Pages

Thursday, May 31, 2012

आडरात्री नाळेच्या वाटेने विसापूर

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्याची गोष्ट. मुंबईमधला शेवटचा रविवार 'सत्कारणी' लावायचा होता. त्यामुळे ट्रेकच करायचा होता. प्रीती व राजस अहुपे घाटाने चढून डोणीच्या दाराने उतरणार होते. सूरज व टीम चंदेरीला जाणार होती. आणि मुंबईत आल्यापासून ज्यांच्यासोबत अनेक ट्रेक केले, ते माझे बरेचसे मित्र विसापूर नाईट असेंड करणार होते. माझा भयंकरच गोंधळ उडाला होता. तीनही ट्रेक करायचे बाकी होते पण एकच निवडावा लागणार होता. अखेर, 'इस दोस्ती के रिश्ते को याद करके' मी विसापूर नक्की केला. पण 'विसापूर रात्री चढायचाय' असा मित्राचा समस आल्यावर माझी नाही म्हटलं तरी थोडी तंतरलीच.

विसापूरबद्दल मी जे काही ऐकलं होतं ते घाबरवणारंच होतं. इथे येणारे जवळजवळ प्रत्येक ग्रूप वाट चुकतातच पासून हरवलात तर पाण्याची कुठेही सोय नाही, आणि अशावेळी चकवेही लागतात,  इथपर्यंत अशा आत्मविश्वास खच्ची करणार्याच कहाण्या ऐकल्या होत्या. वर्तमानपत्रातून विसापूरमध्ये हरवलेल्या ट्रेकर्सचे भयभीत वृत्तांतही वाचले होते. त्यामुळे मी जरी या चढाईसाठी 'हो' म्हटलं तरी मनातून धाकधूक होतीच. पण सगळे सोबती अट्टल भटके असल्यामुळे थोडा निर्धास्तही होतो. आणि मुख्य म्हणजे, वाट चुकलो तरी काही वर्षांपूर्वी वाटणारी भीती आता वाटेनाशी होण्याइतका या सह्याद्रीबाबाबद्दल विश्वास आला होता.

केवळ आठ जण जाणार असल्यामुळे मुंबईतून कारने जायचे ठरवले. खारघरनाक्यावरच्या गाडीवर आलू पराठे बांधून घेतले, द्रुतगती मार्गावरील फूडमॉलमध्ये खाद्यपदार्थांच्या किंमतींबद्दल त्या हॉटेलसमोरच एक निष्फळ परिसंवाद केला आणि (मी झोपेतच) मळवलीला पोचलो तेव्हा पहाटेचे अडीच वाजले होते. द्रुतगती महामार्गाच्या शेजारून पाटण गावाकडे वळलो तेव्हा महामार्गाला लंबरूप (सोप्या भाषेत 'परपेंडिक्युलर') असणारा विसापूर किल्ला अंधारात गायब झाला होता. पाटण गावात शिरलो तेव्हा आम्ही आणि कुत्री एवढेच जागे होतो. बाकी सर्वत्र सामसूम होती. पाटणच्या पाठीशी विसापूर खड्या पहारेकर्यासारखा उभा आहे. त्याच बाजूला गडाचा दरवाजा आहे.

पहाटे तीन वाजता आम्ही चढाईला सुरूवात केली. आकाशात चांदण्या असल्या तरी चंद्रप्रकाश नव्हता. घाटावर असल्यामुळे घामटाही नव्हता.  पायथ्यापासून थोड्याच उंचीवर एके ठिकाणी कातळातील पायर्या लागल्या. हातातील टॉर्चच्या साहाय्याने अर्ध्या-पाऊण तासात बर्यापैकी उंची गाठली. तिथून दूरवर फक्त लोहमार्गावरून जाणार्या एक्सप्रेस मेलचा आवाज अधूनमधून येत होता. एका सपाटीवर पोचल्यावर एक बर्यापैकी मोठी वाट पूर्वेकडे विसापूरला डाव्या बाजूने वळसा घालून जात होती. यावेळी चुकायची शक्यता प्रत्येकानेच गृहीत धरलेली असल्यामुळे, शक्यतो चुकू नये अशा रीतीनेच वाट पकडून चालत होतो. त्यामुळे त्या मोठ्या वाटेने निघालो. पण आमच्यातील एकाने हा ट्रेक पूर्वी केलेला असल्यामुळे त्या वाटेने जायचे नसून गावाच्या मागेच असलेल्या एका नाळेतून वाट असल्याचे आठवत होते. आम्ही उभे होतो तिथे आजूबाजूला फक्त रानजाळी होती. नाळेत शिरणे सोडाच, नाळेचे अंतरही समजत नव्हते. अखेर आधुनिक तंत्रज्ञान मदतीला धावून आले. एकाच्या मोबाईलमध्ये गूगलमॅप पाहिला. त्यात लोहगड दाखवलेली दिशा पाहून थोडावेळ तो मॅपच चुकीचा आहे, असे मी बोलूनही दाखवले. साक्षात गूगलस्वामींना मी चूक ठरवल्यामुळे तो मॅप श्रद्धेने बघणारे अचानक थबकून हसायला लागले. अखेर त्या मॅपनुसारच दिशांचा अंदाज घेतला आणि नाळ शोधायला निघालो. पुढील एक तास फक्त गच्च काटेरी जाळ्या, अनियमित चढ-उताराच्या अरूंद पायवाटा, अंधार, घाम इत्यादी इत्यादी. अर्थात विसापूरबद्दल माझा जो समज होता त्यामानाने ही वाट बरीच बरी होती. मुख्य म्हणजे दिशा बरोबर होती. अखेर पहाटे साडेचारच्या सुमारास त्या नाळेत येऊन पोचलो. आता इथून पुढे नाळेपासून भरकटलो नसतो तर दरवाजा नक्की सापडला असता. पाचच्या सुमारास एका सपाटीवर येऊन पोचलो. इथून पुढची वाट पाठ नसली तरी चुकायची शक्यता नसल्यामुळे उजाडेपर्यंत तिथेच पाठ टेकायचे ठरवले.पहाट फुटण्याच्या सुमारास नाळेच्या डाव्या अंगास असलेल्या झाडीतून काहीतरी वरून खाली सळसळत जाण्याचा मोठा आवाज ऐकला. ती बहुधा वानरेच असावीत. सात वाजता नाळेतून दरवाजाच्या दिशेने निघालो. दरवाजापाशी कातळात कोरलेला मारूती आहे. तिथून पुढे नीटशा पायर्या आहेत.


