Pages

Wednesday, November 16, 2016

हर शाम.. उनके नाम - Revisit

एखादी कविता नशीब घेऊन येते हेच खरं!

पाचएक महिन्यांपूर्वीची गोष्ट. फेसबुकवर तिची फ्रेंड-रिक्वेस्ट आली. आणि सोबत मेसेजही आला - 'मी २००९ ला, तुम्ही लिहिलेली 'हर शाम उनके नाम' कविता वाचली होती. प्रचंड आवडली होती. माझ्या जगण्याशी मॅच होत गेली आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा वाचनात आली. त्यातलं नाविन्य माझ्यासाठी अजूनही ओसरलेलं नाही... ती कविता मायबोलीवर वाचली तेव्हापासून तुम्हाला शोधत होते आणि आज फेसबुकवर सापडलात!....' आणि मग पुढे माझ्या कौतुकाचे काही शब्द होते. मी थक्क! - ('that poem! once again!' - मी मनात.)

मी मग तिला गमतीत म्हटलं -
"तुमच्या जगण्याशी मॅच झाली हे वाचून आनंद झाला आणि दु:खही झालं".
"दु:ख का?" - ती.
"अहो, त्या कवितेसारखा शेवट झाला असेल तुमच्या आयुष्यात म्हणून दु:ख झालं". - मी.
तिचा रिप्लाय अमेझिंग होता.
"काही नाती मैत्रीच्या पलिकडे न जाणं हेच खूप छान असतं आणि या कवितेतून दु:ख होण्यापेक्षा आपण समजूतदार झालोय याचेच पुरावे मिळतात". - ती.
मग पुढे तुम्ही काय करता, आम्ही काय करतो (पोटापाण्यासाठी) असं जुजबी बोलणं झालं.

चॅटिंग संपलं आणि मग मी आपले माझे नेहमीचे सोपस्कार पार पाडून ती फ्रेंड रिक्वेस्टही स्वीकारली. ती मूळची कोल्हापूरची. कोल्हापूर म्हणजे माय फेवरिट!

तिच्याशी झालेल्या ह्या अनपेक्षित चॅटने मी बराच थक्क, खूश वगैरे झालो होतो. आणि भारंभार लाईक्स, कमेंट्स, लोकप्रियता याची काहीच सवय नसल्यामुळे आणि ते मिळवण्यासाठी आवश्यक कलागुणही अंगी नसल्यामुळे हे असे विरळ प्रसंग मला नेहमीच धीर आणि उत्साह देऊन जातात. त्या चॅटनंतर मग पुढे फारसा काहीच काँटॅक्ट झाला नाही. गेल्या महिन्यातली गोष्ट. तिचा पुन्हा मेसेज आला.

"मला व माझ्या मित्राला तुमची भेट घ्यायची आहे. मिळू शकेल का?" - ती.
"अहो आयेम जस्ट अ कॉमन मॅन. एवढी फॉर्मॅलिटी कशाला? भेटूया की." - मी . (मला तर 'गटणे'च आठवला).
"मला भेटायचंच आहे आणि मी ज्या मुलाशी लग्न करणार आहे त्यानेही तुम्हाला भेटावं अशी माझी इच्छा आहे". - ती.
('अच्छा! तर असं आहे होय!' - मी आपलं मनात.)

मग एका रविवारी दोघे भेटायला आली. तिच्यापेक्षा त्याच्याशीच जास्त गप्पा झाल्या. तो कविता-गझल-काव्यक्षेत्रातला नाहीये तरी कलेशी त्याचाही खूप जवळून संबंध आहे. त्यामुळे विषयांना तोटा नव्हता. ती पहिला तासभर आमचं बोलणं नुसतं ऐकतच होती. मग गाडी कवितांवर आली. 'हर शाम..' वर ती पुन्हा खुलून बोलली. मग माझ्या इतर काही कविता त्याच्या मोबाईलमध्ये तिच्यासाठी रेकॉर्ड करून दिल्या. तिच्या चेहर्‍यावरचा आनंद ही  माझ्यासारख्या एका सामान्य कवीसाठी बहुमोल गोष्ट होती. त्या दोन तासाच्या भेटीमध्ये मला दोन खूप हसरे, आनंदी, उत्साही मित्र-मैत्रिणी मिळाले. (घरून निघताना पद्मजाला सांगितलं की येतो तासाभरात जाऊन, त्यावर तिने लगेच सांगितलं, 'तू कसला तासाभरात येतोयंस? कमीत कमी दोन तास धर!' खरंच होतं तिचं.)

