Pages

Saturday, August 29, 2015

ही केवळ राखी नाही

ही केवळ राखी नाही, जन्माचा धागा आहे
माहेरपणाची माझ्या हक्काची जागा आहे
माझ्याइतकी खात्री प्रत्येक मुलीला व्हावी
तुझ्यातल्या भावाशी जवळीक तिचीही व्हावी

नात्यात तुझ्या कुठल्याही, अभिमान तिला वाटावा
तुझ्या परिचयामध्ये विश्वास तिला वाटावा
निखळ, नितळ नात्यांची सवय तुला लागावी
स्त्रीशक्तीची तुजला मायाच नित्य लाभावी

या बहिणीसाठी इतके तुज जमेल का रे दादा?
पुरवशील का रे हा बघ हट्ट एवढा साधा
सन्मान मिळावा स्त्रीला, इतकीच अपेक्षा आहे
ही केवळ राखी नाही, जन्माचा धागा आहे

- नचिकेत जोशी (२९/८/२०१५)

Friday, July 17, 2015

सह्यमेळावा २०१५ - भाग ३ (अंतिम): किल्ले पिंपळा उर्फ कंडाळा

मुक्कामाची सोय सुरेखच होती. शांत गाव, ऐसपैस मंदिर, आणि ट्रेकमध्ये असल्याची जाणीव! अजून काय हवं? डावीकडे शाळा आणि उजवीकडे मंदिर -



रविवारच्या सकाळच्या नाष्ट्याचा जिम्मा आम्हीच उचलला होता. बर्‍याच घमासान चर्चेनंतर नाष्ट्याला मिसळपाव फायनल झाले होते. प्लॅननुसार सकाळी साडेसातला पिंपळ्याकडे निघायचे होते. म्हणजे मिसळपाव टीमला त्याआधी नाष्टा तयार ठेवावा लागणार होता. पण सकाळच्या 'मुख्य' कामांमध्येच इतका वेळ गेला की सुरूवातीपासूनच उशीर होत गेला. एकतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दूरपर्यंत पिके नसलेली रिकामी शेते पसरली होती. पुढचं लिहित नाही आता. सूज्ञास सांगणे न लगे.

मिसळ तयार होईपर्यंत मी हेमकडून RAAM (Race Across America) बद्दलच्या माझ्या शंका निरसून घेतल्या. हेम काय, आशिश काय (आशुचँप), सायकलमधले दिग्गज! एवढा स्टॅमिना, एवढी धडपड पाहिली की आपणही असं काहीतरी करावं याची सुरसुरी येते (जशी येते तशी जातेही हेच तर दु:ख आहे!). RAAM जिंकून नुकत्याच भारतात परतलेल्या नाशिकवासी डॉ. महाजन बंधूंना भेटण्याचा उपकार्यक्रम या मेळाव्यामध्ये होता.

मिसळ फक्कड झाली होती. ते अवघड काम अनिरुद्ध केळकर आणि सवंगड्यांनी पार पाडले. तेव्हाचा एक किस्सा आठवला. मिसळची उसळ आणि तर्री घेण्यासाठी विनय भिडेंनी पसरट डिश पुढे केली. त्यावर अनिरुद्धने 'काय भिडे? रस्सा घ्यायला पसरट प्लेट काय कामाची?' असा सवाल केला. त्यावर सिनिअर भिडेंनी आपल्या उपजत हजरजबाबी शैलीने 'अरे! नाष्ट्याला मिसळ होती?? मला माहितच नाही' असे उत्तर दिले. हातातली मिसळप्लेट घेऊन भिडे पितापुत्र बाहेर व्हरांड्यात येऊन बसले. तेव्हा श्रेयस उर्फ ज्युनिअर भिडेंनी बाबांना विचारले, 'बाबा, जर तुला माहित नव्हतं नाष्ट्याला मिसळ आहे तर मग तू सॅकमधून फरसाणाची पॅकेट्स का आणलीस?' सबंध व्हरांड्याने हे वाक्य ऐकलं आणि पुन्हा हास्यकल्लोळ! सीनिअर भिडेंना मी क्वचितच चूप झालेलं पाहिलंय, अँड दॅट वॉज वन ऑफ दोज रेअर मॉमेंट्स! अ‍ॅक्च्युअली, बच्चेकंपनीतील कोणी बाबाशी बोलायला लागला की आम्ही हळूच शांत बसायचो कारण काहीतरी 'वस्त्रहरण' ऐकायला मिळणार याची खात्री असायची. (माझ्या डोक्यात मात्र सारंग ट्रेकला यायला लागल्यावर आपलंही हेच होणार आहे वगैरे विचार यायचे)

तर मिसळप्रकरण संपवून आम्ही सॅक्स भरल्या आणि पिंपळ्याकडे निघालो. पिंपळ्यावर अजिबात पाणी नाही हे माहित असल्यामुळे प्रत्येकाला एक्ट्रा पाणी घेऊन ठेवायला सांगण्यात आले होते. हा किल्ला साधारण वीसएक वर्षांपूर्वी नाशिकच्या गिरीश टकले यांनी कागदपत्रांतील माहितीच्या आधाराने शोधला.  पिंपळा हा प्रत्यक्षात किल्ला नाही. माथ्यावर पाण्याची टाकी आहेत. एक गुहा आहे. पण माची, तटबंदी, दरवाजा यापैकी काहीच नाही. पण याचे भौगोलिक स्थान पाहता 'वॉचटॉवर' म्हणून याचे महत्त्व असावे. या किल्ल्याचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे, किल्ल्यावर असलेले नेढे. हे नेढे बहुधा सह्याद्रीतील सर्वात मोठे नेढे असावे. एकावेळी सव्वाशे ते दीडशे माणसे आरामात बसू शकतील एवढे हे मोठे आहे.

सावरपाड्याहूनच पिंपळ्याकडे पायवाट निघते. रात्रभराच्या वार्‍यानंतर सकाळ झाली तीच मुळी काळ्याशार ढगांची तलम शाल नभावर घेऊन! आज(तरी) पाऊस पडणार काय असा विचार करत करत पिंपळ्याकडे निघालो. पिंपळ्याचे पहिले दर्शन -





या वरच्या फोटोत पिंपळ्याचे नेढे दिसले ना? :)

ही वाट सुरेखच आहे. त्यात आल्हाददायक हवा सतत सोबत होतीच. ऊन्ह, उकाडा असा प्रकार सुदैवाने नव्हताच. पहिलं पठार येईपर्यंत पिंपळा नवनवीन रूपे दाखवत होता.



