Pages

Tuesday, April 24, 2012

एका प्रवासाची गोष्ट - २


वेळ वाचवण्याचा खुळा छंद कुणाला असेल का? आणि असलाच तर वेळ वाचवण्याच्या धडपडीपायी माणूस काय काय करतो? याची उत्तरे वेगवेगळी येतील. पण सुखासुखी होऊ शकणारा प्रवास टाळून आपणहून धाकधूक ओढवून घेणारा प्रवास एखादा वीर नक्की करू शकतो. मी नुकताच केलाय!

रायगडच्या नितांतसुंदर ट्रेक कम ट्रीपनंतर पुण्याला जाण्यासाठी बसमधून एकटाच महाड फाट्याला उतरलो तेव्हा सव्वापाच वाजले होते. हायवेपासून पाव किमी वरचा स्टँड गाठून पुण्याच्या गाडीत बसायचे एवढा साधा मामला होता. स्टँडवर गेल्यावर समजले, की पुणे गाडी साडेसहा वाजता आहे. मला तो उरलेला सव्वा तास दहापट मोठा होऊन दिसायला लागला. महाडहून पुण्याला येणार्‍या बर्‍याच गाड्या वरंधामार्गे येतात. 'त्यामुळे इथे वेळ घालवण्यापेक्षा मिळेल त्या वाहनाने वरंध/माझेरीपर्यंत जाऊ. तिथे भोरपर्यंत जाण्यासाठी वाहन मिळाले तर उत्तम, नाहीतर ही साडेसहाला इथून सुटणारी गाडी तिथे पकडू' असा साधा-सोपा विचार करून स्टँडबाहेर आलो.
सहा आसनी टमटमवाल्याला विचारले तर तो बिरवाडीपर्यंत सोडेन म्हणाला. बिरवाडी हे हायवेपासून आत असल्यामुळे मला चालणार नव्हते. मग चालत पुन्हा गोवा हायवेला आलो.

तिथे एक बाबाजी भेटला. 'भोरपर्यंत कसे जावे' असे विचारल्यावर त्याने 'विक्रममधून (टमटमला पेण-रायगडमध्ये 'विक्रम' म्हणतात) बिरवाडी फाट्याला जा, तिथून भोरला जायला टेम्पो मिळेल' असे सांगितल्यावर विक्रममध्ये बसलो. बिरवाडी फाट्याच्या ठिकाणावरून माझा थोडा गोंधळ झाला होता. गोवा हायवे सोडून वरंधा घाटाकडे जो रस्ता वळतो, त्या रस्त्यावर पिंपळवाडी (कांगोरीगड फाटा), ढालकाठी, बारसगाव (शिवथरघळ फाटा) ही गावे आहेत. त्याच रस्त्यावर बिरवाडीकडे जाणाराही एक फाटा आहे. टमटम मला तिकडे सोडेल अशा समजुतीतून मी विक्रममध्ये बसलो होतो. प्रत्यक्षात गोवा हायवेलाच एक बिरवाडी फाटा लागतो. टमटम तिकडून आत शिरल्यावर मी डायवरशी भोरला पोचण्याबद्दल विचारायला सुरूवात केली. मुख्य प्रश्न फक्त वेळेचा होता. मला वेळ वाचवून लवकरात लवकर पुण्याला पोचायचं होतं आणि झोपायचं होतं.

"बिरवाडीतून ढालकाठीला जा. तिथून भोरला जायला ट्याम्पो भेटतील." - डायवर.
"हो. बिरवाडीतून ढालकाठी किती लांब आहे?"
"असेल दहा-पंधरा मिनिटे. पण तुम्ही साडेसहाच्या गाडीने का नाही गेलात?"
डायवरने अचूक मुद्द्यावर बोट ठेवले होते.
"अहो, मला वाट बघायचा कंटाळा आला. ढालकाठीहून टेंपो नाही मिळाला तर ही साडेसहाची गाडी मिळेलच की!"
"कुणी सांगितलं? ती गाडी ताम्हिणीमार्गे जाते"
"!!!!!!"
"........."
"क्क्काय??"
"हो मग! वरंधामार्गे आता डायरेक्ट रात्री साडेअकराला एसटी आहे"
"हो! बरोबर आहे. मागे एकदा त्या एसटीने गेलो होतो". मला तीन वर्षांपूर्वीचा तोरणा ते रायगड ट्रेक आठवला. त्यावेळी त्या साडेअकराच्या एसटीने पार पुण्यापर्यंत उभे राहून गेलो होतो.
"मग आता कसं जाऊ? पुन्हा माघारी महाडात जाऊ का?" घड्याळात सहा वाजले होते. डोक्यात वेळेचा हिशेब सुरू होता.
"छे छे! आता उलटं कुठे जाताय? १० रूपयाची रिक्षा करा, ढालकाठीपर्यंत. ढालकाठीहून फळा-बिळांचे ट्यांपो नक्की मिळतील."
"बरं".

बिरवाडीत उतरलो तेव्हा सहा वाजून पाच मिनिटे झाली होती. एका रिक्षावाल्याला विचारलं तर त्याने तीस रूपये होतील असं सांगितलं. ते ऐकून तर डॉस्कंच हललं. आधीच एसटीची आशा संपली होती, त्यात हे असं! मग चालतच ढालकाठीकडे निघालो. वाटेत एक नदीचा पूल लागला. अस्ताला जाणार्‍या सूर्याचं प्रतिबिंब, संथ वाहणारं पात्र, वार्‍याची झुळूक हे सगळं अनुभवल्यावर खूप्पच फ्रेश वाटलं. आणि तसंही ते अंतर तीस रूपयांच्या मानाने फारच कमी होतं. ढालकाठीपासून थोडं पुढे पिंपळवाडीच्या फाट्यावर येऊन थांबलो.