'हर शाम.. उनके नाम' या कवितेचं माझ्यावर खूप ऋण आहे. ते कधीही न फिटणारं आहे. (आणि ते फेडायची मला इच्छाही नाही.) ही कविता जितकी मला आवडते तितकीच आवडलेले अनेक जण सापडले, अजूनही 'ती'च्या सारखे सापडतात. दिवस सार्थकी लागल्याची भावना येते. अगदी कालपर्यंत अनोळखी असलेले आज खूप छान ओळखीचे होऊन गेलेत, ही त्या कवितेची किमया. एखादी कविता नशीब घेऊन येते हेच खरं. साहिर लिहून गेलाय - 'मै पल दो पल का शायर हूं'. म्हणूनच ह्या अशा गोष्टी भाग्याच्या खात्यात मांडलेल्या बर्‍या असतात.

आणि आता शेवटी तिचं नाव! नावात काय आहे? त्या दोघांच्या खुद्द स्वतःच्या घरी अजून त्यांनी लग्नाचं सांगितलं नाहीये. गोष्टी सर्वकाही सुखरूप, सुरळीत पार पडल्या (त्या पडतीलच) की मग सांगेनच तिचं नाव! तोपर्यंत, 'हर शाम उनके नाम'ची ही भेट अशीच कायम हसत राहूदे ही प्रार्थना आणि दोघांना उदंड शुभेच्छा!

- नचिकेत जोशी

Tuesday, November 8, 2016

घुसमट

समोर आला रस्ता म्हणुनी निघून गेलो
जन्माला आलो होतो मग जगून गेलो

तिला मिळाल्या फुटक्या काचा, भग्न आरसे
तुकड्या-तुकड्यांमधे तिला सापडून गेलो

प्रेम दिले तेव्हाही झाली घुसमट माझी
प्रेम मिळाले तेव्हाही गुदमरून गेलो

हरेक जन्मी साथ द्यायला तयार झालो
एका जन्माच्या अर्ध्यातच दमून गेलो

वार्‍यावरती फडफडणारे पानच होतो
सुगंध आला नशिबी अन् दरवळून गेलो

- नचिकेत जोशी (४/११/२०१६)

Thursday, September 1, 2016

वि. ग. कानिटकर - RIP Sir!

वि. ग. कानिटकर गेले... माझा एक खूप आवडता लेखक काळाच्या पडद्याआड गेला. 'चर्चिल', 'नाझी भस्मासुराचा उदयास्त', 'अब्राहम लिंकनः फाळणी टाळणारा महापुरूष' अशी त्यांची फक्त तीन पुस्तके आजपावेतो वाचली आहेत, पण त्यातलं प्रत्येक पुस्तक कितीतरी वेळा वाचलंय याची नोंदच नाही.

'नाझी...' सगळ्यात पहिल्यांदा वाचलं. तेही जवळजवळ २००० साली. तेव्हापासून हिटलर आवडायला लागला. विशेषतः १९२४ ते १९३९ पर्यंत हिटलरने भल्याभल्या महासत्तांना गुंडाळत आपल्याला हवं तसंच सगळं युरोपात घडवून आणलं, त्याची सखोल आणि अतिशय विस्तृत माहिती वाचून तर हिटलरबद्दल कौतुकच वाटलं होतं. Concentration Campsची प्रकरणं वाचून त्याचा तितकाच रागही आला होता. हे श्रेय कानिटकरांचं. अतिशय संतुलित पद्धतीने, जरी हिटलर त्या पुस्तकाचा नायक असला, तरी त्याचे गुण आणि दोष, यश आणि अपयश, तितक्याच ठामपणे मांडण्याची शैली खूप आवडली. पुस्तकाच्या नावातच 'भस्मासूर' शब्द वापरून हिटलर युरोपात टिकणं किती घातक ठरलं असतं हे सूचकपणे सांगितलं. पुस्तक संपताना 'भले हिटलरचे युद्ध डावपेच, आंतरराष्ट्रीय राजकारणातली समज तत्कालीन नेत्यांपेक्षा कितीही प्रगत असली तरी त्याचा नाश झाला ते बरंच झालं' अशीच भावना माझी तरी झाली. चर्चिलशी पहिली ओळख झाली ती 'नाझी...' मध्येच.