बरेच चालून/चढून आलो की!



ही वाट अंदाजे दोन तासांची आहे. सुरूवातीला सपाटी, मग अंगावर येणारा चढ, मग विस्तीर्ण स्वर्गीय पठार आणि पुन्हा शेवटच्या टप्प्यातला सुमारे पासष्ट-सत्तर अंशातला चढ अशी थोडक्यात वाट आहे. वाटेत स्थानिक वाटाड्याने कोशिंब नावाची फळे काढून दिली. चवीला कोकमासारखी ही फळे असतात. 'व्हिटॅमिन सी' भरपूर! एकदा तोंडात टाकली की बराच वेळ तोंडात घोळवत ठेवावीत अशी ही फळे. हा अचानक मिळालेला रानमेवा दिलखूश करून गेला.





प्रत्यक्ष पिंपळा डोंगराचा चढ अंगावर येणारा आहे. पण त्याच्या पायथ्याचं पठार म्हणजे या ऋतूतला स्वर्ग आहे. पिंपळ्याकडे यायला मळेगावातूनही एक वाट येते. आपण तिथून का नाही आलो हे ओंकारला विचारल्यावर त्याने 'तिथे मुक्कामाची सोय झाली नाही' इत्यादी किरकोळ कारणे दिल्यावर सांगितले, 'त्या वाटेने आलो असतो तर हे पठार miss झालं असतं. तू पठारावर गेल्यावर बघशील काय वाटतं ते!'. खरंच होतं ते! तिथे जो वारा वाहत होता, त्याला सोसाट्याचा, भणाणता वगैरे विशेषणे कमी पडतील. केवळ सुख! त्यात सूर्य ढगाआड! मग अजून काय हवं?
तिथून दिसणारा व्ह्यू तर नजरबंदी करणारा! पठारावरून घेतलेला पिंपळा -



पिंपळ्यावरून घेतलेला पठाराचा फोटो -



पिंपळ्यावरील नेढं हे बहुधा सह्याद्रीतील सर्वात मोठं नेढं आहे. एकावेळी शंभर-सव्वाशे माणसे आरामात बसतील अशी ही जागा आहे. तिथे इतका वारा होता की कुणीतरी 'मल्लीला धरून ठेवा रे' अशी कॉमेंटही केली. हॅट तर सर्रास उडत होत्या. नेढ्यापुढील झुडुपात जाऊन पडत होत्या. नेढ्याशेजारीच एक गुहासदृश खिंडार आहे. त्याच्या दुसर्‍या बाजूला कातळाला भेगा पडल्या असून त्यातून वारा वाहणे सुरू झाले आहे. वार्‍याबरोबर धूळ आणि मातीही उडू लागली आहे. यावरून अजून चार-पाचशे वर्षांनी इथे दुसरे नेढे तयार होईल आणि जुळी नेढी असलेला महाराष्ट्रातला (भारतातला?) एकमेव किल्ला (?) म्हणून पिंपळा प्रसिद्ध होईल असे भा़कीत मनोजने मांडून टाकले.





सह्याद्रीतला सर्वात उंच किल्ला साल्हेर (डावीकडे) आणि सालोटा (उजवीकडे) -




नेढ्याच्या बाजूने कातळखाचेतून माथ्यावर वाट आहे. बिचार्‍या श्रेयसला (ज्युनिअर भिडे) ती दिसली नाही आणि त्या कातळावरूनच वर जायचे असावे अशी समजूत त्याने करून घेतली. त्यावर 'Oh Baba! is this way to go up? this is so insane!!' या त्याच्या निरागस कॉमेंटवर हसून हसून माझे हृदय शतशः विदीर्ण झाले.

कातळखाचेवर बच्चेकंपनीचा उत्साह अपूर्व होता. दर्शनने तर (ज्युनिअर आशुचँप) वर चढताना 'सरका, सरका' चा घोष लावला होता आणि एके ठिकाणी हात टेकायला जागा मिळाली नाही म्हणून पुढे असलेल्या विनयच्या गळ्याभोवती हात गुंफून विनयचा उभ्या जागी पुतळा करून टाकला. माथ्यावर बघण्यासारखे काहीच नाही. तीनशेसाठ अंशातल्या डोंगररांगा, चढून आलो ती वाट, दूरवर सावरपाड्याचा रस्ता मात्र प्रेक्षणीय!



पुन्हा नेढ्यात आलो आणि काल रात्री झालेल्या चर्चेचा गोषवारा आणि घेतलेले निर्णय सर्वांना कळवण्यात आले. त्यानुसार या मेळाव्याला जे येऊ शकले नाहीत ते वगळता सह्यमेळाव्याच्या सदस्यसंख्येत यापुढे कोणाचीही भर पडणार नाही असे ठरले. हाच एक मुख्य निर्णय होता. उतरताना कसरत होती. सत्तर अंशाचा उतार उतरून जाण्यापेक्षा डोंगराला वळसा घालून उतरूया असा प्रस्ताव ओंकार सीएमने मांडला आणि इथे पहिल्यांदाच विरोधात मते पडली. मी (अर्थातच) विरोधाला पाठिंबा दिला. शेवटी आम्ही दहा-बारा जण त्या उताराची फुल्ल मजा घेत आलो आणि बाकीचे वळसा घालून आले.

पठारावर आल्यावर डोळे मिटले आणि पंधरा मिनिटे शांततेशी गप्पा मारत बसलो. चौफेर वाहणारा वारा, आजूबाजूचा दंगा यातून हळूहळू मन शांत, अलिप्त होत गेलं आणि पुढे उरली फक्त वाहती शांतता. तो वारा जर नसता तर अजून सुखी शांतता ऐकायला मिळाली असती. पुढे कधी काळी आयुष्यातल्या काही अविस्मरणीय वेळा आठवायची वेळ आली तर त्यात ही पंधरा मिनिटे नक्की लक्षात येतील. असो. सगळे पठारावर आल्यावर गृप फोटोसेशन झाले. एव्हाना एक वाजून गेला होता.