तिथे माझेरीकडे जाणार्‍या गाडीची वाट पाहत उभे असलेले दोन गावकरी भेटले. पेहराव आणि बोलण्यावरून सरकारी कचेरीतले असावेत असे वाटून गेले. त्यांना पाहिल्या पाहिल्याच मी 'रायगडला गेलो होतो. दोस्त मुंबईचे होते, ते मुंबईला गेले. मला भोरला जायचंय' असं जाहिर करून टाकलं. मला नीट पाहून घेतल्यावर मग ते बोलायला लागले.
"आम्ही पाच वाजल्यापासून उभे आहोत. एकही वाहन आलं नाही अजून. रोज असं होत नाही. आज काय झालंय काय माहित!"
वेळ वाचवण्याच्या उरल्यासुरल्या आशाही नेस्तनाबूत करायला निघालेली ती सलामीची वाक्ये ऐकून मला धस्स झालं.
"टेंपो मिळेल ना एखादा?"
"हात करायचा. थांबला तर थांबला. आज रविवार आहे ना, त्यामुळे टेंपोंची वर्दळ कमी असते"
हे रविवार प्रकरण नवीनच होतं. त्याचा मी विचारच केला नव्हता.
"एकदा भोरला पोचलो की मग पुढे चिक्कार एस्ट्या मिळतील पुण्यासाठी" - मी.
"हो, पण भोरचा स्टँड साडेनऊला बंद होतो. त्यानंतर पोचलात तर कापूरहोळपर्यंत जावं लागेल कसंतरी"
हायला! हे अजून एक नवीन! पण ही वस्तुस्थिती असू शकत होती. कारण सहा वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असताना भोरला एका स्पर्धेसाठी गेलो होतो तेव्हा तिथून पुण्यात परतायला साडेनऊची शेवटची एसटी मिळाली होती. आताही तीच परिस्थिती असेल तर साडेनऊच्या आत भोरमध्ये पोचणं मस्ट होतं! हा विचार मी महाडहून निघाल्यापासून केलाच नव्हता कारण साडेनऊच्या लक्ष्मणरेषेच्या आत पुण्यातही पोहोचू असं वाटलं होतं!

दोन ट्रक आले, पण न थांबताच निघून गेले. बाकी सगळ्या प्रायवेट गाड्या. त्यांची अलिशानता पाहूनच मला त्यांना हात करायची हिम्मत होईना! मग दोन टेंपो आले. त्यांना हात करणार तेवढ्यात ते उजवा इंडीकेटर दाखवून पिंपळवाडीत वळले. आत लग्नाचं वर्‍हाड बसलं होतं. लांबवरून येताना दिसलेले १ ट्रक आणि २ टेंपो ट्रक लांबूनच बिरवाडीकडे वळले. निराशा! तात्पर्य, भोरच्या दिशेने निघण्याच्या निर्णय अत्यंत चुकीचा ठरण्याची चिन्हे दिसू लागली होती. आणि वर पुण्यात केव्हा पोचेन हेही बेभरवशाचे होत चालले होते.

सहा पंचवीस!
अजून पाचच मिनिटांनी ती पुणे गाडी महाडमधून सुटली असती आणि ताम्हिणीमार्गे निघालीही असती. आणि मी अनिश्चित काळासाठी पिंपळवाडी फाट्यावर अडकून पडलो होतो. 'कॅप्टनना महाडऐवजी माणगावात सोडायला सांगितलं असतं तर कदाचित ती गाडी मिळालीही असती' - उशीरा सुचलेले निरर्थक विचार मनात सुरू झाले होते! अखेर कंटाळून पुन्हा आल्या मार्गे ढालकाठी-बिरवाडी-'विक्रम' करून महाडात जायचा विचार त्यांना बोलून दाखवला. तेही सहमत झाले.

"इथे सध्या चोर्‍यामार्‍यांमुळे वातावरण टेन्शनमध्ये आहे. त्यात तुम्ही पडलात बाहेरगावचे. उगाच काही व्हायला नको. त्यापेक्षा महाडमध्ये सुरक्षित असाल. आणि तो स्टँड रात्रभर सुरू असतो"
"हो ना!"

साडेसहा वाजता मी एवढा वेळ रस्त्यावर ठेवलेली नवी कोरी प्रिय ट्रेकिंगसॅक उचलली आणि स्वतःच्या एका फसलेल्या प्लॅनला (अतिउत्साही, घाई-गडबड वगैरे) दोष देत ढालकाठीकडे निघणार तेवढ्यात एक ट्रक आला. सातारा पासिंगचा तो ट्रक पाहिल्यावर आशा-उमेद वगैरे जे काही असेल ते एकदम आकाशात पोचलं आणि त्याला हात केला. त्यानेही 'कुठे' असे खुणेनेच विचारले. भोर म्हटल्यावर ट्रक थांबला. मी आणि ते माझेरीचे दोघे ट्रकमध्ये चढलो. त्याचा चालवण्याचा वेग पाहिल्यावर पहिल्याच मिनिटाला ते गावकरी "आता पोचाल वेळेत भोरला" असं म्हणू लागले आणि मी जरा निवांत झालो.