शालेय इतिहास शिकताना 'अ‍ॅटली पंतप्रधान झाला म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळालं, चर्चिल पुन्हा पंतप्रधान झाला असता तर ते शक्य नव्हतं (म्हणजे चर्चिल चांगला नव्हता हे अनुमान)' एवढंच शिकलो होतो. चर्चिलची महती माहित करून घ्यायची असेल तर हिटलरशी ओळख करून घ्यावीच लागते. एकदा ती झाली की मग चर्चिल अजून मोठा वाटायला लागतो. इंग्लंडवरचं आणि लोकशाहीवरचं त्याचं आत्यंतिक प्रेम, आणि खंबीर युद्धनेतृत्त्व हे सगळं कानिटकरांच्या 'चर्चिल'मधून कळलं. १९३४ ते १९३९ ही पाच वर्षे हिटलर सत्तेवर असताना नेमका इंग्लंडमध्ये चर्चिल सत्तेबाहेर होता आणि त्यामुळे इतिहास कसा बदलत गेला, हा दैवदुर्विलास कानिटकरांनी दोन्ही पुस्तकातून नेमकेपणे पोचवला. किंबहुना, हिटलर आणि चर्चिल यांच्यामध्ये जवळजवळ पंधरा वर्षे समान असल्यामुळे (१९३० ते १९४५) अनेक गोष्टी दोन्ही बाजूंनी वाचायला मिळतात. माझ्यासारख्या इतिहासप्रिय वाचकासाठी ही पर्वणीच. विसाव्या शतकात जग बदलून टाकलेल्या दोन प्रभावी नेत्यांकडे बघायची दृष्टी मला कानिटकरांच्या ह्या पुस्तकातून मिळाली, हे माझं भाग्य वाटतं.

एकोणिसाव्या शतकातही असाच एक नेता जगावर प्रभाव टाकून गेला. 'फाळणी टाळणारा महापुरूष' या विशेषणाने तर कानिटकरांनी एकाच वेळी अनेक मुद्द्यांना स्पर्श करून टाकला. अब्राहम लिंकनचं त्यांनी लिहिलेलं चरित्रही असंच माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि अनेकवेळा वाचावं असं आहे.

त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातली अजून दोन पुस्तकं आता लिस्टवर आहेत. माझ्याकडून हीच त्यांना श्रद्धांजली. You will always be remembered Sir!

- नचिकेत जोशी (१/९/२०१६)

Monday, August 22, 2016

ओंजळ

तुझ्या एका झुळुकीने माझे झाड सळसळे
तुझ्या प्रकाशाभोवती माझी तिरीप रेंगाळे

माझ्या देहाचा ठिपका तुझ्या कवेत आभाळ
तुझ्या हातात विसावे माझी फाटकी ओंजळ

होऊ पाहते आधार तुला पावलोपावली
अशी स्वप्नाळू बिचारी माझी अशक्त सावली

तुझे बेभान वादळ तुझे मंथन-तांडव
तुझ्या दारी घुटमळे माझे अबोल आर्जव

तुझ्यातून जन्म घेतो तुझ्यातच विसावतो
श्वास मंथर हिंदोळ देह पार्थिव उरतो

- नचिकेत जोशी (१९/८/२०१५)