(फोटो क्रेडिट - सुनिल पाटील)

आता पुन्हा तिरकस उतार, पठार आणि गाव! उतरताना तनिष्कला (ज्युनिअर संतोष काशिद) सुसाटत उतरताना पाहून काळजीने मी त्याचा हात पकडला आणि माझ्याबरोबर उतरायला लावलं. बिचार्‍याने निमूटपणे काही अंतर ती आज्ञा पाळली. पण मी मुळात माझ्या तब्येतीला जपत उतरत असल्यामुळे त्याची अडचण व्हायला लागली. मग ते माझ्याही लक्षात आल्यामुळे मी त्याचा हात सोडून दिला. तत्क्षणी ज्युनिअरसाहेब पुन्हा गती पकडून दिसेनासे झाले. आणि उतरताना 'पाय कुठे टाकावा, कुठे टाकू नये, वेग बॅलन्स कसा करावा' याचं इतकं सुंदर प्रात्यक्षिक देऊन गेले की काही वर्षांनी ही मुलं नक्कीच उत्तम क्लाईंबर/ट्रेकर होतील अशी खात्रीच वाटायला लागली. मी त्याचा हात पकडून उगाच एका उडत्या पक्ष्याचं आकाश बांधून ठेवत होतो असं वाटून गेलं.

येताना एका वेगळ्या वाटेने उतरण्याचा आनंद घेत गावात आलो तेव्हा अडीच वाजून गेले होते. जेवायला मिसळीची उरलेली उसळ अ‍ॅड करून फक्कड उसळ-भाकरी बेत होता. चिकनही होतेच. बरेच दिवसांपासून लिस्ट वर असलेला सह्यमेळावा संपत आला होता असं वाटत होतं. तिथून निघायला चार वाजले.

नांदुरी मार्गे सप्तशृंगीगडाला वळसा घालून येताना अचला-अहिवंतपासून चांदवडपर्यंत पसरलेल्या सातमाळ रांगेतले बरेचसे किल्ले एकाच ठिकाणाहून दिसले. सोबत माहिती पुरवायला तत्पर तल्लख ओंकीपिडीआ उर्फ ओंकार होताच.
सप्तशृंगीगड -


सप्तशृंगीगडाच्या समोरचा मोहनदरी किल्ला, यालाही नेढं आहे. या नेढ्याची एक आख्यायिका आहे. देवी आणि एका दैत्याचं युद्ध झालं. देवीपुढे निष्प्रभ होत चाललेल्या त्या दैत्याने रणांगणातून पळ काढला. तो दैत्य या डोंगराआड गेला असताना पाठलाग करता करता देवीने या डोंगरावर प्रहार केला, त्यातून हे नेढं तयार झालं. मूळ नाव - मोहिंद्री, अपभ्रंश - मोहनदरी. (संदर्भ - स्थानिक गावकरी आणि ओंकार ओक)





विस्तीर्ण अहिवंतगड -


सप्तशृंगीगडाच्या शेजारचा मार्कंडेय डोंगर -


सप्तशृंगी, मार्कंडेय आणि रवळ्या-जावळ्या -


नाशकात आलो तेव्हा साडेसहा वाजले होते. नाईलाजाने डॉ. महाजनबंधूंना भेटण्याचा कार्यक्रम रद्द केला आणि बस पुण्याकडे निघाली. रविवार संध्याकाळ, त्यात पालखीनिमित्त वारकर्‍यांना घेऊन निघालेले ट्रक आणि दुपदरी रस्ता यामुळे प्रवास खूप वेळखाऊ झाला.

राजगुरूनगरच्या टोलनाक्यावर आलो तेव्हा रात्रीचा दीड वाजला होता. फिर वही रात! फिर वही बात! टोलवाल्यांशी सह्यमेळाव्याच्या शिलेदारांची बाचाबाची! "टोल भरावाच लागेल" ही त्यांची सक्ती आणि १. गाडी MH14 ची आहे. २. इथून जाताना परवा रात्री टोल नाही घेतलात मग आत्ताच का? ही आमची दोन बिनतोड पण निष्फळ उत्तरे यात अर्धा तास मोठा मजेत गेला. मग तिथल्या आयआरबीच्या अधिकार्‍याचे तिथे अवतरणे (बहुधा झोपमोड झाल्यामुळे तो चिडलेला असणे), 'एकवेळ टोल न घेऊन तुम्हाला सहकार्य केले ही बकवास' 'तुम्ही टोल न भरून महाराष्ट्राची शान घालवता आहात' वगैरे त्याचे बरळणे (हे ऐकून तर माझी सटकलीच होती, कैच्याकै!) मग नाईलाजाने त्याच्या हातावर सत्तेचाळीस रुपये टेकवणे हे प्रकार यथासांग पार पडले. मला तरी नाशिक हायवेवरच्या या टोलनाक्यांची भानगड समजतच नाही. पुढच्या वर्षी याच मार्गाने यायची वेळ आली तर सगळी माहिती आधीच काढून या टोलवाल्यांची दादागिरी उतरवायचं फार मनात आहे! असो.

अपरात्र झाली असल्यामुळे प्रत्येकाला ऑलमोस्ट होमड्रॉप मिळाला. मला घरी पोचायला पहाटेचे साडेतीन वाजले. डोळ्यावर झोपही होती आणि मनात गेले दोन दिवस सह्याद्रीत स्वच्छंदपणे हुंदडलेल्या क्षणांची स्मृतिचित्रेही!

सह्यमेळावाच्या आयोजनात ओंकारने प्रचंड मेहनत घेतली. तसंच हेम, राहूल यांनी पायलट ट्रेक करून लेटेस्ट माहिती आमच्यापर्यंत पोचवली. हॅट बनवण्याची जबाबदारी हिम्याने एकहाती पेलली. यो, विन्या, इंद्रा, आशुचँप, गिरी, सूनटून्या, मनोज आणि सगळेच (कुणाचं नाव राहिलं असल्यास क्षमस्व!) घरचं कार्य असल्यासारखे वावरत होते. (आणि रिलॅक्स व्हायला वॉट्सअ‍ॅपवर पडीक होते!) मेळाव्याला आलेला प्रत्येक जण सह्याद्रीवर मनापासून प्रेम करणारा होता. हल्ली बाजार आणि बिझनेस बनत चाललेल्या या ट्रेकिंगमध्ये नकारात्मक बातम्या सातत्याने येत चालल्या आहेत. निरनिराळ्या प्रकारचे धोके नव्याने उभे राहत आहेत. अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्या 'कंपनी'मध्ये निर्धास्त भटकावं अशी माणसं या सह्यमेळाव्यामध्ये एकत्र भेटली. निसर्गाचा आदर करून, स्वत:च्या मर्यादा ओळखून सह्याद्रीच्या हवाली होणारे हे सह्यपंढरीचे वारकरी! इतिश्री सह्यमेळावा २०१५!