वाटेत अजून एक "डोलकर" ट्रकमध्ये चढला. त्याला वाघजाईला जायचे होते. आता आमची चौघांची कंपनी झाली होती. माझेरीमध्ये ते दोघे उतरले. मग मी थोडा ऐसपैस बसलो आणि ट्रकची केबीन निरखू लागलो. गडी नेहमी ट्रकवर असणारा असावा. झोपायला चादर-उशी, एक्स्ट्रा शर्ट-प्यांटचा जोड, उदबत्त्या, दोन पाण्याच्या बाटल्या, एक डबा. बोर्डवर देवीचा फोटो, शेजारी टेप. फक्त क्लिनर दिसत नव्हता. (नसेल क्लिनर, मला काय?)

डायवर मुकाट ट्रक चालवत होता आणि मला गप्प बसून झोप येऊ लागली होती. मग 'रिकामे मन सैतानाचे घर' प्रमाणे मनात भोर-वरंधा मार्गावर अंधारात झालेल्या लुटीचे आणि मारहाणीचे किस्से आठवले. अनोळखी ट्रक डायवर आणि त्यात बरोब्बर अंधार पडताना आम्ही त्या मार्गावर असणार होतो. या विचारांना ट्रक जेव्हा कावळ्याच्या पायथ्याशी थांबला तेव्हा ब्रेक लागला. डायवरसाहेब उदबत्ती घेऊन उतरले आणि वरंधामाथ्यावरच्या वाघजाईच्या मंदिरात जाऊन पूजा वगैरे करून आले. तेवढी पाचएक मिनिटे मीही बाहेर उतरून दरीत पसरणारा अंधार बघून घेतला. वातावरण सुंदरच होते ते!

वाघजाईला ते 'डोलणारं' पावणं उतरलं आणि ट्रकमध्ये आम्ही दोघेच उरलो. ट्रक रिकामाच चालला होता. माल पोचवून आला असावा. भोर-वरंधा हा पस्तीसएक किमी चा रस्ता मला दिवसाही विलक्षण कंटाळवाणा वाटतो. रस्ता वळणं घेत घेत जात राहतो. चालवणार्‍याच्या हातांना चांगलाच व्यायाम! तिन्हीसांजेला डायवरबाबांनी भजनांची कॅसेट लावली आणि झोप-बिप सगळी उडून गेली. बर्‍याच महिन्यात न ऐकलेली सुंदर भक्तिगीते ऐकायला मिळाली. ते लूट वगैरेचे विचार केव्हा दूर पळाले ते कळलेही नाही.

बरोब्बर आठ वाजून चाळीस मिनिटांनी भोरमध्ये चौपाटीला उतरलो. (छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा असलेल्या चौकाला भोरमध्ये चौपाटी म्हणतात) डायवरला धन्यवाद दिले (धनही दिले). दहा मिनिटे चालत स्टँड गाठला. परंतु पुण्यासाठी एसटी थेट साडेनऊलाच असल्याचे कळले आणि इतकी धावाधाव निष्फळ ठरल्याचे जाणवले. अर्थात माझेरी-ढालकाठी-महाड अशा दूर दूर ठिकाणी अडकण्यापेक्षा हा पाऊण तास अधिक सुसह्य होता. एक स्व-आयोजित, दगदगीचा पण अतिशय सुंदर असा प्रवास संपवून स्वारगेटला उतरलो तेव्हा सव्वा अकरा झाले होते. डोळे झोपेमुळे बंद होत होते आणि मन टक्क जागे!

नुकतीच एक बातमी वाचली - मी जेव्हा बिरवाडी-ढालकाठीमध्ये फिरत होतो आणि टेंपोची वाट पाहत होतो, योगायोगाने त्याच दिवशी, आणि कदाचित एक-दोन तास आधी चांभारगडावर एकटाच चाललेल्या एका ट्रेकरला स्थानिक गावकर्‍यांनी चोर समजून पोलिस ठाण्यात नेले होते. माझेरीचे ते दोन गावकरीसुद्धा चोरीबिरीबद्दल बोलले होतेच. ती बातमी वाचून मला फक्त हसू फुटले एवढंच!

आता ठरवलं आहे, महाडमधून पुन्हा कधी यावेळेला आलोच तर मुकाट साडेसहाच्या एसटीने यायचे.....नाही! नको नको! कारण त्याशिवाय असा विचित्र तरीही भरपूर आनंद-अनुभव देऊन गेलेला प्रवास कसा घडणार? या अनुभवामुळे पुढच्या वेळी धोपटमार्गाने प्रवास करावा की निश्चिंतपणे असे ऑफरूट ट्राय करावेत या दुहेरी शंकांमध्ये सध्या अडकलो आहे, एवढे मात्र निश्चित!

- नचिकेत जोशी (१९/४/२०१२)

Saturday, April 21, 2012

रायगडः छोट्या दोस्तांसमवेत (अंतिम भाग २)लहान मुलं किती लोळतात!!! १८० अंशात वळण्यापासून बसून झोपलेले सापडण्यापर्यंत अनेक प्रकार मुले ट्राय करत असावीत! कुण्या एका लहान मुलाने लोळत लोळत खाली सरकताना मारलेली तिसरी हलकीशी लाथ तोंडावर बसल्यावर मी वैतागून जागा झालो आणि काहीतरी पुटपुटून त्याला नीट झोपण्यासाठी सांगणार तेवढ्यात महेंद्र म्हणाले, 'अहो नचिकेत! वर सरका! झोपेत सरकत किती खाली गेलात!' मी अवाक आणि गप्प! (क्षणभर लहान झाल्याच्या आनंदात!)                