Tuesday, August 9, 2016

करवंदांचे सार

लागणारा वेळ: ३०-३५ मिनिटे
लागणारे जिन्नस -
१. करवंदे (कच्ची किंवा पिकलेली कुठलीही चालतील. कच्ची असल्यास सार पिवळसर होईल, पिकलेली असल्यास लालसर. - इति स्त्रोत.)
२. फोडणीचे साहित्य (जिर्‍याची फोडणी, लसूण, कडीपत्ता, तिखट, उडीद किंवा मसूर डाळ)
३. मिरच्या-कोथिंबीर (आवडीनुसार)
४. तिखट-मीठ-गूळ (आवडीनुसार व चवीनुसार)
कृती -
१. लगदाटाईप दिसू लागेपर्यंत गरम पाण्यात करवंदे उकडून घ्यावीत. (इंडक्शन कू़कटॉप वर २०० डिग्रीला साधारण वीस मिनिटे). उकळत असतांना करवंदांचा रंग बदलू लागतो. मी पिकलेल्या करवंदांची केल्यामुळे लालसर रंग आला होता.
२. उकळून झाल्यावर पाणी वेगळे काढून घ्यावे. ते नंतर वापरता येईल.
३. उकळल्यामुळे मऊ झालेल्या करवंदांच्या बिया काढून घ्याव्यात. नंतर त्यांचा गर एकत्र करावा.
४. करवंदांचे बाजूला काढलेले पाणी आणि गर यांची एकत्रित मिक्सरमधून काढून पेस्ट करून घ्यावी. (लसूण आवडत असल्यास तीही घालावी)
५. नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात जिरे, तिखट, उडीद/मसूर डाळ घालून ही पेस्ट घालावी.
६. साखरेऐवजी गूळ घालावा. (आवडत असल्यास)
७. उकळी येईपर्यंत मंद आचेवर ठेवावे.
८. करवंदांचे सार रेडी!

विसू: या पदार्थाला बेसनही लावता येते. आम्ही विदाऊट बेसन खाल्ले त्यामुळे मी तशी पाकृ लिहिली आहे.
अवांतरः मी केलेले सार चवीलाही उत्तम झाले होते. (आंबटगोड, मध्यम घट्ट)

स्त्रोतः आंबिवली गावातील (पेठ किल्ला उर्फ कोथळीगडाच्या पायथ्याचे गाव) सौ. सावंत काकू.
दोन वर्षांपूर्वी कोथळीगडाचा पौर्णिमेच्या रात्री ट्रेक केला होता. त्यावेळी दुसर्‍या दिवशी त्यांच्याकडे जेवणात हे सार होते. या पदार्थाला तिकडे 'करवंदांची कढी' म्हणतात. पण या कृतीमध्ये बेसन पीठ वापरले नसल्यामुळे 'सार' म्हटले आहे. शेवटी नावात काय आहे, असा विचार करायचा आणि सार/कढी जे म्हणू त्याचा - आस्वाद घ्यायचा!

 - नचिकेत जोशी




Monday, August 8, 2016

मित्रा!

तसे पाहता खूप दूरचे होते अंतर मित्रा
तुझ्या सोबतीने येताना झाले सुंदर मित्रा!

किती ठिकाणी पडलो, रडलो, काचांवरती चिडलो!
जखमांवरती तुझी नेहमी आली फुंकर मित्रा!

अता अवेळी कट्ट्यावरची दिसू लागते मैफल
रमून जातो स्मरणांपाशी मग मी क्षणभर मित्रा!

शिक्षण घेताना पडलेले प्रश्न मोजके होते!
तीच उत्तरे शोधत फिरतो आता जगभर मित्रा!

फार लांबच्या स्वप्नांमागे धावत आहे नुसता
दिसते आहे सर्व जवळचे हल्ली धूसर मित्रा!

एकेकाळी वाटायाचे क्षण अपुरे दोघांना
आता नाही वाटत याचे नकोच उत्तर मित्रा!

या मैत्रीचा सुगंध जपणे हीच तिची सार्थकता!
सांग कधी जपता येते का मुठीत अत्तर मित्रा?

तसा एकट्यानेही जमला असता प्रवास सारा
दोघे असल्यामुळे पोचलो बहुधा लवकर मित्रा

कृतज्ञ मी राहीन नेहमी, अमोल या नात्याशी
अजून आहे बोलायाचे - बोलू नंतर मित्रा!

- नचिकेत जोशी (३०/९/२०१४, अश्विन शुद्ध षष्ठी)

Friday, August 5, 2016

... श्रावणाला

दाटते आभाळ त्याच्या स्वागताला
गाठते क्षितिजावरी त्या पावसाला

साजणीला भेटण्या आतूर झाला
वाट आभाळातली सोडून आला

मुक्त पागोळ्या उड्या घेतात खाली
चिंब रांगोळी सुवासिक अंगणाला

थेंब ओघळले तिच्या देहावरी अन्
गंध मोहरता नवा मातीस आला

भेट होऊ द्या अशी एकांत जागी!
पाठवा जमिनीत भिजलेल्या नभाला

वाट ओली पावलांना साद घाली
रान ओले दाखवी भय पाखराला

सातही रंगांमध्ये पाऊस मनभर!
काजळाचा रंग माझ्या श्रावणाला!

