Pages

Sunday, December 19, 2021

नांदा सौख्यभरे!


आदित्यला मी पहिल्यांदा भेटलो ते २०१२ च्या उन्हाळी रायगड children’s ट्रेकला. ईश्वरीची पहिली भेट बहुधा त्यानंतरच्याच तोरणा children’s ट्रेकला. त्या काळी आमचे कॅप्टन दरवर्षी लहान मुलांसाठी (वय ६-७ ते १४-१५) वर्षांतून दोनवेळा उन्हाळी आणि दिवाळी सुटीत मुक्कामी ट्रेक न्यायचे. अशाच एका ट्रेकला स्वयंसेवकगिरीची आवड असलेले अस्मादिक जॉइन झाले आणि मग सगळ्या त्या वेळच्या लहान आणि फार लहान मुलामुलींचा ‘दादा’ होण्याचं भाग्य ओंजळीत दोहों करांत स्वीकारते झाले. ते ट्रेक २०१७-१८ पर्यन्तच झाले, पण त्या ट्रेक्सनी आयुष्यभरासाठी आठवणी दिल्या. पण काही काही लव्ह-स्टोरीजचे मूक साक्षीदार असणंही सुखद असतं हे मात्र नक्की. ईश्वरी-आदित्य आणि आणखी चार-पाच जणांचा एक छान ग्रुप होता. सगळाच्या सगळा ग्रुप एकदम मस्त. ट्रेकमध्ये त्यांच्यामुळे जान असायची. 

आदित्य पहिल्यापासूनच ‘सायन्स’चा मुलगा. अत्यंत calculative, तंत्र-शिस्त-लॉजिक ह्यांचा ठाम चाहता. संशोधन-प्रिय मुलगा. एकदा माथेरान night trekच्या वेळी अक्षरश: मध्यरात्रीच्या वेळी काही वेळ तो आणि मी असे दोघेच त्या अंधार्‍या पायवाटेवरून चढत होतो. पुढचे बरेच पुढे आणि मागचे बरेच मागे होते. आणि आमच्या गप्पा कशा ते आठवत नाही, पण 4th-5th dimension, parallel universe ह्यावर चालू झाल्या. आणि एका क्षणी त्या गप्पा ‘ह्या क्षणी आपल्यासारखं कुणीतरी ह्या जगात/जगाबाहेर असेलही’ ह्या आदित्यच्या वाक्यापर्यन्त आल्या. माझ्या अंगावर अक्षरश: भीतीने काटा याचा बाकी होता. चढताना आलेला घाम आणि भीतेने आलेला घाम ह्यात फरक करता आला नसता. आणि वर हा बाबाजी एकदम प्रॅक्टिकली विचारात होता, ‘काय बरोबर आहे की नाही?’.  कुठल्याही ट्रेकला भेटला आणि आकाश स्वच्छ असलं की ह्याचा तारे-दर्शनाचा कार्यक्रम व्हायचाच. त्या रायगड ट्रेकमध्येच होळीच्या माळावर आम्ही सगळे त्याच्याभोवती गोल करून बसलो होतो आणि हा (तेव्हा लहान असलेला) आदित्य आम्हाला तारकासमूहांबद्दल अतिशय आत्मविश्वासाने माहिती देत होता. मला फक्त वृषभ रास, वृश्चिक रास एवढंच माहीत होतं, पण ह्याला त्या समूहातले super-cluster वगैरेही माहीत होते. मी जाम थक्क झालो होतो. असा हा एकदम सायंटिस्ट- आणि लॉजिकप्रिय वल्ली. यथावकाश त्याला त्याची तारका आकाशात न सापडता त्याच्या जवळपासच सापडली.

ईश्वरी पहिल्यापासूनच कलासक्त, अतिशय संवेदनशील, आणि इंग्लिशमध्ये ज्याला आपण ‘empathy’ म्हणतो त्या गुणांची. ट्रेकमध्ये सोबत्यांची काळजी घेणारी. ईश्वरीचा गळा अतिशय गोड, त्यामुळे प्रत्येक ट्रेकमध्ये रात्री ईश्वरीचं गाणं हे व्हायचंच! प्रामाणिकपणे सांगायचं तर ‘ओल्या सांजवेळी’ हे गाणं मला फार आवडायला लागलं ते ईश्वरीच्या आवाजात राजगड की तोरणा ट्रेकला ऐकलं तेव्हापासून! ते तेव्हा रेकॉर्ड करायला सुचलं नाही, पण त्यावेळी तिथे जो माहौल तयार झाला होता, त्याला तोड नाही! एक-दोन ट्रेक्सनंतर आमच्याही लक्षात यायला लागलं की ईश्वरीच्या गाण्यांचे आपण फक्त प्रेक्षक-चाहते आहोत. रात्रीच्या मैफलीतले ते शब्द आपल्याला भेदून जात आहेत, पण न थांबता कुठल्या तरी विशिष्ट दिशेने निघाले आहेत. कुणास ठाऊक, त्या शब्दांचं डेस्टीनेशन त्यावेळी बाहेर कुठेतरी आकाश बघत फिरतही असेल. पण ते डेस्टीनेशन तिच्यासाठीच वाट बघत होतं. 

ट्रेकच्या वेळेचं दोघांचं वागणं मात्र वयाला झेपेल अशा समंजसपणाचं असायचं. चिडवाचिडवी झालीच तर अगदी ‘आपण त्या गावचेच नाही’ असे भाव चेहर्‍यावर असायचे. मग नंतर आम्हाला हेही कळलं की हे नातं जुळायला आणि फुलायला दोघांच्याही घरून सक्रिय सहकार्य आहे! काही लव्ह-स्टोरीज फुलतांना बघणं हे सुखद होत जातं त्यात हा फॅक्टर फार महत्त्वाचा ठरतो. 

बघता बघता दिवस-महिने-वर्षं उलटली आणि आज ही दोघे आयुष्यभरासाठी शेकडोंच्या साक्षीने अधिकृतपणे एकमेकांची सहप्रवासी बनली. आदित्यला ‘ईश्वरी’ लाभ झाला आणि ईश्वरीला रडा-भांडायला हक्काचा (उंच-भक्कम आणि लॉजीकल) खांदा मिळाला!

प्रिय ईश्वरी आणि आदित्य, सुखाने आणि आनंदाने ‘तुमचा’ बेस्ट संसार करा.

तुमचा तोच,
नचिकेत दादा

(ता.क. – कालपर्यंत बच्चापार्टीत असलेली ही गोड पोरं लग्नाचे पेढे द्यायला लागली की आपण म्हातारे होत चाललो आहोत हे फीलिंग येतं राव! आज ईश्वरीला मामासोबत विवाह-वेदीकडे जाताना बघून नकळत डोळ्यांतून पाणी आलं तेव्हा ते फार जाणवलं. खरं तर ते फीलिंग ‘दिल चाहता है’ला वीस वर्षे झाली हे ज्या दिवशी कळलं तेव्हापासूनच यायला लागलं आहे, पण असो!)

- नचिकेत जोशी (१९/१२/२०२१)