सूर्योदय बघण्यासाठी जगदीश्वराच्या पलीकडील भवानी टोक गाठायचा प्लॅन होता. पण सकाळी सकाळी एवढी तंगडतोड करायचं जीवावर आल्यामुळे 'भवानी टोकावरून सूर्योदय' हा प्लॅन पुढील खेपेसाठी आरक्षित करून ठेवला आणि सूर्योदय पाहण्यासाठी नगारखान्याकडे धावलो. सोबत महेंद्र आणि प्रीतमही होते.
होळीच्या माळावर तुरळक वर्दळ होती. मग थोडे फोटो काढले -


डोंगरकडे -


नगरपेठ/बाजारपेठ -


त्या दिवशी पाहिलेला सूर्योदय हा आतापर्यंतचा 'वन ऑफ द बेस्ट' म्हणावा लागेल. तोरण्याच्या किनारीमागून हळूहळू वर उगवणारा लाल-गुलाबी गोळा अक्षरशः स्तब्ध होऊन आणि भान हरपून बघत होतो.


उजवीकडे मागे दिसणारा डोंगर - राजगड!


खाली येऊन सर्वांना फोटो दाखवले (आणि टुकटुक केलं). चहा-पोहे आटपल्यावर हिरकणी बुरूजाकडे निघालो. पाचव्यांदा रायगडला जात असूनही हिरकणी बुरूजावर जाणे झाले नव्हते.
टकमक टोक - (काल सूर्यास्त इथून पाहिला होता)


बुरुजावरील सपाटीच्याही अलिकडच्या टेकाडावरच सर्वांना थांबवलं गेलं. तिथे माहितीदान आणि ताकपानाचा कार्यक्रम झाला. तिथून उरलेले सगळे आंघोळीच्या आशेने कुशावर्त तलावाकडे गेले आणि कॅप्टनना सांगून आम्ही तिघेच हिरकणी बुरूजाकडे निघालो. गडाच्या पायथ्यापासून पायर्‍या चढतांना हा बुरूज बराच काळ समोर दिसत राहतो. त्याच्या पायथ्याजवळूनच वाट महादरवाजाकडे जाते. त्या बुरूजावरून खाली डोकावताना दोन सेकंद ज्जाम तंतरली. त्या हिरकणीबाईने त्याकाळी तो कडा कसा उतरला असेल (ती गोष्ट खरी असेल तर) ते तीच जाणे! त्यानंतर महाराजांनी ती बाजू तासून घेतली, त्यामुळे हिरकणी जेव्हा उतरली तेव्हा त्यामानाने सोपी वाट असेल असं जरी मानलं तरी एक्स्पोजरमुळे वाटणारी भीती कमी होत नाही!
बुरूजामधील मारूती -


उन्हं वाढायला लागल्यावर आम्हीही कुशावर्त तलावाकडे पावले वळवली. दुर्दैवाने तलावात खूप गा़ळ असल्यामुळे आंघोळ तर सोडाच, साधं पाय टाकूनही बसता आले नाही. एव्हाना फक्त दहा वाजले होते. बाराच्या आत जेवण तयार होणार नसल्यामुळे दोन तास काय करायचे हा प्लॅन कॅप्टनच्या डोक्यात तयार होता - सगळ्या मुलांना घेऊन जोडसाखळी खेळायला होळीच्या माळावर न्यायचे. तेवढ्यात घारूने मला जवळ बोलावून 'थांब! वाघ दरवाजाला जाउ' असं म्हटल्यावर आमचाही दोन तास घालवायचा प्लॅन तयार झाला. अखेर सर्व मुले होळीच्या माळाकडे गेल्यावर सात-आठ उत्साही मंडळींसोबत आम्ही वाघ दरवाजाकडे निघालो.

कुशावर्त तलावाच्या खालच्या अंगाला, डोंगराच्या कुशीत बांधला गेलेला वाघ दरवाजा हा एक चोर दरवाजा आहे. छत्रपती संभाजीमहाराजांच्या वधानंतर जेव्हा फितुरीमुळे झुल्फिकारखानाच्या ताब्यात गड जायची वेळ आली होती तेव्हा राजाराम महाराज याच दरवाजातून निसटले होते. पुढे ते जिंजी किल्ल्यावर पोचले आणि तिथून त्यांनी राज्यकारभार पाहिला.

वाघ दरवाजाबद्दल मला आतापर्यंत आवडलेली गोष्ट म्हणजे त्याची वाट सहज न सापडणे. आतापर्यंत चारपैकी दोनदाच वाट सापडली होती. त्यादिवशीही तेच झाले. कुशावर्तापासून खाली उतरलो. आणि एका सपाटीवरून वाट सापडेनाशी झाली. तापायला लागलेलं उन्हं, वाढणारी तहान, सोबतीला दरवाजाच्या आशेने आलेली मंडळी आणि वाट शोधत फिरणारे आम्ही! दरवाजाच्या उजव्या आणि डाव्या घळींमध्ये पार ओढ्यात उतरून शोध घेतला. दरवाजाकडे जाणारी वाटच सापडेना. अखेर पोटल्याच्या डोंगरासमोरच्या कड्याजवळ जाऊन थोडं खालच्या अंगाने दरीच्या बाजूने ट्रॅवर्स मारायला मी खाली उतरलो. आणि पाच मिनिटातच रूळलेली वाट सापडली. त्या वाटेने दरवाजाचे बांधकाम दिसेपर्यंत खाली उतरून खात्री करून घेतली आणि बाकीच्यांना हाक मारली. वाघ दरवाजाबद्दल मला   आवडणारी अजून एक गोष्ट म्हणजे दरवाजात येणारा आणि समस्त एअरकूलर्सला फिकं ठरवेल असा प्रेमळसा थंडगार वारा! असं वाटत होतं की तिथेच झोपून जावं! त्या दरवाजातून चाळीसएक फूट खाली कातळ उतरून कड्याच्या अगदी टोकावर जाऊन येण्याची हौस भागवून घेतली.