- नचिकेत जोशी (१७/६/२०१४)

Monday, July 4, 2016

पाउस

तिची आठवण येता, क्षणात भरतो पाउस
कोर्‍या ओळींमध्येही कोसळतो पाउस

पागोळ्यांच्या धारेखाली फुटते माती
खळग्यामध्ये स्वतःशीच मग भिजतो पाउस

चिंब फुलांच्या देहांवरचे नवथर यौवन
ढगात लपलेल्या थेंबानी टिपतो पाउस

ओढे, नाले, विहिरींमध्ये जाउन बसतो
पहा केवढा तहानलेला असतो पाउस!

कधीकधी आभाळ रिकामे होते सारे!
इतके कुठले ओझे हलके करतो पाउस?

त्याची चाहुल येता तीही गंध प्रसवते
मिठीत शिरता मातीच्या मोहरतो पाउस

कॉफी, भेटी, कट्टे सारे पुसून जातो
गालांवरती एकटाच ओघळतो पाउस

- नचिकेत जोशी (२८/७/२०१४)

Friday, June 24, 2016

घरच्या घरी मँगो 'नॅचरल' आईस्क्रीम (चार जणांच्या अंदाजाने)

वीकेंडला थोडा वेळ मिळाला तेव्हा आईस्क्रीम करून पाहिले. चवीलाही उत्तम झाले होते, म्हणून शेअर करतोय -

साहित्य - आंब्याचा रस - दोन वाटी
आंब्याच्या बारीक कापलेल्या फोडी - ८ ते १०
सुकामेवा/ड्रायफ्रूट्स - आवडीनुसार
दूध - दीड वाटी
मिल्क पावडर - एक वाटी
साखर (आवश्यक वाटल्यास, चवीपुरती)

कृती - दूध, मिल्क पावडर, आंब्याचा रस एकत्र करून मिक्सरमधून काढून घ्यावे. चव अगोड वाटल्यास साखर घालून पुन्हा मिक्सरमधून काढून घ्यावे. हे मिश्रण डीप फ्रीजमध्ये सहा ते आठ तास ठेवावे. डीप फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर बर्फाचा हलका थर तयार झालेला असतो. म्हणून नंतर पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्सरमधून काढून घ्यावे. दुसर्‍यांदा मिक्सरमधून काढल्यावर मिश्रण खूप सॉफ्ट बनते. त्यावर आंब्याच्या फोडी, ड्रायफ्रूट्स पेरून पुन्हा एक ते दोन तासांसाठी डीप फ्रीजमध्ये ठेवावेत. आईस्क्रीम रेडी!













- नचिकेत जोशी (२२/६/२०१६)

Friday, June 10, 2016

दुवा

तुझ्या आठवांच्या उजेडात माझ्या मनातील अंधार तेजाळतो
मनाआडच्या घोर रानातही मी, तुला जोडणारा दुवा शोधतो

तुझा हात हाती विसावून जावा, निघावे त्वरेने दिगंताकडे
नसावे कुणालाच ठाऊक काही, कुठे चाललो, वाट कोणीकडे
असे एक आयुष्य स्वप्नी तरी दे, असे रोज देवास त्या मागतो - १

नसे एकही भग्न गर्ता न वास्तू, अशा धूळवाटेवरी चाल तू
जिथे स्वप्नतळवे विसावू पहाती, तिथे एक मुक्काम रेंगाळ तू
तुझ्या सोबतीला कुणी एक तारा तुलाही न कळता नभी राहतो - २

अशी सांजवेळा, अशी ही उदासी, असा विश्वसंन्यास क्षितिजावरी
विरहसोहळा रंगतो शामरंगी नि वेणू इथे वाजते अंतरी
विरक्तीसही रंग येतो गुलाबी, नवा अर्थ प्रेमास या लाभतो - ३

- नचिकेत जोशी (१०/६/२०१६)

Monday, May 30, 2016

... करून पाहू!

