Pages

Monday, December 21, 2009

COEP सोडताना...

संध्याकाळची वेळ...
BC वरचा तोच कट्टा, तीच पायरी..
श्वासात भिनलेला तोच वारा
आणि दूरवर चमकणारा तोच तारा...
अशा त्याच वातावरणात अवचित झालेली पानगळ
आणि भैरवीत पोचलेल्या मैफलीला यावी तशी आलेली मरगळ...
अशातच मग सुरू होतात त्याच गप्पा..
मी मात्र अबोलच. स्वत:शीही बोलत नाही.
इतक्यात समोरुनच आवाज येतो आणि मी वास्तवाच्या जगात येतो.
"अरे, तूही सांग, काय वाटतं आता COEP सोडताना?"..
हं.... प्रश्न एकच, पण उत्तर?

नदीकाठी वसलाय माझ्या आठवणींचा गाव
त्याचं COEP हे नाव..
या गावात खूप भटकलोय,
रात्री-अपरात्री, उन्हापावसांत खूप हुंदडलोय
चार घटका विसावलो, आता निघायला हवं
भरली झोळी खांद्यावर टाकून पुढचं गाव गाठायला हवं
मधले दिवस हरवून जातात इथले हिशेब मांडताना
कसं सांगू काय वाटतं COEP सोडताना..

चांगलं-वाईट, भलं-बुरं सगळं आत भरवत गेलो
तरुणाईच्या सळसळत्या गर्दीत इथे स्वत:ला हरवत गेलो
आणि त्याच वेळी कदाचित मीच मला शोधत गेलो
आता कुठे स्वत:ला सापडतोय इथून बाहेर पडताना
खूप खूप जड वाटतंय COEP सोडताना..

येणाऱ्या प्रत्येक क्षणाकडे माझं एवढंच मागणं होतं
"कडकडून भेटून जा" एवढंच सांगणं होतं
आज निरोप घेताना जाणवलं
त्यानं उत्तर म्हणून तर तुम्हाला पाठवलं
आता भेटलो नाही तरी हे चेहरे लक्षात राहतील
उंच उडणाऱ्या प्रत्येकाला त्याच कौतुकाने पाहतील...

आठवतंय?
आपण असे बऱ्याचदा जमलो होतो..
एकमेकांना सांभाळत नकळत रमलो होतो
त्या meetings, त्या स्पर्धा,
त्या पार्ट्या,ती मस्ती,
तो कल्ला, तो धिंगाणा,
ते events, ती presents,
तो जोष, तो हरवलेला होश...
...सगळं काही भरभरून जगलो होतो
आणि काही विशिष्ट प्रसंगी मात्र
अगदी शहाण्यासारखं वागलो होतो...
रिझल्टच्या दिवशी हसलो होतो
आणि "पुढच्या वेळी नक्की Disti हं?" असं म्हणून
पुन्हा तिथंच गप्पा मारत बसलो होतो...
आता कसलीच खंत नाही
तरी मुक्या वेदनेला अंत नाही..
असं एक एक आठवायचं म्हटलं तर काहीच आठवत नाही
आणि साठवायचं म्हटलं तर ही ओंजळच पुरत नाही
म्हणून मग मी अबोल होतो या वळणावर चालताना
मागे फक्त वळून पाहतो COEP सोडताना...

इथं मिळालेलं हे सगळं नक्की उपयोगी पडेल
मला नाही वाटत आमचं पाऊल आता संकटांशी अडेल
स्वप्नं पेरायला इथं शिकलो
आणि ती मिळवण्यासाठी पेटायला इथेच शिकलो
स्वप्नं पाहणं आता मनात रुजलंय
मला खुणावणारं आकाश आता आणखीनच सजलंय
सगळं पुन्हा जिवंत झालंय तुमच्यासमोर मांडताना
खूप काही माझं झालंय COEP सोडताना
खूप काही... माझं झालंय... COEP सोडताना

-नचिकेत जोशी (९-५-२००६)
B.E.(Computers)