पुन्हा माघारी आलो तेव्हा बच्चेमंडळी खेळ-बिळ आटोपून, येऊन, जेवून निवांत (हुंदडत) बसली होती. सहलीमधला शेवटचा खाना म्हणून आमटी-भात-भाजीबरोबरच पोळी-गुलाबजाम-ताक अशी चंगळ होती. पोटभर जेवल्यावर हात धुवायला कसेबसे उठलो. लगेच सॅक पॅक केल्या आणि संजयभाऊ व कुटुंबाचा निरोप घेतला.
शिरकाईदेवीच्या मंदिराजवळ एक ग्रूप फोटो झाला.


गोलाकार उभे राहून प्रथेप्रमाणे राष्ट्रगीत म्हटले आणि गड उतरायला सुरूवात केली. टळटळीत उन्हं असलं तरी उतार असल्यामुळे व पायर्‍या असल्यामुळे तासाभरात उतरून बसजवळ आलो. मग पुन्हा सरबताची फेरी झाली. वाटेत पाचाड गावी जाऊन राजमाता जिजाऊसाहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि आल्या वाटेने माघारी निघालो. महाडच्या फाट्याजवळ मला सोडून बस मुंबईच्या दिशेने निघून गेली. त्यांना पोचायला ट्राफिकमुळे मध्यरात्र झाली आणि स्वत:हून ओढवून घेतलेल्या एका रोमांचकारी प्रवासामुळे मीही पुण्यात पावणेबाराला पोचलो.

तर ही होती एका ट्रेक कम ट्रीप कम मोहिमेची गोष्ट! लहान मुलांमध्ये त्यांच्याहून लहान होऊन राहण्यात, वावरण्यात मजा असतेच. हे लिखाण खास त्या छोट्यांच्या मोठ्ठ्या मज्जांना, त्यांच्या अमाप उत्साहाला आणि निरागस भावविश्वाला समर्पित...

(समाप्त)

- नचिकेत जोशी
(फोटो - नचिकेत जोशी आणि विश्वेश नवरे)

Friday, April 20, 2012

रायगडः छोट्या दोस्तांसमवेत (भाग १)

शिवतीर्थ रायगड! एका अद्भूत इतिहासपुरूषाने उभ्या केलेल्या सार्वभौम साम्राज्याची तितकीच मनोहर राजधानी! कुणी त्याला 'गरूडाचं घरटं' म्हटलं, तर कुणी 'पूर्वेचं जिब्राल्टर'! कितीही वेळा रायगडाला भेट द्या, समाधान आसपासही फिरकत नाही, हे विशेष! पुन्हा पुन्हा तो परिसर डोळे भरून पाहावासा वाटतो, इतिहासातील सर्व वाद बाजूला ठेवून मनातल्या शिवरायांची पूजा करावीशी वाटते आणि त्या महापुरूषाच्या सद्गुणांसमोर नतमस्तक व्हावंसं वाटतं. यावेळीही तेच झालं!
निमित्त होते, शैलेंद्र सोनटक्के (उर्फ कॅप्टन) आणि टीम आयोजित वय वर्षे ५ ते १७ मधील पन्नासएक मुलांच्या रायगड ट्रेकमध्य सहभागी होण्याची मिळालेली संधी! आजोबा डोंगर, गणपती गडदच्या गुहा, यानंतर त्यांच्याबरोबर केलेला हा तिसरा ट्रेक कम ट्रीप (मुलांसाठी ट्रेक, आमच्यासाठी ट्रीप!). हा ट्रेक लहान मुलांसोबत असल्यामुळे मी आधीपासूनच जरा जास्तच उत्साही होतो. छोट्या मुलांचा अपार उत्साह मला थक्क करून सोडतो (कधीकधी वैतागही येतो पण त्याला इलाज नाही). त्यातच आदल्याच दिवशी नवी ५५ लिटरची ट्रेकिंगसॅक घेतल्यामुळे उत्साह अजून वाढला होता.

शुक्रवारी, १३ तारखेला रात्री दादरला बसमध्ये चढल्यावर कॅप्टननी हातात यादी ठेवली आणि 'हजेरी' घेऊनच सर्वांना बसमध्ये चढवायला सांगितले. नाहूरला मोठी गँग बसमध्ये चढल्यावर बसमध्ये जिवंतपणा आला. कळंबोलीमार्गे बाहेर पडताना हायवेवर तुफान ट्राफिक लागला. दोन दिवसांची जोडून सुटी आल्यामुळे बहुधा मुंबई आपापल्या किंवा भाड्याने घेतलेल्या चारचाकांवरून बाहेर पडत असावी. त्यामुळे कळंबोली मॅकडोनाल्डपाशी शेवटच्या पिकअपला पोचेपर्यंत पावणेदोन वाजले. (ते बिचारे अकरा-साडेअकरापासून येऊन थांबले असणार!) बस फुल्ल भरली आणि आम्ही दोघे-तिघे खर्‍या ट्रेकरच्या गुणधर्माला जागून कॅरीमॅट बसच्या कॉरिडॉरमध्ये अंथरल्या आणि बिनधास्त आडवे झालो. मध्यरात्री एकदा कम्पल्सरी ब्रेकसाठी आणि एकदा माणगाव एसटी स्टँडवर बस थांबली. (मी झोपलोच होतो) बाकी काही नाही.