मनात आहे ते ते सारे लिहून पाहू
मनासारखे कुठेतरी बागडून पाहू

पाटी पुसली आहे सारी गतकाळाची
आता केवळ रेघोट्या आठवून पाहू

अजून त्यांचा ताबा आहे मंचावरती
ताबा घेण्यापूर्वी खाली बसून पाहू

धापा टाकत जातो कायम जिकडेतिकडे
आयुष्यच हे श्वासामध्ये भरून पाहू

भेटायाला तिने घातली आहे बंदी
तिच्याभोवती भासांमधुनी फिरून पाहू

कधी ना कधी तिथे जायचे आहे नक्की!
इथून जाण्यापूर्वी इथले असून पाहू!

नकोच आता कोणाचीही वाट पाहणे
स्वतः स्वतःची सोबत बनुनी, निघून पाहू

नचिकेत जोशी (१०/६/२०१३)

Monday, April 25, 2016

डायरी

केव्हातरी सोशिकपणा माझ्यातला संपेलही
ठेवायला डोके मला खांदा तुझा लागेलही

तंद्रीमध्ये काही बिया थुंकून ती गेली पुढे
कुठली तरी रुखरुख तिची मातीतुनी उगवेलही

नात्यातही धोरण हवे - आत्ता कुठे कळले मला!
निष्ठेतला निष्फळपणा माझा मला उमगेलही

काही दिवस सांभाळली होती तिची मी डायरी
माझ्यातल्या खोलीमध्ये घुसमट तिची नांदेलही!

बोलावणे आले मला, अद्यापही आली न ती
इतक्यात सांगावे कसे? येईलही, थांबेलही!

येणारही नाही कुणी शोधायला येथे मला
स्मरणांमध्ये आहे, उद्या दुनिया मला विसरेलही

- नचिकेत जोशी (१०/३/२०१६)

Monday, March 7, 2016

समजूत (सुनीत)

पुन्हा भेटले दोघे अंतिम निर्णय घेण्यासाठी
पान उघडले, अखेर त्यांनी लिहून देण्यासाठी
कागद हाती, डोक्यामध्ये वादळ धुमसत होते
आर्त मनीचे ओळींवरती झरझर उतरत होते -

उपभोगांची नशिबाने आरास मांडली होती
दोन लेकरे नशिबाने झोळीत घातली होती
देहामध्ये सुखस्वप्नांची रंगत गेली मैफल
यथावकाशे तारुण्याचा उतरत गेला अंमल
तशी मुलांनी आपसात वाटून घेतली माया
आईबाबा तयार झाले अखेर त्याग कराया
डोळ्यांनी मग डोळ्यांची समजूत घातली काही 
एका वाटेचा दोघांनी हट्ट ठेवला नाही -

'कथाबीज चांगले मिळाले', एक म्हणे दुसर्‍याला
'डेलीसोप करूया याचा, शूट सुरू दसर्‍याला!'
 
- नचिकेत जोशी (३/३/२०१६)

Tuesday, February 23, 2016

किती लांबचे रोज घ्यावेत वळसे...

'सुमंदारमाले'तला हा प्रयत्नच, स्वतःला तपासून बघतो जरा!
अशा दीर्घ वृत्तामध्ये व्यक्त होणे, जमावे मला, हेच परमेश्वरा!

**************

किती लांबचे रोज घ्यावेत वळसे...

कधी आठवावे, कधी विस्मरावे, असे हेलकावे - भिती वाटते!
जरी बंद केली कवाडे घराची, झरोक्यातुनी ऊन डोकावते

नको वाटते ही जखम पावसाची, जुन्या वेदना फक्त हिरवाळती
उन्हाच्या झळा आत शिरतात तेव्हा मनाची भुई खोल भेगाळते

मनाचे रकाने भरावेत असले विषय सापडू देत देवा मला
(तिची बातमी वाचती रोज डोळे, छबी मन तिची सारखी छापते!)

कुणी भाळतो क्षणभरी फूल पाहत, खुळे फूलही आत गंधाळते
प्रवासी स्वत:च्याच धुंदीत निघतो, बिचारे मुके फूल कोमेजते

तुझ्या मैफली गाजती रोज आता, शहरही तुला आपलेसे करी
जुने खास कोणी, तुझ्या ओळखीचे, तुला ऐकण्या कान टवकारते

पुन्हा त्याच कविता, पुन्हा तीच हुरहुर, पुन्हा तेच छळणे, स्वतःला स्वतः!
किती लांबचे रोज घ्यावेत वळसे, पुन्हा वाट तेथेच रेंगाळते

'नको दु:ख वाटून घेऊस काही, मुक्यानेच हे भोग भोगायचे'
दया फार माझीच येता मला मग, कुणी आतले छान समजावते!