*******************

दरवेळी ट्रेकने मला काय मिळतं हे प्रश्न आता हळूहळू पुसट होत चालले आहेत. पूर्वी ट्रेकहून आल्यावर वृत्तांत लिखाणाची जितकी आवड आणि हौस असायची तितकी आता उरलेली नाही. आता फक्त सॅक पाठीवर टाकावी, जुने-जाणते निवडक दोस्त सोबत असावेत आणि डोंगरदर्‍या-घाटवाटा तुडवाव्यात, कुठेतरी मंदिरात-गुहेत राहावं, कातळझर्‍याचं थंड पाणी प्यावं आणि कुठल्याशा हिरव्यागार आसनावर डोळे मिटून शांत बसावं आणि हा सह्याद्री, त्याच्या अंगाखांद्यावर खेळण्याचं लाभलेलं भाग्य अबोलपणे अनुभवावं, ही जाणीव अधिकाधिक वाढू लागली आहे. कधी वाटलंच तर रायगड प्रदक्षिणेतला पाऊस कागदावर उतरवावा, नाही वाटलं तर केवळ मनात झिरपू द्यावा, एवढंच! कागदावर उमटतील आणि फोटोतून दिसतील ते केवळ तिथे जाऊन आल्याचे पुरावे! शेवटी, या पायवाटांच्या सोबत येणार्‍या समृद्धतेला शब्दांत मांडण्याची ताकद कुठून आणायची? इति लेखनसीमा!

(समाप्त)
- नचिकेत जोशी

Wednesday, July 15, 2015

सह्यमेळावा २०१५ - भाग २: किल्ले चौल्हेर

रात्रभर प्रवास करून तिळवण गावात पोचलो तेव्हा साडेसहा वाजले होते. पहिला अर्धा तास बसमधून खाली उतरून शाळेच्या पटांगणात जमण्यातच गेला. त्यातच सर्व ट्रेकर मंडळींच्या नजरा 'वेगळ्याच पण अपेक्षित' ठिकाणाचा शोध घेत होत्या. अखेर, तसे ठिकाण काही सहजी सापडले नाही. (सह्याद्रीमधल्या अनेक गावांमध्ये अजूनही 'होल वावर इज अवर' हीच प्रथा सुरू आहे). अखेर शाळेच्या पटांगणात गोलाकार उभे राहून एक ओळखपरेड झाली.


माझा पहिलाच मेळावा असल्यामुळे सूनटून्या, मनोज, कुशल या दिग्गजांना 'याचि देही याचि डोळा' पाहून घेतलं. गेल्या काही वर्षांत आपले ट्रेक फार म्हणजे फारच कमी व्हायला लागले आहेत, ही जाणीव टोचलीच. आमची काहीशी औपचारिक ओळखपरेड सुरू असताना पटांगणातल्या घसरगुंडीवर ज्युनिअर ट्रेकर्सनी ओळख बिळख बाजूला ठेवून ठिय्या मांडला होता. लहान मुलांचं हे एक बरं असतं, ओळख वगैरे काही लागत नाही.
तिळवणमधली ही सुंदर शाळा -




तेवढ्यात चहा-पोह्यांची व्यवस्था ज्यांनी केली होती, ते विष्णू गुंजाळ भेटायला आले. त्यांनी तर चहा-नाष्ट्याचे पैसे घ्यायलाही नकार दिला होता. ('नाष्ट्यासाठी तीस लोकं काही आम्हाला जड नाहीत' - हे उत्तर!) हल्ली बर्‍याच किल्ल्यांच्या पायथ्याच्या गावांमध्ये ट्रेकर्स आणि पर्यटकांची अक्षरशः लूट सुरू असते, त्यात हा अनुभव म्हणजे सुखद धक्काच! पण आम्ही मात्र खाल्या पोह्यांना जागून त्यांचे मानधन त्यांना दिलेच. मग चविष्ट पोहे आणि फक्कड चहा झाल्यावर आमच्या 'यजमानां'सोबत एक फोटोसेशन झाले.


नंतर ओंकारने 'बस चौल्हेरचा चढ जिथून सुरू होतो, त्या वाडी चौल्हेरमध्ये पार्क केल्या जातील' अशी घोषणा केली. गावातून दोन वाटाडे सोबत आले होते. तिळवणमधून दिसणारा किल्ले चौल्हेर -


बागलाण आणि नाशिक जिल्ह्याचा उत्तर-पश्चिम भाग म्हणजे आभाळात घुसणार्‍या सुळकाधारी/शिखरधारी किल्यांचे गोकुळच आहे. सह्याद्रीचं आगळं वैभव असलेल्या नाशिक जिल्ह्यात दोन पर्वतरांगा स्वतंत्रपणे दिसतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना आधी सातमाळा रांग आणि नंतर सेलबारी-डोलबारी रांग. या दोन रांगांच्या मधल्या भागातही काही किल्ले स्वतंत्रपणे वसलेले आहेत. चौल्हेर हा त्यातलाच एक. चौल्हेर या किल्ल्याची चौरगड, तिळवणचा किल्ला अथवा चाल्हेरीचा किल्ला अशीही नावे आहेत. चौल्हेरची उंची साधारण ११२५ मीटर (३७०० फूट). गड चढायला सोपा असला तरी काही ठिकाणी अंगावर येणारा चढ आहे. हा किल्ला तत्कालीन स्वराज्यात असला तरी छत्रपतींनी बांधलेला मात्र नाही. सुरतेच्या स्वारीच्या काळामध्ये थोरले राजे या किल्ल्यावर आले होते, अशी माहिती स्थानिक वाटाड्याने पुरवली.