शनिवारी सकाळी रायगडपायथा गाठला तेव्हा काटा सात वाजल्याचे दाखवत होता. नियोजित वेळेपेक्षा आम्ही तासभर मागे होतो. ग्रुपमधल्या गोवेकर काकांच्या वाढदिवसानिमित्त खूबलढा बुरूजाच्या साक्षीने केककटाईचा कार्यक्रम झाला. संदीप खांबेटे उर्फ घारूअण्णा (या ट्रेकचे अधिकृत गाईड) यांनी थोडक्यात गडाच्या पायथ्याची माहिती देऊन एक-दोन प्रश्नांची पिलावळ पोरांच्या डोक्यात सोडून दिली (त्याचे परिणाम नंतर माझ्यासारख्या सामान्य ट्रेकर्सना भोगावे लागले. त्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी उत्सुक मुलामुलींनी माझा इतका पिच्छा पुरवला की बस रे बस!)

सोयीसाठी कॅप्टननी ५ ग्रूप पाडले होते. एका ग्रूपच्या लीडरपदी अस्मादिकांची नेमणूक झाली होती. अर्थात ट्रिपच्या शेवटी हे ग्रूप फक्त कागदावरच राहिले, ही गोष्ट वेगळी. बालसुलभ हालचाली आणि इच्छा यामुळे ही मुलेमुली आपला ग्रूप सोडून इतर सर्व ग्रूपमध्ये असायची. तात्पर्य, 'काऊंट' या एकाच गरजेपोटी हे ग्रूप बनवले गेले होते and that purpose served well!.

सव्वासातला पायर्‍यांनी चढाई सुरू केली आणि पावणेनऊपर्यंत महादरवाजा गाठला सुद्धा! विलक्षण उत्साहाने सर्वच मुले चढली. महादरवाज्याची रचना यावर घारूअण्णाने (इथून पुढे 'घारू') सविस्तर माहिती दिली आणि महाराजांबद्दलचा आदर अजून वाढला. शिरकाईदेवीच्या मंदिराजवळ काऊंट घेतला आणि होळीच्या माळाच्या खालच्या अंगाला असलेल्या धनगरवस्तीकडे पावले वळवली. उद्या दुपारी निघेपर्यंत आमचा मुक्काम संजयभाऊंच्या घरी असणार होता.
चहा आणि उपम्याचा नाष्टा आटोपून नगारखाना आणि राजसदर पाहायला निघालो. हे सगळंच खरं तर अजून वर्णन करून लिहायला पाहिजे. कारण, यावेळी मी अट्टल भटक्यांसोबत नव्हे, तर एका वेगळ्याच वयातल्या सळसळत्या उत्साहासोबत मोहिमेवर होतो. आणि हा उत्साहही कसा तर, समोरच्यालाही स्वतःसोबत ओढून घेणारा! 'दादा, तुला कोडं घालू का?', 'ए दादू, बोअर नको मारूस रे' पासून 'तुला डोरेमॉन आवडतो का (डोरेमॉनच ना?)', किंवा 'हा चॉकलेटचा कागदाचा कचरा तुझ्या खिशात ठेव ना' इथपर्यंत आणि 'बाबा म्हणतायत सायन्सलाच जा' पासून ते 'तो दरवाजा फार सेक्सी होता नै?' असं म्हटल्यावर एक सीक्रेट कळल्यासारखे वेगळेच भाव चेहर्‍यावर सहज उमटून जाणार्‍या ह्या वयापर्यंत सर्वत्र सारखंच चैतन्य होतं. त्याबद्दल तितकंच मिसळून लिहायला हवं. बघूया. प्रयत्न करतो.

होळीचा माळ, नगारखाना, राजसभा, महाराजांचे खाजगी महाल, अष्टप्रधानमंडळाच्या कचेर्‍या, राणीवशाच्या विरंगुळ्यासाठी उभारलेले अष्टकोनी मनोरे, गंगासागर तलाव, कारखान्यांची कोठारे इ इ सगळा परिसर फिरलो. कळत्या वयातली मुले माहिती लक्ष देऊन ऐकत होती. बाकीची मनसोक्त हुंदडत होती. त्यांच्याकडे पाहून 'यांना आत्ता इतिहास कळत नाहीये, तो लक्ष देऊन ऐकायचं यांचं वयसुद्धा नाहीये, पण आपण इथे आलो होतो आणि इथे येऊन फार छान वाटलं होतं, एवढ्या जाणिवेवर जरी पुढेमागे किल्ले भटकायची सवय लागली तरी पुरेसे आहे' हा विचार माझ्या मनात येऊन गेला. घारूच्या माहितीसोबतच मीही अधूनमधून शिवरायांबद्दल जमेल तेव्हा बोलत होतो. अर्थात, माझा वाटा अगदी खारीपेक्षाही कमीच होता. पण मुलांना आवड वाटत होती, जाणून घ्यायची उत्सुकता होती, हे कारण मला पुरे होते.
रायगडाबद्दल काय आणि किती लिहावं? प्र के घाणेकरांनी एक साडेतीनशे-चारशे पानांचं अख्खं पुस्तक फक्त रायगडासंबंधी लिहिलंय. शिवाय बखरी, दस्तऐवज, कागदपत्रे, पत्रव्यवहार यातून तर रायगडाचं चिकार वर्णन सापडतं. किल्ला देखणा खराच! पण त्याचबरोबर मराठ्यांच्या सार्वभौम राज्याची राजधानी असल्याच्या खुणा प्रत्येक बांधकामरचनेमध्ये सापडतात. असा किल्ला फिरायला कधी गेलात तर सोबत माहितगार माणूस न्याच! टेक माय वर्ड्स, परत फिराल तेव्हा काहीतरी अमूल्य भावना घेऊन याल.