नचिकेत जोशी (३१/५/२०१३)

Friday, February 12, 2016

दुबळेपण

मी चाचपडत असतो
आजूबाजूचा उजेड अधीरतेने.
टिपू पाहतो माझ्या बोटांनी
त्याचा कण अन् कण
पण तो हाती येतच नाही कधी,
फक्त व्यापून असतो माझा भवताल
त्याच्या उजळपणाने.
मी स्वत:भोवती फिरतो,
उजेड कवेत घेऊ पाहतो
तर त्याचं नितळ तेजोमय अस्तित्त्व
जाऊ देतं मला आरपार
पण हाती गवसतच नाही काही.

मी चिडतो, चरफडतो, असहाय होऊ लागतो
तेवढ्यात उजेडालाच येऊ लागतो एक सुगंध -
अस्सल, शुद्ध आणि दर्पहीन.
माझ्या श्वासात भिनू लागतो त्याचा परिमळ
इतका, की हलके हलके
माझे श्वासही सुगंधी
आजूबाजूला भासही सुगंधी.
आणि मनाला ध्यासही सुगंधीच!

उजेड आणि सुगंध - एकजीव होतात
दोघेही मनभर बागडतात,
पण माझ्या स्पर्शात गवसत नाहीत ,
माझ्या ओंजळीत मावत नाहीत.
मी थकतो, निराश होतो,
असाह्यपणे माझं दुबळेपण कबूल करतो.

मग मला एकदम तू आठवतेस.
या उजेडासारखीच तू, या सुगंधासारखीच तू,
हा उजेडही तुझाच, हा सुगंधही तुझाच.

- नचिकेत जोशी (१०/२/२०१६)

Wednesday, February 3, 2016

धबधबा

जेमतेम चार महिने वाहणारा तो झरा
हल्ली अविरत कोसळतोय, अखंड धारांनी
भयचकित करणाऱ्या वेगात, आवेशात,
धबधब्याच्या रूपात.

कुणालाही सहज आकर्षून घेण्याची क्षमता
अन् वारंवार खेचून घेण्याचं वशीकरण तंत्र
असं बरंच काही आहे त्याच्यात,
ज्याच्या ओढीनं मावळतात विरोध,
आपसुक विरून जातात मनसुबे
स्वखुशीनं अलगद चार-दोन तुषार झेलायचे.
चकाकत्या कातळावर जमत जातं शेवाळ अन्
होत जातात ते निसरडे.
तरीही हवीहवीशी वाटत राहते वृष्टी
डोळ्यातही शिरतो धबधबा,
आणि फिक्कट होत जाते अवघी सृष्टी...

आमुलाग्र बदलत जातो
धबधब्यातून बाहेर येणारा प्रत्येक जण.
देहावरून ओसंडणारे समाधानाचे, कौतुकाचे टपोरे थेंब
धबधब्याच्या जलझोताने भारून गेलेली पंचेंद्रिये
पुन्हापुन्हा हवंहवंसं सारं!
सहाव्या इंद्रियावर मात्र गारठ्याने येते बधीरता
पार हाडापर्यंत पोचते शहार्‍याची ओल
लकवा भरायला लागतो अवयवांना
अन्
देहाबरोबरच मनालाही
दिशाहीन थकवा येऊ लागतो.....
तरीही
विरह अनावर होतो, मग

सगळेच पुन्हा निघतात - धबधब्याकडे!
आणि
नखशिखांत आसक्त भिजलो तरी
आतून विरक्त कोरडाच राहण्याचे
बळ मिळवायला
मी निघतो धबधब्यापासून दूर...

- नचिकेत जोशी (१५/१२/२०१३)

[या रचनेच्या फिनिशिंग टच साठी क्रांतीताईंचे (क्रांती साडेकर) आभार..]

Thursday, January 21, 2016

तुझी कविता

तुझी कविता हल्ली वाचायला घेतो खरी..
पण जरा जपूनच!

प्रत्येकच ओळ मला भिडते!
कधी लचके तोडते,
तर कधी कुरवाळते
कधी रात्र रात्र जागवते
तर कधी वेड्यासारखी वागवते...