सामुहिक वर्गणीतून या वर्षी हॅट घेण्यात आल्या होत्या. या कामी हिमांशू कुलकर्णी यांनी बरीच मेहनत घेतली. (त्याबद्दल मंडळाकडून त्यांचे आभार!) हॅटवाटपाचा कार्यक्रम पार पडल्यावर गड चढायला सुरूवात केली. नेहमीप्रमाणे बच्चेकंपनी सगळ्यात पुढे! पायांबरोबरच जिभेकडेही (चघळण्याचे) काम होते. पवन'काका'ने आणलेल्या इमल्या पोरांना (आणि थोरांनाही) फारच आवडल्या.



दोन तासात वर पोचलो. गडाचा दरवाजा प्रत्यक्ष समोर गेल्याशिवाय वाटेवरून कुठूनच दिसत नाही.


किल्ल्याचा मुख्य दरवाजाच्या आतून घेतलेला फोटो -


फोटो काढल्याशिवाय हलायलाच तयार नाहीत मंडळी ;) -






गडावर मोती टाक्याचे अप्रतिम चवीचे गारेग्गार पाणी प्यायलो आणि तिथेच खाण्याच्या पुड्या सोडल्या. काही मंडळी सकाळपासून अपूर्ण राहिलेले 'कार्य' करायला धावली. अर्ध्या पाऊण तासाने गड फिरायला निघालो. गड तसा छोटाच. मुख्य दरवाजातून वर गेल्यावर डाव्या आणि उजव्या हाताला गडाचे दोन भाग आहेत. डाव्या हाताला पठार आणि उजव्या हाताला गडमाथा. त्या वाटेवर पोटात मोती टाके. फक्त याच टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. मोती टाक्याच्या शेजारी अजून एक टाके आहे. त्यातले पाणी गहिरे हिरवट पिवळे असले तरी पिण्यायोग्य नाही.

गडमाथ्यावरून काय सुरेख नजारा दिसतो! जवळजवळ अख्खी सातमाळा रांग (हातगड व अचला वगळून) - धुरकट का होईना, पण दिसते. केवळ अप्रतिम व्ह्यू! वातावरण स्वच्छ नसल्यामुळे यातले अनेक किल्ले धूसर दिसले, पण एवढी विस्तृत रांग एका ठिकाणाहून बघणे हा आनंद औरच होता. एका बाजूला सातमाळ रांग तर दुसर्या बाजूला डोलबारी-सेलबारी रांग.

चौल्हेरवरून कुठले कुठले किल्ले दिसतात हे 'ओंकारून' पाहिल्यावर त्याने काही सेकंदात यादीच दिली - अजमेरा, साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरा, हरगड, भिलाई, प्रेमगिरी, इंद्रमाळ डोंगर, सप्तशृंगीगड, मार्कंडेय, रवळ्या-जावळ्या, धोडप, लेकुरवाळी, हंड्या, कांचना, बाफळ्या, शिंगमाळ, कोळधेर, राजधेर, इंद्राई आणि पुसटसा चांदवड! आणि नुसती यादीच देऊन थांबला नाही, तर तिथे प्रत्यक्ष हे किल्ले दाखवलेही! हा एवढा विस्तीर्ण नजारा चौल्हेरवरून दिसतो.

चौल्हेरच्या जवळ पूर्वेकडे 'दीर-भावजय' या नावाचे वैशिष्ट्यपूर्ण सुळकेही दिसतात. (सुळक्यांना ह्या नात्याची नावे ऐकून 'कुछ तो गडबड है दया' असं मी स्वतःशीच म्हणून घेतलं).

हेच ते दीर-भावजय सुळके -


सातमाळ रांग समजावून देतांना नाशिकनिवासी दुर्गभ्रमणाधिपती रा. रा. हेमंत पोखरणकर उर्फ हेम -


अखेर आपले नाशिक जिल्ह्यातले फार म्हणजे फार कमी किल्ले बघून झालेत ही जुनी वेदना जागी झाल्यावर मुकाट माघारी फिरलो.

गडाच्या दक्षिणेकडील पठार (हाही गडाचाच भाग आहे) -


चौल्हेरच्या शेजारी असलेला हा कोथमिर्‍या डोंगर - ('डूबा'वरून राजगडचा बालेकिल्ला असाच दिसतो, नाही का?)


गडाच्या दुसर्‍या बाजूकडील पठाराच्या टोकापाशी असणारा सरळसोट कडा छाती दडपून टाकतो. तो अनुभव मनसोक्त घेऊन साडेबारा वाजता उतरायला सुरूवात केली.

काहीसा खडा आणि ''स्क्री''युक्त उतार उतरून वाडी चौल्हेरपर्यंत येईपर्यंत दोन वाजले. जेवणाची सोय सटाणा गावात एका खानावळीत केलेली होती. (तिळवण-सटाणा अंदाजे १३ किमी). वाटाड्याचे मानधन सुपूर्द करून बसेस सटाण्याच्या दिशेने निघाल्या. वाटेत कुठल्याशा वाहनामुळे जखमी झालेला शॅमॅलिऑन विव्हळत असलेला दिसला. त्याला पाणी पाजून राजेशने झाडीमध्ये सोडले. जाताजाता तशाही अवस्थेत त्याने रंग बदलून दाखवत आमचे आभार मानले (असावेत).

सटाणामधील 'आमंत्रण'चे जेवण केवळ अप्रतिम! भुकेल्या पोटी किती जास्त जेवलो ते आठवतच नाही. पुढचं डेस्टिनेशन होते - देवलाणा येथील प्राचीन मंदिर! सटाणापासून अंदाजे १६ किमी वर सटाणा-अजमेरसौंदाणे रस्त्यावर देवलाणा नावाच्या गावामध्ये एक हेमाडपंथी मंदीर असल्याची माहिती सकाळपासून आमच्यासोबत असणार्‍या 'दुर्गवीर' संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिली होती. इथपर्यंत आला आहात तर ते मंदिरही बघाच असा आग्रहही केला. (अजिबात कष्ट नाहीयेत कारण मंदिराच्या दरवाजापर्यंत बस जाते, असा दिलासाही दिला). मग 'एकमताने' ते मंदिर बघायला निघालो. अजमेरसौंदाणे गावाचे रहिवासी असणार्‍या किशोर सोनावणे यांना 'दुर्गवीर'च्या कार्यकर्त्यांनी बोलावून आणले होते. त्यांनी अतिशय प्रभावीपणे मंदिराची माहिती दिली. (तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. खरं सांगायचं तर तो प्रत्यक्ष तिथे जाऊन बघण्याचाच विषय आहे) देवलाणा मंदिराची भेट ही सह्यमेळाव्यातली रन टाईम व्हॅल्यू अॅडिशन होती.