दोन तास तो परिसर फिरल्यावर उन्हामुळे आणि भुकेमुळे मुलांची नव्हे, तर आमची चुळबूळ सुरू झाली. मग पुन्हा मुक्कामाचा रस्ता पकडला. नाचणीची भाकरी-रस्सा-भात-आमटी-पापड-लोणचे-कांदा असा फक्कड मेनू आणि यासोबत मीठ-तिखट लावून कैर्‍यांच्या फोडी!


हे जेवल्यावर मला झोपच आली आणि लगेचच मी अर्धा तास डुलकी काढून घेतली. संध्याकाळी जगदीश्वर मंदिर आणि टकमक टोकावरून सूर्यास्त असा कार्यक्रम होता. टकमकटोकावरून दिसणारा सूर्यास्त हा एक अतिशय सुखद अनुभव असतो. त्यामुळे कॅप्टन आणि घारूशी बोलून मी टकम़कटोकाची भेट दुसर्‍या दिवशी सूर्योदयाऐवजी आदल्या दिवशी सूर्यास्ताची करून घेतली होती. आणि आता टकमकच्या कड्यावर रेलिंग लावलेले असल्यामुळे मुलांना घेऊन तिथे जाण्यात धोकाही नव्हता. (रेलिंग नसताना मजा अधिक यायची हे सांगायला नकोच!)

जगदीश्वर मंदिराच्या पहिल्या पायरीला वाकून नमस्कार केला आणि रायगड बांधणार्‍या हिराजीला मनोमन सलाम केला. मराठी वाचता येणार्‍या मुलांकडून (वय वर्षे ८-१०) त्या पायरीवरचा शिलालेख वाचून घेतला आणि अर्थही त्यांच्याचकडून काढून घेतला. स्वतःला अर्थ लावता आला म्हणून ते खूश आणि त्यांनी प्रयत्न केला म्हणून मी खूश! महाराजांच्या समाधीचेही दर्शन घेतले.

जगदीश्वर मंदिर बघून टकमक टोकाकडे आलो तेव्हा सूर्य चांगला हातभर वर होता. टकम़कवरून घेतलेले काही फोटो -
सूर्यास्ताची वेळ कायम भुरळ पाडते. मी नकळत माझ्या मनस्थितीची आणि सूर्यास्त किती सुंदर असतो हे कळण्याच्या वयापर्यंत न पोचलेल्या त्यातल्या काही छोट्या सवंगड्यांच्या मनस्थितीची (शब्द जड होतोय, मान्य आहे!) तुलना करू लागलो. सूर्यास्त, निसर्ग, कातरवेळ, अंधूक होत जाणारा आसमंत, पश्चिमेकडून येणारा झुळूकवारा, पक्ष्यांची माघारी जाणारी रांग, हे सर्व अनुभवांच्या कसोट्यांवर तोलून क्षणोक्षणी भावनिक हिंदोळ्यांवर झुलणारा मी आणि 'पाटी कोरी' असल्यामुळे निश्चिंत असणारे ते! सूर्यास्त पाहत असताना माझं मन हलकं होत जातं हे खरं असलं तरी ते रोजच्या 'संसारा'मुळे मुळात जड झालेलं असतं ही वस्तुस्थिती आहेच! यांच्या मनावर असले दिवस पाहायची वेळ अजून यायची आहे त्यामुळे इथे जड-हलकं असं काही नाहीच! घरच्यांनी यांना बिंधास्तपणे सहलीला सोडलं आहे, आणि यांनी स्वतःला कॅप्टन-दादा-ताई-काका यांच्या हवाली केलं आहे - बात खतम! संपूर्णपणे विश्वास टाकण्याचं आणि त्यात खोट-बिट नसतेच हे मानण्याचं आणि असली तरी चालू शकण्याचं हे वय एकदाच मिळतं हेही खरं! असो. फारच वेगळा विषय सुरू झाला.टकमक टोकावर गर्दी व्हायला लागली आणि दुसर्‍या एका ग्रूपला जागा करून देण्यासाठी आम्ही टोकावरून मागे येऊन बसलो. अंधार पडायच्या आधी कॅप्टननी सर्वांना तिथून निघण्याची सूचना केली. मी मात्र ग्रूप काऊंट घेण्याची जबाबदारी को-लीडरला देऊन सूर्य पूर्ण मावळेपर्यंत तिथेच बसून राहिलो. समोर महादरवाजा काळोखाच्या कुशीत शिरू लागला होता. शिरकाईमंदिरापासून निघालेल्या आणि महादरवाजातून उतरलेल्या, हिरकणी बुरूजाखालून जाणार्‍या आणि डोंगराच्या मध्यातून पार खूबलढा बुरूजापर्यंत दृष्टीपथात येणार्‍या पायर्‍यांवर त्या संपूर्ण पट्ट्यात कोणीही नव्हतं. होती ती फक्त शांतता! कधी माझ्या शब्दांमध्ये जर तेवढी ताकद आली तर सूर्यास्ताच्या अशा अनुभवांवर एकदा स्वतंत्रपणे लिहायची इच्छा आहे. नक्की काय वाटतं ते सांगता येतंय असं वाटत असतानाच निसटून जातं. काहीच न बोलता, सांगता शांत बसून राहण्याची इच्छा प्रबळ होते. अखेर एक सुंदर सूर्यास्त पाहून माघारी वळलो आणि टॉर्च सोबत असूनही तो न लावता टकम़क टोक ते होळीच्या माळापर्यंतचं अंतर फिक्कटल्या उजेडातच पार करून सोबत्यांना येऊन मिळालो.मुक्कामाकडे जातानाच्या पाच मिनिटाच्या उतारावर सोबत मुले होती. तेव्हा टॉर्च बंद केल्यावर मात्र मुलांचा गोंधळ उडाला. अंधारातही वाट सापडू शकते हे त्यांना शिकवण्याची ती वेळ नव्हती, पण पाच सेकंदाचा एक अनुभव मात्र त्यांच्यासाठी वेगळा ठरला असावा अशी मी समजूत करून घेतली. शेवटी, नुसत्या सहलीपलिकडेही स्थळ-काळ-वेळ बघून जर काही देता आलं तर का देऊ नये? त्यांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाची एक छोटीशी परतफेड "अंधारातही हा सह्याद्री तितकाच आपला आहे" हा विश्वास त्यांच्या मनात पेरण्याची सुरूवात का करू नये? अर्थात, खरं सांगायचं तर त्यावेळी डोळ्यासमोर होतं ते फक्त मुलांसोबत असणं आणि त्यांच्यासोबत आनंद वाटून घेणं. आणि ते खूप आनंददायी होतं.