मग कधी कधी तिच्यात
स्वत:ला शोधत बसतो ..
शब्दांचे अर्थ वळवून, चुकवून
माझ्या मनासारखे करतो..
कधी जमते मनाजोगी, पण
बरेचदा निसटते चकवा देऊन!

आधार देणारं, निराधार करणारं
डोळ्यात भिजणारं, श्वासात अडकणारं...
फुंकर घालणारं, साथ देणारं...
शब्दात दिसणारं, नि:शब्द करणारं..

इतकं कधी जगलीस तू?
ओळीत मांडायला कुठे शिकलीस तू?

ओळ, अर्थ, शब्द, अगदी कविताही
कवेत घ्यावीशी वाटते
आणि तेही पुरेसं वाटत नाही
इतकी पोकळी का दाटते?

- नचिकेत जोशी (८/२/२०१३)

Wednesday, January 20, 2016

कधीकाळी तुझ्यासाठी

मनाच्या खोल मातीने उन्हाळे सोसले होते
तरी मी पेरता स्वप्ने ऋतू पान्हावले होते

अबोला फार दिवसांचा तुझा हा अन तिथे माझ्या-
घराच्या स्वच्छ काचांवर धुके अंधारले होते

नसावी काय जगण्याला जरा खोली, जरा रूंदी?
तुम्ही नुसतेच श्वासांचे मनोरे बांधले होते

कळीचे फूल होताना तिथे मी नेमका होतो
जणू चोरून कवितेने कवीला गाठले होते!

अहो जे वाटते ना ते मला प्रत्यक्ष सांगा ना!
असे बरळून पाठीवर कुणाचे हो भले होते?

तशी ती भेट शेवटचीच होती आपुली तेव्हा
पुढे नुसतेच शब्दांना उरी कवटाळले होते

मला वाटायचे मजला फुलांनी गूज सांगावे!
(कितीही वाटल्याने का कुणीही आपले होते?)

नको दुस्वास दु:खाचा ठरवले मी, कुठे तेव्हा-
कुशीमध्ये सुखाच्या ते सुखाने झोपले होते

कधीकाळी तुझ्यासाठी दिला मी जीवही असता –
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते

- नचिकेत जोशी (२०/१/२०११)

Friday, January 15, 2016

काय करावे उर्जेचे

काय करावे उर्जेचे या समजत नाही
जोडत नाही ही काही वा तोडत नाही

क्षणाक्षणाला धांदल उडते जगता जगता
कधी श्वासही सोडुन देतो घेता घेता
गेली घटिका कोणासाठी थांबत नाही

उत्तर देते चकवा कायम वाटेवरती
प्रश्नच कोरून घेतो मग तळहातावरती
वळसे पडती, तरी शोध हा संपत नाही

लाभो उर्जा झर्‍यासारखी खळखळणारी
मुक्त सचेतन झोत होउनी सळसळणारी
प्राण बनुन ही श्वासांमध्ये अखंड वाही

जगतो आहे तोवर राहो सोबत माझ्या
ओळख माझी बनुनी येवो सोबत माझ्या
नसेन तेव्हा अर्थ तिलाही नसेल काही

नचिकेत जोशी (४/४/२०१३)

Thursday, January 7, 2016

आभाळरस्ता

ओळ घेते गूढ गिरक्या, शब्द नाचवतो मला
एक साधा सरळ मिसरा ना कधी सुचतो मला

मी खरेतर एवढाही देखणा नाही मुळी
आरशामध्ये कुणाचा चेहरा दिसतो मला?

घोळके जमतात, गर्दी बदलते वाटेमध्ये
साथ शाश्वत जोखमीची फक्त मी करतो मला

भाग्य अन् दुर्भाग्य ठरते कोणत्या रेषेमुळे?
मीच हे घेऊन कुतुहल हात दाखवतो मला

भावते झुळझुळ तुम्हाला या नदीची लाघवी
डोह फसवा या नदीचा फार आवडतो मला

अर्थ शब्दांचा भलेही कळत नाही तेवढा
रोख आवाजातला पण नेमका कळतो मला

वाटते कित्येकदा की वाट मी व्हावे तुझी
पण तुझा आभाळरस्ता दूर हाकलतो मला

- नचिकेत जोशी (२२/९/२०१४)