मंदिराच्या आवारात 'दुर्गवीर' संस्थेच्या बागलाण शाखेच्या प्रमुखांसोबत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत थोडावेळ गप्पा झाल्या. दुर्गवीर प्रतिष्ठान (मुंबई) ही संस्था दुर्गांचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी कार्यरत आहे. रायगड संरक्षक प्रभावळीतील ९ गडांचे संरक्षण आणि संवर्धनाचे काम संस्थेमार्फत केले जाते. या अंतर्गत सुरगड, अवचितगड, मानगड या गडांवर गडाची डागडुजी, पाणी टाके साफसफाई, माहिती व दिशादर्शक फलक, गडाची स्वच्छता राखणे अशी बरीच कामे केली जातात. सोबत या गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात शाळेमध्ये शालेय वस्तू वाटप यासारखे सामाजिक उपक्रम राबवले जातात. गेली ८ वर्ष दुर्गवीर प्रतिष्ठान आपले मराठी सण श्रमदान करत असलेल्या गडाच्या सहवासात करत आहे. (संदर्भ - http://www.durgveer.com/amchi_olakh.html)

नुकतीच या कार्यकर्त्यांनी साल्हेर किल्ल्यावर श्रमदान करून टाकीस्वच्छता, साल्हेरवाडीतून येणार्‍या वाटेची दुरुस्ती केली आहे. आमच्या या सह्यमेळाव्याच्या नियोजनामध्ये या बागलाण शाखेतील कार्यकर्त्यांची मोलाची मदत झाली. राहण्या-जेवण्याचे नियोजनापासून ते पूर्ण दिवसाचा वेळ आमच्यासाठी देण्यापर्यंत त्यांचं सहकार्य होतं. याबद्दलची कृतज्ञता आणि त्यांच्या दुर्गसंवर्धनाच्या कार्याला फूल ना फुलाची पाकळी म्हणून सर्व उपस्थित सह्यभटक्यांतर्फे एक छोटीसं पाकीट त्यांच्याकडे सुपूर्द केलं.


'दुर्गवीर' बागलाण शाखेचा प्रमुख सागर सोनावणे माहिती देताना - (पदरमोड करून हे कार्यकर्ते दुर्गसंवर्धनाचे कार्य करत आहेत. कुठल्याही राजकीय आधाराविना हे कार्य करायचा यांचा मानस आहे). शेजारी आमचे लाडके सीएम उर्फ ओंकार ओक उर्फ ओंकिपीडिआ उर्फ गूगलोंकार -




या मदतीवरून आठवलं, काही दिवसांपूर्वी एका चिमुकलीच्या आजाराबद्दल आणि मदतीबद्दल आवाहनाची पोस्ट आम्ही फेसबुक आणि इतर सोशल मिडिआवरून प्रसिद्ध केली होती. आनंदाची गोष्ट म्हणजे, त्या आवाहनाला तुडुंब प्रतिसाद मिळाला. त्यात अनेक ज्ञात-अज्ञात 'मायबोली'करही होते. एकूण एक लाखांहून अधिक रक्कम जमा झाली होती. त्या रकमेचा हिशेब आणि त्या चिमुरडीच्या पालकांचा कृतज्ञतापर संदेश सुनील पाटील याने कथन केला.




त्या दिवशीचा सूर्यास्त बसमधूनच पाहिला. सुरेख रस्ता, आजूबाजूला तुरळक लोकवस्तीची गावे, अधूनमधून दिसणारे शेळ्या-गुरांचे कळप, हळूहळू अंधारात अदृश्य होत चाललेले सह्याद्रीमधले कातळसुळके. कातरवेळेइतकी रम्य वेळ संपूर्ण दिवसात क्वचितच येत असेल. ही वेळ अशी असते की जी स्वतःसोबत(च) घालवावीशी वाटते. त्यादिवशी बसमध्ये मात्र वेगळाच नूर होता. दिवसभराच्या धावपळीमुळे बच्चेकंपनी कंटाळली होती. त्यात बसमध्ये टीव्ही दिसल्यावर तो चालू करण्याची फर्माईश झाली. डायवरने स्क्रीन ऑन केल्यावर एक उत्स्फूर्त कॉमेंट आली - "आता फक्त लग्नाची कॅसेट लावू नका". कॉमेंट करणार्याचे वय फक्त सहा वर्षे असून तो 'मल्ली'पुत्र रूद्राक्ष आहे हे कळल्यावर अख्खी बस हास्यात बुडाली. बच्चेकंपनीने संपूर्ण ट्रेकभर अशाच कॉमेंट्स करून हास्याचे धबधबे उडवले. (सगळ्याच कॉमेंट्स इथे लिहित नाही, पण नवीन पिढी इज व्हेरी स्मार्ट हं!)

देवलाणेहून पिंपळा किल्ल्याच्या पायथ्याच्या गावाला - 'सावरपाडा'ला, पोचलो तेव्हा पावणेआठ वाजले होते. सावरपाड्यामध्ये रमेश ठाकरे आणि मित्रपरिवाराने जेवायची सोय केली होती. मुक्कामाला गावातली शाळा आणि शाळेसमोरचे मंदिर असा ऐसपैस मामला होता. शाकाहारी मंडळींसाठी वांगे-बटाटा रस्सा आणि सामिषपंथी मंडळींसाठी चिकनरस्सा असा बेत होता. जेवल्यानंतर अनेक विषयांवरची चर्चासत्रे आखलेली होती. त्यात आशुचे 'सायकलवरून पुणे ते कन्याकुमारी'चे अनुभव, सूनटून्याने आणलेल्या इक्विप्मेंट्सची माहिती, आहारातील तीन मुख्य शत्रूपदार्थांबद्दल हेमकडून अधिक वर्णन, असे अनेक खास मेळाव्यासाठी राखून ठेवलेले विषय होते. पण आदल्या रात्रीची अपुरी झोप, चौल्हेरची चढ-उतार आणि देवलाणेची सफर यामुळे बच्चेकंपनी तर कंटाळलेलीच होती, पण त्यांच्या जोडीला मोठी मंडळीही पेंगायला लागली. अखेर मंदिरामध्ये निवडक ट्रेकर्सच्या सहभागामध्ये "सह्यमेळावा: काल, आज आणि उद्या" याबद्दलचे चर्चासत्र तेवढे पार पडले. चर्चासत्र सुरू झाले तेव्हा मी जागा होतो. नंतर शास्त्रीय मैफलींमध्ये ब्याकग्राऊंडला जशी संवादिनी वाजत असते, तसा इथेही काहीतरी सूर हवा म्हणून झोपून गेलो. पुढचे काहीच आठवत नाही. रात्री उशीरा केव्हातरी सत्र संपले. रात्रभर प्रचंड वारे वाहत होते. मधूनच गावातली कुत्री भुंकत होती. बाकी सर्वत्र शांतता. सह्यमेळावा - दिवस पहिला यथासांग पार पडला होता. उद्याचे ध्येय होते - किल्ले पिंपळा उर्फ कंडाळा!