अंगणामध्ये अंधारातच फरसाण-बिस्कीटाच्या पुड्या फिरल्या आणि अंताक्षरीला सुरूवात झाली. जेवण तयार होईपर्यंत धम्म्माल गाणी झाली. जेवायला तांदळाची भाकरी-फ्लॉवर रस्सा-भात-आमटी-कांदा-लोणचे-पापड असा मेनू होता. रस्सा तिखट लागलेल्या बालचमूमध्ये मीही सामील झालो आणि सॅकमधून जॅम मागवून घेतला.

'जेवल्यावर मूनलाईट वॉक आहे' हे मुलांना आधीच सांगितल्यामुळे दुसर्‍या पंगतीमध्ये आम्हा संयोजकांची जेवणे होण्याची वाट बघत मुले टॉर्च घेऊन आणि बूट चढवूनच गप्पा मारत बसली होती. काहींना झोप फारच अनावर झाली होती. त्यामुळे त्यांच्या झोपण्याची आधी व्यवस्था लावून मग होळीच्या माळावर निघालो.

नगरपेठेच्या पायर्‍यांवर टेलिस्कोप मांडून आदित्य छत्रे आणि टीम तयार होती. शनि, मंगळ, सप्तर्षी, त्यांच्या रेषेत ध्रुव तारा, सिंह-कन्या-मिथून या राशी सुपरवर्गो हा क्लस्टर (आदित्यभौ, चुकून हे वाचलंत आणि काही चूक बिक सापडलं तर क्षमा करा हो!) असं काय काय त्याने उत्साहाने दाखवलं आणि समजावूनही दिलं. शेवटी मला झोप अनावर व्हायला लागली. म्हणून 'समदु:खी' गडी (त्यात कॅप्टनसुद्धा होते) पकडले आणि मुकाटपणे मुक्कामाची वाट पकडली.

बहुतांश जनता शाकारलेल्या अंगणात झोपणार होती. मला तिकडे उकडण्याची भीती असल्यामुळे मी उरलेल्या जनतेप्रमाणे अंगणाच्याही बाहेर, उघड्या आकाशाखाली झोपणं पसंत केलं. स्लीपींग मॅटमध्ये शिरलो तेव्हा साडेअकरा झाले होते. वारा पडला होता. भयंकर उकडत होतं. पहिला दिवस संपला होता.
(क्रमशः)

 - नचिकेत जोशी
(फोटो - नचिकेत जोशी आणि विश्वेश नवरे)

Wednesday, April 11, 2012

बिचकते आयुष्य माझे

बिचकते आयुष्य माझे आयते यश पाहिल्यावर
एरवी संतुष्ट असते कमवलेल्या अपयशावर

मी जरी नसलो तरी गर्दी स्वतःतच दंग असते
मी असा वागेन का हे चेहरेही पांगल्यावर?

ती समजते - 'संकटांशी एकटी लढते सदा मी!'
(कोण हो जाणार मदतीला तिने झिडकारल्यावर?)

ओठभर चव घेउनी, उष्टावले त्याने तुला! अन् -
अजुनही वाटे तुला की प्रेम करतो तो तुझ्यावर!

वाट असते स्तब्ध तेव्हा शांतता करतेच दंगा
रान रेंगाळून जाते चालणार्‍या पावलांवर

ओळखीची खूण नसते वागण्यामध्ये कधीही
भाव परका ओळखीचा झळकतो पण चेहर्‍यावर!

जवळ कायमचे नको आहे तुला कोणी मुळीही
पाहिजे खांदा तुला तू दोन अश्रू ढाळल्यावर!

नेहमी दु:खात होते एक राजा, एक राणी
एकदा झाले सुखी ते! पण कहाणी संपल्यावर!

नचिकेत जोशी (१०/४/२०१२)