विसापूर हा एक प्रचंड घेरा असलेला किल्ला आहे. विसापूरचं जुन्या काळातलं नाव इसागड होतं. गडाला शिवपूर्वकाळाच्याही आधीपासूनचा इतिहास आहे. आम्हाला किल्ला कडेकडेने फिरायला जवळजवळ साडेतीन तास लागले. पश्चिमेकडची विस्तृत तटबंदी नजरबंदी करते. अतिशय नेटकी, बलदंड आणि सुबक रचना असलेल्या या तटबंदीवरून चौफेर दूरवर नजर पोचेल तिथपर्यंतची सफर करत फिरलो. गडावर पाण्याची अनेक टाकी, अनेक देवालये, कोठारे दिसतात. आजुबाजूचा परिसर तर केवळ डोळ्यात साठवून ठेवावा असा आहे. विसापूरवर फारसं काही बघायला नसेल हा (हवेतला) अंदाज पूर्ण चुकीचा ठरल्याचं अनोखं समाधान मिळत होतं!
लोहगडासारख्या किल्ल्याचा शेजार असूनही गडाची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे.
या प्रदक्षिणेदरम्यान काढलेले काही फोटो -
लोहगडाचे बुरूज, दरवाजे आणि लोहगडवाडी गाव -
पवना जलाशय आणि तुंग किल्ला -


चुन्याची घाणी, आणि जाते

साडेदहा वाजता उतरायला सुरूवात केली आणि पायथ्याला पोचलो तेव्हा साडेबारा वाजत आले होते. सोबत्यांना
तुंग किल्ला ही करायचा होता. पण रणरणत्या उन्हामुळे तो प्लॅन रद्द झाला आणि आम्ही लोणावळ्याच्या दिशेने निघालो. येता येता जेवण, मग कांजूरमार्ग स्टेशनपर्यंत कारने आणि तिथून पुढे (स्लो) लोकलने कंटाळवाणा, पण 'हे इथलं शेवटचंच' हे जाणवत असल्यामुळे संपूच नये असं वाटणारा प्रवास करून दादरला उतरलो, तेव्हा पाच वाजले होते.ट्रेकची आवड आधीपासूनचीच, पण घरापासून दूर, मुंबईत आल्यापासून ट्रेकमध्ये नियमितपणा आला.  माबोकरांसोबत सांदण दरीची सफर, मग कळसूबाई, बोरांड्याच्या दाराने नाणेघाट, विही वॉटरफॉल रॅपलिंग, गणपती गडद, आजोबा डोंगर, भैरवगड, गोरेगावमधील वॉल क्लाईंबिंग, सह्यांकन २०११, रतनगड ते डेहेणे, माहुलीचा अत्यंत थरारक अनुभव इत्यादी इत्यादी इत्यादी.... पहाटे पाच अट्ठावन्नची कर्जत स्लो पकडण्यासाठी उठल्यावर पावसाने केलेले स्वागत, दादरच्या सुनसान रस्त्यावर झालेली जुन्या ट्रेकच्या आठवणींची आणि नवीन ट्रेकबद्दलच्या उत्सुकतांची गर्दी... थोडं काव्यमय होत असेल, पण गेले दहा महिने सर्वार्थाने सुखद होते... अनेक ट्रेक, त्यांच्या अविस्मरणीय आठवणी, नवे दोस्त, नवे उपक्रम... पसारा म्हटलं तर वाढलाय, म्हटलं तर अजिबातच नाही!  अजूनही ट्रेकिंगमध्ये फार अनुभव आलाय असं म्हणवत नाही, कारण प्रत्येक ट्रेक हा वेगळा असतो आणि सह्याद्रीकडून घेण्यासारखं बरंच काही आहे - जे अजून दशांशानेही घेतलेलं नाहीये, हे माहीत आहे!

पुन्हा भेटूच!

 - नचिकेत जोशी

Thursday, May 17, 2012

... करार झाले

तुझे नि माझे नको तेवढे करार झाले
बुडलो आपण, नाते अन् सावकार झाले

इतकी अडचण झाली प्रेमापायी त्यांची
कितीक होकारही शेवटी नकार झाले!

तुला नकोसा आहे हे माहीत असुनही
खुळ्या मनाशी हवेहवेसे विचार झाले

करून झाले मनासारखे हरेक वेळी
वरवर नंतर फक्त खुलासे चिकार झाले

वेडा झालो तिच्याचसाठी, तिला समजले!
तिचे बहाणे हळूहळू मग हुशार झाले

बरेच झाले, मजला केवळ दु:ख मिळाले!
तिच्या बिचार्‍या सुखात वाटे हजार झाले

हिशेब माझ्या शब्दांचा एवढाच आला -
रूतले, चुकले अन् काही आरपार झाले

जगण्याला आयुष्यभराची कैद! तरी ते -
बघता बघता श्वासांसोबत पसार झाले

नचिकेत जोशी (११/५/२०१२)