(क्रमशः)
- नचिकेत जोशी

Monday, July 13, 2015

सह्यमेळावा २०१५ - भाग १: पूर्वतयारी आणि प्रस्थान

तो दिवस मला आजही लक्षात नाही. ती वेळ मला आजही आठवत नाही. 'यंदाचा सह्यमेळावा केव्हा घ्यायचा आणि कुठे घ्यायचा' हा वरकरणी साधाच प्रश्न कुणीतरी वॉट्सअ‍ॅप गृपवर पोस्ट केला आणि 'हर हर महादेव!'च्या आवेशात तमाम इंडिया-स्थित मेंब्रानी रात्रीचा दिवस करून सगळा मोबाईल डेटा वॉट्सअ‍ॅपवर उधळला. पार सुधागडपासून सिंधुदुर्गापर्यंत आणि कोकणच्या खाडीपासून आपापल्या घराच्या माडीपर्यंत सगळी ठिकाणे डिस्कस केली. अगदी पॉवरबँकपासून हायड्राबॅगपर्यंत आणि ट्रेकिंगसॅक पासून हेडटॉर्चपर्यंत सगळ्या गोष्टींची खरेदी होत आली, तरी ठिकाण काही निश्चित होईना! वॉट्सअ‍ॅपचा गृप नुसता ओसंडून वाहत होता. त्यात आशिषची (आशुचॅंप) 'सायकलवरून कन्याकुमारी'ची लेखमाला सुरू झाली. त्यातून भलतीच प्रेरणा घेतलेल्या काहींनी 'यंदाचा मेळावा सायकलवरून करूया' असा प्रस्ताव मांडून पाहिला. हा एखादा फॉरवर्ड मेसेज असावा अशी (सुरक्षित) समजूत करून घेऊन जवळपास प्रत्येकानेच त्या प्रस्तावाला इग्नोर मारला. त्या इग्नोराचं खरं कारण 'उभ्याउभ्या खाली बघितल्यावर स्वतःचे पाय न बघू देणारी शारिरिक अवस्था' हे होतं, हे सर्वांच्याच लक्षात आलं. गृपचा सब्जेक्ट बदलून झाला, डीपी बदलून झाला, तरी ठिकाण ठरेना! अखेर सर्वज्ञानी ओंकार ओक उर्फ ओंकीपीडिया उर्फ सीएम यांनी मांडलेला पहिलाच प्रस्ताव एकमताने संमत झाला. (ओंकार महाराष्ट्राचे आजी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांसारखा दिसतो हे मज पामराचे निरीक्षण त्या बिचार्‍याला सीएम या पदावर घेऊन आले आहे, बाकी काहीच नाही. मेळाव्याच्या संयोजनातील त्याचे काम आणि त्याच्या 'सह्य'ज्ञानाचा आवाका पाहता त्याला दिलेली सीएम ही उपाधी अगदीच किरकोळ आहे). तर ओंकारने केवळ ठिकाणच सुचवले असे नाही, तर घरून निघण्यापासून घरी पोचेपर्यंतचा सगळा प्लॅनच पोस्ट केला. इतका सखोल आणि सजीव प्लॅनपाहून आता प्रत्यक्ष मेळावा करायची गरजच नाही असा एक आगाऊ विचार माझ्या मनात येऊन गेला. तर ठिकाण होतं - बागलाणातील दोन काहीसे अपरिचित किल्ले - चौल्हेर आणि पिंपळा, आणि डेट्स होत्या - ४ आणि ५ जुलै २०१५.

बाकी आम्हा ट्रेकर्सना सीसीडी आणि पार्कातल्या डेट्सपेक्षा या डेट्सच महत्त्वाच्या आणि हव्याहव्याशा असतात. यंदाच्या सह्यमेळाव्याला कोण कोण येणार याची चाचपणी सुरू झाली. (नेहमीप्रमाणे) सुरूवातीला आकडा चाळीसच्या वर गेला. माझा हा पहिलाच सह्यमेळावा असल्यामुळे सगळ्यांनी खास ट्रेकर्स शैलीमध्ये 'विशेष सूचना आणि धमक्या' द्यायला सुरूवात केली. गेली दोन्ही वर्षे इच्छा असूनही काही ना काही कारणामुळे मला जाणे जमले नव्हते. ('इच्छा तेथे मार्ग' वगैरे सुभाषिते बॅचलर असतांना खूप आवडायची. तर ते असो.) यंदा जायलाच हवे होते.

२०१४ हे वर्ष आधी उजव्या घोट्याच्या आणि नंतर उजव्याच गुडघ्याच्या लिगामेंट इन्जुरीमुळे बर्‍यापैकी ट्रेकलेस गेले होते. पाय पुन्हा साथ देईल की नाही, झेपेल की नाही वगैरे वगैरे शंका मनात होत्याच. पण त्या कारणामुळे फारकाळ ट्रेकपासून दूर बसणे जमणार नव्हतेच. मग 'जमेल तेवढे चालू, नाहीतर पायथ्याला बसून राहू' या निर्णयाने माझेही नाव नोंदवून टाकले.

