Pages

Monday, August 22, 2011

उंबरा

जगावेगळे मागणे मागते मी
मला शोध तू, फक्त तू! - हरवते मी!

पुन्हा रंग येतो नव्याने ऋतूंना
पुन्हा फूल होऊन गंधाळते मी

कवडसे, झुले, आरसे, बंद खोल्या
अशा चौकटींशीच सैलावते मी

असा मान आहे समाजात मजला -
नजर चुकवते, झेलते, सोसते मी!

नभातून येते खुळी हाक त्याची
उभी स्तब्ध जागीच नादावते मी

जरी करपते रोज मेंदी चुलीवर
बिछान्यातला चंद्र सांभाळते मी

असे साचले काय आहे तळाशी
अशी का सतत खिन्न फेसाळते मी?

कधी एकटी भांडते मी स्वतःशी
अखेरी स्वतःलाच समजावते मी

जिथे पाय माझ्यात अडतो स्वतःचा
असा उंबरा रोज ओलांडते मी!

- नचिकेत जोशी(२२/८/२०११)

Thursday, August 11, 2011

चांदणे आहे खरे की...

चांदणे आहे खरे की भास नुसता?
भूतकाळाचा जिवाला त्रास नुसता!

अजुनही तितकीच आवडते मला ती
अजुनही फुलतो मनी मधुमास नुसता

अजुनही ती दाटते मेघांप्रमाणे
अजुनही मी बांधतो अदमास नुसता!

मार्ग होते वेगळे प्रत्येकवेळी
जवळ आल्याचा जरा आभास नुसता

ती तुझी नाहीच हे तू जाण वेड्या!
दोन खाटांनाच म्हण सहवास नुसता

अंबराचा थांगही लावेन म्हणतो
मोजला आहे धरेचा व्यास नुसता

मी विरक्ती घेतली आहे खरे तर
आत अजुनी नांदतो हव्यास नुसता!

मी कशी फेडू उधारी जीवना ही?
घेत असतो रोज मी गळफास नुसता

मी किती जगलो मलाही आठवेना
घेतला मी शेवटीही श्वास नुसता

- नचिकेत जोशी (११/८/२०११)

Friday, August 5, 2011

दु:ख म्हणजे सावली होती

माणसे गावातली होती
वाटले, ती आपली होती

गवगवा नुसताच दानाचा
मूठ त्यांनी झाकली होती

वेदनेच्या भरदुपारीही
आसवे सुस्तावली होती

मी सुखाच्या पुस्तकामधली
खंतही अभ्यासली होती

उंबरा ओलांडला तेव्हा
पावले रेंगाळली होती

मी खुळा समजून घेणारा!
(ती कुठे ओशाळली होती?)

मी जगावर प्रेम केले अन्
जवळच्यांशी जुंपली होती

वादळे नशिबातही होती
छप्परे भेगाळली होती

श्वास झाला उंच झोपाळा
ती अचानक भेटली होती

सुख उन्हासम तळपले होते
दु:ख म्हणजे सावली होती

- नचिकेत जोशी (५/८/२०११)