Pages

Monday, February 20, 2017

समर्पण

जेव्हा विचार आला, दोघांस चिमुकलीचा
त्यांनाच विसर पडला कोर्टातल्या सहीचा!

झाला असा चुकीचा भलताच बोलबाला
दोघातल्या खर्‍या पण -  स्वप्नातल्या मिठीचा

प्रत्यक्ष सांगण्याची हिंमत कधीच नव्हती
वायाच जन्म गेला, त्याच्यातल्या कवीचा

बिलगून वाट जावी, माझ्यातुझ्या ठशांना
रानास भास व्हावा आजन्म सोबतीचा

प्रेमी कुणी बुडाला, खळबळ तिच्या तळाला!
अवघा प्रवाह गेला बदलून मग नदीचा

व्हावे असे समर्पण, की श्वास संथ व्हावा!
लवलेशही नसावा प्रेमात घुसमटीचा

- नचिकेत जोशी (३/२/२०१७)

Tuesday, February 7, 2017

प्रामाणिक

मी असे नाही म्हणत की, प्रेम हे वैश्विक असू दे
प्रेम कुठलेही असू दे - फक्त प्रामाणिक असू दे

पूर्ण मेसेज् वाचण्याचे कष्ट वाचावेत माझे -
तर तुझ्या नाकारण्याला एक प्रास्ताविक असू दे

एकमेकांना दिला होकार पण, तेव्हाच ठरले -
या नव्या लिव्ह-इनमध्येही सर्व तात्कालिक असू दे

नेमक्या वाक्यात निर्माता गरज सांगून गेला
'गोष्ट कौटुंबिक असू दे फायदा आर्थिक असू दे'

आत जाताना तुझा दर्जा मुळी विसरून जा तू
आर्जवे कर, शक्य तितका चेहरा अगतिक असू दे

तो कवी अन्, ती समीक्षक! वादळी चर्चा बिछानी!
"आपला शृंगारही का गहन वैचारिक असू दे?"

थेट बोलू आणि मिटवू आपल्यामधला दुरावा
यापुढे अंतर तुझ्यामाझ्यात भौगोलिक असू दे

एवढे झेलून धोके, मी तुझ्या दारात आलो
आज शेवटचीच इच्छा - घाव प्राणांतिक असू दे!

- नचिकेत जोशी (७/२/२०१७)

Friday, February 3, 2017

पेशा

ह्या रेषेच्या पुढे मनाची सत्ता नाही
ह्या रेषेच्या आत मनाची इच्छा नाही

कोण ठरवते, कुणी कुणावर प्रेम करावे?
नियतीही मुक्काम ठरवते - रस्ता नाही!

तुला वाटते त्यापेक्षा हे सुंदर आहे
होकाराची ह्या वाक्यास अपेक्षा नाही!

आकाशाचेही आंदण पिल्लास मिळाले
अजून त्याच्या पंखांचाही पत्ता नाही

सहनशीलता म्हणू यास की हतबल जगणे?
प्रश्न जागतिक आहे, माझ्यापुरता नाही

आपण करतो बंद आपले स्वप्नझरोके
मर्यादांना कुठलीही मर्यादा नाही

नाते विश्वासू आहे, पण नको भेटणे -
तुला भेटल्यावर माझाच भरवसा नाही

जरी चेहरे चिकार येथे, बघू कशाला?
नटलेले सारेच, एकही हसरा नाही

कधीतरीही लिहून फिटते हौस जिवाची
आणि तसेही, लिहिणे माझा पेशा नाही!

- नचिकेत जोशी (२/२/२०१७)

Thursday, February 2, 2017

कहाणी

पूर्वी जनता भले शहाणी नव्हती
सध्याइतकी तरी अडाणी नव्हती

त्या काळी ही असली गाणी नव्हती
बाजारीही खोटी नाणी नव्हती

बालपणी पक्षीही दोस्तच होते
चिमणीसुद्धा माणुसघाणी नव्हती

रबराइतके लवचिक होते नाते
तुटण्याइतकी ताणाताणी नव्हती

रस्ते होते शोधत रस्ता अपुला
त्या गावाला जुनी कहाणी नव्हती

माघारीची आज्ञा कुठून आली?
हरण्याची कुठलीच निशाणी नव्हती

तो सार्‍या विश्वाचा राजा होता
ती तर गावाचीही राणी नव्हती

- नचिकेत जोशी (२/१०/२०१४, अश्विन शुद्ध अष्टमी)