आता किल्ल्यांच्या निवडीबद्दल - हल्ली वीकेंडला मुख्य मुख्य किल्ले गर्दीने ओसंडून वाहत असतात. हायवेज, ढाबे, धबधबे, डोंगरवाटा - सगळीकडेच तुडुंब जत्रा असते. त्यामुळे आम्हाला आडवाटेवरचेच किल्ले हवे होते. एकट्या नाशिक जिल्ह्यात तब्बल ५८ किल्ले आहेत. त्यातही बागलाण तालुक्यातले किल्ले पुण्या-मुंबईपासूनच्या लांब अंतरामुळे आणि तेथील भौगोलिक परिस्थितीमुळे गर्दीपासून मुक्त आहेत. त्यामुळे जेवण-राहण्याची सोय आणि अंतर निकषांमधून चौल्हेर आणि पिंपळा हे फायनल झाले. हेमने जून महिन्यात चौल्हेर-पिंपळाचा एक पायलट ट्रेक करून बघितला.

'जेवणाचे मेनू' यावर गृपवर जितकी चर्चा झाली, तितकी क्वचितच कुठे होत असेल. (इथे तुलना करायचा मोह आवरता घेतो आहे, पण सोशल वेबसाईट्सवरचे आपले आवडते आणि लोकप्रिय फोरम आठवा). नाष्ट्याला पोहे-उपमा-मिसळ पासून जेवणाला पिठलंभाकरी-उसळ-चिकन-भात-रस्सा आणि स्वीटडिश म्हणून श्रीखंड-रसमलाई-शिरा-गुलाबजाम, रात्री झोपण्यापूर्वी हॉट चॉकलेट, कोल्ड कॉफी, मसाला दूध एवढ्या फर्माईशी आल्या. मला तर सह्यांकनचीच आठवण झाली. सीएम साहेब ज्याप्रकारे सगळ्या फर्माईशी मंजूर करत होते, ते पाहता त्यांना सह्यांकनला 'टफ' द्यायची नाहीये ना, अशीही एक शंका येऊन गेली. अखेर, गावात पुरेसे दूध मिळणार नाही हे कळले. आणि बाकी सर्व स्वीट डिश आमच्यापैकीच कुणालातरी (सॅकमध्ये घालून बसपर्यंत) आणाव्या लागतील हे समजले. मग आपोआप 'जे सहज उपलब्ध होईल ते चालेल' अशी तडजोड झाली.

पुण्याहून एक आणि मुंबईहून एक अशा दोन बस निघणार होत्या. पुणे बसच्या डायवरला (त्याचे नाव अप्पा) मागील वर्षीच्या सह्यमेळाव्याचा दांडगा अनुभव होता. त्यामुळे तो आम्हाला चांगला 'ओळखून' होता. मुंबई बसचा डायवर नवखा होता. त्याच्या चालककौशल्यावरून अप्पाने त्याचे मेळाव्यादरम्यानच्या निवांत क्षणी बौद्धिक घेतले. दोन्ही बसेस ३ तारखेला रात्री आपापल्या ठिकाणांहून निघून पुण्यक्षेत्र नाशिक येथे अपरात्री अडीच-तीन वाजता भेटणार होत्या. नाशिकहून हेम आम्हाला जॉईन होणार होता. मग दोन्ही बसेस चौल्हेरच्या दिशेने निघणार होत्या. प्लॅन तर फस्क्लास होता.

पुण्याची बस वेळेत म्हणजे चक्क वेळेत निघाली. ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या मेंब्रांचे पिकअप झाले. मला बसमध्ये चढताना प्रत्यक्ष पाहिल्यावर 'मी मेळाव्याला येत आहे' याची पवन आणि ओंकारची खात्री झाली, इतका त्यांना माझ्याबद्दल (अ)विश्वास होता. पुणे-नाशिक महामार्गावर रात्री पाऊण वाजता नारायणगावात 'मुक्ताई'ला नेहमीप्रमाणे मसाला दूधासाठी बस थांबली. तेव्हा मुंबईची बस माजिवड्यात पोचली होती. (कारण काय तर म्हणे, गिरीने उशीर केला!) अखेर मुंबईची बस तीन वाजेपर्यंत नाशकात पोचत नाही हे स्पष्ट झाल्यावर मग आम्ही मसाला दुधाचा अजून एक राऊंड केला. तिथे पवनचा वाढदिवसही वाढता साजरा केला. यथासांग दुग्धपान झाल्यावर बस निघाली. पुढचं मला काहीच आठवत नाही. सीटवर अवघडल्या अवस्थेत झोपण्यापेक्षा मधल्या कॉरिडॉरमध्ये अख्खा सहज मावेन हा साक्षात्कार ज्या क्षणी झाला, तो क्षण भाग्याचा! मग केव्हातरी साडेतीन-चारला दोन्ही बसेस नाशकात भेटल्या, तिथून धुळे महामार्गावर सोग्रस फाट्याला वळल्या, तिथून सटाणाच्या एक किमी अलिकडे तिळवण फाट्याला वळल्या आणि पहाटे साडेसहाला तिळवणला पोचल्या, हे सगळं मी दुसर्‍या दिवशी ओंकारकडून ऐकले. सुरू होणार होणार म्हणता म्हणता सह्यमेळावा सुरूही झाला होता. आम्ही पहिल्या डेस्टिनेशनला पोचलो होतो. समोर होता शिवकालीन चौल्हेरगड आणि तिळवण गावात वाट पाहत होता - चहापोह्यांचा नाष्टा...




- नचिकेत जोशी

(क्रमशः)

Tuesday, June 16, 2015

कोरडा

नटून बसलेल्या बागेचा सोस तेवढा नाही
शोधत आहे ज्याला मी तो इथे केवडा नाही

ठरव तुझी तू तहान आधी, पाणी नंतर शोधू!
दुरून आलेला कुठलाही मेघ कोरडा नाही

शब्द तुझा घेऊन परततो, दाद-दागिने मोठे
त्या लक्ष्मीला भुलण्याइतका अर्थ भाबडा नाही

मैफल संपत असताना तो स्वतःशीच पुटपुटला -
ह्या नावाला टाळ्यांचा अद्याप तुटवडा नाही

गर्दीमध्ये इथल्या जो तो एकाकी जगणारा
हे बघताना मिळे दिलासा, मीच एकटा नाही!

नजर जगाची नको तेवढी पार पोचते हल्ली
एकहि कपडा देहावरचा तसा तोकडा नाही

'सॉरी' म्हटल्यावर हरल्याचा फील मला ना येतो
ईगो असला मला तरीही, तुझ्याएवढा नाही!

इतका प्रवास झाल्यावर हे, आता कळले आहे -
वाट वाकडी असेल माझी, पाय वाकडा नाही

- नचिकेत जोशी (२४/१०/२०१४)