होती.
बालेकिल्ल्यावर एक मोठं टाकं आहे, पांडजाई देवीचं देऊळ आहे, आणि एक हनुमान आहे. आम्ही टाक्यातल्या थंडगार पाण्याने ताजेतवाने झालो. बरोबर आणलेलं खाऊन घेतलं आणि दोन वाजता उतरायला सुरूवात केली. उतरतानाही तो झुबक्याप्रमाणे दिसणाऱ्या झाडांचा आणि त्यात टप्पोऱ्या मोत्यासारख्या उठून दिसणाऱ्या वाई-मेणवली गावांचा प्रदेश खिळवून ठेवत होता. आधी list मध्ये असलेला शेर वाडियांना भेटण्याचा कार्यक्रम गड उतरल्यावर मेणवली गावातला वाडाही पहायचा असल्यामुळे रद्द केला. वाटेत आम्हाला वर जाताना सोबत म्हणून दिलेली काठी त्या बाईला काठी परत केली. तिथल्या विहिरीवर पाणी प्यायलो आणि गड निवांतपणे उतरून मेणवली मध्ये आलो. "मेणवलीला कृष्णा नदी मोहक वळण घेते" असं वाचलं होतं. ते मोहक वळण पाहायला घाटावर पाय ठेवला आणि अगदी ओळखीचं काहीतरी पाहतोय असं वाटायला लागलं. "स्वदेस" मधलं "पल पल हे भारी" हे गाणे आणि त्यानंतरचा रावणवध तसंच शेवटची कुस्ती याच घाटावर चित्रित करण्यात आली आहे. "रात्रभर शूटींग चालू होतं, आम्ही प्रेक्षकांत बसलो होतो. शेवटी पहाटे ४ वाजता रावण मेला" - इति एक गावकरी. तसंच, पंचायत आणि "ये तारा, वो तारा" गाणे हे नाना फडणवीसांच्या वाड्याबाहेरील एका प्रचंड वृक्षाजवळ चित्रित झाले आहेत.
घाट मात्र सुंदर आहे आणि गावही गावपण टिकवून आहे. कृष्णेचं पात्र कमालीचं शांत आहे - "संथ वाहते..." ची आठवण करून देणारं. अस्ताला जाणारा सूर्य पाहत कृष्णेच्या पाण्यात पाय सोडून बसलो. सूर्य झाडामागे गेला आणि आम्हीही "आता निघावं" असं म्हणून (फोटो काढायला) निघालो. पुढचे १५-२० मिनिटं मन भरेपर्यंत फोटो काढून घेतले. चहा घेऊन सव्वासहा वाजता वाईतून निघालो.
"परतीच्या वाटेवरती"ही बुटांतल्या काट्यांप्रमाणेच पांडवगड, मेणवलीचा कृष्णेचा घाट, आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या त्या वाई आणि सभोवतालच्या प्रदेशाची संध्याछायेसारखी रेंगाळणारी आठवण मनात रुतून बसली होती. आणखी एक दिवस सार्थकी लागला होता. आणखी एक किल्ला गाठीशी जमा झाला होता. आणखी एक आनंदयात्रा संपवून आम्ही माघारी निघालो होतो. आयुष्यात ह्या "आणखी एक" ला सतत मागणी आहे, म्हणूनच पुढे जाण्यात आनंद आहे, आणि अशा आणखी अनेक आनंदयात्रांच्या स्वागतासाठी हा सह्याद्री आडवाटाही सजवून सदैव उभा आहे!

- नचिकेत जोशी (3/12/2007)